।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री दत्तांची राजधानी नृसिंहवाडी (Sri Datta’s capital Narasoba Wadi)
श्री दत्तांची राजधानी नृसिंहवाडी पत्ता (Sri Datta Nrusimha Saraswati Devasthan Address) : श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.
पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सणकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.
नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दीदेखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे. २००५ च्या महापुरात जवळपास संपूर्ण गावालाच पाण्यानं वेढलं होतं.
वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.
श्रीदत्तात्रेयावतार श्री नरसिंहसरस्वती स्वामीमहाराज हे कृष्णा-पंचगंगा संगमानजिक आज असलेल्या स्थानात बारा वर्षे वास्तव्य करून होते. येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर (औरवाड) हे गाव होते. आजही आहे. तेथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांच्या सन्निध चौसष्ट योगिनींचा परिवार आहे. श्रीनृसिंहसरस्वतीमहाराजांची सेवा योगिनींनी ते असेपर्यंत केली. नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हातरी वसलेले आहे. तोपर्यंत शुक्लतीर्थापासून संगमापर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणूनच धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा. या उद्देशानेच टेंबेस्वामिमहाराजांनी केलेल्या श्रीनरसिंहसरस्वती स्तोत्रात,‘अमरख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोस्ति योगिनी: । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्, मेऽस्ति परावरा गति: ॥’ असा उल्लेख केला असावा. ‘श्रीनृसिंहवाटिका क्षेत्रेव्दादशाब्दान्वसनसुधी:।तत्र स्थित्वापि गंधर्वपुरमेत्यावसन्मठे ॥’ असाही उल्लेख नक्षत्रमालिका स्तोत्रात केला आहे. पण त्यावेळी नृसिंहवाडी हे गाव नसल्याने उल्लेख ‘गृहस्थ: सद्दशीं भार्यां विन्देत् ।’ या वचनाप्रमाणे भविष्य व्दतीनेच म्हणजे पुढे होणाऱ्या नृसिंहवाडीक्षेत्रात अशा अर्थानेच केलेला दिसतो. एकंदरीत विचार केला असता अमरेश्वर, चौसष्ट योगिनी, शुक्लादी अष्टतीर्थे, कृष्णा-पंचगंगा संगम अशा सर्वांगीण पवित्र भागात श्रीगुरूंनी वास्तव्य केले असून ते आजही कायम आहे. हे दिव्यदृष्टीच्या महात्म्यांनाच अवगत होणारे आहे.
‘नृसिंहवाटीका क्षेत्रे व्दादशाव्दानवसनसुधी: । तत्र स्थित्वापि गधर्वरपुमेत्या वसनमठे ॥’
या श्लोकात श्रीटेंबेस्वामिमहाराजांनी हेच स्पष्ट केले आहे. परमात्मा विभुव्यापक म्हणजे देशमर्यादारहित असल्याचे हे वर्णन असंभवनीय नाही. असे हे नृसिंहवाडीक्षेत्र काळाच्या उदरात प्रभू येण्यापूर्वीपासूनच आहे याचे ज्ञान फक्त त्रिकालज्ञ महापुरूषांनाच असू शकते. म्हणूनच श्रीरामचंद्रयोगीमहाराज प्रभुदर्शनाकरता दोनशे वर्षे पूर्वीच येथे निवास करून राहिले. या क्षेत्राची व्यक्तावस्था प्रसिद्धी शिरोळचा व्दिजपुत्र जिवंत झाल्यापासून झाली, असे टेंबेमहाराजांनी
‘तत:प्रभृति तत्पुरे प्रवरमाबभौ संदरं । असे वर्णन त्रिशती काव्यामध्ये केले आहे. याप्रमाणे नित्य प्रभुनिवासाने पवित्र असणाऱ्या नरसिंहवाडीक्षेत्रात भगवद्भक्त महापुरूषांचाही निवास वेळोवेळी असणे साहजिकच आहे. त्यापैकीच श्री नारायण स्वामी महाराज व पुढे श्री वासुदेवानंदसरस्वती महाराज आहेत.
मत् चिता चिंती साची ही वाडी नरसोबाची हे वाक्यच ज्या महापुरुषाने आपल्या काव्यात ग्रंथीत केले आहे असे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सांगतात की ही वाडी म्हणजे श्री दत्तात्रेयांची राजधानी आहे. श्री महाराज काशीस संन्यास घेतल्यानंतर कारंज्यास आपल्या जन्मस्थानी आले.
तेथून दक्षिणेस येत असता, भिलवडी म्हणजे औदुंबर या कृष्णेच्या काठी वसलेल्या ‘गावी’ येऊन एका औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्या करू लागले. तेथे असता एका करवीरस्थ ब्राह्मण पुत्राला भगवती भुवनेश्वरी देवीनी आज्ञा केल्यानंतर कृष्णा प्रवाहात पोहत येऊन श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांना अनन्य भावाने शरण गेल्यानंतर श्री महाराजांनी कृपामृताने पावन करून त्या मंदमती ब्राह्मण पुत्राला ज्ञानी केले.
पुढील कार्यासाठी श्री नृसिंहवाडी येथे आगमन केल्यावेळी तेथे घनदाट वृक्षांनी व्याप्त झालेला प्रदेश होता. जवळच भगवती पुण्यपावन गंगा कृष्णामाता आपल्या पुण्यपावन जलाने दु:खितांचे ताप हरण करीत संथपणे वाहात होती. तेथे एका रम्य औदुंबर वृक्षाच्या खाली एका प्रस्तरावर श्री स्वामी महाराज ध्यान धारणा करीत होते. दोनप्रहरचे वेळी पैलतीरावर असलेल्या अमरापूर या ठिकाणी भिक्षेस जात असत व परत त्या ठिकाणी येऊन ध्यानयोग साधत असत. असे काही दिवस गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या अलास गावच्या श्रीपादभट जेरे हे वृद्ध गृहस्थ जवळ असलेल्या शिरोळ ग्रामी जोशीपणाची वृत्ती करीत असत. ते मार्गस्थ असता श्री स्वामी महाराजांना वंदन करून पुढे जात असत. असे काही दिवस गेल्यानंतर त्या ब्राह्मणाचा भाग्योदय झाला व त्याचेकडून भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपी श्री दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली व या वृद्ध ब्राह्मणास तेथे अर्चक म्हणून ठेवले. श्री स्वामीमहाराजांनी पुढील कार्यासाठी गमन करतेवेळी या ब्राह्मणास आशीर्वाद दिला की या औदुंबर वृक्षास जेवढी फुले, फळे आहेत. तेवढा तुझा वंशवृक्ष वाढेल. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दु:खे निवारण करण्यासाठी आहेत. काही दिवस ते श्रीपादभट आलासहून दररोज त्या ठिकाणी येऊन अर्चना करीत असत. काही काळानंतर तेथे हळुहळू वस्ती झाली व श्री नृसिंह सरस्वती तेथे तपश्चर्या करीत असल्याने त्या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नाव प्राप्त झाले. तेथे श्रीपादभटाचे पुत्राने वंशोवंशी राहून श्री महाराजांची अर्चना केली. अशा या ठिकाणी सिद्धगुरु, सिद्ध साधूयोगी यांनी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली. त्यामध्ये परमपावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपाळस्वामी महाराज, श्री मौनीस्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले. काही काळानंतर या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले.
श्रीनृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकऱ्यांनीच आपल्या प्रेमाने गुरूमाऊलीला सतत जागृत ठेवले आहे. म्हणूनच आजही हजारो भक्तांनी या पुजाऱ्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीदत्तगुरूंनी दिलेल्या फळांचा रोकडा अनुभव घेतला आहे. दक्षिणद्वार पर्वणी, संततधार, नित्य पालखी, महाराजांचे विविध उत्सवही पुजारी मंडळी किती आपुलकीने करतात आणि म्हणून श्रीदत्तप्रभूंची प्रसन्नता या स्थानात किती प्रकर्षाने जाणवते हे स्वत: गेल्याशिवाय कसे कळणार?
श्रीनरसिंहसरस्वती दत्तमहाराजांच्या सबंध पवित्रतम जीवन प्रवासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की तो वैकुंठीचा राणा भक्तवत्सल परमात्मा जीवांचा उद्धार व्हावा म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वारा कशाचीही तमा न बाळगता वणवण फिरला. अनेकांना सन्मार्गाला लावले. आडमार्गी पाऊल पडले तर मातृप्रेमाने सांभाळून पुन्हा मार्गावर आणले. रंजले-गांजलेल्यांना दिलासा दिला. नैराश्यग्रस्तांना उमेद दिली. गोरगरिबांचे अश्रू पुसले. क्षणभंगूर जीवनाचे रहस्य सांगून मातीच्या शरीराचे सोने कसे करावे त्याची शिकवण दिली. नराचा नारायण करण्याची साधना सांगितली. जीव, शिव कसा होतो ते शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन हाच एक उत्कृष्ट धर्मग्रंथ आहे. त्यालाच ‘श्रीगुरूचरित्र’ म्हणतात.
एका क्षणात पृथ्वी बुडवून टाकू शकणारा सागर, सामर्थ्य असून मर्यादा उल्लंघन करीत नाही, हे अनुभवून त्या सागराला गुरु करणारे श्रीनरसिंहगुरु स्वयं अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत, राजांचे अधिराजे आहेत, योगसम्राट आहेत. तरीही अत्यंत मृदुहृदयी, भक्तवत्सल आहेत. स्मर्तुगामी आहेत. ‘मला अहंकार नाही’ असाही अहंकार साधकांना नसावा, असे ते सांगतात. भगवंतानी विदुराघरच्या कण्या आणि सुदाम्याच्या पुरचुंडीतले पोहे मिटक्या मारीत खाल्लेले आहेत. जनाबाईंचे दळण दळले आहे. कबिराचे शेले विणले आहेत. अर्जुनाचे घोडे धुतले आहेत.
श्री नरसिंहसरस्वती पूजा, अर्चना व दिनक्रम (Shri Narasimhasaraswati Puja, Archana and Routine)
या ठिकाणी अनेक भक्तानी, त्यामध्ये आर्त, जिज्ञासू अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करीत असल्याने हे स्थान आसपासच्या गावांत प्रसिद्ध झाले. या ठिकाणी वास्तव्य करून सर्व ब्रह्मवृंद या मनोहर पादुकांची तीन त्रिकाळ अर्चना करीत असून, ही अर्चना चालूच आहे.
प्रात: काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो. थोड्यावेळाने श्री सूर्यनारायण उदयाचलावर येण्यापूर्वी श्री महाराजांना कृष्णामातेच्या जलाने स्नान घातले जाते व पंचोपचार पूजा करुन महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते व त्यावर नागदेवतांची स्थापना करून प्रात: कालची पूजा संपूर्ण होते. नंतर ९ वाजणेचे सुमारास अनेक भक्तगण बाहेरगांवचे येऊन, स्नान करून, पंचामृत पूजेस सिद्ध असतात. अर्चक स्नान करून पादुकांवरील वस्त्र दूर करून श्री पादुका भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पंचामृत स्नानास सिद्ध करतात. हा उपक्रम साधारणपणे तीन तास चालू असतो.
पुढे माध्यान्हकाळी या पादुकांची महापूजेस सुरुवात होते. त्यावेळी पादुकांवर दूध, केळी, आंब्याच्या दिवसात आमरस, दही, दूध, तूप, मध यांचे लेपन करून गरम पाण्याने श्री महाराजांना मांगलिक स्नान घातले जाते. नंतर स्वच्छ अशा वस्त्राने पादुकांवरील जल शोषित केले जाते. नंतर सुगंधित, पण मंद सुवासिक अत्तराचे लेपन केले जाते. महाराज स्वत: शांत वृत्तीचे असल्याने अत्तर सुद्धा मोगरा, चमेली, गुलाब असे असते. नंतर पादुंकावर सुगंधित पुष्पांचे अच्छादन केले जाते. तुळशीपत्र, बिल्वपत्र यांचेही अर्पण केले जाते. नंतर श्री पादुकांवर दिव्य छाटीचे आवरण केले जाते. त्यावर रेशमी वस्त्र जरीकाठी अर्पण करतात. नंतर नागदेवांची वर स्थापना करून त्रिमूर्तीचे सुवर्णमुकुट त्या ठिकाणी ठेवतात. महाराजांना दोनप्रहरच्या वेळी तृष्णा भागवण्यासाठी थंडगार व सुगंधित पाण्याने भरलेल्या कमंडलूची व्यवस्था केली जाते. नंतर भक्तवृंद अनेक आरत्या म्हणून महाराजांची आराधना करतात. नंतर श्री महाराजांना रौप्य ताटामध्ये षड्रस अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर प्रसाद तीर्थ घेऊन सर्व भक्तवृंद आपल्या घरी आपल्या घरी दोनप्रहरचे भोजन करण्यासाठी रवाना होतात. अशाप्रकारे श्री पादुकांची माध्यान्हपूजा पूर्णत्वास येते.
दुपारचे वेळी विद्वान ब्रह्मवृंद मंजुळ आवाजाने श्री महाराजांपुढे वेदमंत्राचे पठण केले जाते. सायंकाळी पुराणिकांकडून श्री महाराजांना दिव्य पुराणांचे श्रवण करविले जाते. सायंकाळी सात वाजल्यापासून महाराजांच्या सायंपूजनास प्रारंभ होतो. त्यावेळी अर्चक पंचोपचार पूजा करून धूप अर्पण करून मंगल आरती करतात. त्यावेळी चांदीच्या पात्रामधून केशरयुक्त दूध, काही फराळाचे जिन्नस व नाना प्रकारची फळे यांचा नैवेद्य श्री महाराजांना अर्पण केला जातो. नंतर श्री महाराजांची उत्सवमूर्ती दिव्य वस्त्र व दिव्य अलंकार यांनी सुशोभित करून, छत्र चामरासहित श्री नारायणस्वामींचे मंदिरातून मंगल वाद्य व नामघोषाच्या गजरात खाली महाराजांचे मंदिरात आणतात. तेथे पुष्पहार महाराजांना अर्पण केले जातात. त्यावेळी अर्चक ब्रह्मवृंद दिव्य आरत्या झांजांच्या गजरात म्हणतात. नंतर सुशोभित अशा महाराजांची उत्सवमूर्ती त्या शिबिकेमध्ये विराजमान होते आणि मंगल गजरामध्ये त्या शिबिकेच्या महाराजांभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यावेळी सर्व ब्रह्मवृंद उपासक व भक्तवृंद निरनिराळ्या मंगल पदांनी व भावपूर्ण अंत:करणाने श्री महाराजांना आनंदित करतात. नंतर तीर्थप्रसाद होतो व ब्रह्मवृंद मंत्रपठणाने महाराजांना संतोषित करतात. नंतर महाराज मंत्र गजरामध्ये दिव्य नामघोषात श्री नारायण स्वामींचे मंदिरात आपल्या ठिकाणी विराजमान होतात.रात्री शेजारती होते. श्री महाराज शयनगृहामध्ये प्रवेश करतात व ते द्वार बंद केले जाते. सर्व भक्तवृंद अर्चक आपल्या घरी गमन करतात.
खरोखरच श्रीदत्तमहाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. परमपावन दत्तकथा भवरोग्याला अमृतवल्ली सारख्या असतात आणि त्यांच्या श्रवणाने भवबंधन बाधीत नाही. पवित्र दत्तप्रबोधिनी मात्रा भवरोग्याने घ्यावी आणि जन्मकर्माची यात्रा चुकवावी. जीवाच्या जन्म-मृत्यूच्या रहाटगाडग्याची समाप्ती व्हावी म्हणून सतत प्रबोध करून श्रमलेल्या श्रीगुरूपादुकांची गुरूभक्त क्षणभर विसरू शकत नाही. सात्त्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्रीगुरूंची फार मोठी प्रीती असते; म्हणून अत्रि-अनसूया, राजा-सुमति, अंबा-माधव या सात्विक पतीपत्नींच्या श्रद्धा, निष्ठा, प्रेम या गुणांमुळे श्रीगुरूंनी गर्भव पत्करला. अवधूत, ब्रह्मचारी, संन्यासी अशा वेषांनी समाजाला प्रबोधन केले.
श्रीगुरुदत्त भगवान संतांना परब्रह्म वस्तू देतात. पाप्यांना पापक्षालनार्थ प्रायश्चित्तादिक शिक्षा देतात. त्रस्त लोकांना संकटमुक्त करतात. संन्याशांना आत्मज्ञानवंत करुन मोक्ष देतात. रोग्यांना औषध देतात. अभिमान नष्ट करुन निरभिमानता देतात. स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात. ते दयासागर नृसिंह सरस्वती गुरूराज रूपाने साक्षात मदन वाणीने, बृहस्पति, क्षमेने पृथ्वीसारखे सहनशील, बुद्धीने महापंडित व तेजाने प्रत्यक्ष सूर्यनारायण भासतात. भक्तांना दु:खमुक्त करून, सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात. प्रत्येक अवतारात भगवंताला साह्य करण्याकरिता स्वर्गस्थ देव मनुष्ययोनीत जन्माला येऊन, मनुष्यरूपे धारण करून, परमेश्र्वराला साह्य करतात. रामावतारात वानरांच्या रूपाने, कृष्णावतारात यादवरूपाने देवांनी जन्म घेऊन भगवंताला साह्य केले होते. या श्रीदत्त महाराजांच्या श्रीनृसिंहसरस्वती अवतारात पुजारी होऊन ते साह्य करीत आहेत. अलास गावचे भैरवभट जेरे हे या देवस्वरूप पुजाऱ्यांचे मूळ पुरूष आहेत. पुढे दत्तप्रभूंची इच्छा जाणून स्वर्गस्थ देवच त्या भैरव भटजींच्या पोटी पुत्र, पौत्र, प्रपौत्रादि पुढील समस्त कुळविस्तार रूपाने अवतीर्ण झाले आणि श्रीनृसिंह सरस्वती भगवंतांच्या मनोहर पादुकांची त्रिकाळ पूजा करू लागले. त्या देवस्वरूप द्विजांनी श्रीगुरुभक्ताला “कल्याणं चिंतितं कार्यं । चिंतितार्थमनोरथ: । देवद्विजप्रसादेन । सर्वे अर्था भवंतु ते ॥ चिंतित मनोरथसिद्धिरस्तु” असा आशीर्वाद देऊन श्रीफळ त्याच्या पदरात घातले की, त्याचे काम झालेच समजा. श्रीदत्तप्रभूंना साह्य करणारे अनुवंशिक भक्तिसंपन्न असे हे श्रीनृसिंहवाडीचे पुजारी लोक मनुष्य रूपाने दिसत असले तरी हे सर्व स्वर्गस्थ देवच आहेत ही अनुभूती येते. ऊन, पाऊस, वारा, कडक थंडी, काहीही असो; ही प्रभूंची लेकरे श्रीकृष्णाआईच्या कुशीत शिरून स्नान करतात. पहाटे ५ पासून रात्री १० वाजेपर्यंत विविध सेवा करणार. पालखी मिरवून धन्य प्रदक्षिणा करणार. काकडआरतीपासून शेजारतीपर्यंतची या प्रभू लेकरांची दिव्य सेवा पाहिली की, प्रभूंच्या मनोहर पादुकांच्या आधी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावेसे वाटते.
नृसिंहवाडीत कृष्णामाई उत्सव कार्यक्रम अव्याहत चालू आहे. अनेक भक्त आपापल्या वाहनातून नित्य येथे येतात. गंगेचे स्नान करून श्री महाराजांच्या विविध पूजेत सहभागी होतात. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्तजयंती, श्री गुरु द्वादशी श्री नृसिंह जयंती. श्री गुरुप्रतिपदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव हे उत्सव साजरे केले जातात.
दसऱ्याचे दिवशी श्री महाराज आपल्या वैभवाने युक्त असे नटलेले शिलंगणास जातात. दीपावलीस सर्व अर्चकांच्या स्त्रिया दिव्यवस्त्र परिधान करून श्री महाराजांना ओवाळतात. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत श्री महाराजांचे दर्शनास लांबलांबचे भक्त येत असतात. ते महाराज संन्यासी असल्यामुळे पवित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकांशिवाय कोणासही प्रवेश देत नाही. शिबिकेच्यावेळी श्रद्धा अर्चकाशिवाय शिबिकेला कोणीही स्पर्श करावयाचा नाही असा येथील नियम आहे. यासाठी धोतर, उपरणे घातलेले भक्तवृंद असतात व डाव्या बाजूला शर्ट व इतर वस्त्र घातलेले असतात. शिबिकेच्या मागे अब्दागिरी व छत्र असते. अशा राजवैभवात महाराज शिबिकेमध्ये आरोहण करतात. मंदिराचे बाहेर मिठाई, धार्मिक ग्रंथांची दुकाने सजलेली आहेत. सायंकाळचे वेळी सनई व चौघडा यांचे वादनाने श्री महाराजांना संतोषित केले जाते.
नृसिंहवाडीमध्ये श्री मारुतीरायाचे मंदिर आहे. श्री ब्रह्मानंदस्वामी, श्री नारायणस्वामी मंदिरे, वगैरे देवतांची मंदिरे आहेत. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे श्री नृसिंहवाडीतील वस्ती वाढत आहे. अनेक भक्तांना समाधान व शांती प्राप्त होते. म्हणून वाडीत येत असतात. दर बारा वर्षांनी श्री गंगामाई श्री कृष्णामाईला भेटायला येते. लाखो भाविक या सोहळ्यात समाविष्ट होतात व आपल्याला पुनित करून घेतात.
गावाचे बाहेर रम्य ठिकाणी वेदपाठशाळेची स्थापना झाली असून त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्जन करीत असतात. त्याबाहेर सुगंधित पुष्पांची बाग आहे. त्या बागेतील फुले महाराजांना अर्पण केली जातात.
कोल्हापूर जिल्ह्यातील, शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी अर्थात श्रीदत्तमहाराजांची लाडकी राजधानी श्रीनरसोबाची वाडी येथे आधीच १२ महिने २४ तास पुण्यकालच असतो. तेथे गुरु कन्या राशीत गेल्यावर वर्षभर महापुण्यकाल सुरू असतो. त्यालाच कन्यागत महापर्वकाल म्हणतात. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर १२ वर्षांतून एकदा कन्यागत सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की १२ वर्षांतून एकदा येथे गंगा अवतीर्ण (प्रकट) होते, आणि तेव्हा देव्हाऱ्यातील उत्सवमूर्तीला त्या गंगेत स्नान घातले जाते. याला शाही स्नान असेही म्हणतात. हे स्नान ‘शुक्ल तीर्थ’ नामक स्थळी संपन्न होते.
आता याच श्रीदत्तमहाराजांच्या राजधानीत श्रीनृसिंहवाडीला कन्यागताच्या पहिल्या दिवशी श्रीदत्तमहाराजांच्या उत्सवमूर्तींना देवद्विज पालखीत विराजमान करून मिरवणूकीने मंदिरापासून उत्तरेस असलेल्या शुक्लतीर्थस्थानी आणून पर्वस्थानाचा अपूर्व सोहळा संपन्न करतात. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, छत्र, चामर, चौघडा, वाजंत्री इतर अनेक प्रकारची वाद्ये यांचा जल्लोष असेल. आरत्या, पदे, इंदुकोटी, स्तोत्रे वगैरे धार्मिक कार्यक्रम सतत निनादत राहतात. प्रत्येक घरापुढे गुरूमूर्तीची आरती सुवासिनींकडून होते. हा नयनमनोहर सोहळा भाविकांनी चुकवू नये.
सात नद्यांचे मिलन झालेले हे तीर्थक्षेत्र, आसमंतात श्रीदत्तगुरूंचा संचार झाल्याने त्यांच्या रज:कणांनी पवित्र झालेली ही भूमी, कृष्णातीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशी, काम्य, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे अशा या परम दिव्यस्थानी कन्यागत कालात वर्षभर केव्हाही कृष्णानदीत स्नान करावे, मुंडन-क्षौर, उपोषण, हिरण्यश्राद्ध भक्तीने करावे; म्हणजे पितृगणांचा उद्धार होतो. गंगापूजन अवश्य करावे. तीर्तश्राद्ध हे विधी झाल्यानंतर सुपवाण, श्रीदत्तप्रभूंची महापूजा, ब्राह्मण सुवासिनी भोजन करावे. संन्यासी सत्पुरूषांची समाधी मंदिरे अत्यंत पूजनीय आहेत. अमृतामध्ये केशर घालावे तसे कन्यागत पर्वकालात वाटते. वाडीत उत्साहाचे उधाण येते. प्रेमाचा पूर येतो. आनंद लहरींचे उधाण येते. पण आपापला वैयक्तिक पुण्यसंचय वाढविताना जनता जनार्दनाचाही विचार भक्तराजांनी केला पाहिजे.
या गावात एकूण ८ तीर्थे आहेत. त्यातील पहिलेतीर्थ म्हणजेच शुक्ल तीर्थ. हे स्थळ ओतवाडी च्या मार्गाला वेदपाठ शाळेच्या थोडेसे पुढे गेल्यावर आपणास दिसते. तेथेच १२ वर्षांतून एकदा गंगा अवतीर्ण होते. देवळातून स्वामींची पालखी वाजतगाजत त्या स्थळी पोहोचण्यासाठी तब्बल १५ तासांचा अवधी लागतो. वास्तविक पाहता हे अंतर १ किलोमीटर पेक्षाही कमी आहे. पण श्रींची पालखी केवळ १२ वर्षांतून एकदाच गावात येते, त्यामुळे प्रत्येक घरासमोर पालखी थांबते. त्यावेळी घराघरातील महिला पालखीचे, उत्सवमुर्तीचे औक्षण करतात. पालखीच्या जाण्याच्या मार्गावर मखमली तसेच फुलांच्या पायघडयाघालतात. त्यावरून वाजत गाजत पालखी शुक्लतीर्थवर पोहोचते. तेथे गंगा अवतीर्ण होता क्षणीच उत्सवमुर्तीचे शाही स्नान घडवले जाते. तेथून नदीचे पाणी वाहत देवळाच्या दिशेने येते. श्रींच्या स्नानाचे पाणी डोक्यावर घेण्यासाठी हजारो भक्तगण देवळात प्रतीक्षा करत असतात.
इकडे श्रींचे शाही स्नान झाल्यावर तोफा व आतिशबाज़ी ने सर्वांना सूचित केले जाते. देवळातील भक्तगण आतिशबाजी होताच नदीत बुडी मारून श्रींच्या स्नानाचे पाणी आपल्या डोक्यावर घेतात. या शाही स्नानानंतर नियोजित सर्व विधि आटपुन पालखी परत देवळाच्या दिशेने प्रस्थान करते. तेव्हाही आधी प्रमाणेच सर्व कृती होते. पालखी शुक्ल तीर्थकडे जाताना पहिल्या गल्लीतुन जाते तर परत देवळाकडे येताना दुसऱ्या गल्लीतुन येते. अशा प्रकारे हा मुख्य सोहळा संपन्न होतो. गंगा पुढे १३ महीने येथे निवास करते व पुन्हा १२ वर्षांनी परत अवतीर्ण होते.
सह्य पर्वतावर उगम पावणाऱ्या सर्वमान्य व कृतार्थ अशा कृष्णा नदीला गंगा भेटीस येऊन वर्षभर वास्तव्य करणार आणि पापी लोकांच्या स्नानपानादि संपर्काने साठलेले सर्व पाप नष्ट करणार. अद्यापही सह्य पर्वतावर असलेल्या गंगाकुंडातून ‘कन्या’ राशीस गुरु गेल्यावर जलप्रवाह सुरू होऊन गंगामाता प्रकट होते. इतर वेळी तो प्रवाह दिसत नाही. प्रत्येक बारा वर्षांनी बार्हस्पत्यमानाने हा परमपवित्र पर्वकाळ येत असतो. यावेळी श्रीनृसिंहवाडीत भक्तवत्सल श्रीदत्तमहाराज पालखीत बसून फार मोठ्या थाटाने शुक्लतीर्थावर स्नान करण्यासाठी जातात. याच ठिकाणी कृष्णामाता पश्चिमवाहिनी झालेली आहे. श्रींच्या स्नानविधीचे वेळी त्याखाली कृष्णाप्रवाहात स्नान करायला मिळणे हे परमपुण्यकारक असते. स्नानविधी, इतर धार्मिक विधी व परत पालखी मंदिराकडे येणे हा सोहळा १५ ते १८ तास चालतो. तो पाहून डोळ्याचे पारणे फिटते.
या महापर्वाच्या अत्युच्य सुमुहूर्तावर भगवान दत्तात्रेयांचे शुक्लतीर्थावर महास्नान होते. त्यानंतर हजारो दत्तभक्तगण त्या पावन तीर्थामध्ये स्नान करतात. तत्पूर्वी श्रीदत्त मंदिरातून फार मोठी शोभायात्रा निघते. महाराजांच्या मिरवणुकीची सुमंगल सूचना अग्रस्थानी असलेला चौघडा सनई देतील. त्यामागे अश्वादि पथके, बॅंड या सारखी आधुनिक वाद्ये, लेझीम पथक, त्यानंतर श्रींच्या पालखीपुढे पुजारी वर्ग आणि अन्य दत्तभक्त धोतर आणि उपरणे या पारंपारिक गणवेषात झांजाच्या तालावर पदे, भजन म्हणत असतात. आणि त्यामागे भगवान दत्त महाराजांची पालखी, दत्तभक्तांच्यावर आणि संपूर्ण नृसिंहवाटिकेवर कृपादृष्टी टाकत, आशीर्वाद देत महाराज शुक्लतीर्थाकडे प्रस्थान करतात. वाटेत पंचप्राणांच्या भक्तिपूर्ण भावनेने सुवासिनी महाराजांना आरती करतात. गावभर मंडप, रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट, अत्तर इ. सुगंधित पदार्थांचा सडा, धूप-उदबत्त्या यांचा दरवळणारा सुगंध, सडा-पायघड्या, मोठे मंगलमय वातावरण. स्वर्गच भूवर अवतरतो की काय? अशी अनुभूती आल्याशिवाय राहात नाही.
या विराट महापर्वाचे सुनियोजित व्यवस्थापन दत्त देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत, अन्य शासकीय तसेच शैक्षणिक संस्था युद्धपातळीवर करतात. या निमित्ताने योगायोगाने ग्रामसुधारणा स्थानिक तसेच शासकीय यंत्रणेद्वारा सुरु आहे. दत्त देवस्थानचा विकास एवं सुधारणा देवस्थान कमिटी करीते. महापर्वाच्या निमित्ताने प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्याच शब्दात आपण दत्तमहाराजांना प्रार्थना करूया.
नृसिंहवाडी येथील चंदन लेपन व दक्षिणद्वार पर्वणी (Chandan Lepan and Dakshindwar Parvani at Nrisimhwadi)
येथील पुजारी व सेवक वर्ग गुरुपादुकांस अत्यंत सश्रद्ध अंतकरणाने स्तवतात. उन्हाळ्यात पादुकांना उष्म्याचा त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण शीतल चंदन लेपन करतात. महाराजांना थंड गार पाणी ठेवतात. सुगंधी पुष्प ठेवतात. अत्यंत उष्णतेच्या काळात संततधार हि ठेवतात. सातत्याने अनुष्ठाने चालूच ठेवतात. सण समारंभ काळीं भरजरी वस्त्रे पुष्पांची विशेष रचना करतात. तर नदी काठी असलेल्या या मंदिरात कृष्णा पंचगंगेची पातळी वाढल्यावर मंदिरात पाणी प्रवेश करते. उत्तर द्वारातून पाणी पादुकांवरून दक्षिण द्वारातून बाहेर येते, पण येताना ते पादुकांवरून येते. हि एक महान पर्वणी असते. म्हणून भक्तजन या दक्षिण द्वारी स्नान करतात व आपले जीवन कृतार्थ झाल्याचे मानतात. वाडीवासीतर या परम पावन क्षणाला उत्सव स्वरूप साजरे करतात. बाहेरगावाचे अनेक भक्त यासाठी संस्थान व पूजाऱ्यांच्या संपर्कात असतात बाहेरगावाहून येऊन ते ही पर्वणी साधतात. धन्य ती दक्षिणद्वार पर्वणी !
या काळात देव वर उत्सव मूर्तीचे ठिकाणी असतात. भक्तांना या काळात मनोहर पादुकांचे दर्शन होत नाही. उत्सव मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. पाणी कमी झाल्यावर सर्व पुजारी जन व भक्तजन सेवा करून सर्व मंदिर परिसर धुऊन स्वच्छ करतात. अनेक जन्माचे पुण्य संचित असेल तरच दक्षिण द्वार व मंदिराची सेवा करण्याची संधी मिळते, हा पुण्यपावन अवसर मिळालेल्यांनाच याची महती कळू शकते. सदर काळात महाराज पाण्यात असतात त्यांना त्यामुळे प्रकृतीस त्रास होऊ नये म्हणून एक काढा करण्याची येथे पद्धत आहे हा काढा महाराजांना दिला जातो. यात मुख्यत्वेकरून अनेक औषधी द्रव्य असतात. हाच काढा पुजारी जनांकडे व भक्तांना दिला जातो यातून अनेक रोगांपासून भक्तांना सरंक्षण मिळते असा भक्तांचा अनुभव व श्रद्धा आहे. अनेक पुजारी व सेवक या पूरसदृश्य परिस्थितीत महाराजांची सेवा करतात. असे सांगितले जाते की ५ वर्षांपूर्वी अशा काळात अनेक घरात पाणी घुसलेले असताना छतावरून पाण्यात उडी मारून महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचून तेथे पूजा सेवा अर्पण केली. हे सर्वच अदभूत आणि अचम्बीत करणारे आहे. थोडक्यात श्रद्धेची पराकाष्ठा !
वेद मूर्ती भैरवभट जेरें यांचेवर श्रींचा अनुग्रह व नृसिहवाडी इतिहास (Sri’s Anugraha and Nrisihwadi History of Veda Murti Bhairavabhat Jare)
इ.स. १४२२-१४३५ या १२ वर्षाच्या कालावधीत कृष्णा-पंचगंगा संगम हे अत्यंत रमणीय स्थान होते. औदुंबर, शमी, वड, बेल, पळस, चंदन, साल, देवनार खैर, रुई अशा दव वृक्षांची येथे दाटी होती. लोकवस्ति फारशी नव्हतीच. प. प. रामचंद्र योगी व इतर काही योगी तापचरणासाठी येथे येऊन राहिले होते. कृष्णेच्या पूर्वतीरावर अमरापूर व त्याच्या दक्षिणेस अडीच-तीन मैलावर आलास नावाचे एक गाव आहे. या गावात अनेक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांची अनेक घरे होती. या पंच क्रोशीत कुरुंदवाड, शिरोळ अमरापूर अशी गावे होती. ब्रम्हवृदांचे येथे येणे जाणे होते.
आलास मध्ये भैरवभट्ट नावाचे वृद्ध ब्राम्हण रहात होते. ते वेद शास्त्र संपन्न व सदाचारी होते. त्यांची पत्नीही अत्यंत सुशील गुणावती व पतिव्रता होती. पती हाच देव गुरु व सर्वकाही अशी तिची भावना होती. परस्परांवर नितांत प्रेम होते. घर खऱ्या अर्थाने एक मंदिराचं होते. पण दुर्भाग्यावश हे दाम्पत्य अपत्यहीन होते. ते एकमेकांची खूप काळजी घेत. पंचक्रोशीत भैरवभट्टाना खूप म।न सन्मान होता. आलास, अमरापूर, गोपुर, शिरोळ, कुरुंदवाड या गावात ते पौरोहित्य करीत असत. शिरोळला अमरेश्वरतळी दर्शन घेत. कृष्ण।नदी येथे ओलांडून पंचगंगेच्या काठाने शिरोळला जात. पावसाळ्यात गंगानुज नावेतून त्यांना कृष्णा पार करून देत असे. एकेदिवशी शिरोळला जाताना अमरेश्वरी दर्शन घेतल्यावर संगमतीरावर असलेल्या अश्वत्थ वृक्षाचेतळी बसलेले एक तेजपुंज संन्यासी बसलेले दिसले. त्या दिव्य मूर्तीस पाहून भैरव भटजींचे हात अनाहूत पणे जोडले गेले. नदी ओलांडून ते पश्चिम तीरावर पोहोचले व त्या महात्म्यांचे अतिशय जवळून दर्शन झाले. भगवी वस्त्रे, रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर त्रिपुंड्र (भस्माचे) लावलेल्या त्या दिव्य मूर्तीकडे पाहून भैरव भट्ट मंत्रमुग्ध झाले.
औदुंबर तळवटी बसलेली दिव्यामुर्ती म्हणजेच साक्षात नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज होते भैरव भट्टानी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामी उच्चरिले ‘नारायण’. भैरव भट्ट शिरोळला गेले व येताना पुन्हा त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. आणि घरी जाऊन आपल्या धर्मपत्नीस ते स्वामींचे वर्णनच करीत राहिले. हा नित्यक्रमच चालू झाला त्यांना त्या यातीराजांच्या दर्शनाची ओढच लागली. श्री गुरूंच्या ‘नारायण’ या प्रसन्न शब्द।व्यतिरिक्त कोणतेही संभाषण झालेच नाही. एकदा शिरोळहुन परतताना संध्याकाळ झालेली होती भटजी यतीराजांचे दर्शनास थांबले यतीराज त्यावेळी सायंसंध्या करीत होते. भटजींनीही संध्या केली.जवळच बसलेल्या आसनस्थ यातीराज।ना नम स्कार केला व लगबघिने घराकडे निघाले तेव्हा स्वामीजी म्हणाले, “अंधार होऊ लागला आहे व आपलेही बरेच वय झाले आहे, अशा दुर्गम रानावनातून एकटे जाणे बरे नव्हे आज येथेच राहावे व सकाळी जावे.” भैरव भट्टांची द्विधा मनस्थिती झाली घरी पत्नी एकटीच, पण या परमेश्वर सदृश सत्पुरुषाने राहण्यास सांगितले. यांची मधुर वाणी देव दुर्लभ सहवास हे अव्हेरून जाणे बरे नव्हे. म्हणून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
स्वामींनी त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला. तेव्हा भटजी म्हणाले,” आम्ही आलास गावाचे देशस्थ ब्राम्हण गोत्र भारद्वाज. वडील वेदोनारायण होते. घरानाजीकच विश्वेश्वराचे मंदिर जे श्रीमद शंकराचार्यांनी स्थापिलेले आहे तेथे नित्यपूजन व रुद्रापाठ करतो. जगदंबा एकविरा हि कुलदेवी आहे. मी पंचक्रोशीत पौरोहित्य करतो. पत्नी सत्शील व सदाचरणी आहे. पण आम्हांस अपत्य नाही. आता मी वृद्ध झालो आणि पत्नीनेही साठी ओलांडली. आर्थिक परिस्थिती बेताची पण एकविरा मातेच्या कृपेने अन्नोदक कधीही कमी पडले नाही. घरी अग्निहोत्र आहे. त्यामुळे तिर्थ यात्रा केल्या नाही. आपले दर्शन झाल्या पासून सर्व तीर्थे हात जोडून उभी आहेत. आपला नारायण हा शब्द ऐकून मनाला उभारी वाटते, प्रसन्न वाटते, म्हातारपण व्याधी व मृत्यूचेही भय वाटत नाही. श्रीगुरुंनी कृपाकटाक्ष टाकला व म्हणाले, “आमच्या बद्दल एवढी श्रद्धा वाटते मग संगमावरच राहायला या ना!” हे वाक्य ऐकले आणि भटजी गोंधळले. स्वामी महाराज अलौकिक त्रिकालज्ञानी दैवी पुरुष आहेत हे भटजींना पटलेले पण काय बोलावे हेच कळेना. श्री गुरूंनी हि अवस्था ओळखली आणि म्हणाले, “या तापोभूमीत येऊन आम्हास १२ वर्षे लोटली. आता दुसऱ्या स्थानी जायचे आहे. तथापि या स्थानाचा लौकिक इथून पुढे वाढतच जाणार आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या मनोरथ पूर्ण करण्यास पादुकांचे रूपाने आम्ही येथे कायम राहणार आहोत. तेव्हा या पादुकांचे नित्य पूजन अर्चन कारण्यासाठो वेदशास्त्र संपन्न व सदाचारी ब्राम्हण आवश्यक आहे. तुमचा श्रद्धाभाव पाहून आम्ही प्रसन्न आहोत. तेव्हा आपणच सहकुटुंब येथे येऊन राहावे असे आम्हाला वाटते.” भटजी चांगलेच गं।गरले, मनात विचार आला निर्जन वनात राहायचे, ना शेजारी ना लोकवस्ती, जवळच्या गावातूनही येणाऱ्यांची वर्दळ कमीच, दिवस जाईल पण रात्री कसा निभाव लागायचा? उदरभरणं कसे होणार? सर्व परिस्थिती ओळखून मी येथे राहण्यास आलो तरीही पत्नीला हे जमेल काय? दुखलं खुपल तर वैद्य कोठे? कृष्णा पंचगंगा दुथडी वहात असताना कोठे जायचे? काय करायचे? अशा अनेक विचारांनी भैरवभटांचे मनात काहूर केले. तरीही थोडेशे धारिष्ट करून श्रीगुरुना म्हणाले, “महाराज माझे जन्मोजन्मीचे भाग्य म्हणूनच श्रीपादुकांची सेवेची संधी मला मिळतेय. पण या निर्जन ठिकाणी तर पत्नीशी विचारविनिमय करावा असे वाटते. तिची तयारी असेल तर आनंदाने मी येथे राहायला येईल.” स्मित वदनाने महाराजांनी त्यास मान्यता दिली. थोडयाशा अपराधी पणाने भारावलेल्या अवस्थेत भैरवभटानी स्वामींचे चरणयुगल घट्ट पकडले. केव्हढा हा विलक्षण प्रसंग देवादिकानाही भटजींचा हेवा वाटला असेल. पण भटजी त्याच अवस्थेत निद्रिस्थ झाले.
इकडे आलास मध्ये भटजींची पत्नी त्यांचे वाटेकडे डोळे लावून बसली होती. नेहमी सूर्यास्तापूर्वी येणारे पती काळोख झालातरी अजून आले कसे नाहीत? घरातील अग्निहोत्र पत्नीने शास्त्रार्थानुसार हवन यजन केले. आणि पतीची वाट पाहत राहिली. साध्वीच्या मनाची तगमग होऊ लागली. मनात अनेक विचार येऊ लागले. यांचे वय झाले, दग दग आता सोसत नाही, आज एकादशीचा उपवास, रस्त्यात चक्कर तर अ।ली नसेल ना? उपरण्याशिवाय यांचेकडे काहीच नाही. मध्यरात्र झाली काहीच सुचेना देवघरात येऊन एकविरा मातेला हळद कुंकू वाहिले व करुणा भाकू लागली “मातें जीवाची तगमग होतेय. निर्जन वाटेवर यांना काही संकट तर आले नासेलना? आता तूच त्यांचे रक्षण कर.तू आमची कुलदेवता आहेस. आमचे रक्षणाची जबाबदारी माते तुझीच आहे.!” तळमळीने प्रार्थना करतानाच त्या साध्वीला ग्लानी आली व ती देवाघरातच पडून राहिली. त्या आवस्थेतच माता एकविरा प्रगटली व म्हणाली, “हे साध्वी चिंता करू नकोस. कृष्णा-पंचगंगेच्या संगांतीरावरील स्वामी महाराजांचे सानिध्यात तुझे सौभाग्य सुरक्षित आहे. तुमचा उभयतांच्या आचार आणि श्रद्धा यामुळे श्रीगुरु प्रसन्न आहेत. तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे. तुझ्या सोबती साठी मी आलेली आहे, आता तू काळजी करू नकोस. “प्रसन्न मुद्रा, कपाळावरील कुंकूम तिलक, नाजूक सुवर्ण मंगळसूत्र, पायातील रुणझुण नुपुरे आणि मंजुळ शब्द यांनी ती साध्वी सुखावली. त्या आवस्थेतच यति महाराजांचे चरणी निद्रिस्थ भैरव भटजी दिसले. या आनंदात किती काळ गेला हे साध्वीला समजलेच नाही आणि भगवती एकविरा व संगमावरील यतीराजांचे रूप पुन्हापुन्हा आठवत होते. घरात सुगंध पसरला परासदारीचे प्राजक्त, सोनचाफा, जाई जुईचे वकृष्णाकमल फुलांनी आज डवरून गेले. केवढे हे भाग्य! ब्राम्ह मुहूर्तावर स्वामी महाराज स्नाना साठी निघाले. भैरव भटजीही निघाले आणि स्वामी महाराजांचे अंगावरून येणाऱ्या जलप्रवाहात स्नान करून कृतकृत्य झाले. स्नानसंध्येनंतर स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन आपल्या घराकडे मार्गस्थ झाले.
भटजी घरी आले आता दोघांनाही आपले दिव्या अनुभव एकमेकांना सांगायचे होते. दोघांनाही दिव्या अनुभूती झाली होती साध्वीने भटजींना गरम फुलपात्र भरून दूध दिले तेव्हा भटजी म्हणाले “काल त्या यातीराजांचे येथे त्यांनी आम्हास ठेऊनघेतले आपणास चिंता वाटली असेलना?” त्यावर पत्नी म्हणाली “मला सर्व ठाऊक आहे. प्रथम आपण आन्हिक उरकून घ्या मग बोलू” भैरवभट चकित झाले पण स्वामींची मूर्ती त्यांचे डोळ्यासमोरून हालतच नव्हती. पुजाकर्माबरोबर श्रीसूक्त, रुद्र, व पवमान पठानंतर गोग्रास, वैश्वदेव व काकबलीझाला अतिथीची वाट पाहता एक जटाधारी योगी दिसले. त्यांना सामोरे जाऊन भटजींनी बोलावले पाद्य दिले. त्यांना अन्न भोजनाची विनंती केली. शाक पाकादी भोजन वाढले, प्रार्थना केली महाराज आपण भोजन करावे. जगतपालक श्री नृसिह सरस्वतीच रूप पालटून आलेले, तृप्त झाले. भोजना नंतर भैरवानी यतींना दर्भाची चटई घालून विश्रांती घेण्यास सांगितले. आतल्या घरात दाम्पत्याचे बोलणे चालू होते भटजी स्वामी महाराजांचे वर्णन करीत असता भारावून सांगत होते तर पत्नी म्हणाली आई एकविरा माझ्या सोबतीला होती व तिनेच तुमचे व यतिराजांचे मला दर्शन घडविले. आता काय निर्णय घ्यायचा हा विचार चालू असताच विश्रांती घेत असलेल्या अतिथीशी विचार विनिमय करण्याचे ठरले. मुनी वामकुक्षी तुन उठले, त्या दाम्पत्याने विचारले, व मुनिवर्य उच्चरिले “संगमावरचे संन्यासी प्रत्यक्ष दत्तात्रय आहेत. तुमचे जन्मोजन्मीचे सुकृत म्हणून तुम्हास त्यांच्या सेवेचा लाभ होणार आहे. मनामध्ये कसलेही भय किंतु न बाळगता आपण तेथे राहावयास जावे. मनोहर पादुकांचे पूजन अर्चन सुरु कारावे. सर्व संकटांचे ते निरसन करतील व आपला योगक्षेम चालवण्यास ते समर्थ आहेत. ते तुमच्यावर प्रसन्न आहेत.” मुनिवर्य इतके सांगून निघून गेले. भैरव भटांनी आपल्या कुटुंबाबरोबर संगमी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ, इष्ट, सगे सोयरे यांनी या दैवी कार्यास अनुकूलता दाखवली!
अश्विन वद्य १० सकाळीच त्या दाम्पत्याने प्रातः आन्हिक आटोपले वैश्वदेव नैवेद्य झाले. शिधा सामुग्री, भांडी व प्रवरणे घेऊन निघाले ग्रामस्थांनी जड अंतःकरणानी निरोप दिला. यति महाराजांना अर्पण करण्यासाठी फळे घेतली. जाताना सातत्याने शुभ शकुन होत राहिले, शुभ्र गाई पडसना दूध पाजताना दिसल्या, भारद्वाज पक्षाचा मंगल ध्वनी ऐकू आला, मुंगूसाचे युगल दिसले, कलशात पाणी घेऊन जाणाऱ्या सुवासिनी आडव्या आल्या. अमेरेश्वरांचे दाम्पत्याने दर्शन घेतले. श्रीगुरुंचा अनुग्रह झालेला गंगानुज नदीतीरी वाट पाहत होता. स्वामी महाराज पर्णकुटीत होते. स्वामी महाराजांचे दर्शन होताच त्या दंपत्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. दोघेही श्रीचरणी नतमस्तक झाले. स्वामी महाराजांनी प्रसादश्रीफल त्या द्विजपत्नीचे ओटीत घातले व आशीर्वाद दिला, “अखंड सौभाग्यवती भव! पुत्रवती भव!” त्या तेजपुंज स्वामींचे दर्शनाने ते दाम्पत्य भारावून गेले होते. तरीही तिने थोड्या धिटाईनेच विचारले, ‘महाराज आता माझी साठी झालेली आहे व यांचेही वय आता ८० आहे. आता पुत्रप्राप्ती कशी व्हावी?’ त्यावर कृपासिंधु स्वामी म्हणाले. आमचा हा आशीर्वाद याच जन्मी फलद्रुप होणार आपणास लवकरच एक पुत्र होईल व त्याला पुढे चार पुत्र होतील. त्या चारीही पुत्रांचे वंश औदुंबरास फळे येतात त्याप्रमाणे बहरतील. एका शिळेवर पादुका प्रकट होतील व त्या पादुकांचे यावतचंद्रादिवाकरो पिढ्यानपिढ्या पूजन करावे. आता आम्हास गंधर्वनगरी (गाणगापूर) येथे प्रयाण करायचे आहे परंतु मनोहर पादुकांचे रूपाने अहर्निश माझे वास्तव्य राहील. यास्थानी तुम्हास याची वारंवार प्रचिती येईल. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील’. एवढे बोलून स्वामींनी औदुंबर वृक्षा खालील काळ्या पाषाणावर कमडलूतील कृष्णाजल शिंपडले. त्यावर ओंकाराची आकृती बोटांनी रेखली आणि त्याच अंगुलीने मानवी पावलांच्या मुद्रा रेखाटल्या. त्याचे सभोवती शंख, चक्र, पद्मा, गदा, जंबुफळअशी स्वस्ति चिन्हेही रेखाटली आणि आश्चर्य बघता बघता या शुभ चिन्हांसह मनोहर पडयुगुल या शिळेवर प्रकट झाले. हे पाहून भैरवदाम्पत्य व सोबत असलेले आप्तेष्ट भावविभोर झाले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले आणि उपस्थित वारंवार स्वामीजी अ।णी मनोहरपादुकांचे दर्शन करते झाले. धन्य ते भाग्यवान जे या प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी होते. काही वेळाने स्वामीजी भटजींना म्हणाले आपण आणलेली शिधा सामुग्री पादुकासमोर ठेवा. साक्षात अन्न पूर्णा अवतरणार आहे. तिचे पूजन करा. तुम्हालाच काय पण तूमच्या पुत्र पौत्रादी वंशजांना या क्षेत्री राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि भक्तजनांना यापुढे येथे अन्न व उदकाची चिंता राहणार नाही. अन्न पूर्णेची पूजाही पर पडली. सर्वत्र सुगंध दरवळला. भटजींना एक पर्णकुटी बांधून दिली. एकादशी दिवशी ब्राम्ह मुहूर्ती भटजी व स्वामीजी स्नानास गेले. द्विजपत्नी सडा समार्जन करू लागली. त्यावेळी तेथे आणखीन वावर जाणवला तो ६४ योगिनींचा. त्यांनी तिला दर्शन दिले व काशी क्षेत्रींच्या योगिनी श्री सेवे साठी कृष्णेच्या पूर्व तीरी असल्याचे सांगितले. स्वतः अन्नपूर्णा माता येथे महाराजांना भिक्षा देत असे. येथेच भैरवभताने स्वामींच्या अंगावरून येणाऱ्या जलात स्नान केले व अन्हीकही केले. माध्यान्हीस महापूजा केली. श्री नृसिंह स्वामी येथे वास्तव्यास येणार म्हणून प. प. रामचंद्रयोगी येथे वास्तव्यास येऊन राहिले होते. त्यांनी भैरव भटास त्यांचे भाग्याची सलाहाना केली. व त्यांना श्रीपादश्रीवल्लभ व नृसिह सरस्वती आवतारांची माहिती दिली. भैरवदाम्पत्यास आप्तेष्ट व भक्तवृन्दानी वस्त्र, पात्र, प्रवरणे आणली. फळे दूध साखर आणले. सर्वांनी श्रीगुरु व मनोहर पादुकांना वंदन केले. तेथे महाराजांनी भैरव भटांना पुजाविधांन सांगितले. विधिवत पुण्याह वाचन, नंदीश्राद्ध झाल्यावर विधिवत श्रींचे पादुका पूजनाचा संकल्प सोडला. आवाहन मंत्रानंतर पादुकांवर श्रींच प्रत्यक्ष दिसू लागले व सर्वाना पादुका व श्री यांच्यामधील अभिन्नत्व पटले.
भैरव भटजींनी प्रार्थना केली, “महाराज केवळ आपल्या आशीर्वादाने आणि कृपेमुळे आपल्या या दिव्य पादुकांचे पूजन आमच्याकडून घडले आहे. आपणच दिलेल्या अशीर्वाचनानुसार पुढील वंशजांकडून यावचचंद्रदिवाकरो अशीच पूजा अखंड करून घ्यावी. सर्वाना शुद्ध बुद्धी द्यावी, धन-धान्य, यश, कीर्ती संतति, समृद्धी याचा लाभ व्हावा. मानवी स्वभावानुसार काही अपराध घडलेतर मातृहृदयाने उदार अंतःकरणानी सर्वाना क्षमा करावी व आपले कृपाछत्र अखंड लाभावे. आपल्या मनोहर पादुकांची सेवा करणाऱ्या सर्व भक्तांची मनोरथे पूर्ण करावीत.” हि प्रार्थना ऐकतानाच सर्वांची हृदये हेलावली. या क्षणी प्रत्येक जण पुनः पुनः श्री महाराजांच्या दिव्य मूर्तीचे व मनोहर पादुकांचे अवलोकन करीत ते रूप अंतःकरणात साठवून ठेवत होते. काही क्षण असेच गेले. महाराजांनी दंड कमंडलू हाती घेतले. भैरव भटजींनी श्रींचे चरणकमल घट्ट धरून ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले मी पादुकारूपाने येथेच राहणार आहे. स्वामी पूर्वाभिमुख झाले, कृष्णा प्रवाहा जवळ आले प्रवाह दुभंगला दुतर्फा फुलांचे पुष्करणी दिसले. त्यावरून पुढे जात महाराज दिसेनासे झाले. यथावकाश भैरव भटना पुत्र प्राप्ती होऊन त्यास विवाहानंतर ४ अपत्ये झाली व आज जे श्रीसेवक पुजाऱ्यांचे कुळाचा विस्तार झाला आहे. त्याचे मागे श्री गुरूंचे कृपाशीर्वादाच आहेत. धन्य ते भैरवभट दाम्पत्य व त्यांची गुरुनिष्ठा !
श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम माहात्म (Krishna Panchganga Sangam Mahatm at Sri shetra Narsobachi Wadi)
श्री क्षेत्र नरसोबाची वाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमा वर वसले आहे. श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी व कर्मभूमी ह्या ठिकाणी स्वामींनी बारा वर्षे वास्तव्य केले, आणि अनेकांचा ऊध्दार केली आपल्या अगम्य लिला ह्या संगम क्षेत्री भक्तांना दाखविल्या .ह्याच संगम स्थळी अनेक सत्पूरूषांचे वास्तव्य होते. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी दीर्घकाळ साधना केली सदगुरु प. पु. श्री गुळवणी महाराजांनी याच क्षेत्री फार मोठे कार्य केले. अनेक योगी आणि तपस्वी यांनी ईथे वास केले आणि आज ही ह्या संगमी अदृश्य रूपाने वावरत आहे आणि अनेकांच्या मनोकामना पुर्ण करीत आहे.
पंचगंगा नदी मध्ये कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्यांचे पाणी आहे, पंचगंगेचा ईथे कृष्णे बरोबर संगम होतो. आणि पूढे ती कर्नाटकात वाहत जाते. येथिल कृष्णेत शुक्ल पापविनाशी, सिध्द, अमर, कोटी, शक्ती, प्रयाग, संगम अशी आठ पवित्र तिर्थे आहेत. याच ठिकाणी काशी विश्वेश्वराचे निवास आहे म्हणून या संगमाला विशेष महत्व आहे. पलिकडील किनार्यावर अमरापूर ईथे ६४ योगीनी ही राहतात. येथिल मनोहर पादुकांच्या दर्शनाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात नृसिंह वाडी पूर्वेस कृष्णानदी ही ऊत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते.त्यामूळे यास विशेष महत्व आहे. म्हणून यासंगमास विशेष महत्व प्राप्त झाले. ह्या संगम स्थळाची महती ही श्री गुरूचरित्राच्या अध्यायात आली आहे गंगानूज हा श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा भक्त होता. माघ महिन्यात त्रिस्थळीचे स्नान करण्याचे महत्व त्याने महाराजांना विचारले तेव्हा आपण बसलेल्या व्याघ्रांबरावर हात ठेऊन डोळे मिटण्यास सागिंतले. आणि योग बळाने त्याला काशी गया प्रयाग या तिर्थाचे दर्शन घडविले त्यानंतर त्यांनी त्यास कृष्णा पंचगंगा संगम म्हणजेच प्रयाग, जुगुळ हे गाव म्हणजे काशी व कोल्हापूर म्हणजे गया असे त्यास समजाऊन सांगितले ह्यासंगमाचे दर्शनाने काशी क्षेत्री दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते अन्नपूर्णेस व चौसष्ट योगिनींना ईथे वास्तव्य करून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यास सांगितले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ होतो. सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करणेत येते.
हा उत्सव दहा दिवस चालतो पण या उत्सवाची तयारी महिनाभर चालू असून येथील दत्त मंदिराच्या उत्तरबाजूस या उत्सवासाठी मंडप व शामियाना उभारणेत येतो. पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य, गजरासह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणणेत येते. घोडे, भालदार, चोपदार, दिवटी, छत्र चामर आणि वाद्यवृंदतसेच दुतर्फा ब्रम्हवृंद, लेझीम पथक, घोडा आदी मिरवणूकीत सामील झालेने मिरवणुकीची शोभा वाढवितात. संस्कार भारती नृसिंहवाडीने मिरवणूक मार्गावर घातलेल्या नयनरम्य रांगोळ्या लक्ष वेधून घेतात. नृसिंहवाडी सह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलां मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळतात व आशीर्वाद घेतात. हा सर्व उत्सवच नयनरम्य व प्रासादिक असतो. या काळात अनेक कीर्तने, भजन व गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
वासुदेवानंद सरस्वती व कृष्णामाई,
थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीत येणारे सातवे उत्तर म्हणजे श्रीकृष्णालहरी प्रेमे वाचिता इष्ट ये करी ।। असे आहे. नृसिंहवाडीच्या वेदशास्त्र संपन्न बापूशास्त्री कोडणीकर यांनी या कृष्णा लहरीचे भाषांतर केले असून या स्तोत्रकाव्यात भगवती कृष्णामातेची स्तुती आहे. श्रीक्षेत्र वाई येथे भगवती कृष्णामातेचा उगम झाल्यावर प्रवाह पूर्वदिशेला समुद्रात मिळेपर्यंत कृष्णामातेच्या रूपाची कल्पना कृष्णा लहरीत केली आहे. यात वाई उगमस्थान हे मुख असून, नृसिंहवाडी हे मातेचे हृदय आहे, कुरवपूर हे नाभिस्थान असून पूर्व देशी समुद्राला मिळताना झालेले दोन प्रवाह हे दोन चरण आहेत.
कृष्णा लहरी हे भगवती कृष्णामातेचे स्तुतीपर काव्य जरी असले तरी कृष्णामाई हि विष्णू स्वरूपिणी आहे तेव्हा कृष्णा मातेची स्तुती हि एकापरीने भगवान दत्तात्रेय स्वरूपी विष्णूंची केलेली स्तुती आहे असे म्हणायला हरकत नाही. स्वामी महाराज यात केवळ तुझ्या तीरावर राहावयाचे भाग्य लाभू दे अशी प्रार्थना करतात. या स्तवनाने मला संपत्तीने शोभणारे राज्य नको, देवांना पूज्य असे अग्न्यादि देवाचे स्थान नको, किंवा आपल्या प्रकाशाने विश्वाचे पोषण करणाऱ्या सूर्याचे स्थान नको, विषयांनी युक्त असे इंद्रपद नको, जेथे गेले असता मनुष्य जन्म मरणरुपी संसारातून मुक्त होतो ते वैकुंठपद नको. दत्त महाराजांच्या संचाराने अतिपवित्र आणि देवांनाही दुर्लभ अशा तुझ्या तीरावर मला वास दे.
संततधार विधी म्हणजे काय ? (What is Santadhar ritual?)
असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.
त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद्दोनच होतात.
देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.
श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात चातुर्मास काळात रात्री नित्य म्हणण्यात येणारे धावे (श्रीगुरू दत्तात्रय धावा)
गुरुराया नरहरी दत्तात्रया येई येई बा | करुणासागरा | पुरूशोतमा || नरहरी कल्पद्रुमा | अठरा पुराणा | तव महिमा | न कळे निगमागमा || पतितपावना करुणालया || नरहरी दत्तात्रया येई येई बा|गुरुराया | स्वामी दत्तात्रया |येई येई बा || १ || तापत्रयाने | तापविले देह माझे कष्टविले || कोठे विश्रांती | नाढळे चरण तुझे सापडले || आता कृपेची करी छाया || नरहरी दत्ता || २ || कामक्रोधादी | अहंकार उठती वारंवार || अंगी मातला | अविचार पडला अंधकार || स्त्रिया पुत्रांसी बहुमया || ३ || वर्णू तुझी कीर्ती | लवलाही रजकाला पाछाई || दिधली क्षणात बा | तू काही तूची बापमाई || अघटीत घटना तुझी | बा सखया || स्वामी दत्तात्रया | येई येई बा || ४ || नवसा करुनी तुला |निघाला | धनिक उदिमा गेला | लाभ चौगुणी त्या झाला || चोरांनी मारिला | तस्कर वधूनिया | उठविसी तया || ५ || अन्न भक्षिता उठे शूळ | विप्र करी तळमळ प्राण त्यागिता | तात्काळ | आणविसी आपणाजवळ || अन्नची औषध दे | भक्षाया || ६ || करवीर क्षेत्रीचा द्विजपुत्र | विद्येवीण अपवित्र | जिव्हा छेदुनिया | अहोरात्र | करी भुवनेश्वरीस्तोत्र || देशी चौदाही | विद्या तया || ७ || अन्नपूर्णा तुज करजोडी || पक्वान्ने बहु वाढी | घेवड्या शेंगाची तुज गोडी || भला दिनाचा गडी || देशी घागर भरून | पुतळया तया || ८ || शिरोळ ग्रामीची द्विजनारी | पुत्र समंध मारी | ठेवी कलेवर | औदुंबरी | म्हणे पाव श्रीहरी | उठविसी तात्काळ || पुत्र तया || ९ || वांझ महिशीचे दुग्ध पिसी || विप्रस्त्री सुखविसी || पतिता मुखी वेद बोलविसी | द्विजगर्वा छेदिसी नकळे कवणाला | तव चर्चा || १० || त्रिविक्रम भारती | करी निंदा | म्हणे हा दांभिक धंदा | विश्वरूप तया | मुकुंद || दाखविसी गोविंदा | नरसिंहसरस्वती | गुरुराया || ११ || माहूर पुरीचा रोगी पती || घेउनी निघाली सती | मार्गी मरण आले || तयाप्रती | करी बहू काकुळती || देशी अभय तया | सौभाग्या || १२ || सत्कर्माचरणी बहुश्रुत | नेमे वरिले चित्त || परान्न भक्षाया उदुक्त || स्त्री बहु तळमळीत | आज्ञा देऊनिया || दांपत्या विपरीत देखे जाया | आली बा भेटाया | तव पाया || १३ || तीन पात्रांची सामुग्री | ब्राह्मण भिक्षा करी | छाटी झाकुनिया | अन्नावरी || जेविले सह्स्त्रचारी | कीर्ती झाली बा || जगत्रया || १४ || साठ वर्षांची म्हातारी | वंध्या पदर पसरी || करुणा येऊ दे | तुज नरहरी | देशी पुत्रकुमारी || समर्थ दुखःचि तू | हराया || १५ || श्वेतकुष्टाने व्यापिला | ब्राह्मण धावत आला || रक्षी रक्षी म्हणे | दयाळा || शुष्ककाष्ट द्रुम केला | निर्मल झालिबा || तत्काया || १६ || तंतुक भक्त तुझी | करी सेवा | म्हणे पावगा देवा | दर्शन श्रीशैल्या || महादेवा | करविसी केशवा || माता पिता तू गुरुराया || १७ || देवा दिपवाळीचे दिवशी | अष्टरूप झालासी | आठ गृही भिक्षा | तू घेसी | दीनबंधू म्हणविसी | करीशी भक्तासी | बहु माया || १८ || गाणगग्रामीचा कुलवाडी | मार्गी उभा कर जोडी || आडवा पुढे पडे | घडो घडी | पीक हजारो खंडी | देसी शूद्राला | स्वामीया || १९ || सायंदेव पंत | निजभक्त | तव भजनी आसक्त || दिधले तयासी बा || नीज तक्त | अशा कथा अनंत | शेषादिक थकले | गुणगाया || २० || केवळ मतिमंद पातकी |बहु जन्माचा दुःखी | महादेवात्म्जा | करा सुखी | कृपादृष्टी अवलोकी | ठेवा हात शिरी | करा दया || २१ || नरहरी दत्तात्रया येई येई बा |
नरसोबावाडी येथे जाण्यासाठी कोणत्या मार्गाने कसे पोहचू ? (How to reach Narsobawadi ?)
आगगाडीने:
हैदराबादहून: हैदराबाद ते कोल्हापूर एक्स्प्रेस ट्रेन उपलब्ध आहे. कोल्हापूर ते नरसोबावाडी बसेस दर एक तासासाठी उपलब्ध आहेत (चेन्नईपासून सुमारे 52 किमी: चेन्नई आणि सांगली दरम्यान कोणतीही थेट ट्रेन उपलब्ध नाही. चेन्नईहून पुण्याला जाण्यासाठी सर्वोत्तम आहे नंतर पुण्याहून सांगलीला Bgkt Sbcexp घ्या. चेन्नई आणि पुणे दरम्यानचे अंतर: 913 किमी
पुणे आणि सांगलीमधील अंतर: 214 किमी
बेंगळुरूहून: राणी चेन्नम्मा एक्सप्रेस बेंगळुरू ते कोल्हापूरसाठी उपलब्ध आहे. तेथून नरसोबावाडीला जाता येते.
नवी दिल्लीहून: एच. निजामुद्दीन ते कोल्हापूर सुपर फास्ट एक्स्प्रेस उपलब्ध आहे आणि तेथून नरसोबावाडीला जाता येते.
पुणे/दादर: पुणे स्टेशन ते जयसिंगपूर स्टेशन
दादर ते जयसिंगपूर स्टेशन. जयसिंगपूर ते नरसोबाचीवाडी अंतर 14 किमी. नरसोबावाडीला जाण्यासाठी ऑटोरिक्षा/सिटी बसेस उपलब्ध आहेत.
बसने: पुणे (स्वारगेट) ते नरसोबावाडी बसेस उपलब्ध आहेत
रस्त्याने:
सांगली शहरातून तुम्ही या ठिकाणी ~40 मिनिटांत गाडीने उतरू शकता, रस्ता अरुंद आहे पण चांगला आहे. कोल्हापूरला जाण्यासाठीही एक मार्ग आहे जो ~ 45 किलोमीटर अंतर दर्शवतो. सांगली शहर ते नरसोबाचीवाडी अंतर 22 किलोमीटर आहे. सांगली येथून खाजगी जीप/ट्रॅक्स/सुमो देखील उपलब्ध आहेत. स्थानिक वाहतुकीमध्ये मिरज (सुमारे 16 किमी), कोल्हापूर (सुमारे 52 किमी) आणि सांगली (सुमारे 20 किमी) पासून एसटी बस (सुमारे 20 किमी) पासून ऑटो रिक्षा आणि सिटी बसचा समावेश होतो. तसेच, सांगली बसस्थानकावरून कुरुंदवाडला जाण्यासाठी एसटी बसने जाता येते, जी तुम्हाला पुन्हा नरसोबावाडी येथे सोडते.
निपाणी किंवा बेळगाव जवळील लोकांसाठी प्रथम कुरुंदवाड (नरसोबावाडीपासून 1 किमी) येथे यावे.
काही मार्ग: कोल्हापूर-इचलकरंजी-कुरुंदवाड-नरसोबावाडी, कोल्हापूर-जयसिंगपूर-शिरोळ-नरसोबावाडी, मिरज-शिरोळ-नरसोबावाडी, निपाणी-बोरगाव-हेरवाड-कुरुंदवाड-नरसोबावाडी, बेळगाव-निपाणी-चिकोडी-जयसिंगपूर-रसोबावाडी-रसोबावाडी – नरसोबावाडी.
विमान मार्गे :
कोल्हापूर विमानतळ तेथे आहे आणि प्रमुख शहरांपासून कोल्हापूरला जोडलेली उड्डाणे उपलब्ध आहेत. कोल्हापूरहून नरसोबावाडीला जाता येते.