जाणून घ्या शेवंती लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Shevanti Lagwad Mahiti Shevanti Sheti) – Shevanti Farming

शेवंती लागवड | Shevanti Lagwad | Shevanti Sheti | शेवंती लागवडीचे महत्त्व ।शेवंती पिक लागवडी खालील क्षेत्र । शेवंती पिक उत्पादन । शेवंती पिकास योग्य हवामान । शेवंती पिकास योग्य जमीन । शेवंती पिकाच्या जाती । शेवंती पिकाची अभिवृद्धी । शेवंती पिकाची लागवड पद्धती ।शेवंती पिक हंगाम । शेवंती पिक लागवडीचे अंतर ।शेवंती पिकास वळण । शेवंती पिकास छाटणीच्या पद्धती ।शेवंती पिक खत व्यवस्थापन । शेवंती पिक पाणी व्यवस्थापन । शेवंती पिकातील आंतरपिके ।शेवंती पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।शेवंती पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । शेवंती फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।शेवंती पिकातील तण आणि त्यांचे नियंत्रण । शेवंतीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

शेवंती लागवड | Shevanti Lagwad | Shevanti Sheti |

जगभर शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतात शेवंतीच्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. शेवंतीची फुले अत्यंत आकर्षक असतात. त्यांना विशिष्ट गंधही असतो. शेवंतीच्या फुलांचा वापर सण, उत्सव, देवपूजा, लग्नमंडपांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. परदेशात शेवंतीची फुले लांब फुलदांड्यासह सुशोभनासाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी आणि गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. जगातील फुलांच्या व्यापारामध्ये शेवंतीचा दुसरा नंबर लागतो हे आपणांस पुढील तक्त्यावरून दिसून येईल.

शेवंती लागवडीचे महत्त्व । Importance of Shewanti cultivation.

शेवंती हे दुष्काळी भागातील अत्यंत महत्त्वाचे फुलझाड आहे. शेवंतीच्या फुलांना आकर्षक सुवास असून त्यांचा उपयोग गजरे तयार करण्यासाठी, सजावटीसाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी अथवा हार तयार करण्यासाठी केला जातो. शेवंतीची फुले लवकर वाळत नाहीत आणि वाळलेली फुलेही चांगल्या रितीने टिकून राहू शकतात. या गुणधर्मामुळे तसेच परिसरातील वातावरण प्रसन्न राखण्यासाठी विशेषतः दसरा, दिवाळी, नाताळ, इत्यादी सण, पूजा, लग्नसमारंभ या प्रसंगी शेवंतीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मोठ्या आकाराच्या शेवंतीच्या फुलांचा उपयोग बागेत किंवा प्रदर्शनात मांडणीसाठी केला जातो. शेवंतीच्या फुलांच्या रंगछटा, आकार आणि फुलांची मांडणी यांमुळे हे साध्य झालेले आहे. चीन, जपान आणि कोरिया या देशांचे शेवंती हे राष्ट्रीय फूल आहे. भारतात शेवंतीची लागवड महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागांत केली जाते.
महाराष्ट्रात शेवंती हे दुष्काळी भागातील अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. सध्या या पिकाचे क्षेत्र जरी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यात एकवटलेले असले तरी पुणे, नाशिक, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही शेवंतीच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
शेवंती हे फुलझाड मूलतः चीनमधील असले तरी शेवंतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर जपानने केला. चीन, जपान, कोरिया, नेदरलँड, जर्मनी, इटली, अमेरिका, इत्यादी देशांत शेवंतीची लागवड मुख्यतः लांब दांड्यांच्या फुलांसाठी ( कट फ्लॉवर्स)
करतात.

शेवंती पिक लागवडी खालील क्षेत्र । शेवंती पिक उत्पादन । The area under Shewanti crop cultivation. Shewanti crop production.

भारतात शेवंतीची लागवड व्यापारी तत्त्वावर कर्नाटक, तामीळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यात होते.
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात शेवंतीखालील क्षेत्र प्रामुख्याने पारनेर-सुपा या दुष्काळी भागात एकवटलेले आहे. याशिवाय शेवंतीची तुरळक प्रमाणावर लागवड पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतही केली जाते. अतिपावसाच्या भागात शेवंतीची लागवड यशस्वी होत नाही.

शेवंती पिकास योग्य हवामान । शेवंती पिकास योग्य जमीन । Suitable climate for Shewanti crop. Land suitable for shevanti crop.

शेवंतीच्या झाडाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश, 12 ते 15 तासांचा दिवस आणि 20 ते 27 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. म्हणूनच महाराष्ट्रात शेवंतीची लागवड एप्रिल-मे महिन्यांत करतात. त्यामुळे एप्रिल ते जून- जुलै या 2 ते 3 महिन्यांच्या काळात झाडांची भरपूर शाखीय वाढ होते. शेवंतीच्या झाडाला कळया येण्यास आणि त्या फुलण्यास दिवस लहान आणि रात्रीचा कालावधी जास्त म्हणजेच 12 ते 14 तासांपर्यंत आणि तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस इतके असावे. अशा प्रकारे हवामान असलेल्या भागामध्ये शेवंतीची भरपूर वाढ होऊन उत्पादनही चांगले मिळते. शेवंतीच्या झाडाच्या शाखीय वाढीच्या काळात हवेतील आर्द्रता 70 ते 80 % असल्यास झाडांची भरपूर वाढ होते. मात्र फुले येण्याच्या कालावधीत हवामान कोरडे असणे आवश्यक आहे. त्यामुळेच कमी पावसाच्या भागात शेवंतीची लागवड यशस्वी होते. जास्त पाऊस असलेल्या भागात या पिकापासून फायदेशीर उत्पादन मिळू शकत नाही. जास्त पावसामुळे पानांवर काळे-पिवळे ठिपके (अल्टरनेरिया लीफ स्पॉट) पडून झाडाचे खूप नुकसान होते. त्यामुळे उत्पादनही कमी येते.
शेवंतीच्या झाडांची मुळे ही तंतुमय असल्यामुळे शेवंतीच्या लागवडीसाठी योग्य जमीन निवडणे फार महत्त्वाचे असते. शेवंतीच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. भारी, चोपण, खारवट, चुनखडीच्या जमिनी शेवंतीच्या लागवडीसाठी निवडू नयेत. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. अन्यथा मूळकूज होऊन अथवा जमिनीलगतच्या पानांवर काळे – पिवळे ठिपके पडून झाडे मरतात आणि उत्पादनही घटते.

शेवंती पिकाच्या जाती । Varieties of Shewanti crop.

जगात शेवंतीच्या 20,000 पेक्षा जास्त जाती असून भारतात 500 जातींची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात वर्षानुवर्षे शेवंतीची लागवड केल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात झिप्री, राजा, पिवळी रेवडी आणि पांढरी रेवडी या स्थानिक जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या जातींचे उत्पादन कमी असते. तसेच जास्त पाऊस पडल्यास त्या मोठ्या प्रमाणावर रोगास बळी पडतात. शेवंतीचा हार, गजरा, वेणी आणि गुच्छ यांसाठी योग्य असलेल्या जातींचा अभ्यास अखिल भारतीय समन्वित पुष्प सुधार योजना, गणेशखिंड, पुणे येथे घेण्यात आला. त्याचे मुख्य निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत

अ.क्र.जातीचे नावफुलांचा रंगहेक्टरी उत्पन्न (टन)
1झिप्रीपिवळा7 ते 8
2राजापांढरा7 ते 8
3पांढरी रेवडीपांढरा7 ते 9
4पिवळी रेवडीपिवळा6 ते 7
5सोनाली तारापिवळा10 ते 12
6आय. आय. एच. आर.
सिलेक्शन 4
पिवळा12 ते 13
7बग्गीपांढरा10 ते 11
8शरद मालाफिकट पांढरा12 ते 13
शेवंतीच्या विविध जातीं

अखिल भारतीय समन्वित पुष्प सुधार योजना, पुणे यांनी शिफारस केलेल्या प्रमुख जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.

आय. आय. एच. आर. सिलेक्शन 4 |

बंगलोर येथे भारतीय बागवानी संशोधन संस्थेने ही जात विकसित केली. या जातीची फुले पिवळया रंगाची असून फुलाचा आकार मध्यम असतो. पाकळ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे या जातीच्या फुलांना बाजारभाव जास्त मिळतो. पानावरील ठिपके या रोगास ही जात प्रतिकारक आहे. या जातीच्या फुलांचे उत्पादन हेक्टरी 12 ते 13 टन इतके मिळते.

सोनाली तारा |

ह्या जातीची फुले सोनेरी पिवळया रंगाची असून आकाराने मोठी असतात. फुलांचे वजन इतर जातींच्या मानाने जास्त असते. पॉलिहाऊसमध्ये लागवड केल्यास या जातीपासून मोकळ्या शेतीतील उत्पादनाच्या तुलनेत 53% जास्त उत्पन्न मिळते. या जातीपासून फुलांचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी 10 ते 12 टन इतके मिळते.

बग्गी ।

या जातीची फुले मध्यम आकाराची आणि पांढऱ्या रंगाची असतात. ही जात रोगांना कमी प्रमाणात बळी पडणारी आणि भरपूर फुले देणारी आहे. या जातीपासून फुलांचे हेक्टरी उत्पादन 10 ते 11 टन इतके मिळते.

शरद माला ।

ही जात बुटकी असून या जातीला लवकर फुले येतात. या जातीची फुले मध्यम आकाराची आणि फिकट पांढऱ्या रंगाची असतात. या जातीपासून फुलांचे उत्पादन हेक्टरी 12 ते 13 टन इतके मिळते.
याशिवाय शेवंतीच्या ब्युटी, स्नो बॉल, कस्तुरबा गांधी, स्नो या पांढऱ्या रंगाच्या जाती तर चंद्रमा, सोनार बांगला, सुपर जायंट या पिवळया रंगाच्या जाती तसेच महात्मा गांधी, क्लासिक ब्युटी आणि पिकॉक या फिकट निळया रंगाच्या मोठ्या फुलांच्या जाती असून त्या फुलदाणीसाठी योग्य आहेत. शरद शोभा, शरद शृंगार, हेमंत शृंगार, मोहिनी आणि मीरा या जाती कुंड्यांमधून किंवा फुलांचे ताटवे तयार करण्यासाठी वापरतात.

शेवंती पिकाची अभिवृद्धी । शेवंती पिकाची लागवड पद्धती । Growth of Shewanti crop. Cultivation method of Shewanti crop.

शेवंतीची लागवड मागील वर्षाच्या झाडापासून मिळालेल्या काश्यांपासून (सकर्स) केली जाते. लागवडीसाठी मुळचा किंवा काश्या काढताना काळजी घ्यावी लागते. बेणे म्हणून निवड करून ठेवलेल्या वाफ्यात जनावरे फिरू देऊ नयेत, तसेच या वाफ्यात गवत वाढू देऊ नये. बेण्याची काढणी करताना काश्यांचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. बेणे खोदण्यापूर्वी शेताला पाणी द्यावे. बेणे खोदल्यानंतर त्यांचे 10 ते 15 सेंटिमीटर लांबीचे तुकडे करून त्यांचे योग्य गठ्ठे बांधावेत आणि ओलाव्याच्या ठिकाणी सावलीत ठेवावेत. त्यापूर्वी रोगप्रसार टाळण्यासाठी शेवंतीचे निवडलेले बेणे बोर्डोमिश्रण अथवा बाविस्टीनच्या द्रावणात बुडवून काढावे. शेवंतीची लागवड प्रामुख्याने या पद्धतीने केली जात असली तरी समान वाढ आणि एकसारखे उत्पादन मिळण्यासाठी शेवंतीची अभिवृद्धी शेंडा कलम किंवा खोड कलम वापरूनही करतात. यासाठी निवडलेल्या शेंड्याची 10 ते 15 सेंटिमीटर लांबीची फुटी अथवा खोडाचा 10 सेंटिमीटर लांबीचा मध्यभाग निवडावा. शेंडा कलमाची खालची 4-5 पाने काढून शेंड्याकडील 2-3 कोवळी पाने ठेवावीत. खोड कलमाची सर्व पाने काढावीत. अशा बेण्याचा खालील भाग बुरशीनाशकाच्या द्रावणात 15 मिनिटे बुडवून सेरॅडिक्स अथवा केरॅडॅक्स या संजीवकाच्या भुकटीत बुडवून अथवा इंडॉल ब्युटिरिक अॅसिड या संजीवकांच्या 1,000 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणात बुडवून अशी कलमे बारीक वाळूत अथवा पॉलिथीन पिशवीत लावावीत. या कलमांना रोज नियमित पाणी द्यावे. साधारणपणे 20 ते 25 दिवसांत शेंडा कलमास तर 30 ते 40 दिवसांत खोड कलमास मुळया फुटतात. त्यानंतर चांगल्या तयार केलेल्या जमिनीत त्याचे स्थलांतर करावे.
याशिवाय शेवंतीची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून तसेच काही जातींमध्ये गुटी कलमांमार्फतही करतात. बी वापरून हंगामी शेवंतीची (बिजली) लागवड करतात.
शेवंतीची लागवड करावयाची असल्यास सरी-वरंबे अथवा सपाट वाफे तयार करून जमिनीची आखणी करावी. अशा जमिनीची उभी आडवी नांगरट करावी आणि कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. आधीच्या पिकाचे राहिलेले अवशेष गोळा करावेत. जमीन सपाट करून हेक्टरी 20 टन शेणखत मिसळून जमिनीच्या उताराच्या आडव्या 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात अथवा 3 x 2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.

शेवंती पिक हंगाम । शेवंती पिक लागवडीचे अंतर । Shewanti crop season. Shevanti Crop Cultivation Distance.

महाराष्ट्रात शेवंतीचे पीक वर्षांतून एकदा लागवड करून घेतले जाते. लागवडीचा हंगाम ठरविताना हवामान, जमीन, बाजारभाव आणि फुलांना कोणत्या काळात जास्त मागणी असते या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, शेवंतीला ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळी हंगामात फुले येत असल्याने त्याआधी 4 ते 5 महिने लागवड करणे आवश्यक असते. त्यामुळे शेवंतीच्या झाडांची भरपूर शाखीय वाढ होते, भरपूर फांद्या आणि उपफांद्या फुटतात आणि जास्त कळया लागून जास्त फुलांचे उत्पादन मिळते. लवकर फुले हवी असल्यास शेवंतीची लागवड साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात जेथे पाण्याची सोय आहे तेथे करावी. ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्यावरच लागवड केली जाते अशा ठिकाणी जून-जुलै महिन्यात लागवड करावी. लागवड 60 सेंटिमीटर अंतरावर सरी-वरंबे काढून सरीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक ओळीत 30 सेंटिमीटर अंतर ठेवून करावी. लांब दांड्याची फुले मिळविण्यासाठी 30 x 15 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.

शेवंती पिकास वळण । शेवंती पिकास छाटणीच्या पद्धती । Shevanti crop turn. Methods of pruning Shewanti crops.

नुकत्याच लागवड केलेल्या शेवंतीच्या रोपांना सरीतील मातीने भर देऊन चांगला आधार द्यावा. शेवंतीचे रोप हे ठिसूळ लाकडाचे बनलेले असल्यामुळे त्याचे जोराचा वारा अथवा पाऊस यांपासून संरक्षण करावे लागते. त्यासाठी शक्यतो ज्या ठिकाणी शेवंतीची लागवड करावयाची आहे तेथे शेवरीसारख्या वारारोधक झाडांची 2 ते 3 ओळींत बांधाच्या कडेला लागवड करावी. विशेषतः पश्चिमेकडून अशी लागवड करावी. झाडांना वेळोवेळी खोदणी करून मातीची भर द्यावी. शेवंतीची उंच वाढणारी जात असल्यास काठ्या लावून झाडे 2-3 ठिकाणी सुतळीने बांधावीत. झाड जमिनीवर कोलमडून पडून पाने, कळया आणि फुले यांचा ओल्या मातीशी संपर्क येतो आणि त्या ठिकाणी बुरशी वाढून पानांवर ठिपके पडतात. पाने पिवळी पडून वाळतात, कळया उमलत नाहीत तर फुले खराब होतात. हे टाळण्यासाठी झाडांची वाढ मर्यादित ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी लागवड केल्यानंतर झाड जास्त उंच वाढू न देता 3-4 आठवड्यांनी त्याचा शेंडा खुडावा. साधारणपणे शेंड्याचा 10 सेंटिमीटर भाग खुडावा. यालाच इंग्रजीत पिंचिंग असे म्हणतात. त्यामुळे झाडावर 3-4 फांद्या चारही दिशांना वाढतात आणि झाडाची सर्वसाधारण सारखी वाढ होते. रोपे उंच न वाढता पसरट वाढतात. त्यांच्यावर उपफांद्या जास्त फुटतात आणि कळचा जास्त लागून फुलांची संख्याही जास्त मिळते. लागवडीनंतर साधारणपणे एक महिन्यानंतर शेवंतीचा शेंडा खुडावा. लवकर अथवा उशिरा शेंडा खुडल्यास फुलांची अपेक्षित संख्या मिळत नाही. शेवंतीच्या झाडाला वळण देताना रोगट पाने, कमकुवत फांद्या अथवा रोगट फांद्या कात्रीने कापून काढाव्यात. शेवंतीच्या पिकापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आणि पिकाची अनावश्यक शाखीय वाढ रोखून झाडांचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी संजीवकांचा वापर केला जातो. मॅलिक हायड्रॅझाईड या रसायनाचे 1,000 पीपीएम तीव्रतेचे द्रावण अथवा सायकोसिल या रसायनाचे 500 पीपीएम तीव्रतेचे द्रावण लागवडीनंतर चार आठवड्यांनी शेवंतीच्या पिकावर फवारल्यास झाडे बुटकी राहतात. झाडांना उपफांद्या जास्त फुटून जास्त फुले मिळतात.
शेवंतीची लागवड इतर देशांत कटफ्लॉवर्स म्हणून केली जाते. यामध्ये शेवंतीच्या एका दांड्यावर 7-8 फुले असतील तर त्यास स्प्रे प्रकार असे म्हणतात. एका लांब दांड्यावर शेंड्यावर एकच मोठे आकर्षक फूल असेल तर त्यास स्टैंडर्ड शेवंती असे म्हणतात.
शेवंतीची लांब दांड्याची फुले फुलदाणीत ठेवण्यासाठी, गुच्छ तयार करण्यासाठी अथवा सुशोभनासाठी वापरतात. शेवंतीची लांब दांड्याची फुले मिळविण्यासाठी वळण देण्याच्या प्रचलित पद्धतीत काही बदल करावे लागतात.

स्प्रे प्रकार ।

शेवंतीची लागवड केल्यानंतर 1 महिन्यानंतर रोपाचा शेंडा खुडावा. त्यामुळे राहिलेल्या खोडावर एकाच जागी फांद्या फुटतात. यांपैकी 5 फांद्या ठेवून इतर फांद्या काढाव्यात. या सर्व फांद्यांना उपफांद्या फुटून त्यांवर कळया येतात आणि प्रत्येक स्प्रेला 10 फुले आणि 30-40 सेंटिमीटर लांबी मिळते. अशा प्रकारची लांब दांड्या असलेली शेवंतीची 4-5 स्प्रे असलेली जुडी बाजारात विकता येते. विशेषतः दसरा-दिवाळीनंतर शेवंतीच्या सुट्या फुलांना मर्यादित मागणी असल्यामुळे भाव कमी असतो. या काळात स्प्रे प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेण्यासाठी भरपूर वाव आहे.

स्टैंडर्ड प्रकार ।

या प्रकारच्या शेवंतीमध्ये एका लांब फांदीच्या शेंड्यावर एकच मोठे गोंडेदार फूल वाढविले जाते. यासाठी लागवड केल्यापासून झाडाच्या वाढीवर लक्ष ठेवावे लागते. झाडावर फांद्या वाढू नयेत म्हणून पानांच्या बगलेत असलेली नाजूक डोळ्यांची फूट वेळोवेळी काढून टाकतात. त्यामुळे शेवंतीच्या मुख्य खोडावर फांद्याच नसतात आणि शेंड्यावर फक्त एकच कळी ठेवतात. या प्रकारास इंग्रजीत डिसबडिंग असे म्हणतात.

शेवंती पिक खत व्यवस्थापन । शेवंती पिक पाणी व्यवस्थापन । Shewanti Crop Fertilizer Management. Shevanti crop water management.

शेवंतीच्या वाढीसाठी आणि फुलांच्या उत्तम गुणवत्तेसाठी सर्व अन्नघटकांचा संतुलित पुरवठा होणे आवश्यक आहे. शेवंतीच्या पिकाला कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन या वायूंशिवाय स्फुरद, पालाश, चुना, लोह, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनीज, सल्फर, मॉलिब्डेनम, जस्त या खनिजांचीही आवश्यकता असते. यांपैकी कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे हवेतून आणि पाण्याच्या विघटनातून घेतले जातात. नत्रासह इतर सर्व खनिजे ही शेवंतीच्या जमिनीतून पुरविली जातात. परंतु नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये शेवंतीच्या पिकाला जास्त प्रमाणात लागतात. शेवंतीच्या पिकाला दर हेक्टरी 40 टन शेणखत, 200 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश या प्रमाणात खताची मात्रा दिल्यास भरपूर उत्पादन मिळते. शेणखत आणि स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीत मिसळून द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 15 दिवसांनी तर दुसरा हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी द्यावा.
जमीन अत्यंत हलकी, माळरान प्रकारची असल्यास काही वेळा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. अशा वेळी आवश्यकतेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या 0.5% द्रावणाची फवारणी करावी.

नत्र खते देताना झाडाच्या पानांवर खताचे दाणे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण त्यामुळे पाने करपतात. तसेच नत्रखत एकदम बुंध्याला लागूनही देऊ नये. नत्रखत सम प्रमाणात पसरेल याची काळजी घ्यावी. दिलेल्या खतावर मातीचा पातळ थर द्यावा आणि शक्य झाल्यास त्वरित पाणी द्यावे.
शेवंतीच्या पिकाची मुळे फार खोलवर जात नाहीत. त्यामुळे लागवड केल्यापासून पावसाळा सुरू होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे 4-5 दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे. पावसाळ्यात पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाचा ताण पडल्यास एक-दोन वेळा पाणी द्यावे. पावसाळ्यात पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. एक दिवसापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत असल्यास आणि पाण्याचा त्वरित निचरा होत नसेल तर ताबडतोब शेवंतीचे पीक मलूल पडून सुकू लागते, कारण जमिनीतील पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे मुळांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन वायू पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे झाडाच्या मुळाची श्वसनक्रिया थांबते. पर्यायाने झाड मलूल पडून सुकत जाते. असे होऊ नये म्हणून शेवंती अशा प्रकारच्या जमिनीत लावली असल्यास पावसाळयाच्या सुरुवातीला पाण्याचा निचरा होण्यासाठी शेताच्या उताराकडील बाजूने 60 सेंटिमीटर खोलवर चर काढून ठेवावेत.
शेवंतीच्या वाढीसाठी तसेच कळया येण्याच्या सुमारास व फुले उमलण्याच्या सुरुवातीपासून ते फुलांची संपूर्ण तोडणी होईपर्यंत झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये अन्यथा झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर तसेच फुलांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून शेवंतीला वारंवार हलक्या पाण्याच्या पाळया द्याव्यात. मात्र सरीत जास्त काळ पाणी राहील इतके पाणी देऊ नये. त्यामुळे मूळकूज नावाचा रोग होऊन झाडे मरतात.

शेवंती पिकातील आंतरपिके । Inter-crops in Shewanti crop.

शेवंतीची वाढ सुरुवातीला सावकाश होते; परंतु लागवडीचे अंतर कमी असल्यामुळे तसेच सरीच्या दोन्ही बाजूंना लागवड केली जात असल्यामुळे शेवंतीमध्ये शक्यतो आंतरपिके घेऊ नयेत. परंतु जमीन, खत, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा समन्वित वापर करण्याच्या दृष्टीने उन्हाळयात काही प्रमाणात मिरची, मेथी, चाकवत, शेपू अथवा कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या घेतल्यास त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळते; परंतु त्यासाठी उन्हाळयात त्या शेतात भरपूर पाणी असणे आवश्यक आहे.

शेवंतीमध्ये आंतरपिकाची निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात :

(1) आंतरपिकाची काढणी शेवंतीला फुले येण्यापूर्वी करावी.

(2) आंतरपिकांची वाढ झपाट्याने होऊन त्यामुळे शेवंतीचे पीक झाकले जाऊ नये.

(3) आंतरपिकांमुळे शेवंतीच्या पिकावर रोग आणि किडी पसरणार नाहीत याची खात्री करावी.

काही शेतकरी शेवंतीची लागवड करताना वरंब्याच्या मधोमध ग्लॅडिओलस या पिकाची लागवड करतात आणि सरीच्या दोन्ही बाजूंना शेवंती लावतात. ग्लॅडिओलसची फुले 2-3 महिन्यांत निघून आल्यानंतर त्यांचे कंदही चांगले पोसले जातात आणि नंतर शेवंतीची फुले काढणीस येतात. म्हणजेच एकाच वेळी एकाच शेतात दोन पिकेही घेता येतात. यासाठी दोन्ही पिकांची नियोजनबद्ध लागवड करणे आवश्यक आहे.

शेवंती पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Shewanti crop and their control.

मावा (अॅफिड्स्) :

ही कीड शेवंतीच्या कोवळ्या फांद्यांवर, पानांवर, शेंड्यांवर आणि कळीच्या दांड्यांवर राहून अन्नरस शोषण करते. त्यामुळे शेंड्याची वाढ थांबते. कळया खुरटतात. अर्धवट उमलतात. त्यामुळे फुलांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम
होतो.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 15 मिलिलीटर मॅलॅथिऑन 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

फुलकिडे (थ्रिप्स) :

या किडीचा उपद्रव उन्हाळ्यात आणि पावसाळयात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. फुलकिडे शेवंतीची फुले आणि कळयांमधील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने वेडीवाकडी होतात, झाडे निस्तेज दिसतात. त्यामुळे फुलांची गुणवत्ता आणि उत्पादन कमी होते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन ( 50 % प्रवाही) 10 लीटर या प्रमाणात पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

पाने खाणारी अळी (हेअरी कॅटरपीलर) :

ही अळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. ही अळी शेवंतीची संपूर्ण पाने खाते. त्यामुळे झाडाचा फक्त सांगाडा शिल्लक राहतो.

फुलांच्या कळचा लागण्याच्या सुमारास कळयांवरसुद्धा या अळयांचा उपद्रव होतो. नवीन कळया येण्याचे प्रमाण कमी होते.

उपाय : सुरुवातीला अळयांचा उपद्रव कमी प्रमाणात असतो. त्या वेळी अळया गोळा करून नष्ट कराव्यात. अळयांचा उपद्रव जास्त प्रमाणात असल्यास 12 मिलिलीटर इकॅलक्स (35% प्रवाही) अथवा थायोडॉन (35% प्रवाही) 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे अथवा 40 ग्रॅम कार्बारिल (50%) 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.

लाल कोळी (रेड माईट्स्) :

हे लहान आकाराचे आणि लाल रंगाचे कोळी पानांच्या खालच्या बाजूस राहून जाळचा तयार करतात व पानातील अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात, झाड सुकण्यास सुरुवात होते, पानांची आणि कळयांची वाढ खुंटते, कळचा पूर्ण उमलत नाहीत. फुलांची प्रत खराब होते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक अथवा 10 मिलिलीटर केलथेन 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.

पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) :

ही अळी पानांच्या कडा एकत्र आणून गुंडाळी करते व त्यात राहते आणि पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर नागमोडी आकाराचे पांढरे पट्टे दिसतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मिथिल डेमेटॉन किंवा 3 मिलिलीटर फॉस्फॉमिडॉन मिसळून फवारावे. रोगट, किडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत.

शेवंती पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Shewanti crop and their control.

पानांवरील ठिपके आणि मर कूज किंवा रोपांची मर या दोन प्रमुख बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शेवंतीच्या पिकांवर होतो.

पानावरील ठिपके (लीफ स्पॉट) :

या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पावसाळी अथवा दमट हवामानात मोठ्या प्रमाणात होतो. प्रथम जमिनीलगतच्या पानांवर काळपट तपकिरी रंगाचे आणि गोल आकाराचे ठिपके पडतात. हे ठिपके आकाराने मोठे होत जाऊन एकमेकांत मिसळतात, त्यामुळे संपूर्ण पान करपते. रोगाचा प्रसार झाडाच्या बुंध्यापासून सुरू होऊन झाडाच्या शेंड्याकडे पसरत जातो. फांद्यांची संख्या कमी होते. फुलांचा आकार आणि संख्या यांवर अनिष्ट परिणाम होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 (78%) अथवा 26 ग्रॅम डायथेन झेड-78 (78%) मिसळून पिकावर फवारावे. रोगाला बळी न पडणाऱ्या जातीची लागवड करावी. रोगट पाने काढून झाड स्वच्छ ठेवावे.

रोपांची मर (विल्ट) :

या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळापासून ते कळया व फुले येईपर्यंत होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडाचे खोड तपकिरी रंगाचे होऊन पाने पिवळी पडून मलूल होतात. काही दिवसांनी पूर्ण झाड सुकून जाते. भारी जमिनीत हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात झाडाच्या मुळाशी डायथेन एम-45 या बुरशीनाशकाचे 0.2% तीव्रतेचे द्रावण ओतावे (यासाठी 26 ग्रॅम डायथेन एम-45 घेऊन ते 10 लीटर पाण्यात मिसळावे). रोपे शेतात लावण्यापूर्वी रोपांची मुळे 25 ग्रॅम थायरम अथवा 40 ग्रॅम कॅप्टन दहा लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवावीत.

खोडकूज (स्टेम रॉट) :

या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत वाढणाऱ्या बुरशीपासून होतो. जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीलगत असलेले खोड काळसर पडते आणि पाने खालून वर सुकत जातात. काही दिवसांनी संपूर्ण झाड मरते.

उपाय : रोगमुक्त झाडे लागवडीसाठी वापरावीत. लागवडीपूर्वी रोपे 40 ग्रॅम कॅप्टान अथवा 25 ग्रॅम थायरम अथवा 20 ग्रॅम बाविस्टीन दहा लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून लावावीत. झाडाच्या खोडाशी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास झाडाच्या खोडाजवळ जमिनीत 20 ग्रॅम बाविस्टीन अथवा 20 ग्रॅम कॅप्टान दहा लीटर पाण्यात मिसळून तयार केलेले बुरशीनाशकाचे द्रावण ओतावे.

मूळकूज रोग (रूट रॉट) :

ह्या रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात होतो. रोपाच्या मुळाजवळ पाणी साचून राहिल्यामुळे रोपाची मुळे कुजतात काही दिवसांनी संपूर्ण झाड मरते.

उपाय : रोगमुक्त रोपांचा लागवडीसाठी वापर करावा. रोगट किंवा रोगाची लागण झालेली रोपे लगेच काढून टाकावीत. झाडाच्या मुळाजवळ जमिनीत 25 ग्रॅम थायरम (80%) दहा लीटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण ओतावे.

भुरी :

या रोगामुळे पानांवर पांढरी बुरशी वाढते, पानांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. रोगाचे लगेच नियंत्रण न केल्यास पानगळ होते. अशा झाडांना कमी आणि लहान फुले लागतात. कळया पूर्ण उमलत नाहीत. फुलांच्या खालच्या बाजूस, देठाजवळ रोग पसरल्यास फुले माना टाकतात, सुकतात आणि वाळून जातात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 6 ग्रॅम कॅरथेन किंवा 10 ग्रॅम बाविस्टीन मिसळून पिकावर फवारणी करावी.

तांबेरा :

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन संपूर्ण पान तांबरलेले दिसते. काही दिवसांनी पान काळपट होऊन गळून पडते, नवीन कळया येण्याचे थांबते. नवीन पालवी कमी प्रमाणात येते. त्यामुळे फुले लागण्याचे प्रमाण अतिशय कमी असते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ग्रॅम डायथेन एम-45, 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.

शेवंती पिकातील तण आणि त्यांचे नियंत्रण । Weeds in Shewanti crop and their control.

शेवंतीची लागवड हलक्या, मुरमाड आणि चांगल्या निचऱ्याच्या शेतात केली जात असल्यामुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो; परंतु लागवडीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करून आधीच्या पिकांचे तसेच तणांचे अवशेष काढून टाकले नाही तर या पिकांतही हरळी, लव्हाळा यांसारख्या बहुवर्षायु तणांचा उपद्रव होतो. याशिवाय योग्य प्रकारे तयार न केलेल्या कंपोस्टमधून तसेच पाटाच्या पाण्यातून चिमणचारा, घोळ, चाबूक काटा, पांढरी फुली, तेरडा, इत्यादी तणांचा प्रादुर्भाव होतो. या तणांच्या नियंत्रणासाठी शेवंतीची लागवड केल्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा निंदणी केल्यास दोन-तीन निंदणीत सर्व तणांचे नियंत्रण होते; परंतु तणांकडे दुर्लक्ष झाल्यास शेवंतीच्या पिकाची वाढ नीट होत नाही. म्हणूनच योग्य वेळी तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. शेवंतीच्या पिकातील हंगामी तणे दोनतीन खुरपण्यांत कमी होतात. परंतु बहुवर्षायु तणे विशेषतः लव्हाळा आणि हरळीचा उपद्रव लवकर कमी होत नाही. त्यासाठी पूर्वमशागत चांगली करणे जास्त फायदेशीर ठरते. पावसाळयात लव्हाळा उगवून आल्यास हातांनी मुळांसह उपटून काढावा. शेवंतीच्या पिकातील हरळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागवड करण्यापूर्वी 2-3 खोल नांगरटी करून उपटून आलेल्या सर्व काश्या गोळा करून व्यवस्थित जाळून टाकाव्यात. .जमिनीत गाडल्या गेलेल्या काश्या पुन्हा कुळवणी करून वर काढाव्यात आणि त्या वेचून नष्ट कराव्यात. पावसाळ्यात पीक लावल्यानंतर हरळी उगवून आलेली दिसल्यास ती त्वरित खोदून काढावी.
शेवंतीच्या शेतात हरळी आणि लव्हाळयाचा उपद्रव जास्त प्रमाणात होऊ शकतो; कारण फुलांची काढणी झाल्यानंतरही पुढील वर्षाची नवीन लागवड करण्यासाठी, काश्या मिळविण्यासाठी (बेण्यासाठी) शेवंतीचे पीक शेतात ठेवावे लागते आणि तिला पाणी द्यावे लागते. अशा वेळी हरळी आणि लव्हाळा ही दोन्ही तणे जास्त प्रमाणात येतात; परंतु सुरुवातीपासून तणांचे नियमित नियंत्रण केल्यास शेतात तणांचा उपद्रव कमी होतो.

शेवंतीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Shevanti flowers.

शेवंतीच्या लागवडीनंतर 5-6 महिन्यांनी फुले लागतात. लागवडीनंतर सुरुवातीचे तीन महिने शेवंतीची शाखीय वाढ होते आणि त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी फुले फुलू लागतात. आपल्याकडील शेवंती ही लहान दिवसमान असतानाच फुलते. म्हणून ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत ती फुलते. शेवंतीच्या फुलांची काढणी करताना कोणत्या उद्देशासाठी शेवंती लावली आहे, त्यानुसार काढणीची वेळ आणि फुलांची अवस्था आधीच ठरवून काढणी करावी. सर्वसाधारणपणे सुटी फुले काढून त्यांचा उपयोग हार, वेण्या करण्यासाठी तसेच कटफ्लॉवरसाठी शेवंतीच्या फुलांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते.

सुट्या फुलांसाठी काढणी करणे ।

हार, गजरा, वेण्या, तोरणे किंवा देवपूजेसाठी शेवंतीची लागवड केली असल्यास काढणी करताना पूर्ण उमललेली फुले 1 सेंटिमीटर लांब देठ ठेवून झाडापासून हातांनी काळजीपूर्वक तोडावीत. अर्धवट उमललेली किंवा कळीच्या अवस्थेतील फुले तोडू नयेत कारण अशी फुले नंतर पूर्ण उमलत नाहीत. पूर्ण उमललेली फुले तोडताना झाडाच्या इतर फांद्या आणि कळया मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण शेवंतीच्या फांद्या ठिसूळ असतात आणि त्या साध्या धक्क्यानेही मोडतात. त्यामुळे नुकसान होते. शेवंतीची फुले तोडल्यानंतर लगेच बांबूच्या छोट्या पाट्यांमध्ये ठेवावीत. फुले जमिनीत मातीवर ठेवू नयेत. फुले तोडणीचे काम शक्यतो सकाळी आठ वाजेच्या आत करावे; म्हणजे फुलांचे वजन चांगले भरते. तोडणी उन्हात केल्यास अथवा तोडलेली फुले उन्हात राहिल्यास त्यांच्या पाकळया गळतात, रंग फिकट होतो आणि गुणवत्ता कमी होते. पूर्ण उमललेली फुले जास्त काळ झाडावर राहिल्यासही ती तोडताना पाकळया गळतात आणि रंगाने फिकट होतात म्हणून फुले उमलल्यानंतर ती जास्त काळ झाडावर राहू न देता त्यांची लगेच काढणी करावी. फुलांची तोडणी एकदा सुरू झाल्यानंतर दर 3-4 दिवसांनी फुले वेचणीस येतात. अशा 8-10 तोडण्या केल्यास संपूर्ण शेतातील सर्व फुलांची तोडणी पूर्ण होते.
शेवंतीची काढलेली फुले बागेतच झाडांच्या सावलीखाली अथवा सावली करून गोणपाटावर किंवा पॉलिथीन कागदावर किंवा ताडपत्री अंथरून कमी उंचीचे ढीग करून ठेवावी. नंतर किडलेली किंवा खराब झालेली फुले वेगळी करून राहिलेल्या फुलांची मोठी, मध्यम आणि बारीक अशा तीन गटांत विभागून प्रतवारी करावी. बाजारपेठेनुसार विक्रीसाठी फुलांचे पॅकिंग करावे. उदाहरणार्थ, लांबची बाजारपेठ असल्यास आणि फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यास प्रतवारीप्रमाणे फुले विभागून गोणपाटाच्या पोत्यांत भरावीत. बाजारपेठ जवळ असल्यास 15-20 किलोच्या बाबूंच्या हाऱ्यात भरावीत आणि हायला वरच्या बाजूस गोणपाटाच्या कापडाने शिवून घ्यावे. बाजारपेठेत प्रतवारीप्रमाणे भाव मिळत असल्यास दोन-दोन किलोच्या बांबूच्या करंड्यांत फुले भरावीत. करंड्यांमध्ये तळाशी कडूनिंबाच्या पाल्याचा थर देऊन त्यावर फुले रचावीत. बांबूची करंडी बांबूच्याच विणलेल्या झाकणाने बंद करून शिवून घ्यावी. अशा प्रकारे करंड्यांत फुले भरून लांबच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत. शेवंतीची फुले काढल्यापासून विक्री होईपर्यंत केव्हाही त्यांच्यावर पाण्याचा मारा करू नये, त्यामुळे फुले काळी पडतात आणि कुजू लागतात.

कटफ्लॉवर्ससाठी काढणी करणे ।

परदेशामध्ये शेवंतीचा उपयोग कटफ्लॉवर म्हणून करतात. या फुलांचा उपयोग गुच्छ बांधण्यासाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी आणि वेगवेगळया समारंभाच्या सुशोभनासाठी केला जातो. परदेशीय बाजारपेठेत शेवंतीचा उपयोग कटफ्लॉवरसाठीच होतो आणि कटफ्लॉवर्स म्हणून गुलाबानंतर शेवंतीचाच वापर केला जातो. भारतात शेवंतीचा उपयोग कटफ्लॉवर्स म्हणून फारसा होत नसला तरी शेवंतीच्या विविधरंगी, मनोहारी जातींमुळे शेवंतीचा कटफ्लॉवर्स म्हणून उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे दसरा-दिवाळी या सणांव्यतिरिक्तच्या काळात शेवंतीला जो कमी भाव मिळतो तोही टाळता येईल. यासाठी शेवंतीची लागवड 30 x 20 सेंटिमीटर किंवा 30 x 15 सेंटिमीटर अंतरावर करून शेंडा खुडून 4-5 फांद्या वाढू द्याव्यात. दाट लागवड केल्यामुळे फांद्या उभट वाढतात आणि फुलदांड्याची अपेक्षित लांबी मिळते. आच्छादन केल्यास फांद्यांची लांबी 70-80 सेंटिमीटर इतकी मिळते आणि प्रत्येक फांदीवर उपफांद्या फुटून 20-22 फुले मिळतात. असे फुलदांडे 15-16 दिवस फुलदाणीत चांगले टिकतात.प्रत्येक फुलदांड्यावर 5-6 फुले पूर्ण उमललेल्या अवस्थेत, 5-6 फुले उमलत्या अवस्थेत तर 5-6 कळीच्या अवस्थेत असताना फुलदांडा झाडापासून 2-3 सेंटिमीटर अंतर ठेवून कात्रीने काळजीपूर्वक कापावा आणि त्याची खालची पाने हाताने काढून दांड्याचा खालचा भाग पाण्याने अर्धवट भरलेल्या बादलीत बुडवावा. अशा प्रकारे तयार असलेल्या प्रत्येक फुलदांड्याची पाहणी करून काढणीयोग्य फुलदांड्याची काढणी करावी. प्रत्येक फुलदांड्याचा खालचा भाग पाण्यात बुडेल असे बघावे. सर्व फुलदांड्यांची काढणी केल्यानंतर बादल्या शेतातच झाडाखाली अथवा स्वतंत्रपणे तयार केलेल्या सावलीत आणाव्यात. अशा ठिकाणी तापमान शेतातील तापमानापेक्षा थोडे कमी असते. सावली केलेल्या छपरावर गारवेल नावाचा हिरवा वेल वाढवलेला असल्यास तापमान कमी राखण्यास मदत होते. फुलांची काढणी सकाळी 8 वाजेपर्यंत करावी. उशिरा फुलदांडे काढल्यास त्यांवरील फुले तुटू लागतात आणि त्यांची गुणवत्ता कमी होते. फुलदांडे 6 तास पाण्यातच ठेवावेत. नंतर त्यांच्या जुड्या बांधाव्यात. जुड्या बांधताना प्रत्येक फुलदांड्याचे निरीक्षण करून त्यावरील वाळलेली, रोगट आणि किडीग्रस्त पाने काढून टाकावीत. दांड्यावरील खालच्या बाजूने 15 सेंटिमीटरपर्यंतची सर्व पाने हाताने अथवा कात्रीने काढावीत. जुड्या बांधताना वेगवेगळी रंगसंगती साधून प्रत्येक जातीच्या दोन-दोन काड्या (स्प्रे ) एकत्र करून अशा 5 विविध जातींच्या एकूण दहा काड्यांची एक जुडी बांधावी.

त्यासाठी प्रथम सर्व काड्यांची लांबीनुसार पुढीलप्रमाणे प्रतवारी करावी :

अ वर्ग 45 ते 60 सेंमी.

ब वर्ग 30 ते 45 सेंमी.

क वर्ग 30 सेंमी. पेक्षा कमी

परदेशात स्प्रे प्रकारच्या शेवंतीपेक्षा स्टैंडर्ड प्रकारच्या शेवंतीला जास्त मागणी असते. स्टैंडर्ड जातीत एकाच दांड्यावर एकच मोठे आकर्षक फूल असते. या दांड्याची लांबी कमीत कमी 80 सेंटिमीटर आणि जास्तीत जास्त एक मीटर असते.
शेवंतीच्या दहा-दहा काड्यांच्या समान लांबीच्या विविध जातींच्या अथवा एकाच रंगाच्या समूहाच्या जुड्या बांधून त्या बादलीतील पाण्यात बुडवून ठेवाव्यात. नंतर त्यांची बाजारासाठी पाठवणी करताना कार्डबोर्डच्या 75 सेंटिमीटर लांब, 30 सेंटिमीटर रुंद आणि 30 सेंटिमीटर खोल अशा बॉक्समध्ये आडवी मांडणी करावी. त्यापूर्वी प्रत्येक जुडीच्या फुलांकडील भागाला वर्तमानपत्राच्या रद्दीच्या कागदाने गुंडाळावे आणि दोऱ्याने 2-3 ठिकाणी बांधावे. बॉक्समध्ये जुड्या भरल्यानंतर बॉक्स बंद करून लगेच विक्रीसाठी पाठवावे.
सुट्या फुलांचे उत्पादन जातीनुसार हवामान आणि मशागतीप्रमाणे कमी-जास्त येते. शेवंतीच्या स्थानिक जातीचे (झिप्री) उत्पादन दर हेक्टरी सरासरी 6 ते 7 टन इतके मिळते. तर सोनाली तारा, बग्गी, सिलेक्शन – 4 या सुधारित जातींचे उत्पादन दर हेक्टरी 12 ते 15 टन इतके मिळते. या फुलांची घाऊक विक्री पुणे, मुंबई येथील फुलांच्या बाजारात स्वतः शेतकरी करतात अथवा अडत्यांमार्फत विक्री केली जाते. त्यानंतर त्यांची किरकोळीने अथवा हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमार्फत दसरा किंवा दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी विक्री केली जाते. अडत्ये आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना फुलांचा भाव अतिशय कमी मिळतो. शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमधील फुलांच्या बाजारात शेतकऱ्यांनी त्यांची फुले अडत्यांना न विकता येथे आणून स्वतःच विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अडत्यांना कमिशन न जाता शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळू शकतो. दरवर्षी पुणे येथील गुलटेकडी मार्केटमध्ये विविध फुलांची विक्री या पद्धतीने केली जाते. सन 1991-92 साली एकूण 5 कोटी रुपयांच्या फुलांची विक्री या बाजारात झाली. त्यात इतर फुलांप्रमाणेच शेवंतीचा बराच मोठा वाटा आहे. दिवाळीनंतर शेवंतीच्या फुलांना बाजारभाव कमी असतो, अशा वेळी शेवंतीच्या फुलांची कटफ्लॉवर म्हणून जुड्या बांधून विक्री करावी.
कटफ्लॉवर्ससाठी स्थानिक जाती योग्य नाहीत, कारण त्यांच्या फुलांचा आकार लहान असून त्यांना लांब फुलदांडा नसतो. सोनाली तारा, सिलेक्शन- 4, सिलेक्शन 5, मोहिनी, बग्गी या जातींची फुले सुट्या फुलांप्रमाणेच कटफ्लॉवर्ससाठीही योग्य आहेत; कारण त्यांना लांब फुलदांडा असतो, फुले आकाराने मोठी आणि आकर्षक असतात आणि ती फुलदाणीत जास्त काळ टिकतात.

शेवंती फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Shewanti flowers.

शेवंतीच्या फुलांच्या काढणीनंतर त्यांची गुणवत्तेप्रमाणे प्रतवारी करावी. सुटी फुले असतील तर जातिपरत्वे, रंगाप्रमाणे, आकाराप्रमाणे प्रतवारी करून ती बाजारात पाठवितात. बाजारभाव खूपच कमी झाले असल्यास फुलांची साठवण शीतगृहात करावी. विशेषत: ज्या शेतकऱ्यांनी लागवड लवकर केल्यामुळे त्यांची फुले दसरा अथवा दिवाळी या सणापूर्वीच काढणीस आल्यास त्यांना भाव कमी मिळतो. अशा वेळी काढलेली फुले गोणपाटात भरून अथवा बांबूच्या 15 ते 20 किलो क्षमतेच्या करंड्यांत भरून करंड्या वरच्या बाजूस गोणपाटाच्या फडक्याने शिवून घ्याव्यात. या करंड्या शीतगृहात 5 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवून दसऱ्याच्या 1-2 दिवस आधी किंवा दिवाळीच्या 1-2 दिवस आधी फुले बाजारात आणून जास्त उत्पन्न मिळविता येईल. यासाठी शीतगृह, बाजारपेठ आणि उत्पादन केंद्र ही सर्व जवळजवळ असावीत; अन्यथा फुलांच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. पुणे परिसरात हे शक्य आहे, कारण या बाजारात येणारी बहुतेक शेवंतीची फुले ही पारनेर-सुपा, नारायणगाव, जुन्नर, सोलू, आळंदी, यवत आणि दौंड या भागातून येतात. गुलटेकडी मार्केटयार्डला लागूनच महाराष्ट्र शासनाचे शीतगृह आहे. अल्पशा भाड्याने शेतकरी त्यांची शेवंतीची फुले जर अपेक्षित वेळीच विक्रीस आणावयाची असतील, तर या शीतगृहात साठवून नियोजन करून चांगला बाजारभाव मिळवू शकतात. शेवंतीचा बाजारभाव फुले जेवढी ताजी असतील त्या प्रमाणात मिळतो.
कटफ्लॉवर्स प्रकारची फुले ही कार्डबोर्डच्या खोक्यात ठेवून बंद खोकी नियंत्रित तापमानाच्या बंद गाडीमार्फतच बाजारात पाठवितात. या गाडीचे आतील तापमान 5 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे फुले खराब न होता ती जास्त काळ टिकतात.

सारांश ।

जगभर तसेच भारतातही शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेवंती है वैशिष्ट्यपूर्ण फुलपीक असून शेवंतीच्या शाखीय वाढीच्या काळात मोठे दिवसमान आणि भरपूर सूर्यप्रकाश लागतो तर फुले येण्यासाठी लहान दिवसमान आवश्यक असते. जगभर शेवंतीची फुले लांब दांड्याच्या फुलांसाठी फुलदाणीत ठेवण्यासाठी वापरतात. भारतात ही फुले हार, तोरण, गजरा, वेण्या, माळा यांसाठी, सणाच्या वेळी सजावटीला व लग्नमंडपाच्या सजावटीसाठी वापरतात. शेवंतीमध्ये असंख्य जाती असल्या तरी काही विशिष्ट रंगाच्या जातींनाच भारतात मागणी असते.
शेवंतीच्या सोनाली तारा, बग्गी, सिलेक्शन 4 ह्या सुधारित जाती असून त्यांचे उत्पादन स्थानिक जातीपेक्षा दीड ते दोन पट जास्त असते. आणि या जाती रोगासही कमी प्रमाणात बळी पडतात.
शेवंतीची लागवड करण्यासाठी आधीच्या पिकातील काश्या (सकर्स) वापरतात किंवा शेंडे कलम वापरूनही शेवंतीची लागवड करतात. शेवंतीच्या लागवडीसाठी जमीन हलकी ते मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. जमिनीची उभी-आडवी नांगरट करून 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 30 सेंटिमीटर अंतरावर चांगले जोमदार सकर्स निवडून अथवा शेंडा कलम निवडून मार्च-एप्रिल महिन्यांत शेवंतीची लागवड करावी. उन्हाळयात पिकाला पाण्याच्या नियमित पाळया द्याव्यात. पावसाळयात शेवंतीच्या बागेत पाणी साचू नये म्हणून काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर 4 आठवड्यांनी शेवंतीचा शेंडा खुडावा म्हणजे तिला उपफांद्या फुटतात व त्या भरपूर वाढून जास्त उत्पादन मिळते. शेवंतीचे जास्त उत्पादन मिळण्यासाठी हेक्टरी 40 टन शेणखत, 200 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 5-6 महिन्यांनी जातिपरत्वे शेवंतीला फुले येतात. हंगाम व बाजारातील मागणी बघून शेवंतीची पूर्ण उमललेली फुले बागेतून वेचावी आणि व्यवस्थित बांधून बाजारात पाठवावीत. बाजारभाव कमी असल्यास फुले करंड्यांत अथवा पोत्यांत बांधून शीतगृहात 5 अंश सेल्सिअस तापमानात साठवावीत. स्प्रे किंवा स्टैंडर्ड प्रकारातील शेवंती योग्य वेळी काढून जुड्या बांधून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. शेवंतीच्या सुट्या फुलांचे उत्पादन हेक्टरी 8 ते 15 टनांपर्यंत मिळते.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )