दुर्वास ॠषी-राजा अंबरीश (Durvas Rishi-King Ambarish)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

दुर्वास ॠषी-राजा अंबरीश – Durvas Rishi-King Ambarish

सूर्यवंशातील राजा अंबरीश हा राजा नाभागचा मुलगा होता. अत्यंत पराक्रमी व धार्मिक वृत्तीचा होता. तो विष्णूचा परमभक्त होता. तो पृथ्वीचा सम्राट व प्रजावत्सल राजा होता आणि नित्य- नियमित ध्यानधारणेत लिप्त असे. त्याने अनेक यज्ञ केले. तो श्री विष्णूंचा परमभक्त असल्याने, विष्णूंनी त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र ठेवले होते. अंबरीश राजा एकादशीचे व्रत करीत असे. वर्ष अखेरीस एकादशीच्या दिवशी पूर्ण उपास करून, द्वादशीच्या दिवशी पूजा-अर्चा व ब्राह्मण भोजन करून त्याचे पारणे फेडायचे होते. पारण्याचे वेळीच आपल्या क्रोधी स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले महर्षी दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासह त्याच्याकडे आले.

राजा अंबरीशाने त्यांचे पूजन व आदरातिथ्य करून भोजनाची विनंती केली. तेव्हा दुर्वासाने आपण स्नान व ध्यान करून येतो, असे सांगून शिष्यासह नदीवर स्नानास गेले. त्यांना बराच वेळ लागला. द्वादशीची तिथी संपून, त्रयोदशी लागणार होती. अशा वेळेस पारणे द्वादशीतच करणे आवश्यक असते, तरच त्याचे पुण्य लाभते, मात्र अतिथी भोजनास आलेले असताना, त्यांच्या आधी भोजन करण्याने अतिथींचा अपमान होईल, तर भोजन न केल्याने, एकादशीचे पुण्य लाभ होणार नाही, अशा द्विधा मन:स्थितीत अंबरीश पडला. तेव्हा त्याने आपल्या ब्राह्मणांशी सल्लामसलत केली. ब्राह्मणांनी त्याला विष्णूंचे पूजन करून, तीर्थ प्राशन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पारणे फेडल्यासारखेही होते व भोजन न केल्याने गुरूंचा अपमानही होत नाही, अशी उपाययोजना सांगितली. राजाने त्याप्रमाणे श्रीविष्णूंचे पूजन करून चरणामृत प्राशन केले.

महर्षी दुर्वास स्नानावरून आल्यानंतर त्यांना त्यांच्या तपोबलाच्या साहाय्याने अंबरीशने विष्णू तीर्थ प्राशन करून, पारणे फेडल्याचे समजले. तेव्हा ते कोपीष्ट झाले व ब्राह्मणांना भोजनास आमंत्रित करून त्यांच्याआधी पारणे फेडून त्यांचा अपमान केल्याबद्दल तुला दंड करतो असे सांगून, त्यांनी आपल्या डोक्यावरील एक केस उपटून, त्यापासून कृत्त्या नावाचा एक राक्षस निर्माण केला. त्या राक्षसाला अंबरीशचा वध करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे राक्षस अंबरीशाकडे जाऊ लागताच, अंबरीशाने श्रीविष्णूंची प्रार्थना केली. तत्काळ सुदर्शन चक्र प्रकट झाले व कृत्याला ठार करून, ते चक्र दुर्वासांच्या मागे लागले. हे पाहून गर्भगळीत झालेले दुर्वास ऋषी रक्षणासाठी इंद्र, कैलासवासी महादेव व नंतर ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना आपले रक्षण करण्याची विनंती केली. मात्र ब्रह्मदेवाने आपली असमर्थता प्रकट करीत, या चक्राला केवळ विष्णूच थांबवू शकतात. तेव्हा त्यांनाच शरण जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे दुर्वास श्रीविष्णूकडे गेले व क्षमायाचना करून आपले प्राण वाचवण्याची विनंती करू लागले.

मात्र एकदा हे चक्र सोडल्यानंतर ते आपले उद्दिष्टपूर्तीनंतरच आपल्याकडे परत येते असे सांगून, विष्णूंनी माझ्यावर परिपूर्ण विश्वास व श्रद्धा असणाऱ्या माझ्या भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी माझ्याकडे येते व ते माझे कर्तव्य ठरते हे सांगून दुर्वासांना आता हे चक्र केवळ अंबरीशाच्याच आज्ञेनी थांबू शकते असे सांगितले. त्यामुळे आपण केवळ अंबरीशाला शरण जाऊन, त्यालाच विनंती करावी, असा सल्ला दिला. दुर्वास ऋषी अंबरीशाकडे गेले. अंबरीशाकडे जाऊन त्याच्या पाया पडून त्यांनी आपल्या वर्तनाची क्षमा मागितली. या सुदर्शन चक्रापासून आपले रक्षण करण्याची विनंती केली. अंबरीशने आदरपूर्वक दुर्वासांना उठवून, चक्राला परत जाण्याची विनंती केली. तसेच दुर्वासांना म्हणाला की, “आपल्याबद्दल मला पूर्वी इतकाच आदर असून, आपण गेल्यापासून एक वर्षाचा कालावधी उलटला.

तेव्हापासून मी भोजनासाठी आपली वाट पाहत आहे. आपण भोजनास चलावे, अशी विनंती केली. ऋषी दुर्वास व अंबरीश यांनी भोजन करून, व्रताची सांगता पूर्ण केली. दुर्वासांनी अंबरीशाच्या यशाची कामना करीत, त्याला शुभाशीर्वाद दिले. पुढे कालांतराने अंबरीशाने पुत्राचे हाती राज्य कारभार सोपवून, स्वतः विष्णू तप आराधनेसाठी वानप्रस्थान केले.

“तात्पर्य : भगवान आपल्या भक्ताचा अपमानही सहन करू शकत नाहीत. तेव्हा कोणत्याही भक्ताचा भावनेच्या भरात अपमान करू नये.”

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )