जाणून घ्या ग्लॅडिओलस लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gladiolus Lagwad Mahiti Gladiolus Sheti) – Gladiolus Farming

ग्लॅडिओलस लागवड | Gladiolus Lagwad | Gladiolus Sheti |ग्लॅडिओलस पिकाचे महत्त्व ।ग्लॅडिओलस पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन ।ग्लॅडिओलस पिकास योग्य हवामान । ग्लॅडिओलस पिकास योग्य जमीन । ग्लॅडिओलस उन्नत जाती ।ग्लॅडिओलस पिकाची अभिवृद्धी | ग्लॅडिओलस पिकाची लागवड पद्धती ।ग्लॅडिओलससाठी योग्य हंगाम । ग्लॅडिओलससाठी योग्य लागवडीचे अंतर ।ग्लॅडिओलस पिक खत व्यवस्थापन । ग्लॅडिओलस पिक पाणी व्यवस्थापन । ग्लॅडिओलस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । ग्लॅडिओलस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।ग्लॅडिओलस पिकातील तण नियंत्रण ।फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।ग्लॅडिओलसच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । ग्लॅडिओलसच्या कंदांची काढणी आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

ग्लॅडिओलस लागवड | Gladiolus Lagwad | Gladiolus Sheti |

महाराष्ट्र हे एक फुलशेती करणारे प्रगत राज्य आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात निशिगंध, गुलाब यांसारख्या पारंपरिक फुलझाडांबरोबर ग्लॅडिओलससारख्या अपारंपरिक फुलझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्लॅडिओलसच्या फुलांना पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांत वर्षभर मागणी असते. युरोपीय देशांमध्ये ज्या काळात प्रतिकूल हवामानामुळे ग्लॅडिओलसच्या फुलांचे उत्पादन घेणे शक्य नसते, त्या काळात आपल्या हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे वाढते आणि त्यामुळे ही फुले परदेशात पाठविण्यास चांगला वाव आहे.

ग्लॅडिओलस पिकाचे महत्त्व । Importance of gladiolus crop.

इंद्रधनुतील सप्तरंगांची उधळण असणाऱ्या विविध जाती आणि क्रमशः उमलत जाणारी टिकाऊ फुले यामुळे ग्लॅडिओलसची फुले दिवाणखान्यात अथवा पंचतारांकित उपाहारगृहांत फुलदाणीत ठेवण्यासाठी उत्कृष्ट समजली जातात. ग्लॅडिओलसच्या फुलांचे गुच्छ खूपच आकर्षक दिसतात. उद्यानातील आणि इमारतीच्या परिसरातील प्रांगणामध्ये या फुलांचे ताटवे मनमोहक दिसतात.
फुलदाणीत ठेवण्याकरिता आणि गुच्छांकरिता ग्लॅडिओलसची फुले उपयुक्त असल्यामुळे पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात या फुलांना भरपूर मागणी असते. त्यामुळेच या फुलांना चांगली किंमत मिळते. महाराष्ट्रात कटफ्लॉवर्स म्हणून ग्लॅडिओलसच्या फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्लॅडिओलसच्या पिकाला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच या पिकाखालील क्षेत्र वाढविण्यास भरपूर वाव आहे. परदेशात ग्लॅडिओलसच्या काही जातींचे कंद भाजून खाण्यासाठी तसेच औषधी म्हणून
वापरतात.

ग्लॅडिओलस पिकाखालील क्षेत्र । ग्लॅडिओलस पिक उत्पादन । Area under gladiolus crop. Gladiolus crop production.

ग्लॅडिओलसच्या बहुतेक जातींचे मूळस्थान दक्षिण आफ्रिका हा देश आहे. ग्रीसमध्ये 1578 पासून या पिकाची लागवड केली जात होती. तेथून फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, हॉलंड आणि उत्तर अमेरिका या देशांत या पिकाचा प्रसार झाला. हॉलंड आणि फ्रान्स या देशांत अठराव्या शतकात या पिकाच्या संकरित जाती तयार करण्यात आल्या. त्यानंतर या जातींचा बेल्जियम, प्रसार इतर देशांमध्ये झाला. आज जगातील अमेरिका, हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत, इत्यादी देशांत ग्लॅडिओलसची लागवड केली जाते. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, काश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, इत्यादी राज्यांत ग्लॅडिओलसची लागवड केली जाते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांत ग्लॅडिओलसची व्यापारी तत्त्वावर लागवड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ग्लॅडिओलस या पिकाच्या लागवडीखाली सुमारे 300 हेक्टर क्षेत्र आहे.

ग्लॅडिओलस पिकास योग्य हवामान । ग्लॅडिओलस पिकास योग्य जमीन । Suitable climate for gladiolus crop. Land suitable for gladiolus crop.

भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम पाऊस आणि थंड हवामान असलेल्या भागात ग्लॅडिओलसचे पीक चांगले वाढते. सामान्यपणे 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये पिकाची वाढ चांगली होऊन आकर्षक रंगाची फुले येतात. दीर्घ काळ पडणारा जोरदार पाऊस आणि कडक उन्हाळा या पिकाच्या वाढीस आणि उत्पादनास अपायकारक ठरतो.
हलक्या, मध्यम तसेच पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. ग्लॅडिओलसच्या फुलांच्या उत्पादनाइतकेच जमिनीतील कंदांचे उत्पादनही महत्त्वाचे असते. जमिनीत कंदाची चांगली वाढ झाली तरच चांगल्या प्रतीची फुले येतात. ग्लॅडिओलसची मुळे ही जास्त खोल जात नाहीत म्हणून पिकाच्या वाढीच्या काळात मुळांभोवती ओलावा टिकून राहणे आवश्यक असते. ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी सुपीक, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणारी, 4.5 ते 7.5 सामू असणारी, उत्तम निचऱ्याची जमीन उत्कृष्ट समजली जाते. अत्यंत बरड (मुरमाड ), चुनखडीयुक्त आणि पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि फुलांच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो.

ग्लॅडिओलस उन्नत जाती । Gladiolus Advanced Varieties.

या कंदवर्गीय फुलझाडांच्या फुलांमध्ये बी तयार करण्याची चांगली क्षमता असल्यामुळे नैसर्गिक आणि कृत्रिम संकर पद्धतीने या पिकाच्या 30,000 पेक्षा जास्त जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांत सतत भर पडत आहे. भारतामध्ये अमेरिका, इंग्लंड, हॉलंड, रशिया, इत्यादी देशांमधून आयात केलेल्या अनेक जाती प्रचलित आहेत. त्याखेरीज

भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली आणि भारतीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोर येथे विकसित केलेल्या काही जाती तसेच परदेशातील काही जातींचा अखिल भारतीय समन्वित पुष्प सुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे 7 येथे तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. ग्लॅडिओलसच्या काही प्रमुख जातींची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

अ.क्र.जातीचे नावफुलांचा रंगदांड्यावरील
फुलांची संख्या
फुले येण्यास
लागणारा कालावधी
(दिवस)
1सुचित्राफिकट गुलाबी16-1775-80
2आय. ए. आर. आय.सिलेक्शन-1लाल13-1480-85
3ट्रॉपिक सीजनिळा13-1475-80
4सपनापिवळसर पांढरा15-1660-65
5नझरानागर्द गुलाबी13-1480-85
6संसरेपांढरा20-2175-80
7यलो स्टोनपिवळा15-1680-85
8हंटिंग सॉंगकेशरी15-1680-85
9ऑस्करगर्द लाल15-1885-90
ग्लॅडिओलसच्या प्रमुख जातींची माहिती
फुलांचा रंग जाती
पांढराअल्थेना, कॉटन ब्लॉसम, ड्रीम गर्ल, इस्टर्न स्टार, आयसिकल, जेनिफर, लिपस्टिक, ल्यूनार मॉथ, मारजोरी अन, मेलिसा, माइटी माईट, मून फ्रॉस्ट, मॉर्निंग ब्राईड, सिंप्लीसिटी, स्नोड्रॉप, स्नोडस्ट, सुपर स्टार, व्हाईट एनचान्ट्रेस, व्हाईट फ्रेंडशिप, व्हाईट ओक, व्हाईट वंडर.
हिरवाआर्म स्ट्रॉंग, ग्रीन बे, ग्रीन बर्ड, ग्रीन जायंट, ग्रीन वूडपेकर, ग्रीन विलो, फॉरेस्ट ग्लेड, लेमन लाईम, मिंटज्युलिप, ओअॅसिस.
पिवळाअरोरा, ब्राईटसाईड, चायनीज लॅटर्न, फातिमा, फोकसॉंग, गोल्डन हार्वेस्ट, गोल्डन पीच, ज्युनियर प्रॉम, लेमन रफल्स, लाईमलाईट, मेडूसा, मॉर्निंग सन, नगेट, रॉयल गोल्ड, स्वीट फेअरी.
केशरीऑटम ग्लो, कोरल सीज, फॉक्सफायर, जिप्सी डान्सर, लीटर मो, ऑरेंज ब्युटी, ऑरेंज चीफॉन, सेटिंग सन, टॅन्जेरीन.
गुलाबीअमेरिका, डॉन पिंक, ड्रेसडन डॉल, एनचान्ट्रेस, फ्लॉस फ्लोरियम, फ्रेंडशीप, हॉवर्ड, किंबर्ली, लिजेंड, मिस अमेरिका, मिस सालेम, पिंक फॉर्मल, पिंक चिअर, पिंक प्रॉस्पेक्टर, पिंक ट्रायंफ, पावडर पफ, स्पाईस अँड स्पॅन, स्प्रिंग सॉंग, सुपर रफल, स्वीट डेबी, टी पार्टी, टु लव्ह.
लालब्लॅक प्रिन्स, डिकॅथॅलॉन, डेलिशियस, डिक्सिलैंड, एक्लिप्स, फातिमा, लिटल स्लॅम, म्युझिक मॅन, ऑस्कर रेड बैंटम, रीडीम, दी बार्टन
लव्हेंडर आणि पर्पलऑल अॅग्लो, अॅनिव्हर्सरी, डॉन मिस्ट, इलिगन्स, लव्हेंडर मास्टर पीस, मेमोरेंडम, पर्पल जायंट, पर्पल मॉथ, शालिमार
ब्राऊनऑटम सेन्सेशन, ब्राऊन व्युटी, चॉकलेट चीप, चॉकलेट डीप, चॉकलेट मिस्टिक ग्लो, लिटल टायगर
फुलांच्या रंगानुसार ग्लॅडिओलसच्या विविध जाती

भारतात निरनिराळ्या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या ग्लॅडिओलसच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत :

(अ) नॅशनल बोटॅनिकल रीसर्च इन्स्टिट्यूट, लखनौ येथे विकसित करण्यात आलेल्या जाती

(1) मनमोहन, (2) मुक्ता, (3) मनीषा, (4) मनहर, (5) मोहिनी

(आ) भारतीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोर येथे विकसित करण्यात आलेल्या जाती

(1) अप्सरा, (2) आरती, (3) शोभा, (4) सपना, (5) नजराना, (6) पूनम

(इ) भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आलेल्या जाती

(1) अग्निरेखा, (2) मयूर, (3) सुचित्रा

ग्लॅडिओलस पिकाची अभिवृद्धी | ग्लॅडिओलस पिकाची लागवड पद्धती । Growth of gladiolus crop | Cultivation method of gladiolus crop.

ग्लॅडिओलसची लागवड जमिनीत वाढणाऱ्या कंदापासून करतात. जमिनीत जो मोठा कंद लावतात, त्याला इंग्रजीत कॉर्म असे म्हणतात. कंद जमिनीत लावल्यावर त्यापासून 1 ते 3 मोठे कंद आणि 5 ते 25 लहान कंद मिळतात. लहान कंदांना इंग्रजीत कॉर्मेल असे म्हणतात. ग्लॅडिओलसच्या पहिल्या पिकाच्या फुलांचे दांडे छाटून घेतल्यावर सुमारे दोन ते अडीच महिन्यांनी झाडाची पाने पिवळी पडतात. या वेळी जमिनीतील लहानमोठे कंद काढून घेतात. हे कंद लगेच लागवडीसाठी वापरता येत नाहीत. ते जातिपरत्वे 2 ते 4 महिने विश्रांतीसाठी ठेवून नंतर लागवडीसाठी वापरावेत. लहान कंद मोठे होण्यासाठी एक ते तीन हंगाम ते जमिनीत लावावेत आणि मोठे झाल्यावर फुलांच्या उत्पादनासाठी वापरावेत. जिबरेलिक अॅसिडसारख्या संजीवकांचा काळजीपूर्वक वापर केला तर शेतातून काढलेल्या कंदांचा 2 ते 3 महिने विश्रांतीचा काळ कमी करून ते कंद लवकर लागवडीकरिता वापरता येतात.
जमिनीतून कंद काढल्यानंतर आणि लागवडीपूर्वी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम बाविस्टीन मिसळून तयार केलेल्या द्रावणात सुमारे 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवल्यास कंदावर मर रोगाची लागण होत नाही. लागवडीपूर्वी कंद 1 % थायोयुरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणात अर्धा तास बुडवून नंतर लागवड केल्यास उगवण जोमदार होते.
लागवडीसाठी निवडलेले कंद मोठे (4 सेंटिमीटरपेक्षा जास्त व्यास) असल्यास आणि त्यांची विश्रांती पूर्ण झाली असल्यास त्यांना लवकर फुले येतात.
कंदांची लागवड सरी-वरंबा पद्धतीने अथवा गादीवाफ्यावर करतात. पिकामध्ये पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा व्हावा यासाठी तसेच कामाच्या सुलभतेच्या दृष्टीने गादीवाफ्यावर लागवड करणे जास्त फायदेशीर ठरते. गादीवाफा पद्धतीने लागवड करताना 90 सेंटिमीटर रुंदीचे आणि 20 सेंटिमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये 60 ते 75 सेंटिमीटर अंतर ठेवावे. जमिनीच्या मगदुरानुसार गादीवाफ्यावर 30 X 10 किंवा 30 x 20 सेंटिमीटर अंतरावर कंदांची लागवड करावी. सरी-वरंबा पद्धतीने 60 सेंटिमीटर अंतरावर सरी काढून सरीमध्ये लागवड करता येते.

ग्लॅडिओलससाठी योग्य हंगाम । ग्लॅडिओलससाठी योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for gladiolus. Proper Planting Spacing for Gladiolus

ग्लॅडिओलसच्या लागवडीचे खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम आहेत. खरीप हंगामासाठी जून-जुलै महिन्यांत आणि रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत कंदांची लागवड करतात. जास्त पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरसारख्या प्रदेशात ग्लॅडिओलसची लागवड खरीप हंगामात करता येत नाही. मात्र त्या ठिकाणी उन्हाळा कडक नसल्यामुळे लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करता येते. मध्यम पाऊस आणि सौम्य उन्हाळा असलेल्या भागात या पिकाची लागवड वर्षभर कोणत्याही काळात करता येते.
ग्लॅडिओलसची लागवड सपाट वाफ्यांमध्ये अथवा सऱ्या काढून करता येते. पावसाळयात भारी जमिनीमध्ये सऱ्या काढून लागवड करणे फायदेशीर असते. जातीनुसार आणि जमिनीच्या मगदुरानुसार दोन ओळींतील अंतर 30 ते 60 सेंटिमीटर आणि ओळीतील दोन कंदांमधील अंतर 10 ते 20 सेंटिमीटर ठेवून लागवड करतात. कंदांची लागवड जमिनीमध्ये 5 ते 10 सेंटिमीटर खोलीवर करावी. कंद जास्त उथळ लावल्यास फुले आल्यावर झाड कोलमडण्याची शक्यता असते. मात्र ग्लॅडिओलसचे कंद उथळ लावल्यास लहान कंदांची जास्त उत्पत्ती होऊन वाढही चांगली होते. लागवडीच्या अंतरानुसार ग्लॅडिओलसचे हेक्टरी सुमारे एक ते दीड लाख कंद लागतात. जेव्हा लागवडीसाठी कंद मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आणि कंदांच्या उत्पत्तीपेक्षा फुलांचे उत्पादन महत्त्वाचे असते, तेव्हा या पिकाची अधिक दाट लागवड करून हेक्टरी अडीच लाख किंवा त्याहून अधिक कंद लावले जातात.

ग्लॅडिओलस पिक खत व्यवस्थापन । ग्लॅडिओलस पिक पाणी व्यवस्थापन । Gladiolus Crop Fertilizer Management. Gladiolus crop water management.

फुलांच्या उत्पादनाबरोबर जमिनीत कंदांची निर्मिती आणि प्रति हेक्टरी झाडांची भरपूर संख्या यांमुळे ग्लॅडिओलसच्या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. म्हणून ताग, पैंचा यांसारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करावा. त्याचबरोबर उत्तम कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत हेक्टरी 30 ते 50 टन या प्रमाणात जमिनीत टाकून ते मातीत चांगले मिसळून घेतल्यास जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा चांगल्या प्रकारे होऊन पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर पूर्ण होते. शेणखतामध्ये थोडी क्लोरडेन पावडर टाकल्यास हुमणीचा बंदोबस्त करण्यास मदत होते. ग्लॅडिओलसच्या पिकाला भरखतांबरोबर रासायनिक खतांची आवश्यकता असते. पिकाच्या वाढीसाठी आणि जमिनीतील कंदांच्या उत्पादनासाठी नत्रयुक्त खतांची गरज फार मोठी आहे. नत्राअभावी झाडांची पाने पिवळी पडतात. फुलांच्या दांड्यांची निर्मिती, वाढ, फुलांची संख्या आणि जमिनीतील कंदांची वाढ यांकरिता ग्लॅडिओलसच्या पिकाला नत्राबरोबर स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचीदेखील तितकीच आवश्यकता असते.

ग्लॅडिओलसची मुळे फार खोलवर जात नसल्यामुळे पिकाला योग्य आणि नियमितपणे पाणीपुरवठा करण्याची गरज असते. कंदांच्या लागवडीनंतर लगेच पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलांचे दांडे छाटून घेतल्यावरदेखील पुढे दीड ते दोन महिने पिकाला नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. पिकाला अपुरा पाणीपुरवठा केल्यास फुलांची वाढ आणि कंदांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

ग्लॅडिओलस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of gladiolus crop and their control.

ग्लॅडिओलसच्या पिकाला खोड कुरतडणाऱ्या अळया, पाने खाणाऱ्या अळया आणि फुलकिडे या किडींचा उपद्रव होतो.

खोड कुरतडणाऱ्या अळया :

या अळया पीकवाढीच्या काळात पिकावर हल्ला चढवितात. काळया रंगाच्या या अळया जमिनीतील वरच्या थरात राहून झाडाचे खोड जमिनीलगत कुरतडतात आणि झाडाचा गाभा खातात. त्यामुळे झाड सुकून मरते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी क्लोरडेन अथवा हेप्टाक्लोर भुकटी हेक्टरी 50 किलो या प्रमाणात जमिनीत टाकावी. नंतर अळयांचा उपद्रव दिसताच पुन्हा झाडाच्या खोडाभोवती हेप्टाक्लोर भुकटी टाकून ती मातीत मिसळून घ्यावी.

पाने खाणाऱ्या अळया :

या अळया झाडांची पाने खातात. काही वेळा फुलदांड्यावर अथवा फुलांवरही उपद्रव करतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

फुलकिडे :

फुलकिडे झाडाची पाने, कोवळे शेंडे, फुलदांडे यांवर राहून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुकतात, फुलदांड्याची प्रत कमी होते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस या प्रमाणात मिसळून फवारावे.

सूत्रकृमी :

सूत्रकृमी ग्लॅडिओलसच्या मुळांमधील पेशींमध्ये राहून रस शोषण करतात. सूत्रकृमींमुळे मुळांवर गाठी तयार होतात. मुळांची तसेच कंदांची कूज होते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

उपाय : सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी 20 किलो कार्बोफ्युरॉन दर हेक्टरी जमिनीत मिसळावे.

ग्लॅडिओलस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of gladiolus crop and their control.

मर रोग :

या बुरशीजन्य रोगामुळे प्रथम झाडाची पाने पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव कंदावर झाला असल्यास असे कंद न उगवता जमिनीतच कुजतात अथवा उगवणीनंतर झाडे काही दिवसांत पिवळी पडून मरतात. फुले येण्याच्या काळात रोगाची लागण झाल्यास पाने पिवळसर पडतात, झाडाची वाढ खुंटते. काही वेळा काही जातींमध्ये रोगट झाडांची वाढ सरळ उभी न होता वेडीवाकडी होते. एका बाजूला पानांची अर्धवर्तुळाकार वाढ दिसून येते.

उपाय : हा रोग होऊ नये म्हणून शक्यतो रोगप्रतिबंधक जातींची निवड (उदाहरणार्थ, सिटेसिनस हायब्रीड, सिलेक्शन – 1 ) करावी. ग्लॅडिओलसच्या बऱ्याच आकर्षक जाती या रोगाला थोड्याफार प्रमाणात बळी पडतात; परंतु जास्त प्रमाणात बळी पडणाऱ्या अॅपल ब्लॉसम, किंग लिअर अशा जातींची लागवड टाळावी. परप्रांतातून अथवा परदेशातून नवीन जाती आणताना एका जातीचे कंद मोठ्या प्रमाणावर न आणता थोडे कंद आणून ते रोगाला जखमा बळी पडतात किंवा कसे हे पाहून मगच मोठ्या प्रमाणावर कंद आणावेत. लागवडीसाठी रोगट कंद वापरू नयेत. बेणे निरोगी ठेवण्यासाठी कंद जमिनीतून काढल्यानंतर खरचटलेले, झालेले अथवा रोगग्रस्त कंद बाजूला काढावेत. निवडलेले कंद 10 लीटर पाण्यात 60 ग्रॅम कॅप्टान मिसळून तयार केलेल्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून घ्यावेत. नंतर 8 ते 10 दिवस कंद चांगले सुकवून त्यांची साठवण करावी. कंदांच्या लागवडीपूर्वी कंद पुन्हा कॅप्टान या बुरशीनाशकाच्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून घ्यावेत. लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास झाडाच्या बुंध्याभोवती 10 लीटर पाण्यात 60 ग्रॅम कॅप्टान किंवा 40 ग्रॅम काडेझिम मिसळून तयार केलेले द्रावण ओतावे.

साठवणीमधील कंदांची कूज:

ग्लॅडिओलसच्या पूर्वीच्या पिकाचे कंद जमिनीतून काढल्यानंतर पुढील वर्षांसाठी 4 ते 5 महिने साठवून ठेवले जातात. या काळात बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास कंदावर तांबूस तपकिरी, काळपट, खोलगट ठिपके पडतात. हे ठिपके वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात आणि कंदाची कूज सुरू होते. काही वेळा मोठ्या आकाराच्या कंदामध्ये तळापासून कूज होऊन मध्यभागी पोकळ छिद्र दिसून येते आणि कंद बांगडीप्रमाणे दिसतो. काही वेळा कंदावर काळसर, हिरवट, पांढरट किंवा गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी काढणी करताना कंदांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. साठवणीपूर्वी कंद 10 लीटर पाण्यात 30 ग्रॅम थायरम किंवा 30 ग्रॅम कॅप्टान मिसळून तयार केलेल्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे भिजवून घ्यावेत. पावसाळ्यात कंदांची काढणी करताना योग्य काळजी घ्यावी.

कर्म्युलॅरिया करपा :

हा रोग कहुलॅरिया ट्रायफोली नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत वाढते. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर राखाडी रंगाचे ठिपके पडतात. ठिपक्यांच्या कडा तांबूस असून आकार लांबट गोल असतो. काही काळाने ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पान करपते. रोगाचे प्रमाण वाढल्यास खोडावर आणि कंदावरही ठिपके पडतात. फुले वेड्यावाकड्या आकारात उमलतात आणि पाकळ्यांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.

उपाय : करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जमिनीत ग्लॅडिओलसची लागवड करू नये. रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 मिसळून पिकावर फवारावे.

अल्टरनेरिया लीफ स्पॉट :

हा रोग अल्टरनेरिया फॅसीक्युलॅटा नावाच्या बुरशीमुळे होतो. या बुरशीची लागण झालेल्या पानांवर तांबूस काळपट, वेड्यावाकड्या आकाराचे ठिपके पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

विषाणुजन्य रोग :

ग्लॅडिओलसच्या पिकावर ककुंबर मोझॅइक, टोमॅटो रिंग स्पॉट, अॅस्टर यलो, टोबॅको रॅटल, इत्यादी विषाणूंच्या प्रजातींचा प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे झाडाची पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते, फुलदांड्यांचा आकार वेडावाकडा होतो. त्यामुळे फुलांची प्रत कमी होते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी निश्चित उपाययोजना नाही. मात्र या रोगाच्या प्रतिबंधासाठी या रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे या किडींचे नियंत्रण करावे. लागवडीसाठी रोगमुक्त बेणे निवडावे.

ग्लॅडिओलस पिकातील तण नियंत्रण । Weed control in gladiolus crops.

ग्लॅडिओलसच्या पिकाच्या लागवडीपूर्वी हरळी, लव्हाळा, कुंदा यांसारख्या बहुवर्षायु तणांचा नायनाट करावा. नंतर पिकाच्या वाढीच्या काळात 2 ते 3 खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. • दुसऱ्या खुरपणीच्या वेळी म्हणजेच लागवडीनंतर सुमारे 5 ते 6 आठवड्यांनी हलकी खणणी करून खोडाजवळ मातीची भर घालावी. त्यामुळे पुढे फुलांच्या वजनामुळे झाड कोलमडत नाही.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

ग्लॅडिओलसच्या कंदांच्या लागवडीनंतर जातीनुसार 50 ते 90 दिवसांत ग्लॅडिओलसची फुले उमलू लागतात. लागवडीसाठी निवडलेल्या कंदांचा आकार, त्यांची विश्रांतीची अवस्था आणि लागवडीची खोली यांवर फुले उमलण्याचा कालावधी अवलंबून असतो. मोठ्या आकाराचे विश्रांती पूर्ण झालेले कंद जमिनीत थोडे वर लावल्यास त्यांना लवकर फुले येतात. लहान आकाराचे कंद जमिनीत खोल लावल्यास त्यांना उशिरा फुले येतात. सपना, पूनम यांसारख्या जातींना 50 ते 60 दिवसांत फुले लागतात. तर आय. ए. आर. आय. सिलेक्शन – 1, सिटेसिनस हायब्रीड यांसारख्या जाती 90 दिवसांत फुलू लागतात.

ग्लॅडिओलसच्या फुलांच्या काढणीचे वैशिष्ट्य म्हणजे फुलदांड्यावरील सर्व फुले उमलण्याची वाट न पाहता फुलांच्या दांड्यावरील पहिले फूल उमलण्याच्या अवस्थेत येऊन रंग दाखवू लागताच झाडाची किमान 4 पाने ठेवून फुलांचा दांडा छाटून घ्यावा. जमिनीत वाढणाऱ्या उपकंदाची वाढ ही झाडावर शिल्लक ठेवलेल्या पानांवरच अवलंबून असते. म्हणूनच फुलदांड्याची काढणी करताना झाडावर किमान 4 पाने ठेवून दांड्याची छाटणी करावी. फुलाचा दांडा छाटून घेतला, की त्याचा तळाकडील 5 सेंटिमीटर भाग पाण्यात बुडवून ठेवावा. यासाठी फुलांच्या काढणीच्या वेळी बादलीत थोडे पाणी भरून न्यावे.
एक हेक्टर क्षेत्रामधून जातीनुसार आणि लागवडीच्या अंतरानुसार सुमारे 70,000 ते 90,000 फुलदांडे मिळतात.

ग्लॅडिओलसच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of gladiolus flowers.

सर्वसाधारणपणे स्थानिक बाजारपेठेसाठी ग्लॅडिओलसच्या 10 ते 12 फुलदांड्यांची एक जुडी बांधावी. नंतर 25 ते 30 जुड्यांचा एकत्रित गठ्ठा बांधून त्याभोवती गवत अथवा केळीची पाने बांधून हे गठ्ठे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावेत. लांबच्या बाजारपेठेसाठी एकाच उंचीचे आणि योग्य रंगसंगतीचे फुलदांडे एका जुडीत बांधावेत. फुलदांड्यांभोवती बटर पेपर किंवा वर्तमानपत्राचा कागद गुंडाळावा. नंतर फुलदांड्यांच्या जुड्या 120 सेंटिमीटर लांब, 60 सेंटिमीटर रुंद आणि 30 सेंटिमीटर उंच अशा आकाराच्या पुट्ट्याच्या अथवा चटईच्या खोक्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठवाव्यात.
थोड्या कालावधीसाठी फुले साठवून ठेवायची असल्यास 2.3 ते 4.5 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या शीतगृहामध्ये एक आठवड्यापर्यंत ठेवून नंतर विक्रीसाठी पाठविता येतात.
फुलदाणीत ठेवलेली फुले जास्त दिवस टिकण्याकरिता फुलदाणीत 2% साखरेचे द्रावण आणि 200 पीपीएम 8 एच. क्यू. सी. हे द्रावण ठेवावे. मात्र दर 24 तासांनी हे द्रावण बदलावे आणि फुलांच्या दांड्यांची फुलदाणीतील टोके किंचित छाटून टाकावीत.

ग्लॅडिओलसच्या कंदांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of gladiolus tubers.

ग्लॅडिओलसच्या फुलांच्या दांड्यावरील पहिल्या फुलाने रंग दाखविल्यावर तो दांडा छाटून घेतात. त्यानंतर शिल्लक ठेवलेल्या पानांतील अन्नांशावर कंदांचे पोषण होते. कंद चांगला पोसण्यासाठी आणि लवकर तयार होण्यासाठी जमिनीत कंदाभोवती मोरचूद व चुना यांचे मिश्रण ओतावे. यासाठी 2 किलो मोरचूद, 2 किलो चुना, 2 किलो डायअमोनियम फॉस्फेट, 2 किलो पोटॅशियम सल्फेट 100 लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. त्यानंतर पिकाला हलके पाणी देऊन नंतर ताण द्यावा. फुलदांड्यांची छाटणी केल्यानंतर सुमारे अडीच ते तीन महिन्यांनंतर झाडाची पाने पिवळी पडून सुकू लागतात. जमिनीतील कंदांचा पांढुरका रंग बदलून ते तपकिरी रंगांचे होतात. या वेळी जमिनीतील कंदांना इजा होणार नाही याची काळजी घेऊन कुदळीने हे कंद खोदून जमिनीतून काळजीपूर्वक वेचून घेतात. कंदांना चिकटलेली ओली माती या काळात वाळून निघून जाते. त्यानंतर कंद स्वच्छ करून मात्र कंदाभोवती असलेले आवरण न काढता मोठे कंद आणि लहान कंद वेगळे करावेत. त्यानंतर कंद 10 लीटर पाण्यात 30 ग्रॅम थायरम किंवा 30 ग्रॅम कॅप्टान या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे भिजवून घ्यावेत. त्यामुळे साठवणुकीत कंदावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. नंतर कंद 2 ते 3 आठवडे सावलीत सुकू द्यावेत. एक हेक्टर क्षेत्रामधून ग्लॅडिओलसचे 75 ते 80 हजार कंद मिळतात.
अशा प्रकारे स्वच्छ केलेले कंद नंतर थंड आणि हवेशीर जागी पुढील हंगामातील लागवडीकरिता साठवून ठेवावेत. कंद शीतगृहामध्ये साठविल्यास त्यांचे नुकसान कमी होते आणि 1 ते 6 महिन्यांपर्यंत केव्हाही ते लागवडीकरिता वापरता येतात. खरीप पिकाचे आणि रब्बी पिकाचे कंद अनुक्रमे पुढील खरीप आणि रब्बी हंगामातील लागवडीकरिता वापरता येतात. शीतगृहामध्ये तीन ते चार महिने कंद साठवून ठेवून नंतर लागवड केल्यास पिकाची जोमदार वाढ होऊन फुलांचे आणि कंदांचे चांगले उत्पादन मिळते. शेतातून काढून आणलेले कंद लागलीच लागवडीसाठी वापरता येत नाहीत. त्यांना किमान 60 ते 90 दिवसांची विश्रांतीची गरज असते. जिबरेलिक अॅसिडसारख्या संजीवकांचा वापर काळजीपूर्वक करून विश्रांतीचा कालावधी थोडाफार कमी करता येतो.

सारांश ।

क्रमाक्रमाने उमलत जाणारी आकर्षक रंगांची फुले आणि त्यांचा टिकाऊपणा यांमुळे ग्लॅडिओलसच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्यासाठी मोठ्या शहरात वर्षभर मागणी असते. ग्लॅडिओलसच्या फुलांचे गुच्छ आकर्षक असतात. तसेच या फुलांचे ताटवेदेखील फार सुरेख दिसतात. या सर्व बाबींमुळे ग्लॅडिओलसच्या लागवडीस खूप वाव आहे.
महाराष्ट्रामध्ये सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावर ग्लॅडिओलसची लागवड केली जाते. पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, अकोला, इत्यादी जिल्हयांत खरीप आणि रब्बी हंगामात ग्लॅडि- ओलसची लागवड केली जाते. महाबळेश्वरसारख्या जास्त पावसाच्या भागात उन्हाळयात तापमान कमी असल्यामुळे उन्हाळी हंगामातही ग्लॅडिओलसचे पीक चांगले येते. या पिकाच्या अनेक प्रचलित जाती आहेत. संसरे, यलोस्टोन, सुचित्रा, ट्रॉपिक सीज, सपना, नजराना, सिलेक्शन – 1 या जाती फुले आणि कंद उत्पादनाच्या दृष्टीने चांगल्या आहेत.
ग्लॅडिओलसच्या पिकाची लागवड मध्यम पाऊस आणि थंड हवामान असलेल्या भागात आणि सुपीक परंतु पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत यशस्वी रितीने करता येते. ग्लॅडिओलसच्या लागवडीकरिता विश्रांतीकाळ पूर्ण झालेले कंद निवडून ते बाविस्टीन अथवा थायरम या बुरशीनाशकाच्या द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर 30 x 20 सेंटिमीटर अंतरावर कंदांची लागवड करतात. कंदांच्या लागवडीपूर्वी दर चौरस मीटर क्षेत्रात 5 ते 7 किलो शेणखत द्यावे. लागवडीच्या वेळी दर चौरस मीटर क्षेत्रास प्रत्येकी 15 ते 20 ग्रॅम स्फुरद आणि पालाश द्यावे. पिकाला दोन पाने आल्यावर दर चौरस मीटर क्षेत्रात 15 ते 20 ग्रॅम नत्र द्यावे. पिकाला 4 पाने आल्यावर याच प्रमाणात नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
ग्लॅडिओलसच्या कंदांच्या लागवडीनंतर जातीनुसार 55 ते 90 दिवसांत ग्लॅडिओलसच्या फुलांची काढणी सुरू होते आणि सुमारे महिनाभर ती चालते. ग्लॅडिओलसच्या पिकापासून हेक्टरी 70 ते 90 हजार फुलदांडे मिळतात. फुले काढल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत झाडांची पाने पिवळी पडल्यावर जमिनीतील कंद काढून घेऊन सावलीत 3 आठवड्यां- पर्यंत सुकवून हवेशीर आणि थंड ठिकाणी अथवा शीतगृहात पुढील लागवडीकरिता साठवून ठेवतात.

जाणून घ्या शेवंती लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Shevanti Lagwad Mahiti Shevanti Sheti) – Shevanti Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )