जाणून घ्या डेलिया लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Dahlia flower Lagwad Mahiti Dahlia Sheti) – Dahlia Farming

डेलिया लागवड । Dahlia Lagwad | Dahlia Sheti | डेलिया लागवड महत्त्व ।डेलिया लागवडीस योग्य हवामान । डेलिया लागवडीस योग्य जमीन ।डेलियाच्या उन्नत जाती । डेलिया पिकाची अभिवृद्धी । डेलिया पिकाची लागवड पद्धती । डेलिया लागवड योग्य हंगाम । डेलिया लागवड योग्य लागवडीचे अंतर ।डेलिया पिकाचे खत व्यवस्थापन । डेलिया पिकाचे पाणी व्यवस्थापन ।डेलिया पिकातील आंतरमशागत । डेलिया पिकाच्या तणांचे नियंत्रण व आच्छादन । डेलिया पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।डेलिया पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । डेलियाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । डेलियाच्या कंदांची काढणी आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

डेलिया लागवड । Dahlia Lagwad | Dahlia Sheti |

डेलिया या फुलझाडाचे उगमस्थान मेक्सिको हा देश असून फार प्राचीन काळापासून डेलियाच्या फुलांचा उपयोग देवपूजेसाठी केला जातो. फुलाचा आकर्षकपणा आणि नाजूकपणा या दोन बाबींमुळे परदेशी फुलझाडांमध्ये डेलियाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या
फुलझाडाला डॉ. अँड्रिआस डेल या स्वीस वनस्पतिशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ 1791 मध्ये डेहलिया हे नाव देण्यात आले; परंतु आपल्याकडे डेलिया हेच नाव जास्त परिचित आहे. डेलियाच्या फुलामधील आकर्षक रंग, फुलांचे विविध आकार व प्रकार, फुलधारणेची विपुलता आणि लागवड अत्यंत सोपी असल्यामुळे हे फुलझाड अत्यंत लोकप्रिय आहे.

डेलिया लागवड महत्त्व । Importance of Dahlia Cultivation.

बागेमध्ये डेलियाचे फुलझाड असणे ही एक अभिमानाची बाब मानली जाते. या फुलझाडाची बागेत किंवा कुंड्यांत लागवड करता येते. ही फुले प्रामुख्याने प्रदर्शनात मांडण्यासाठी, बागेची शोभा वाढविण्यासाठी आणि गृहसजावटीसाठी उपयोगात येतात. यामुळे आज बहुतेक शहरांत, बागेत आणि घरात डेलियाची लागवड दिसून येते. डेलियाचे सर्वच नवीन प्रकार हे निरनिराळ्या प्रकारांचे नैसर्गिक संकर होऊन निर्माण झाले आहेत. हे सर्व प्रकार प्रदर्शनात मांडण्यासाठी आणि बागेतील शोभा वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. डेलियाचा ठेंगणा वाढणारा प्रकार हा प्रामुख्याने वाफ्यात, प्लॉटच्या किनारीवर व इतर फुलझाडांबरोबर मिश्र किनारीमध्ये लावतात. डेलियाची मोठ्या आकाराची फुलझाडे प्रामुख्याने गच्चीवरील किंवा व्हरांड्यातील शोभा वाढविण्यासाठी कुंड्यांत लावतात. या फुलझाडाची लांब दांड्याची विविध रंगांची व प्रकारची फुले पुष्परचनेसाठी वापरतात. डेलियाच्या पॉमपॉन आणि डेकोरेटिव्ह मिनिएचर या प्रकारातील फुले फुलदाणीत अनेक दिवस टिकतात. याशिवाय या फुलांचा उपयोग हार तयार करण्यासाठी करतात.
डेलिया या फुलझाडाचा उपयोग काही प्रमाणात औषधी व पोषक अन्नद्रव्ये म्हणून केला जातो. या फुलझाडाच्या कंदामध्ये इन्युलीन आणि फुक्टोज ही पोषक अन्नद्रव्ये तसेच काही प्रमाणात फायटीन आणि बेंझॉईक आम्ल हे औषधी घटक असतात.

डेलिया लागवडीस योग्य हवामान । डेलिया लागवडीस योग्य जमीन । Suitable climate for Dahlia cultivation. Land suitable for Dahlia cultivation.

डेलियाच्या झाडाची वाढ मोकळ्या आणि सूर्यप्रकाशाच्या जागेत चांगली होते; परंतु जोराच्या मोकाट वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी या फुलझाडाला आडोसा तयार करावा. झाडाच्या योग्य वाढीसाठी वातावरण हे थंड आणि धुकेविरहित असावे लागते.
डेलियाच्या झाडाच्या वाढीवर आणि फुलधारणेवर दिवस व रात्रीचे तापमान आणि दिवसाची लांबी यांचा परिणाम होतो. काचगृहात निरनिराळ्या हंगामांत डेलियाची लागवड केली असता हिवाळ्यात रात्रीचे तापमान 10 ते 21 अंश सेल्सिअस असताना आणि उन्हाळ्यात 15.6 ते 26.7 अंश सेल्सिअस तापमान असताना या फुलझाडाला कळ्या लागतात. तापमान वाढल्यानंतर कळ्या वाढतात आणि डेलियाच्या सर्व झाडांना फुले लागतात. उत्तम प्रतीची डेलियाची फुले मिळण्याकरिता दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअस असावे. दिवसाचे तापमान 24 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअस असताना डेलियाच्या झाडाला फुलधारणा उशिरा होते. दिवसाचे तापमान 28 किंवा 29 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस असताना फुलधारणा लवकर होते. डेलियाच्या झाडाच्या फुलधारणेवर दिवसाच्या लांबीचा म्हणजेच प्रकाशाच्या काळाचा परिणाम होतो. फेब्रुवारी ते मार्च या काळात नैसर्गिक प्रकाशाचा कालावधी 10 ते 14 तास असल्यास डेलियाच्या झाडाला फुलांच्या कळ्या लागतात. डेलियाच्या कुंड्या 50% सावलीत ठेवल्यास झाडे फार उंच वाढतात.
डेलियाची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते. डेलियाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम पोताची आणि 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन योग्य असते. जमिनीत सेंद्रिय द्रव्याचे भरपूर प्रमाण असल्यास पाण्याचा उत्तम निचरा होतो. याशिवाय आवश्यक तेवढे पाणी जमिनीत राहते आणि जमीन घट्ट होत नाही. कंदांची वाढ मोकळी सुटसुटीत होते. अधिक आम्लधर्मी जमीन असल्यास त्यामध्ये चुना मिसळून ती सुधारता येते. त्याचप्रमाणे क्षारयुक्त जमिनीत जिप्सम मिसळून जमिनीची सुधारणा करता येते. त्यासाठी जमिनीचा सामू तपासून त्याप्रमाणे एक चौरस मीटर जागेत 300 ते 400 ग्रॅम कळीचा चुना किंवा जिप्सम जमिनीत मिसळावा.

डेलियाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Dahlia.

डेलियाच्या फुलाची रचना ही सूर्यफुलाप्रमाणे असते. फुलाच्या कडेला लहान आकाराची असंख्य किरण फुले (रे फ्लोरेट) असतात. ही नरफुले असतात. या फुलांच्या पाकळ्या विविध रंगांच्या असतात. फुलाच्या मध्यभागी तबकडी फुले (डिस्क फ्लोरेट) असतात. ही फुले द्विलिंगी असून बहुधा पिवळ्या रंगाची असतात. मोठ्या आकाराच्या दुहेरी फुलांमध्ये नर फुलांची संख्या जास्त असते आणि त्या प्रमाणात द्विलिंगी फुलांची संख्या कमी झालेली असते.
डेलियाच्या फुलातील किरण फुले आणि तबकडी फुले यांच्या संख्येनुसार डेलियाच्या जातींचे विविध प्रकार पडतात.

डेलियाचे प्रकार ।

डेलियाच्या जातींचे अनेक प्रकार आहेत. त्यांमध्ये संकर करून विविध नवीन प्रकार निर्माण करण्यात आले. इंग्लंडमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी आणि नॅशनल डेलिया सोसायटी यांनी डेलियाच्या आधुनिक जातींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे 11 प्रकारांत केले आहे.

एकेरी फुलांचा डेलिया (सिंगल फ्लॉवर्ड डेलिया) ।

या प्रकारच्या फुलाचा व्यास 10 सेंटिमीटरपर्यंत असतो. फुलाच्या कडेला किरण फुलांची एकच रांग असते. या प्रकारच्या जाती फुलांचे ताटवे तयार करण्यासाठी योग्य असतात. उदाहरणार्थ, बेंबिनो, लिटल डोरिट, यलो हॅमर, इत्यादी.

चांदणी डेलिया (स्टार फ्लॉवर्ड डेलिया) ।

या प्रकारची फुले आकाराने लहान असून या फुलांत किरण फुलांच्या 2 किंवा 3 ओळी असतात. किरण फुलांच्या पाकळ्या टोकदार असतात. या प्रकारातील फुलांचा आकार कपासारखा दिसतो. या प्रकारातील जातींची लागवड अतिशय कमी प्रमाणात केली जाते. उदाहरणार्थ, व्हाईट स्टार.

घुमटाकार डेलिया (अॅनिमोन फ्लॉवर्ड डेलिया) ।

या प्रकारच्या फुलामध्ये मध्यवर्ती भागात लांबट नळीच्या आकाराची असंख्य तबकडी फुले असतात. त्याभोवती किरण फुलांच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त रांगा असतात. या प्रकारातील फुले पुष्परचनेसाठी वापरतात. उदाहरणार्थ, कॉमेट, स्कार्लेट कॉमेट, गिनी, इत्यादी.

कोलेरीट डेलिया ।

या प्रकारातील फुले एकेरी फुलाप्रमाणे दिसतात; परंतु या फुलाच्या मध्यवर्ती तबकडीभोवती किरण फुलांची दोन किंवा तीन वर्तुळे किंवा रांगा असतात. या प्रकारातील फुले पुष्परचनेसाठी अतिशय योग्य आहेत. उदाहरणार्थ, कोह, सिन्सिरिटी, थाईस, इत्यादी.

पियोनी फुलांचा डेलिया ।

या प्रकारातील फुले निम-दुहेरी असून फुलांच्या मध्यवर्ती तबकडीभोवती किरण फुलांच्या काही ओळी असतात. या प्रकारातील फुले फारशी लोकप्रिय नाहीत. उदाहरणार्थ, बिशप ऑफ लँडफ, फॅसिनेशन, इत्यादी.

शोभिवंत डेलिया (डेकोरेटिव्ह फ्लॉवर्ड डेलिया) ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असून फुलांची मध्यवर्ती तबकडी फूल जून होईपर्यंत दिसत नाही. या प्रकारातील फुलांच्या पाकळ्या (किरण फुले) सपाट व रुंद असून किंचित मुरडलेल्या असतात.

शोभिवंत प्रकारातील जातींचे फुलांच्या आकारानुसार आणखी पाच उपप्रकार आहेत.

जायंट डेकोरेटिव्ह :

या प्रकारातील फुले अतिशय मोठी, भरगच्च आणि देखणी असतात. फुलांचा व्यास 45 सेंटिमीटरपर्यंत असतो. डेलियाच्या फुलांचा हा उपप्रकार सर्वांत लोकप्रिय आहे. उदाहरणार्थ, बोनाव्हेंचर, हमारी गर्ल, व्हाईट अल्वास, बार्बारा एलीन, वॉल्टर हार्डिस्टी, एज ऑफ गोल्ड, शीनसुई, इत्यादी.

लार्ज डेकोरेटिव्ह :

या प्रकारातील फुले मोठ्या आकाराची आणि आकर्षक असून भारतात अतिशय लोकप्रिय आहेत. या प्रकारातील ब्लॅक आऊट ही जात अत्यंत लोकप्रिय आहे. उदाहरणार्थ, पॉलिअँड, इंका मेट्रोपोलिटन, सिल्व्हर सिटी, इत्यादी.

मेडियम डेकोरेटिव्ह :

या प्रकारातील जातींना मध्यम आकाराची आणि विविध रंगी फुले लागतात. या प्रकारातील दुहेरी रंगांच्या जाती अधिक लोकप्रिय आहेत. या प्रकारातील फुले प्रदर्शनात ठेवण्यासाठी आणि पुष्परचनेसाठी योग्य आहेत. उदाहरणार्थ, अॅलो वे कॉटेज, दलेको नॅशनल, एव्हलीन फॉस्टर, इंका मॅचलेस, किंग सॉसर, सफोक स्पेक्टॅक्युलर, भिक्कूज मदर, एप्रिल डॉन, इत्यादी.

स्मॉल डेकोरेटिव्ह :

या प्रकारातील फुले लहान आकाराची आणि विविध रंगांची असतात. या प्रकारातील फुले प्रदर्शनासाठी आणि पुष्परचनेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. उदाहरणार्थ, कार्टन लिंडा, डिस्नेलँड, हमारी फिस्टा, लेडी लिंडा, निना चेस्टर, स्वामी माधवानंद, स्वामी लोकेश्वरानंद, व्हाईट लिंडा, इत्यादी.

मिनिएचर डेकोरेटिव्ह :

या प्रकारातील जातींना अतिशय लहान आकाराची चिमुकली फुले येतात. काढणीनंतर ही फुले जास्त काळ टिकतात. त्यामुळे फुलदाणीत पुष्परचनेसाठी ही फुले जास्त उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, अॅब्रीज टॅफी, क्रिस्टाईन हॅमेट, एलिझाबेथ हॅमेट, इस्टवीन, मार्गारिट अॅनी, मिस्टिल डिलाईट, इत्यादी.

कॅक्टस डेलिया ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असून फुलांची मध्यवर्ती तबकडी दिसत नाही. शोभिवंत डेलिया या प्रकारातील फुलापेक्षा कॅक्टस डेलिया प्रकारातील फुलातील किरण फुले अरुंद व अधिक टोकदार असतात. याशिवाय पाकळ्या मागे वळलेल्या किंवा आत मुरडलेल्या किंवा सरळ असतात.

कॅक्टस डेलिया या प्रकारातील जातींचे फुलांच्या आकारानुसार पाच उपप्रकार पडतात.

जायंट कॅक्टस :

या प्रकारातील फुले अतिशय मोठ्या आकाराची असतात. उदाहरणार्थ, पोलार साईट, डोन ह्युस्टन, इत्यादी.

लार्ज कॅक्टस :

या प्रकारातील फुले मोठ्या आकाराची असून प्रदर्शनात ठेवण्यासाठी अतिशय योग्य आहेत. उदाहरणार्थ, वुटॉन कोर्ट, इस्टवूड स्नो, गोल्डन क्राऊन, इत्यादी.

मेडियम कॅक्टस :

या प्रकारातील फुले मध्यम आकाराची असून प्रदर्शनासाठी आणि पुष्परचनेसाठी उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, आर्थर लेशीली, सनसेट, कॅमॅनो क्लासिक, इत्यादी.

स्मॉल कॅक्टस :

या प्रकारातील फुले लहान आकाराची असून काढणीनंतर जास्त काळ टिकतात. या प्रकारातील फुलांचा उपयोग प्रदर्शनासाठी आणि पुष्परचनेसाठी केला जातो. उदाहरणार्थ, अल्वास डोरिस, लवेंडर अथेली, पार्क प्रिन्सेस, बॉर्डर प्रिन्सेस, डोरिस डे, तंजो, इत्यादी.

मिनिएचर कॅक्टस :

या प्रकारातील फुले कटफ्लॉवर्स म्हणून पुष्परचनेसाठी जास्त योग्य आहेत. उदाहरणार्थ, लिटल ग्लेनफर्न, फ्रँक सोटॅन, वी विली, इत्यादी.

सेमि- कॅक्टस डेलिया ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असतात. किरण फुलांच्या पाकळ्यांचा खालचा अर्धा भाग सपाट आणि रुंद असतो. पाकळ्या टोकदार असतात. या प्रकारातील जातींचे पाच उपप्रकार आहेत.

जायंट सेमि- कॅक्टस :

या प्रकारातील फुले प्रदर्शनासाठी उपयुक्त आहेत. या प्रकारातील फुले अतिशय मोठ्या आकाराची असतात आणि फुलांच्या आकाराच्या वाढीवर मर्यादा नसते. उदाहरणार्थ, गेट वे, दलेको ज्युपिटर, दलेको पोलोनिया, इंका डॅम्बस्टर, सुपर व्हेन्टेज, ली व्हॉन स्प्लिंटर.

लार्ज सेमि – कॅक्टस ।

उदाहरणार्थ, डी सारसेटी, हमारी प्रिन्सेस, निव्हेरिक, हमारी कट्रिना, रेजिनाल्ड किनी, सालमान किनी.

मेडियम सेमि-कॅक्टस :

या प्रकारातील फुले प्रदर्शनासाठी आणि पुष्परचनेसाठी वापरतात. उदाहरणार्थ, अमेली स्वीर्ड, सिम्बॉल, दलेको व्हिनस, हमारी ब्राईड, लव्हेंडर सिम्बॉल.

स्मॉल सेमि- कॅक्टस :

या प्रकारातील फुले कटफ्लॉवर्स म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, किमोनो, क्रायफिल्ड ब्रायन, शेंडी.

मिनिएचर सेमि – कॅक्टस :

या प्रकारातील फुले कटफ्लॉवर्ससाठी लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, स्निप, मेरी जो, स्नो क्वीन, ट्विंकल टोज, जिन वानलेस.

बॉल डेलिया ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असून फुलांचा आकार हा चेंडूसारखा असतो. फुलातील मध्यवर्ती तबकडी फुले किरण फुलापेक्षा लहान असतात. याशिवाय पाकळ्यांची कडा आत वळलेली व नळीच्या आकाराची असून तोंडाशी बोथट असते. उदाहरणार्थ, अल्टॅमी चेरी, रिस्का मायनर, क्रिचटन हनी, रूथसे सुपर्ब, वुटान क्युपिड

पॉमपॉन डेलिया ।

या प्रकारातील फुले डेलियाप्रमाणे गोलाकार दिसतात. परंतु त्यांचा आकार हा लहान असतो. या प्रकारातील फुलांचे मोठी फुले (7.5 ते 10 सेंमी. व्यासाची), मध्यम फुले (5 ते 7.5 सेंमी. व्यासाची) आणि लहान फुले (5 सेंमी. पेक्षा कमी व्यासाची) असे वर्गीकरण करतात.
या प्रकारातील फुले पुष्परचनेसाठी अतिशय लोकप्रिय आहेत. डेलियाच्या इतर प्रकारांतील फुलांच्या तुलनेत पॉमपॉन प्रकारातील जातींची फुले काढणीनंतर सर्वांत जास्त काळ टिकतात. उदाहरणार्थ, डायना ग्रेगरी, नोरीन, हॉलमार्क, मार्क लॉकवूड, स्मॉल वर्ल्ड, विलियम जॉन, यलो बेबी, हनीकोम्ब, लिटल विलो, इत्यादी.

फिम्ब्रिएटेड डेलिया ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असतात. पाकळ्यांच्या कडा टोकापासून खाली सुमारे एक सेंटिमीटरपर्यंत केसाळ असतात. या प्रकारातील जातींचे चार उपप्रकार आहेत.

(अ) जायंट फिम्ब्रिएटेड : उदाहरणार्थ, फ्रन्टीसपीस..

(आ) लार्ज फिम्ब्रिएटेड : उदाहरणार्थ, मॅकल्व्ही, झांजीकू

(इ) मेडियम फिम्ब्रिएटेड : उदाहरणार्थ, फ्रिलिडीली, कॉम्प्लिमेन्ट, व्हॅलिसेंट लॅम्बर्ट.

(ई) स्मॉल फिम्ब्रिएटेड : उदाहरणार्थ, चेयन्नी, सुल्तान, झेत्सुबी.

वॉटर लिली डेलिया ।

या प्रकारातील फुले पूर्णपणे दुहेरी असतात. किरण फुलांच्या पाकळ्या मोठ्या आणि कपासारख्या आत वळलेल्या असतात. एका बाजूने पाहिल्यास पूर्ण फूल कपबशीसारखे दिसते. या प्रकारातील फुले वॉटर लिलीच्या फुलांच्या आकारासारखी दिसतात. उदाहरणार्थ, पोर्सेलीन, जेसकॉट लीन, क्रिस्तोफर टेलर, यामाबिको.

मिसेलॅनिअस डेलिया ।

वरील कोणत्याही प्रकारात न येणाऱ्या जातींचा समावेश या प्रकारात होतो. उदाहरणार्थ, पिंक जिराफ, व्हाईट ऑर्किड, गोल्डन स्टार, जेस्कॉट ज्युली, इत्यादी.

डेलिया पिकाची अभिवृद्धी । डेलिया पिकाची लागवड पद्धती । Growth of dahlia crop. Cultivation method of dahlia crop.

डेलियाची अभिवृद्धी बी, कंदमुळे, खोडाचे छाट अशा अनेक प्रकारे करता येते. याशिवाय भेट कलम पद्धतीनेही डेलियाची झाडे तयार करता येतात. शेंड्याकडील छाटापासून (मेरीस्टेम कटिंग) डेलियाची विषाणुमुक्त झाडे मिळवता येतात.

बियांपासून अभिवृद्धी ।

सामान्यपणे बागेतील रोपवाटिकेत डेलियाची बुटकी झाडे लावण्यासाठी बी पेरून अभिवृद्धी करतात. संकरित जाती तयार करण्यासाठी रोप पैदासकार प्रामुख्याने बियांच्या अभिवृद्धीचा उपयोग करतात. एकेरी फुलांच्या जाती वगळता आधुनिक फुलांच्या संकरित जातींची लागवड बियांपासून करत नाहीत. कारण दुहेरी फुलांच्या जातीची लागवड बियांपासून केल्यास त्या झाडांची फुले मोठ्या प्रमाणात निम दुहेरी आणि एकेरी निपजतात. मोठ्या फुलांच्या जातीची लागवड बियांपासून केल्यास भिन्न आकाराची फुले येतात.
डेलियाची बियांपासून अभिवृद्धी करण्यासाठी सुरुवातीला उथळ लाकडी खोक्यात भुसभुशीत माती भरून त्यावर पालापाचोळ्यापासून तयार केलेल्या चाळलेल्या खताचा थर द्यावा आणि झारीने पाणी द्यावे. या खोक्यात डेलियाचे बी पातळ पेरावे. साधारणपणे दहा दिवसांत बी उगवते. बियांच्या पेरणीपासून 3 ते 4 आठवड्यांत डेलियाची रोपे बागेत व कुंड्यांत लागवडीसाठी तयार होतात.

कंदांपासून अभिवृद्धी ।

दुहेरी, शोभिवंत निवडुंग, पॉमपॉन आणि इतर डेलियाच्या जातींची अभिवृद्धी बहुधा कंदांपासून किंवा खोडाच्या छाटांपासून करतात.डेलियाच्या खोडाला जमिनीत जातीप्रमाणे तीन किंवा त्यापेक्षा अधिक कंद असतात. कंदांच्या लागवडीपूर्वी हे कंद वेगळे करणे आवश्यक असते. त्यासाठी तीक्ष्ण चाकूने कंद खोडापासून वेगळे करून घ्यावेत. या वेळी प्रत्येक कंदावर कमीत कमी एक डोळा ठेवावा. कंद जमिनीत सडू नयेत म्हणून कंदांच्या कापलेल्या भागावर 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम कॅपटान (50 %) किंवा 20 ग्रॅम बेनलेट (50%) हे बुरशीनाशक मिसळून तयार केलेले द्रावण लावावे. त्यानंतर कंदांची जमिनीत सुमारे 15 सेंटिमीटर खोलवर लागवड करतात.

खोडाच्या छाटापासून अभिवृद्धी ।

एकसारख्या आकाराची फुले मिळण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात डेलियाची लागवड करण्यासाठी खोडाच्या छाटापासून अभिवृद्धी करणे फायद्याचे असते. कंदाला अंकुर फुटल्यानंतर फुटवे 10 ते 15 सेंमी. उंच वाढतात. त्या वेळी फुटव्याच्या खोडाच्या शेंड्याचे लहान छाट अभिवृद्धी करण्यासाठी वापरतात.
कंदावर वाढलेल्या फुटव्यांचे छाट बऱ्याच उंचीवर ब्लेडने कापल्यास उरलेल्या फुटव्यांवरील पानांच्या बेचक्यातून नवीन फुटवे वाढतात. अशा प्रकारचे छाट पोकळ असतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य नसतात.
डेलियाच्या एका कंदापासून जुलै ते सप्टेंबर या महिन्यात वेळोवेळी खोडाचे छाट मिळतात. त्यानंतर नवीन वाढलेल्या फुटव्यांपासूनसुद्धा आणखी छाट मिळतात. त्यासाठी कंदावरील पहिल्या जोडाखाली धारदार ब्लेडने फुटवे कापतात. खोडाचे छाट साधारणतः 8 ते 10 सेंटिमीटर लांबीचे ठेवावेत. खोडाचे छाट आतून भरीव आहेत, याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर छाटावरील खालची पाने खुडून टाकावीत आणि छाटाचा खालचा कापलेला भाग सेरॅडिक्स बी या संजीवकामध्ये बुडवून काढावा. त्यामुळे छाटाला चांगल्या मुळ्या फुटतात. अशा रितीने तयार केलेले छाट जाड रेती व पीट किंवा रेती व व्हर्मिक्युलाईट यांच्या मिश्रणाने भरलेल्या कुंडीत लावावेत. 8 सेंटिमीटर व्यासाच्या कुंडीत 4 ते 5 छाट कडेने लावावेत. छाटाच्या बुडाभोवती कुंडीतील मिश्रण दाबून लावावे. नंतर छाटांना झारीने काळजीपूर्वक पाणी द्यावे. छाट लावलेल्या कुंड्या दमट जागी ठेवल्या तर कुंड्यांना वारंवार पाणी देण्याची आवश्यकता नसते. याशिवाय कमी पाण्यामुळे छाटाची कूज होत नाही. कुंडीत लावलेल्या छाटांना 2 ते 3 आठवड्यांत चांगल्या मुळ्या फुटतात. त्या वेळी 8 सेंटिमीटर व्यासाच्या कुंडीत एकच मुळ्या फुटलेला छाट लावावा. या कुंड्यांत माती, वाळू व पानांचे खत यांचे सम प्रमाणात मिश्रण भरावे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मुळ्या फुटलेली ही रोपे बागेतील वाटिकेत किंवा 25 ते 30 सेंटिमीटर व्यासाच्या कुंडीत प्रत्येकी एक याप्रमाणे लावावीत.
डेलियाच्या मुळ्या खूप खोल वाढत नाहीत म्हणून लागवडीसाठी जमीन जास्त खोल खोदण्याची आवश्यकता नसते. हलकी किंवा मध्यम प्रकारची जमीन असल्यास 45 सेंटिमीटरपर्यंत खोल खोदावी. परंतु भारी चिकण जमीन असल्यास यापेक्षा जास्त खोल खोदावी. कारण अशा प्रकारच्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक असते. अशा प्रकारे जमिनीची खोल खोदाई केल्यानंतर लागवडीच्या आधी 1 महिना या जमिनीत शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खते घालून जमीन लागवडीसाठी तयार करावी. त्यानंतर जातीच्या उंचीप्रमाणे योग्य अंतरावर लागवड करावी.
डेलियाची झाडे कुंड्यांत किंवा जमिनीत वाढविली तरी लागवडीच्या पद्धतीत विशेष फरक पडत नाही. डेलियाची कुंडीत लागवड करण्यासाठी कुंडीमध्ये भरावयाच्या मिश्रणात 1 भाग बागेतील माती, 1 भाग पानांचे खत, 1 भाग चांगले कुजलेले शेणखत आणि 1 / 2 भाग कोळशाचे तुकडे यांचे मिश्रण भरावे. याशिवाय प्रत्येक कुंडीत 2 चहाचे चमचे भरून सुपर फॉस्फेट मिसळावे. मोठ्या फुलांच्या डेलियाची झाडे वाढविण्यासाठी 25 ते 30 सेंमी. व्यासाच्या कुंड्या योग्य असतात.

डेलिया लागवड योग्य हंगाम । डेलिया लागवड योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for planting dahlia. Dahlia Planting Proper Planting Spacing.

डेलियाची लागवड वर्षातून दोन हंगामांत करता येते. पावसाळी लागवड जून महिन्याच्या सुरुवातीला करावी म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुले मिळतात. डेलियाची हिवाळी लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करावी. या लागवडीपासून फेब्रुवारी-मार्चपर्यंत फुले मिळतात. डेलियाची बियांपासून अभिवृद्धी करावयाची असल्यास मैदानी प्रदेशात बियांची पेरणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आणि पहाडी प्रदेशात मार्च – एप्रिल महिन्यात करावी. बंगलोरच्या हवामानात डेलिया फुलांचा उत्तम हंगाम हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत असतो. त्यासाठी बियांची पेरणी मे महिन्यात करतात.
पहाडी प्रदेशात छाटासाठी कंदांची लागवड काचगृहामध्ये हिवाळ्यात डिसेंबर-जानेवारी महिन्यांत करतात. या पद्धतीने तयार होणारे मुळ्या फुटलेले छाट मार्च – एप्रिल महिन्यांत बाहेर लावण्यासाठी तयार होतात. खोडाच्या छाटापासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना कंदापासून लागवड केलेल्या झाडांपेक्षा सुमारे 2 ते 4 आठवड्यांनी उशिरा फुले लागतात.
दिल्लीच्या परिस्थितीत सप्टेंबर महिन्यानंतर खोडाचा छाट घेऊन लागवड केल्यास कडक थंडीमुळे झाडांची वाढ खुरटी राहते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात झाडांची वाढ होऊन पुढे झाडांना फुले लागतात. खोडाचे छाट यापेक्षा लवकर घेऊन लागवड केल्यास झाडांना डिसेंबर- जानेवारी या महिन्यांत फुले लागतात. डिसेंबर महिन्यात संरक्षित जागेत खोडाच्या छाटांची वाढ केल्यास त्या झाडांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस समाधानकारक फुले लागतात; परंतु झाडांची उंची 45 सेंटिमीटरपेक्षा जास्त वाढत नाही.
कोलकाता येथे जास्त पाऊस पडतो, त्यामुळे कंदांपासून उत्तम छाट मध्य सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात मिळतात. पावसाळ्यात मिळणारे छाट बहुधा लाकडी व बारीक असतात आणि लागवडीसाठी योग्य नसतात. बंगलोर येथे छाट मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातीला घेतात. मद्रास येथे छाटांची लागवड सामान्यपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात करतात. या छाटांना जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यात डेलियाची फुले मिळतात.
डेलियाची लागवड कुंडीत करताना एका कुंडीत प्रकारानुसार डेलियाची 2 किंवा 3 रोपे अथवा कंद लावावेत. डेलियाची जमिनीत लागवड करताना दोन ओळींतील अंतर 60 ते 100 सेंटिमीटर ठेवावे. तर दोन रोपांतील अथवा कंदांतील अंतर 30 ते 50 सेंटिमीटर इतके ठेवावे.

डेलिया पिकाचे खत व्यवस्थापन । डेलिया पिकाचे पाणी व्यवस्थापन । Fertilizer management of Dahlia crop. Water management of dahlia crop.

डेलियाचे व्यापारी पीक घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात खते देण्याची आवश्यकता असते. जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते मिसळल्यास नंतरच्या अवस्थेत या पिकाला रासायनिक खते देण्याची आवश्यकता नसते. सर्वसाधारणपणे एक चौरस मीटर जमिनीसाठी 5 किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत किंवा कुजलेल्या पानांचे खत द्यावे. खतासोबत दर चौरस मीटर जागेसाठी 100 ग्रॅम हाडांचा चुरा किंवा सुपर फॉस्फेट द्यावे. पालाश या अन्नद्रव्यामुळे डेलियाची झाडे निरोगी राहतात. याशिवाय कंदांची चांगली वाढ होऊन फुलांची प्रतही चांगली राहते. म्हणून वाफे तयार करताना एक चौरस मीटर जागेसाठी एक घमेले लाकडाची राख जमिनीत मिसळावी. लागवडीची जमीन हलकी असल्यास डेलियाच्या फुलांच्या कळ्या लागल्यावर शेणखत किंवा पानांचे खत द्यावे किंवा पंधरा दिवसांतून एकदा याप्रमाणे फुलांच्या कळ्या उमलेपर्यंत द्रवरूप खत द्यावे. द्रवरूप खत देण्यापूर्वी जमिनीला पाणी द्यावे. यामुळे द्रवरूप खत जमिनीत समान प्रमाणात पसरते. डेलियाला जास्त नत्रखत दिल्यामुळे तयार होणारे कंद व फुले जास्त दिवस टिकत नाहीत.
डेलियाच्या फुलांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश या प्रमाणात खते द्यावीत. यांपैकी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा लागवडीपूर्वी जमिनीत मिसळावी. त्यानंतर 40 दिवसांच्या अंतराने नत्राची उर्वरित मात्रा पिकाला द्यावी. आवश्यकता वाटल्यास 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम युरिया मिसळून तयार केलेल्या द्रावणाची कळ्या येण्यास सुरुवात होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी. डेलियाची मोठ्या आकाराची फुले मिळण्याकरिता फुलांच्या कळ्या धरण्याच्या वेळी प्रत्येक 20 सेंटिमीटर व्यासाच्या कुंडीला 5 ग्रॅम खतांचे मिश्रण द्यावे. त्या मिश्रणात 3 भाग सुपरफॉस्फेट, 2 भाग म्युरेट ऑफ पोटॅश आणि 1 भाग युरिया ही खते असावीत. डेलियाची खूप मोठी फुले मिळण्यासाठी झाडांना खताचा चहा पाजण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कोंबडीचे खत किंवा बकरीच्या लेंडीचे खत 1 भाग घेऊन ते 3 भाग पाण्यात चांगले मिसळावे. त्यानंतर झाडांना भरपूर पाणी दिल्यामुळे हे खत झाडांच्या बुडाशी ओतावे. डेलियाच्या झाडांना रक्ताचे खत व हाडांचा चुरा दिल्यास झाडे उंच वाढतात. फुलांचे उत्पादन वाढते आणि कंदांची प्रत व उत्पादन वाढते.
डेलियाला नियमित परंतु भरपूर पाणी देण्याची आवश्यकता असते. कोरड्या हवामानाच्या काळात झाडांना पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता असते. डेलियाच्या झाडांना जास्त पाणी दिल्यामुळे झाडे झपाट्याने वाढतात. मात्र झाडांची पालेदार वाढ जास्त प्रमाणात होते. कंद कमजोर राहतात. झाडांना कळ्या कमी प्रमाणात लागतात आणि त्या फुलण्यापूर्वीच सुकतात. डेलियाच्या वाफ्यातील झाडांना आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे. पाणी देताना जमीन 40 सेंटिमीटर खोलीपर्यंत भिजेल आणि काही दिवसांपर्यंत जमीन ओलसर राहील असे पाहावे. त्यासाठी झाडांना वारंवार हलके पाणी देण्याऐवजी एकदाच भरपूर पाणी द्यावे. पाण्याच्या दोन पाळींतील अंतर हे हवामान व जमिनीचा प्रकार पाहून ठरवावे. हवामान थंड व दमट असल्यास 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हवामान उष्ण असल्यास जमिनीच्या

प्रकाराप्रमाणे आठवड्यातून दोन वेळा किंवा पाच दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. डेलियाच्या मोठ्या झाडापेक्षा लहान झाडांना अधिक वेळा पाणी द्यावे. मात्र जमीन पाणथळ होणार नाही याची काळजी घ्यावी.

डेलिया पिकातील आंतरमशागत । Intercropping in Dahlia crop.

डेलियाच्या पिकामध्ये आंतरमशागतीची विविध कामे करावी लागतात.

झाडांना आधार देणे (स्टेकिंग) ।

डेलियाच्या झाडाची वाढ जोमाने होऊ लागल्यावर झाडाला मजबूत आधार देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी बांबूच्या कामट्या वापरतात. कोवळ्या झाडाच्या खोडाजवळ जमिनीत कामटी रोवून त्या कामटीला सुतळीने खोड सैल बांधावे. डेलियाच्या खोडाची जाडी वाढण्यासाठी सुतळीची गाठ सैल ठेवावी. डेलियाच्या मोठ्या झाडाच्या फांद्यांनाही आधार देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी अशा झाडाभोवती त्रिकोणात तीन कामट्या जमिनीत रोवून त्या कामट्यांना फांद्या सुतळीने सैल बांधाव्यात. परंतु बागेत डेलियाची झाडे जास्त प्रमाणात असल्यास या पद्धतीने खर्च व मजुरी वाढते. अशा वेळी झाडांच्या दोन ओळींच्या दोन टोकांवर मजबूत काठ्या रोवून, दोन ओळींच्या मध्ये एक किंवा दोन मजबूत तारा ओढून काठ्यांना तारा ताणून बांधाव्यात. या तारांना झाडांच्या फांद्या सुतळीने सैल बांधाव्यात. फांद्या बांधताना नैसर्गिक अवस्थेपेक्षा फांद्या जास्त वाकवून किंवा ताणून बांधू नयेत.
या पद्धतीने झाडांना आधार देण्याचे काम सुरुवातीला जरी त्रासदायक वाटत असले तरी ते अत्यंत आवश्यक असते. कारण जेव्हा झाडांना भरपूर फुले लागतात तेव्हा फुलांच्या वजनाने किंवा वाऱ्यामुळे आधार न दिलेल्या अशा फांद्या मोडण्याची जास्त शक्यता असते.

झाडाची वाढ रोखणे ।

डेलियाची झाडे 25 ते 30 सेंटिमीटर उंच वाढल्यावर आणि प्रत्येक झाडावर 4 ते 6 निरोगी पानांच्या जोड्या आल्यावर झाडांची वाढ थांबवावी लागते. त्यासाठी प्रत्येक झाडाचा शेंडा खुडून टाकावा लागतो. झाडाची वाढ थांबविण्याचा मुख्य उद्देश हा भरपूर फुलधारणा होणे हा असतो. झाडाचा शेंडा खुडल्यानंतर बाजूच्या फांद्या वाढतात आणि झाडाला झुडपी

आकार मिळतो. आणि फुलांची संख्या वाढते. मोठ्या फुलांच्या शोभिवंत डेलियाच्या झाडावर हलक्या जमिनीत तीन तर भारी जमिनीत पाच बाजूच्या फांद्या वाढू देतात. एकाआड एक फांद्या काढून टाकतात. याच पद्धतीने मोठ्या फुलांच्या कॅक्टस डेलियाच्या झाडावर हलक्या जमिनीत पाच आणि सुपीक जमिनीत सात फांद्या कायम ठेवतात. मध्यम फुलांचा शोभिवंत डेलिया आणि कॅक्टस डेलिया यांच्या झाडावर हलक्या जमिनीत सहा आणि सुपीक जमिनीत नऊ फांद्या कायम ठेवाव्यात. डेलियाच्या निरनिराळ्या जातींची वाढ भिन्न असते. त्यामुळे जोमदार वाढीच्या व अशक्त वाढीच्या झाडावर त्यांच्या कुवतीप्रमाणे फांद्या ठेवाव्यात.
लहान फुलांच्या शोभिवंत डेलियाच्या बाबतीत फांद्या छाटण्याची आवश्यकता नसते. मात्र फांद्यांची फार दाटी झाल्यास काही फांद्या छाटाव्या लागतात. अशा वेळी केवळ कमजोर फांद्या छाटाव्यात. फांद्यांच्या छाटणीचे काम डेलियाची जात व जमिनीचा प्रकार यांवरच अवलंबून असते. या पद्धतीचा अवलंब दुहेरी फुलांचा डेलिया व फॅन्सी डेलिया यांच्या बाबतीत करावा लागतो. प्रदर्शनाकरिता मोठी फुले मिळण्यासाठी आणि बागेतील शोभिवंत फुलांसाठी या पद्धतीचा अवलंब करतात; परंतु त्या झाडांच्या फांद्यांची छाटणी कमी प्रमाणात करावी लागते. डेलियाच्या झाडांची वाढ रोखल्यामुळे फुलधारणेच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येते. साधारणपणे मोठ्या फुलांच्या शोभिवंत डेलियाच्या झाडांची वाढ रोखल्यानंतर सर्वसाधारणपणे सहा आठवड्यांनी त्या झाडांना फुले लागतात.
डेलियाच्या झाडावरील फांद्यांची छाटणी करताना बाजूच्या फांद्या 10 ते 15 सेंटिमीटर लांब वाढल्यानंतरच काढाव्यात. कारण त्यापूर्वी त्या फांद्यांची प्रत समजणे कठीण असते. काढणी करताना जास्तीत जास्त निरोगी फांद्या झाडावर कायम ठेवाव्यात.
जेव्हा कंदापासून डेलियाची झाडे वाढतात, तेव्हा एकच जोमदार वाढीचे झाड कायम राखून बाकीची झाडे काढून टाकावीत. कायम राखलेल्या झाडावर पानांच्या दोन किंवा तीन जोड्या आल्यानंतर त्या झाडाचा शेंडा खुडावा. त्यामुळे फुलांची प्रत सुधारते. याप्रमाणे झाडाची वाढ रोखल्याने फुलधारणा मात्र उशिरा होते. प्रामुख्याने फुलांची प्रत सुधारण्यासाठी डेलियाच्या झाडावरील काही कळ्यांची तोडणी करावी लागते. डेलियाच्या प्रत्येक फांदीच्या टोकावर सामान्यपणे तीन फुलांच्या कळ्या लागतात. या कळ्या वाटाण्याएवढ्या आकाराच्या असताना मध्यवर्ती कळी कायम ठेवून इतर दोन्ही कळ्या खुडून टाकतात. मध्यवर्ती कळी कमजोर असल्यास अथवा तिला इजा झालेली असल्यास बाजूच्या दोन कळ्यांपैकी एक कळी कायम ठेवून इतर कळ्या खुडून टाकतात. या वेळी खालच्या पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या बाजूच्या काही फांद्या काढून टाकाव्यात. मोठ्या फुलांच्या डेलियाच्या बाबतीत प्रदर्शनासाठी मोठी फुले मिळण्यासाठी प्रत्येक फांदीवरील दोन किंवा तीन उपफांद्या नवीन फुले येण्यासाठी कायम ठेवून इतर सर्व फांद्या काढून टाकाव्यात. या फांद्या एकाच वेळी काढून न टाकता मधूनमधून काढाव्यात. कारण कायम ठेवलेल्या फांदीला फूल न लागण्याचासुद्धा संभव असतो.

डेलिया पिकाच्या तणांचे नियंत्रण व आच्छादन । Weed Control and Covering of Dahlia Crop.

डेलियाच्या लागवडीत आच्छादन (मल्चिंग) करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कापलेले परंतु वाळलेले गवत किंवा लाकडाचा भुसा जमिनीवर पसरवतात. या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान ठरावीक पातळीवर राहून फुलधारणा लवकर व चांगली होते. याशिवाय आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे पिकाची पाणी देण्याची गरज कमी होते. तसेच पिकातील तणांची वाढ कमी प्रमाणात होते. डेलियाच्या पिकामध्ये काळ्या पॉलिथीनचे आच्छादन वापरल्यामुळे झाडांची वाढ सुधारते आणि फुले व कंदमुळ्या यांची चांगली वाढ होते. याशिवाय तणांचे चांगले नियंत्रण होते. डेलियाच्या पिकामधील तणांचे रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण करण्यासाठी तण उगवण्यापूर्वी सीमॅझीन हे तणनाशक 1,000 लीटर पाण्यात 2 ते 2.5 किलो या प्रमाणात मिसळून दर हेक्टरी फवारणी करावी.

संजीवकांचा उपयोग ।

डेलियाच्या झाडाच्या वाढीवर, फुलधारणेवर आणि कंदमुळ्यांच्या वाढीवर निरनिराळ्या वाढनियंत्रक संजीवकांचा निरनिराळ्या प्रकारे परिणाम होतो. मॅलिक हायड्रॅझाईड आणि इथरेल या संजीवकांच्या वापरामुळे झाडाची उंची वाढण्यास प्रतिबंध होतो आणि सायकोसील (सीसीसी) व इथरेलच्या उपचाराने फांद्यांची संख्या वाढते. आयएए व जीए 3 च्या 100 पीपीएम व 1,000 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाच्या उपचाराने मास्टरपीस या जातीच्या डेलियाच्या फांद्यांची लांबी लक्षणीय प्रमाणात वाढते. त्याचप्रमाणे 2,000 पीपीएम टिबा किंवा 5,000 पीपीएम एमएच या संजीवकांच्या उपचाराने डेलियाच्या झाडाची उंची खूपच कमी होते.
डेलियाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेत दोन वेळा 100 पीपीएम आणि 200 पीपीएम तीव्रतेच्या जीए 3 या संजीवकाचा उपचार केल्यास फुलधारणा सुधारते. त्याचप्रमाणे 500 पीपीएम आणि 1,000 पीपीएम तीव्रतेच्या इथरेलच्या फवारणीमुळे डेलियाच्या फुलांचे उत्पादन वाढते. तसेच सीसीसी व एमएच या संजीवकांच्या उपचारानेही फुलांचे उत्पादन वाढते. जीए 3 च्या उपचाराने मास्टरपीस जातीच्या फुलांची संख्या वाढते. डेलियाच्या वेगवेगळ्या जातींच्या झाडावर साध या संजीवकाची फवारणी केल्यामुळे डेलियाच्या फुलांचा आकार वाढतो. परंतु 1,000-5,000 पीपीएम तीव्रतेच्या टिबाच्या उपचाराने डेलियाच्या कळ्या 6 ते 15 दिवस उशिरा लागतात. 500-1,000 पीपीएम तीव्रतेचे मॅलिक हायड्रॅझाईड, 10-100 पीपीएम तीव्रतेचे जीए 3 आणि 10-100 पीपीएम तीव्रतेचे एनएए या संजीवकांच्या उपचाराने फुलांच्या कळ्या 4-5 दिवसांनी लवकर लागतात. सीसीसी, इथरेल व मॅलिक हायड्रॅझाईड यांच्या उपचाराने कंदांचे उत्पादन वाढते.

फुलांचे संरक्षण ।

डेलियाची फुले प्रदर्शनाकरिता वाढवायची असल्यास अशा फुलांचे प्रखर उन्हापासून, कोरड्या वाऱ्यापासून आणि मुसळधार पावसापासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. कोरड्या व उष्ण जागी डेलियाची फुले सुकू नयेत म्हणून त्यावर तपकिरी कागद किंवा कापडाची सावली करावी. त्यासाठी चौकटीवर हा कागद पक्का बसवून या चौकटीला खालून काठ्यांचा आधार द्यावा. मात्र सावली तयार करण्यासाठी बागेत वरीलप्रमाणे कागदाच्या चौकटी लावल्यामुळे बागेची शोभा बिघडते. याशिवाय सावलीमुळे फुलांना चांगला रंग येत नाही. म्हणून अतिशय आवश्यक असेल अशा वेळीच सावलीचा उपयोग करावा.
दिल्ली सभोवतालच्या प्रदेशात कडक थंडीमुळे डेलियाची झाडे मरतात. अशा परिस्थितीत डेलियाची झाडे परगोला किंवा झाडाखाली वाढवतात. परंतु अशा झाडांनासुद्धा पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्याची आवश्यकता असते…

डेलिया पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Dahlia crop and their control.

मावा :

मावा ही कीड डेलियाच्या झाडाच्या पानांच्या पेशींमधून रस शोषण करते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय ही कीड मोझाईक आणि स्पॉटेड विल्ट यांसारख्या विषाणुजन्य रोगांचा प्रसार करते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) किंवा 10 मिलिलीटर रोगार (30% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

पाने खाणाऱ्या अळ्या :

ही कीड प्रामुख्याने पाने, कळ्यांची टोके व फुलांचे भाग खाते. त्यामुळे हे भाग विकृत आणि तपकिरी रंगाचे बनतात. याशिवाय ही कीड खोड पोखरते. त्यामुळे झाडे सुकतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी डेलियाच्या झाडावर दर हेक्टरी 20 किलो सेवीन (10%) किंवा कार्बारिल (10%) किंवा फॉलिडॉल (10%) या कीटकनाशकांची भुकटी आठ दिवसांच्या अंतराने धुरळावी.

तुडतुडे :

ही कीड प्रामुख्याने कोवळी पाने, शेंडे व फांद्या यांमधील रस शोषण करते. त्यामुळे पानांचा रंग सुरुवातीला फिकट पिवळसर आणि नंतर तपकिरी बनतो. याशिवाय झाडांची वाढ खुंटते आणि पाने ठिसूळ बनतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर रोगार किंवा 15 मिलिलीटर एन्डोसल्फॉन या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

फुलकिडे :

ही कीड फुलांचे नुकसान करते. फुलकिडे डेलियाच्या फुलांच्या पाकळ्या खरडतात आणि तेथून बाहेर निघालेला रस शोषून घेतात. त्यामुळे पाकळ्यांचा खालचा भाग पांढरा दिसतो व नंतर तो सुकतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 3 मिलिलीटर फॉस्फॉमिडॉन (85%) किंवा 10 मिलिलीटर डायमेथोएट (30%) या प्रमाणात मिसळून किडीचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने 3-4 वेळा झाडावर फवारावे.

लाल कोळी :

ही डेलियावरील सर्वांत घातक कीड आहे. लाल कोळी पानांच्या खालील बाजूस जाळी तयार करून राहतात व अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसतात. काही काळाने पाने निस्तेज होऊन गळून पडतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 14 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस किंवा 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून झाडावर फवारावे.

डेलिया पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of dalia crop and their control.

मर रोग :

हा रोग प्रामुख्याने जमिनीतील बुरशीमुळे होतो. सुरुवातीला जमिनीतील बुरशी डेलियाच्या झाडांच्या मुळ्यांत शिरते. त्यामुळे मुळ्यांना जोडणारा आतील भाग खराब होऊन तपकिरी किंवा काळपट रंगाचा होतो. यामुळे अन्नद्रव्ये आणि पाणी मुळांपासून खोडाकडे वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो. बुरशीमधून निर्माण होणाऱ्या घातक पदार्थांमुळे आतील पेशी खराब होऊन झाड सुकते व नंतर मरते. डेलियाच्या कंदांच्या साठवणीत कंदावर या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. अभिवृद्धीसाठी डेलियाच्या निरोगी कंदांचीच निवड करावी. लागवडीपूर्वी कंदाचा रंग बदललेला भाग किंवा सडलेला भाग कापून टाकावा.

भुरी रोग :

या बुरशीजन्य रोगामुळे डेलियाच्या पानाच्या वरील पृष्ठभागावर पांढरी किंवा करड्या रंगाची भुकटी पसरलेली दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत आणि फुलांच्या हंगामाच्या शेवटी होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम बाविस्टीन (50%) किंवा 21 ग्रॅम कॅराथेन (48 % ) या प्रमाणात मिसळून झाडावर फवारणी करावी.

करपा रोग :

ढगाळ हवामानात या बुरशीजन्य रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. या रोगामुळे डेलियाच्या कोवळ्या फांद्यांवर आणि फुलांच्या कळ्यांवर करड्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. याशिवाय फुलांच्या पाकळ्यांचा रंग फिकट व तपकिरी बनतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 (78%) किंवा 40 ग्रॅम कॅपटान ( 50 % प्रवाही) या प्रमाणात मिसळून डेलियाच्या झाडावर फवारणी करावी.

खोडकूज :

या बुरशीजन्य रोगामुळे मुख्य खोड व फांद्या कुजतात. या रोगामुळे भारी व ओल्या जमिनीत वाढणारी डेलियाची झाडे सुरुवातीला सुकतात आणि नंतर मरतात. या रोगाची लागण रोपवाटिकेतील रोपांनासुद्धा होते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी भारी जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा करावा. त्यासाठी भारी जमिनीत वाळू मिसळून ती भुसभुशीत करावी. रोपवाटिकेत झाडांची दाटी करू नये. रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे.

काणी (स्मट) :

या बुरशीजन्य रोगामुळे डेलियाच्या झाडांवर गोलाकार ठिपके पडतात. सुरुवातीला हे ठिपके पिवळसर हिरव्या रंगाचे असतात. नंतर हे ठिपके तपकिरी रंगाचे होतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेला झाडाचा भाग सुकतो आणि तपकिरी रंगाचा बनतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन झेड-78 (झायनेब) किंवा डायथेन एम-45 (मॅन्कोझेब) या प्रमाणात मिसळून झाडावर फवारणी करावी.

मोझाईक :

हा डेलियाच्या झाडावरील एक अत्यंत घातक विषाणुजन्य रोग आहे. या रोगामुळे पानाच्या मध्यशिरेला समांतर आणि दुय्यम मोठ्या शिरेजवळ फिकट हिरवे पट्टे आढळतात. झाडाची वाढ खुरटी होऊन झाडावर फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडाच्या मुळ्या (कंद) लागवडीसाठी वापरू नयेत. निरोगी झाडांवर रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी 10 मिलिलीटर रोगार दहा लीटर पाण्यात • मिसळून झाडावर फवारावे.

डेलियाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Dahlia flowers.

डेलियाच्या फुलांची काढणी पहाटे अथवा सकाळी लवकर करावी. झाडावरील फुलांची काढणी करताना जास्तीत जास्त लांब दांडा ठेवून फुलांची कापणी करावी. कापलेली फुले पाण्याने अर्ध्या भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीत त्वरित ठेवावीत. फुले भरलेली बादली फुलांचे पॅकिंग करण्यापूर्वी थंड व अंधाऱ्या जागी ठेवावी. फुलांच्या देठांचे बुडखे उकळत्या पाण्यात 30 सेकंद बुडवून काढल्यास फुले 3 ते 5 दिवस चांगल्या स्थितीत राहतात.

डेलियाच्या कंदांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of Dahlia tubers.

डेलियाच्या फुलांचा हंगाम संपल्यानंतर झाडे सुकतात आणि खोडाचा रंग पिवळा पडतो. अशा वेळी झाडे जमिनीपासून 15 सेंटिमीटर खोडाचा खुंट ठेवून कापावीत. त्यानंतर फोर्कच्या साहाय्याने जमिनीतील कंदमुळ्या वर काढाव्यात. त्या गोळा करून साफ केल्यानंतर सावलीत 3 ते 4 दिवस सुकवाव्यात. या कंदांची साठवण करण्यापूर्वी कंद 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम कॅपटान ( 50 % ) मिसळून तयार केलेल्या द्रावणात 30 मिनिटे बुडवावेत. त्यानंतर अशी प्रक्रिया केलेले कंद वाळू टाकलेल्या जमिनीवर अनेक महिने साठवून ठेवतात. कंद साठविण्यासाठी तापमान 4 ते 7 अंश सेल्सिअस असावे. कोरडी हवा असल्यास वाळू, राख किंवा व्हर्मिक्युलाईटच्या थराने कंद झाकावेत किंवा कंदाभोवती वर्तमानपत्राचा कागद गुंडाळावा. डेलियाचे कंद छिद्र असलेल्या पॉलिथीनच्या पिशव्यांत किंवा पॉलिथीनचे अस्तर लावलेल्या आणि तळाशी ओलसर व्हर्मिक्युलाईट भरलेल्या खोक्यांत साठवून ठेवता येतात. कंदमुळ्या जमिनीतून बाहेर काढताना मोडलेल्या कंदमुळ्या तीक्ष्ण कोयत्याने कापाव्यात आणि कापलेल्या भागावर गंधकाची बारीक भुकटी धुरळून त्या वाळवाव्यात. साठवणीतील कंदांची मधूनमधून तपासणी करावी. याशिवाय किडी आणि रोगांपासून कंदांचे संरक्षण करण्यासाठी कंदांवर 5% फॅलिडॉल भुकटी किंवा गंधकाची भुकटी धुरळावी. कंद उष्णतेने आकसण्याची शक्यता वाटल्यास त्यावर पाणी शिंपडावे.
कुंड्यांतील डेलियाच्या झाडांच्या फुलांचा हंगाम संपल्यानंतर ती झाडे कापून टाकावीत आणि कुंड्या मोठ्या झाडाच्या सावलीत कंदांसह ठेवाव्यात. मधूनमधून कुंड्यांवर पाणी शिंपडावे. म्हणजे कंद वाळणार नाहीत. कंदांची काढणी केल्यानंतर बारीक व लहान कंद कुंडीतील किंचित ओलसर मातीत ठेवावेत.

सारांश ।

डेलियाच्या फुलांचे आकर्षक रंग, फुलांचे विविध आकार आणि प्रकार यांमुळे डेलियाचे फुलझाड लोकप्रिय आहे. डेलियाच्या फुलांचा आकार आणि रंग यांनुसार डेलियाच्या जातींचे 11 प्रकार पडतात. सध्या डेलियाच्या अनेक सुधारित व संकरित जाती उपलब्ध आहेत. डेलियाची अभिवृद्धी बियांपासून, कंदांपासून आणि खोडाच्या छाटांपासून करता येते. परंतु सर्वसाधारणपणे कंदांपासून व खोडांच्या छाटांपासून डेलियाची लागवड करतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात कंदावरील डोळे फुटण्यास सुरुवात झाल्यावर कंदांची लागवड जमिनीत 15 सेंटिमीटर खोलीवर करावी. डेलियाला उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यांत फुले लागण्यास सुरुवात होते. बंगलोरच्या हवामानात या झाडांना जुलै-ऑगस्ट महिन्यांत फुले लागतात. जमिनीत लागवडीपूर्वी भरपूर सेंद्रिय खते वापरल्यास डेलियाच्या झाडांना वाढीच्या काळात खते देण्याची आवश्यकता असते. मात्र डेलियाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश या प्रमाणात पिकाला खते द्यावीत. या झाडांना वारंवार हलके पाणी देण्यापेक्षा भरपूर भिजपाणी देण्याची आवश्यकता असते; परंतु पाणथळ जमीन झाडांना अपायकारक असते. डेलियाच्या व्यापारी उत्पादनासाठी आंतरमशागतीची विविध कामे योग्य वेळी करावीत. डेलियाची झाडे कमकुवत असतात. त्यामुळे झाडांना बांबूच्या कामट्यांचा आधार द्यावा लागतो. मोठ्या आकाराची फुले मिळण्यासाठी फांदीच्या शेंड्यावरील 3 फुलांच्या कळ्यांपैकी मध्यवर्ती कळी कायम राखून बाजूच्या दोन कळ्या खुडतात. झाडांचे शेंडे खुडल्यामुळे बाजूच्या फांद्या वाढून झाडे झुडपी बनतात आणि फुलांची संख्या वाढते. संजीवकाच्या फवारणीमुळे फुलांचे उत्पादन वाढते. डेलियाच्या झाडांवर भुरी आणि विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच मावा, पाने खाणाऱ्या अळ्या, फुलकिडे आणि लाल कोळी या किडींमुळे डेलियाच्या झाडांचे भरपूर नुकसान होते. या रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी योग्य पीकसंरक्षक औषधांची वेळीच फवारणी करावी.
डेलियाच्या झाडावरील योग्य आकाराची फुले शक्य तितक्या लांब दांड्यासह कापून लगेच पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवावीत. त्यानंतर ही फुले विक्रीसाठी बाजारात पाठवावीत. फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी. फुलांचा हंगाम संपल्यानंतर व झाडे सुकल्यानंतर जमिनीतील कंद फोर्कच्या साहाय्याने काढून घेऊन साफ करावेत. यानंतर त्यांवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करून पुढील हंगामात लागवडीसाठी थंड सावलीत साठवून ठेवावेत.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )