।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
वेल सेटल
समीर आज मुलगी पाहायला चालला होता…. सकाळपासून समीर च्या आई ची खुप गडबड सुरु होती… तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच, फक्त मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता.
समीर रुम मध्ये आवरत होता.. इतक्यात समीर ची आई आली… “समीर बेटा आवर पटकन… पाहुणे वाट पाहत असतील…”
“हम्म.. जाऊ चल.. आलोच..” समीर आवरुन हॉलमध्ये आला… आई तिथेच होती…“चला आईसाहेब” असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आई सुद्धा बाहेर पडली.
गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आईला विचारले “तु भेटली आहेस का त्यांना या आधी..”
“हो रे.. एकदा भेट झाली आहे आमची..”
“माझ्या अटींबद्दल सांगितले का..”
“हो… ते तयार आहेत.. अगदी तुझ्या मनासारखंच होईल..”
आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला… ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले… मुलीच्या वडीलांनी समीर आणि आईचे स्वागत केले… घरी बाकी सार्यांची ओळख करुन दिली आणि मुली च्या आईला म्हणाले,“किमया ला बोलवा..”
“हो..” किमया च्या आई हसतमुखाने म्हणाल्या… थोड्या वेळाने किमया आली…
शिडशिडीत, सावळी, सुंदर किमया… उंच, गोऱ्या समीरला शोभेल अशी… समीरला किमया पाहताक्षणी आवडली. तिने समीरच्या आईला वाकून नमस्कार केला, आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली.
काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला. नंतर किमयाच्या वडीलांनी तिला व समीरला एकांतात पाठवले…. समीर व किमया गच्चीत आले होते. दोन चार शब्दाची देवाणघेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला.. “तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर…”
“हो.. ते माहीती आहे की मला…
“कसं काय.??”
“म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या… म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला..”
“अस्सं… बर…” तसं तर मी आईला ही आताच नेणार होतो, पण ऐकत नाहीत आईसाहेब.. ”
यावर किमया म्हणाली. “म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला ..?? “
हो.. अर्थात…” समीर च्या या उत्तरावर किमायाच्या चेहऱ्यावरच्या छटाबदलल्या…
“काय झाल..??”
“काही नाही…”
“सांगा.. बिंधास्त.. मनात शंका ठेवून राहू नका”
“खरं सांगायचं, तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबई सारख्या सिटीमध्ये सेटल आहात, कारण पुण्या-मुंबई सारखं मनमोकळ इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते. पण, आता तुमच्या आई येणार म्हणजे…”
तिला मध्येच तोडत समीर म्हणाला… “मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे, चला जाऊया..”
“पण…”
“उरलेलं खाली जाऊन बोलू…”
ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून किमयाचे बाबा मिश्कीलिने बोलले..“लवकर आलात… तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करु,.”
“हो नक्की..” समीरच्या आई बोलल्या…
“ मला बोलायचं आहे… सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत…”
समीरच्या या वाक्यावर सगळे खुप दचकले..
“का… काही प्रॉब्लेम,.??? किमयाचे बाबा म्हणाले“
अक्च्युअली, मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावई ही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सुन नाही व्हायचं..”
“म्हणजे..” किमयाचे बाबा
“म्हणजे तिला फक्त मी हवा आहे.. माझी आई नको, माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही… तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही..”
“पण आम्ही हुंडा मागीतला तरी कुठे…?? आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की, तुम्हाला हुंडा नको म्हणून..”
“हो आम्हाला नकोच आहे हुंडा… पण तुमच्या मुलीला हवाय…”
“काही पण बोलू नका.. मी असं काही मागीतलं नाही आहे…”
“वेल सेटल, पुण्या-मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आई वडीलांची जबाबदारी नको, हा हुंडाच झाला की… आणि तो देणं मला जमणार नाही.. लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो, तर तुम्हाला आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का ग..?? जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत, तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात…
एखादी परिपुर्ण गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपुर्ण करण्यात खरी गंमत आहे… एखाद्याला स्विकारताना त्याच्या गुण-दोषांसोबत त्याची नाती सुद्धा मनापासून स्विकारली, तरच नातं खुलतं…. असो चल आई निघूया आपण….”
असे म्हणून समीर निघून गेला…. आणि निरुत्तरीत होऊन किमया व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होते….
मुलगा नोकरीला पाहीजे, स्वत:चे चांगले घर पाहीजे, खुप बँक बँलन्स पाहीजे, चारचाकी गाडी असावी आणी मुलाकडे खुप प्राँपर्टी असावी… हा पण एक हुंडाच आहे ना. कृपया गैरसमज करू नये, वरील घटना प्रत्येक विचारात घ्यावी.