।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
।। लक्ष्मीपूजन. ।।
पावसाळ्याचे दिवस. ६३-६५ चा औंधमधला काळ. त्याकाळी पाऊस पावसाळ्यातच पडे. त्यामुळे बाहेर धुवांधार पाऊस. दरदिवशी न चुकता येणारा रस्ता झाडण्याचा खराट्याचा खर्र-खर्र आवाज त्या मुसळधार पावसातही येतो. मग मात्र माझ्या बाबांचे कुतूहल चाळवते. या गावात येऊन काही काळ उलटून गेलेला असतो. गावाच्या लयीची, गतिची, नादाची हळूहळू सवय होवू लागलेली असते. त्यातलाच हाही एक आवाज. आईबाबांचा सकाळचा दुसरा चहा आणि हा आवाज यांची न चुकता एकत्र येणारी वेळ. एरवी याबद्दल कधीकाही वाटलेले नसते. आज मात्र या पावसात ते गरमागरम चहा पिताहेत आणि बाहेर कोणीतरी रस्ता झाडण्याचे काम इमानेइतबारे करते आहे याने थोडे अपराधी वाटते.
ते उठतात. दुमजली घराच्या खिडकीतून वाकून खाली पाहातात. ६५-७० ची एक म्हातारी. भिजू नये म्हणून डोक्यावर नावापुरतेच घेतलेले कांबळे. ठिगळं लावून पण नीटनेटकी नेसलेली नऊवारी. हातात लांब दांड्याचा खराटा. पावसाचे वरुन ओतणारे पाणी. रस्त्याच्या कडेला जमलेला ओला पाचोळा. जमेल तसा गोळा करत उचलून पोत्यात गोळा करत पुढे निघालेली असते.
बाबांना राहावत नाही. ते वरुनच शुकशुक करून हाक मारतात. कधी कुणी बोलण्याची सवय नसलेली त्या म्हातारीला कुणी आपल्याला बोलावते आहे हेच समजत नाही. बाबा परत एकदा आवाज देतात. आता मात्र चमकून ती आजूबाजूला पाहाते. मग तिचे लक्ष वर जाते. बाबा तिला वर या म्हणून सांगतात. तिच्या चेहर्यावर भीती, उत्सुकता याचे मिश्रण पसरते.
जिना चढून ती वर येते. बाबा तिला आत बोलावतात. ती अतिशय अवघडून अंग चोरून भिंतीला टेकून उकीडवी बसते. बाबा आईला चहा आण म्हणून सांगतात. आई एक जादाची कपबशी घेऊन तिच्या समोर सारते. ती काहीच बोलत नाही. तिच्या गालावरून येणारे पाणी तिच्या डोळ्यातले की पावसाचे याचा पत्ता न लागू देता ती म्हणते, “ही कपबशी चालत नाय मला. म्हाराची आहे मी मास्तरा.”
बाबा हसून म्हणतात, “आम्हाला चालते, घ्या चहा” ती यावेळी मात्र थोडी जिद्दिने म्हणते, “तुमाला चालंल. पण म्यास्नी नाय चालत तुमची. पिचकी, कानतुटकी काडा एकादी. त्यातनंच मी घेतो बगा च्या. तुज्याबद्दल आयकून हाय मी मास्तर गावात. भला मानूस तू. तुला ईटाळ केला मी तर गावात नाव नाय र्हायचं बग” आता मात्र आई हसून म्हणते, “बाई, आजपासून ही तुमची कपबशी. आम्ही नाही वापरणार. हवं असेल तर कान मोडून ठेवते उद्याला. पण रोज आमच्या घरापाशी आलात की वर चहा घ्यायला येत जा, आणि मग पुढे जा.”
म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर अडकून राहिलेले उरलेले पाणी ओघळते. अंगावरच्या जीर्ण कपड्यासारखंच फिकं हसून ती मान डोलावते.
त्यादिवसापासून बायजाबाई आमच्या घरी नवाच्या सुमारास चहा घ्यायला येवू लागते. तिच्या खराट्याचा आवाज लांबरून येवू लागे. तो आला की आई चहाचे आधण टाके. ती घरापर्यंत पोचे तोवर चहा उकळलेला असे आणि ती जिना वर चढून येईपर्यंत तो कपात असे. आई , बाबा आणि बायजाबाई तिघेजण कधी मूकपणे तर कधी काहीबाही गप्पा मारत चहा संपवत.
बाबा शाळेला जात, बायजाबाई पुढचा रस्ता झाडायला आणि आई तिच्या पुढच्या घरकामाला. आई कधी तिला चहाबरोबर भाकरी – पोळीचा तुकडा नाहीतर इतर काहीबाही देई. ती तो आनंदाने खात असे. सणासुदीला तिच्यासाठी जेवणही बाजूल काढून ठेवले जावू लागले. या बायजाबाईचं गावाच्या बाहेर एक झोपडं. नावापुरतं रात्रीच्यावेळी झोपायला आसरा देणारं. तिच्या मागच्यापुढच्या कुणाचाच पत्ता तिला माहीत नाही. या जगात दिवसभर गावचे रस्ते झाडायला जन्मल्याप्रमाणे ती सारा दिवस गावात घालवी. कोणी शिळे-पाके कधी आंबलेले खायला देई. बस हेच ते काय आयुष्य बायजाबाईचे. कामाला मात्र चोख. गावातल्या रस्त्यावर कधीच कचरा दिसत नसे आणि त्याचे श्रेय बायजाबाईचेच.
अशीच ती एकदिवस नेहमीप्रमाणे चहा प्यायला वर आली. आईने चहा केला एकीकडे आणि दुसरीकडे दाण्याचं कूट करायचं म्हणून दाणे भाजायला घेतले. त्याचा खमंग वास घरभर पसरला. चहा पिऊन झाला, बाबा शाळेत गेले. तरी बायजाबाई आज थोडी घुटमळलीच. आईने शेवटी विचारलं, “काय गं बायजा, काही हवंय का?” ती म्हणाली, “बाये, दाने लय आवडतात बग मला. वासानं जीब चाळवली, देतिस काय वायचं खायाला”.
आईनं “अगं त्यात काय एवढं” असं म्हणत भाजलेले, अजून गरम असलेले थोडे दाणे तिच्या समोर वाटीत ठेवले. तसं बायजा मान हलवत म्हणाली, “बाये, हे असले नगं. भाजतान काळे पडल्याले दे”. “अगं, असूदे हे चांगले खा की मी देते तर” असं म्हणत आई तिला आग्रह करू लागली. तसं बायजाबाई म्हणाली “अगं माय, तू देशील गं. आनि मंग माजी जिब सरावली ते खायाला की ते काळे जळलेल नाय की गं जानार. बाकीचे सगले ते तस्लेच देतात बग. तूही आपले तेच दे”
यावर काय उत्तर द्यावं, हे न सुचलेल्या आईनं मग जमतील तेवढे काळे दाणे बाजूला केले आणि तिला दिले. त्यादिवसापासून मग आई थोडे जास्तच दाणे काळे करायला शिकली. जेंव्हा आई दाणे भा़जे त्यावेळी बायजाबाईसाठी काळे दाणे बाजूला काढून ठेवू लागली.
शेवटी आयुष्याचा आखून दिलेला मार्ग पुढे जात असतो. मी आणि माझी बहीण यांच्या जन्मानंतर, लहान गावात शाळा नसल्याची तीव्र जाणीव बाबांना होवू लागते. आणि शेवटी औंध सोडून सांगलीला त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवतात. बातमी गावात पसरायल वेळ लागत नाही. एव्हानाच्या ७-८ वर्षांच्या काळात आई-बाबांनी माणुसकीची बरीच पुण्याई गोळा केलेली असते. बातमी पसरल्यापासून गाववाल्यांच्या घरी चकरा सुरू होतात. मास्तरांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून आर्जवे, नवस, अगदी प्रेमाच्या धमक्याही देऊन होतात. परंतू मास्तर बधत नाही हे पाहून राजासकट गावावर दु:खाचे सावट पसरते.
जायचा दिवस हळूहळू जवळ येवू लागतो. नेहमीप्रमाणे सकाळच्या चहाला बायजाबाई येतच राहाते. बातमी तिच्यापर्यंतही पोचलेली असते पण ती आईबाबांना “जाऊ नका” असे कधीच म्हणत नाही. “मास्तर, रस्ता जिकडं नेतो तिकडं जायलाच पायजेल की. खुश्शाल जा. सगळं भलंच होईल”, एवढंच म्हणत राहाते.
आईबाबांचा निघायचा दिवस उजाडतो. सकाळचा शेवटचा चहा प्यायला बायजाबाई नवाला हजर होते. मूकपणे समोर येवून बसते. आईनं चहाचा पुढं केलेला कप घेते, आणि एका चुरगळलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी बाबांसमोर सरकवते. “हे काय गं बायजा”, म्हणत बाबा ती हातात घेऊन उघडतात. आणि त्यांच्या चेहर्यावर आश्चर्य मावत नाही. ते न बोलता पुडी आईच्या हातात देतात. आई पाहाते तर चांदीचं उदबत्तीचं घर.
बाबा कसेबसे शब्द गोळा करत बायजाला विचारतात, “बायजाबाई, हे काय हो? कशासाठी?”
बायजा उत्तरते, ” माय आणि तू कायम मला देत आले. म्या कदीबी काय नाय दिलं तुमास्नी. म्हून. ते आप्ला राजा येडंच हाय. दिवाळीच्या वक्ताला मला चांदीचं नाणं दिल्तं बग कदी. आता म्या ते काय खाउ? प्वाट भरंल का माजं त्यानं, त्याचं हे करून आणलं गावात जाऊन. तुमि दोगंबी करताय की द्येवाचं मंग मलाबी आसिर्वाद मिळंल न्व्हं”?
बायजाच्या डोळ्यातला तो पहिल्या दिवशीचा पाऊस आज आईबाबांच्या डोळ्यात उतरतो. हे आम्हाला न देता विकलं तर त्याचे पैसे मिळतील, असे तिला सांगणे म्हणजे तिच्या प्रेमाचा आत्यंतिक अपमान हे बाबांना उमगते. ते न बोलता ती मोलाची भेट स्वीकारतात. बायजाबाई गडबडीनं निघते आणि म्हणते “आज रस्ते लवकर स्व्च करायचं हायती. माझ्या मास्तरचा टरक जानार नव्हं का त्यावरून”.
शेवटी दुपारचा ट्रक निघतो. बाबा ट्रकवाल्याला हळू चालवायला सांगताता. कारण गावातली शंभर एक माणसं ट्रकमागे चालत वेशीपर्यंत पोचवायल येत असतात. शेवटी ट्रक गती पकडतो, हात उंचावतात. त्यात टरकाला ओवाळून कानशिलावर बोटे मोडणार्या बायजाचेही हात असतात.
सांगलीला आल्यावर कित्येक दिवस आई भाजल्यावर काळे दाणे बाजूला काढत राहाते. त्याने एक बरणी भरून जाते. ते खाणारे मात्र नसते कोणी. शेवटी मात्र तिला लक्षपूर्वक दाणे कमी काळे करण्याची सवय लावून घ्यावी लागते. चांदीचे उदबत्तिचे घर देवघरात विराजमान होते. त्यात लावल्या जाणार्या उदबत्तीच्या धुरांच्या वलयाप्रमाणं काळाची वलयं उठत राहातात. त्या अस्पष्ट होत जाणार्या धुराप्रमाणं बायजाबाईही विस्मृतीच्या पड्द्याआड अस्पष्ट होत जाते. मधेच कधीतरी तिची गोष्ट बाबा कुणाला तरी सांगत राहातात. त्यावेळी तिच्या आठवणींचा सुवास उदबत्तीसारखाच सारे आसमंत सुगंधीत करत असतो.
२००८ मधे आईबाब इथे अमेरिकेत येतात. भडंग, भाजणी, गोडामसाला, मेतकूट असे सर्व काढून झाल्यावर बाबा एक मखमली डबी काढतात. म्हणतात काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. माझ्या बाबांना सोन्या-चांदीच्या वस्तू घडवून घेण्याची दांडगी हौस. तसेच काहीतरी असणार असे मनाशी म्हणत मी ती उघडते तर आत लक्ष्मीची चांदीची देखणी मूर्ति.
मी बाबांना म्हणते, “बाबा किती सुरेख घडवलेली आहे ही. पण कशासाठी हे इतकं महागाचं. शिवाय तुम्हाला माहीत आहे, मी पूजा वगैरे काय करत नाही”.
बाबा म्हणतात, “अगं लक्ष्मीची कुठाय ही? ही आहे बायजाबाईची. तिचं उदबत्तीचं घर आणि काही थोडी चांदी माझ्याकडची घालून बनवली मी ही. कष्ट करून मिळवलेले धन सढळपणे दुसर्याला देता यायला हवे हे शिकलो त्या लक्ष्मीकडून. म्हणुन तिची मूर्ति करुन घेतली. आता तुझ्याकडे सांभाळ”
मी निशब्द होते.. मी खरे तर बायजाबाईला कधी पाहिलेले नसते, त्यावेळी माझा जन्मही झालेला नसतो. त्या डबीत कापसात गूंडाळून ठेवलेल्या मूर्तिला मी हलकेच स्पर्श करते. त्या मखमलीत मला तिच्या खरखरीत हातांचा स्पर्श जाणवतो. ती डबी मी ठेवून देते.
तेंव्हापासुन दिवाळीत लक्ष्मीपू़जनाला आवर्जून पूजा करते ती बायजाबाईची. आणि या लक्ष्मीकडे मागणे मागते की “माये, तुझ्यासारखे नितळ मनाचे धन मलाही लाभू दे”.