।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
संत चोखामेळा यांचा परिचय – Introduction to Sant Chokhamela (Chokhoba)
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखामेळा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखामेळा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखामेळांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखामेळांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखामेळांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात.
‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखामेळांचे सुमारे ३५० अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंतभट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.
संत चोखोबांचे (चोखामेळा) अभंग – Abhang of Sant Chokhoba (Chokhamela) –
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’
हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत काळजी वाटत होती.आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
संत चोखामेळा यांना संत नामदेवांचे मार्गदर्शन – Guidance of Sant Namdev to Sant Chokhamela
अशा काळात ज्ञानदेव नामदेवांनी सर्वसमावेशक, समानतेच्या अधिष्ठानावर ज्या भागवत धर्माची साद दिली त्याला समाजाच्या विविध गटातून जो प्रतिसाद मिळाला त्यामध्ये चोखोबा व त्यांचा पूर्ण परिवार सुद्धा होता. चोखोबा या संत मांदियाळीमध्ये सामील झाले. अर्थात त्यांना मंदिरामध्ये प्रवेश देणे त्याकाळातल्या व्यवस्थेमध्ये शक्य झाले नाही. तेव्हा जिथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे असे चंद्रभागेचे वाळवंटच वारकऱ्यांचे मुख्य केंद्र बनले. नामदेवांच्या अभंगात वाळवंटाचे अनेक उल्लेख आहेत. त्याकाळात पांडुरंगाचे मंदिर छोटेसे असावे व तथाकथित अस्पृश्य वर्ग महाद्वारातून विठ्ठल दर्शन घेत असत असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. संत नामदेवराय हे चोखोबांचे गुरु होते.
धन्य धन्य नामदेव । माझा निरसिला भेव । विठ्ठल मंत्र त्रीअक्षरी । खून सांगितली निर्धारी ।।
ठेवोनी माथा हात । दिले माझे मज हित । दावियेले तारू । चोखा म्हणे माझा गुरु ।।
असे नामदेवरायांचे वर्णन चोखोबांनी केले आहे.
संत चोखामेळा यांची दीपमाळ – Deepmal of Sant Chokhamela
संत चोखोबांनी चंद्रभागा नदीच्या पलीकडे एक दीपमाळ बांधली होती . ही दीपमाळ गेल्या शतकापर्यंत साधारण १९६९ पर्यंत जीर्ण अवस्थेत अस्तित्वात होती . त्या दीपमाळेचा फोटो सुद्धा उपलब्ध आहे. नंतर ही दीपमाळ असलेली जागा एका अन्य कोणाच्या तरी ताब्यात गेली. त्यांनी तेथील दीपमाळ काढून टाकली आहे.
संत चोखामेळा यांचे अभंगलेखन – The Unbroken Writings of Sant Chokhamela
अनंतभट्ट नावाचे ब्राह्मण गृहस्थ चोखोबांचे अभंगलेखक होते. असा उल्लेख संत जनाबाईंच्या अभंगात आहे. त्यांनी चोखोबांचे अभंग लिहून ठेवले. चोखोबांच्या अभंगांनी आजही भाविकांच्या व रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असली तरी सातशे वर्षांपूर्वी जातीपातीची बंधने कडक असताना एका ब्राह्मण गृहस्थाने चोखोबांचे अभंग लिहून घेतले हे लक्षात घेतले म्हणजे वारकरी संप्रदायाने आरंभलेल्या कार्याची व त्याला समाजातून मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना येऊ शकेल. आज चोखोबांचे साधारण साडे तीनशे अभंग उपलब्ध आहेत.
संत चोखामेळा यांच्या विषयी आख्यायिका – Legend about Sant Chokhamela
चोखामेळांविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती.
शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले .संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते.
त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखामेळांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखामेळांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत.
संत चोखामेळांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार, म्हणून समजत असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते.
किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखामेळाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखामेळारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी जवळ समाधी बांधली.