जाणून घ्या डाळिंब लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Dalimb Lagwad) – Pomegranate Farming

डाळिंब पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । Dalimb Sheti । डाळिंब पिकास हवामान। डाळिंब पिकास जमीन । डाळिंब पिकातील सुधारित जाती । डाळिंब पिकातील नवीन जाती । डाळिंब पिकाची अभिवृद्धी । डाळिंब पिकाची लागवड पद्धती । डाळिंब पीक हंगाम। डाळिंब पीक लागवडीचे अंतर । डाळिंब पिकास वळण आणि डाळिंब पिकास छाटणीच्या पद्धती । डाळिंब पिकाचा बहार धरणे । डाळिंब पिकास खत व्यवस्थापन । डाळिंब पिकास पाणी व्यवस्थापन । डाळिंब पिकास सूक्ष्म अन्नद्रव्ये । डाळिंब पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । डाळिंब पिकातील आंतरपिके । डाळिंब पिकातील आतंरमशागत । डाळिंब पिकातील तणनियंत्रण । डाळिंब पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । डाळिंब पिकावरील फळांची काढणी, उत्पादन आणि विक्रीव्यवस्था ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

डाळिंब पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

डाळिंबाचे उगमस्थान इराण हा देश समजला जातो. या फळझाडाची लागवड प्रामुख्याने स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, चीन, म्यानमार, रशिया, अमेरिका व भारत या देशांत केली जाते. अफगाणिस्तानातील कंदाहार शहर डाळिंबाचे आगर समजले जाते.
डाळिंब लागवडीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पाण्याची कमी उपलब्धता आणि हलकी जमीन असलेल्या ठिकाणी डाळिंबाची लागवड इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक फायदेशीर दिसून आलेली आहे. म्हणून कोरडवाहू भागात या पिकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
डाळिंबाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये करतात. डाळिंबाचा रस काढून बाटल्यांत भरून अधिक काळ टिकविता येतो. या फळाची साल अमांश आणि अतिसार या रोगांवर अधिक गुणकारी असून सालीचा उपयोग कापड रंगविण्यासाठी करता येतो. डाळिंबाची फळे खाण्यासाठी तसेच ताज्या रसासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
डाळिंबाच्या प्रत्येक 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.

अन्नद्रव्येघटकाचे प्रमाण (%)अन्नद्रव्येघटकाचे प्रमाण (%)
पाणी78.00लोह0.30
शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)14.60स्फुरद0.07
प्रथिने (प्रोटीन्स)160चुना0.01
स्निग्धांश (फॅट्स)0.40रिबोफ्लेवीन0.10
उष्मांक65 (कॅलरी)तंतुमय पदार्थ5.10
खनिज द्रव्ये0.70
100 ग्रॅम खाण्यायोग्य डाळिंबाच्या भागातील अन्नद्रव्ये

डाळिंबाची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, चीन, जपान, रशिया, अमेरिका व भारत या देशांत प्रामुख्याने केली जाते. भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात हे पीक प्रामुख्याने घेतात. महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांत डाळिंबाची लागवड फार मोठ्या प्रमाणात करतात. गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यांतील डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत डाळिंबाची लागवड वाढत आहे. जास्त उष्णतामान व पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी या पिकाची लागवड यशस्वी होत नाही. म्हणूनच विदर्भाच्या हवामानात या पिकाच्या लागवडीसाठी विशेष वाव दिसत नाही.
डाळिंबाच्या पिकाखालील सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात (28,000 हेक्टर) असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्षेत्र व उत्पादन यांत पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांत प्रामुख्याने डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. डाळिंबाचे 3,50,000 टन उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. सोलापूर (11,064 टन), अहमदनगर ( 7,068 टन), नाशिक (5,694 टन) आणि पुणे ( 4, 518 (टन) हे जिल्हे डाळिंबाच्या उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

डाळिंब पिकास हवामान आणि डाळिंब पिकास जमीन :

हवामान :

डाळिंबाचे पीक सर्वसाधारणपणे कोरड्या व समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येते. डाळिंबाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनक्षमतेसाठी तसेच चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक असते. दमट हवामानात फळांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. तसेच फळांना तडे जाण्याचे प्रमाणही जास्त असते. कमी पावसाच्या भागात जेथे थोडी ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी डाळिंबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

जमीन :

मध्यम प्रकारची व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकासाठी निवडावी. भारी जमिनीत झाडाची वाढ भरपूर प्रमाणात होते; परंतु फळांना चांगला रंग येत नाही. अत्यंत हलक्या व मुरमाड जमिनीत फळांना चांगला रंग येतो; परंतु उत्पादन थोडे कमी येते. पाण्याचा अनियमित पुरवठा झाल्यास फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. मध्यम प्रतीची व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन डाळिंबाच्या लागवडीसाठी उत्तम असते.

डाळिंब पिकातील सुधारित जाती :

भारतात निरनिराळया भागांत विविध प्रकारच्या डाळिंबाच्या जाती लागवडीखाली आहेत. डाळिंबाच्या फळाचे आकारमान, रंग, गुणवत्ता, बियांचा मऊपणा, चव, दाण्याचा रंग, इत्यादींमध्ये विविधता आढळते. या गुणधर्मांनुसार काही प्रचलित जातींची वर्गवारी केलेली आहे.

गणेश :

ही जात गणेशखिंड फळ संशोधन केंद्र, पुणे, येथे आळंदी या वाणातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, सालीचा रंग तांबूस पिवळा ते गडद गुलाबी असतो. पोषक हवामानात फळावर लाल गुलाबी रंगाची आकर्षक चकाकी येते. या जातीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दाणे मऊ, फिकट ते गडद गुलाबी, गोड व रुचकर असतात.

मस्कत :

अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भागात या जातीची लागवड केली जाते. फळे मोठ्या आकाराची, फळांचा रंग फिकट हिरवा ते पिवळसर तांबूस असतो. दाणे मऊ, गोड, पांढरे मोत्यासारखे आणि किंचित गुलाबी छटा असलेले असतात.

ज्योती :

बंगलोर कृषि विद्यापीठाने ही जात निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. फळे गणेश जातीसारखी मध्यम आकाराची असतात. फळे झाडांच्या आतील भागात लागत असल्यामुळे उन्हामुळे फळे डागाळण्याचे प्रमाण कमी असते.

डाळिंब पिकातील नवीन जाती :

जी 137 गणेश :

या जातीपासून निवड पद्धतीने ही जात विकसित केलेली आहे. फळांचा रंग पिवळसर गडद गुलाबी असतो. दाण्यांचा रंग गडद गुलाबी आणि दाणे आकाराने टपोरे असतात. फळांचा दर्जा गणेशपेक्षा सरस असतो.

मृदुला :

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मृदुला ही नवीन जात शोधून काढली आहे. या जातीचा रंग गडद लाल असून दाणे मऊ आहेत.

डाळिंब पिकाची अभिवृद्धी आणि डाळिंब पिकाची लागवड पद्धती :

अभिवृद्धी :

डाळिंबाची लागवड गुटी कलमांपासून तसेच छाट कलमांपासून करता येते. मात्र बियांपासून लागवड केली जात नाही. बियांपासून तयार झालेले झाड उशिरा फळे देते व फळांचा दर्जा आणि उत्पादन मूळ झाडाप्रमाणे येत नाही.
उत्तम, दर्जेदार, भरपूर आणि नियमित फळे देणाऱ्या मातृवृक्षापासून गुटी व छाट कलमे तयार करावीत. गुटी कलमे तयार करण्यासाठी झाडावरच शेंड्याकडील 30 ते 45 सेंटिमीटर लांबीच्या पेन्सिलच्या जाडीच्या आकाराच्या 4 ते 6 महिने वयाच्या फांद्या निवडाव्यात. या फांद्यांवरील 2 सेंटिमीटर लांबीची गोलाकार साल काढून त्यावर ओलसर शेवाळ (मॉस) पावसाळयाच्या सुरुवातीला बांधावयास सुरुवात केल्यास 12 महिन्यांत मुळे फुटून गुटी कलमे तयार होतात.
छाट कलमे तयार करताना पेन्सिलच्या जाडीच्या आकाराच्या परिपक्व फांद्या निवडाव्यात. कलमासाठी फांदीचा मधला भाग निवडावा. छाट कलमाची लांबी 20 ते 25 सेंटिमीटर असावी व त्यावर 4 ते 6 डोळे असावेत. फांदीवरील सर्व पाने काढून टाकावीत. पावसाळयाच्या सुरुवातीनंतर कलमे गादीवाफ्यावर 30 सेंटिमीटर अंतरावर कलमाचा अंदाजे पाऊण भाग जमिनीत दाबून लावावीत.

लागवड पद्धती :

लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची उन्हाळयात उभी- आडवी नांगरणी करून, कुळवून चांगली मशागत करावी. उन्हाळ्यात लागवडीच्या अंतरावर 60 X 60 X 60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे करावेत. खड्ड्याच्या तळाशी 1.5 किलो सुपर फॉस्फेट टाकून त्यावर पोयट्याची माती अधिक 15 ते 20 किलो शेणखत यांच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. वाळवीचा त्रास टाळण्यासाठी 100 ग्रॅम 10% लिंडेन भुकटी या मिश्रणात मिसळून घ्यावी आणि नंतर खड्डे भरावेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक खड्ड्यात एक कलम लावावे. पाऊस नसल्यास लावलेल्या कलमांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

डाळिंब पीक हंगाम आणि डाळिंब पीक लागवडीचे अंतर :

उन्हाळ्यात जमीन नांगरून कुळवून मशागत केल्यानंतर खड्डे खोदण्यासाठी जागा निश्चित कराव्यात. डाळिंबाची लागवड हलक्या जमिनीत 4 x 4 मीटर आणि मध्यम ते भारी जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर करावी.

डाळिंब पिकास वळण आणि डाळिंब पिकास छाटणीच्या पद्धती :

डाळिंबाचे कलम लावल्यानंतर त्याची वाढ एका मजबूत खोडावर करून घ्यावी. मुख्य खोडाच्या अर्धा मीटर उंचीपर्यंत कोणतीही फूट वाढू देऊ नये. ह्या उंचीनंतर 4 ते 6 फांद्या चोहोबाजूंनी वाढतील अशा बेताने ठेवाव्यात. डाळिंबाच्या झाडामध्ये बुध्यांपासून जोमदार फुटवे येतात. हे फुटवे वेळीच काढून टाकावेत. डाळिंबाचे झाड एका खोडावरच वाढवावे; म्हणजे झाडाच्या बुंध्यापर्यंत स्वच्छता ठेवता येते. मशागतीची कामे सुलभतेने करता येतात. सुरुवातीची 3-4 वर्षे झाडांची वाढ जोमदार होत असते म्हणून याच काळात झाडांना योग्य वळण व आकार देणे आवश्यक आहे. नंतर पुढे फक्त वाळलेल्या, रोगट, अनावश्यक, किडीने पोखरलेल्या फांद्या व जमिनीलगतचे फुटवे काढून टाकण्याइतकेच छाटणीचे काम राहते. अलीकडे झालेल्या संशोधनावरून असे दिसून आले आहे की, एका खोडाऐवजी 2-3 खोडे ठेवणे अधिक सोईचे ठरते.
डाळिंबाच्या झाडावर जून काड्यांवरील नवीन फुटीवर 3 ते 4 वर्षे फळे येतात. नंतर थोडी हलकी छाटणी करून चांगल्या जोमदार नवीन काड्या तयार होऊ द्याव्यात. अशी छाटणी फळांची काढणी केल्यानंतरच करावी.

डाळिंब पिकास खत व्यवस्थापन आणि डाळिंब पिकास पाणी व्यवस्थापन :

खते :

डाळिंबाची 3 ते 4 वर्षांत जोमदार वाढ होण्यासाठी खालील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे नियमित खते द्यावीत.

झाडाचे वय (वर्षे)शेणखत (किलो)नत्र (युरिया) (ग्रॅम)स्फुरद (सुपर फॉस्फेट) (ग्रॅम)पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश) (ग्रॅम)
210250 (600)125 (800)125 (200)
320500 (1200)125 (800)125 (200)
430500 (1200)125 (800)250 (400)
5 वर्षे व अधिक50625 (1400)250 (1600)250 (400)
डाळिंबाच्या दर झाडाला वयोमानाप्रमाणे द्यावयाची खते

सुरुवातीच्या काळात झाडांची वाढ चांगली होण्यासाठी वर्षातून तीन वेळा म्हणजेच फेब्रुवारी-मार्च, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात खताचे हप्ते द्यावेत. खोडापासून 1 मीटर अंतरावर, फांद्यांच्या बाहेरील पसाऱ्याखाली गोलाकार चर खणून त्यात खते टाकून मातीत मिसळून घ्यावीत व लगेच पाणी द्यावे. बहार धरण्याच्या वेळी शेणखत, स्फुरद, पालाश यांचा संपूर्ण आणि नत्राचा निम्मा हप्ता द्यावा. नत्राचा उरलेला हप्ता एक महिन्याने द्यावा. हलक्या जमिनीत नत्र तीन समान हप्त्यांत दिल्यास चांगला फायदा होतो.

पाणी व्यवस्थापन :

लागवडीनंतर झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी झाडांना नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी आणि मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. पाणी फांद्यांच्या बाहेरील घेराखाली द्यावे. खोडाजवळ पाणी देऊ नये. फुले येऊन फळधारणा होईपर्यंत बेताचे पाणी द्यावे. फळे पोसू लागल्यावर पाणीपुरवठा अनियमित झाल्यास फुले व फळे गळतात आणि फळांना तडे पडतात.

डाळिंब पिकाचा बहार धरणे :

महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या झाडाला वर्षातून तीन वेळा फुले येतात. मृग बहार ( जून – जुलै), हस्त बहार ( सप्टेंबर ऑक्टोबर) आणि आंबे बहार (जानेवारी – फेब्रुवारी) असे तीन प्रमुख बहार येतात. यांपैकी एक योग्य बहार धरण्यासाठी हवामान, पाण्याची उपलब्धता, बाजारभाव, मनुष्यबळ, तांत्रिक ज्ञान, आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी, इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो.
लागवडीपासून साधारणपणे तिसऱ्या वर्षी किंवा झाडाची चांगली जोमदार वाढ झाली असल्यास दुसऱ्या वर्षीसुद्धा बहार धरता येतो. बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे फुले येण्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पाणी तोडावे लागते. या काळात पाणी तोडल्यामुळे झाडाची जीवनक्रिया मंदावते व पाने पिवळी पडून गळून पडतात. यामुळे फांद्यांमध्ये जास्तीचा अन्नसाठा होतो व झाडांना विश्रांती मिळते. मुरमाड हलक्या जमिनीत 3 ते 4 आठवडे तर मध्यम जमिनीत 5 ते 6 आठवडे पाणी बंद ठेवावे लागते. नंतर पानगळ झाल्यावर बागेची मशागत करावी. खताचा हप्ता देऊन हलके पाणी द्यावे.
आंबे बहार घेण्यासाठी उन्हाळयात पुरेसे पाणी उपलब्ध असले पाहिजे किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करून मर्यादित पाण्यावर हे पीक जोपासता येते. आंबे बहाराच्या फळाच्या वाढीच्या काळात म्हणजेच उन्हाळयाच्या मार्च ते मे या महिन्यांमध्ये हवा कोरडी व उष्ण असते तर फळे पक्व होताना म्हणजेच जून ते ऑगस्ट या पावसाळी महिन्यांत तापमान कमी असते. त्यामुळे फळाला गोडी व आकर्षक रंग येतो. फळाचा दर्जा उत्कृष्ट राहतो. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. आंबे बहार धरण्यासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बागेचे पाणी तोडावे. मध्यम जमिनीत 40 ते 50 दिवसांचा तर हलक्या जमिनीत 30 ते 40 दिवसांचा ताण पुरेसा होतो.
मृग बहार धरण्यासाठी एप्रिल मे महिन्यात बागेचे पाणी तोडावे लागते. या बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात तयार होतात. फळाच्या वाढीच्या काळात पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे रोग व किडींचा उपद्रव जास्त होतो. तसेच फळांचा दर्जा चांगला राहत नाही.
हस्त बहार धरण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासूनच झाडांना पाण्याचा ताण द्यावा लागतो. या महिन्यापर्यंत उशिरा पाऊस पडत असल्यामुळे झाडाची वाढ चालूच राहते व झाडांना विश्रांती मिळत नाही; त्यामुळे झाडावर इच्छित फुले येत नाहीत आणि पाहिजे तसे उत्पादन व दर्जा मिळत नाही. आंबे बहाराच्या फळांची गुणवत्ता व उत्पादन चांगले असल्यामुळे आंबे बहार व्यापारी व आर्थिक दृष्ट्या घेणे फायदेशीर आहे.

डाळिंब पिकास सूक्ष्म अन्नद्रव्ये :

डाळिंबाच्या फळ देणाऱ्या झाडांना सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते. ही अन्नद्रव्ये हव्या त्या प्रमाणात जमिनीतून उपलब्ध होत नाहीत. म्हणून अशा अन्नद्रव्यांच्या मिश्रणाची पानांवर फवारणी केल्यास फळाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते. फळधारणा पूर्ण झाल्यावर झाडांना लोह (फेरस सल्फेट 0.4%), झिंक (झिंक सल्फेट 0.3% ), मॅग्नेशियम (मॅग्नेशियम सल्फेट 0.3%), बोरॉन ( बोरॅक्स पावडर 0.2% ) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या एक महिन्याच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आम्लयुक्त असल्यामुळे त्या मिश्रणात कळीचा चुना घालून ती उदासीन करून घ्यावीत. यानंतर झाडावर 1.5 ते 2% युरियाची फवारणी करावी.

डाळिंब पिकातील आंतरपिके । डाळिंब पिकातील आतंरमशागत । डाळिंब पिकातील तणनियंत्रण :

सुरुवातीच्या दीड दोन वर्षांपर्यंत झाडांच्या दोन ओळींतील बरीच जागा मोकळी असते. या काळात मधल्या मोकळ्या जागेत भुईमूग, उडीद, हरभरा ही पिके किंवा कांदा, लसूण, कोबी व इतर फार उंच न वाढणारी भाजीपाल्याची पिके घेणे फायदेशीर असते. या आंतरपिकांना त्यांच्या गरजेनुसार खतांची वेगळी मात्रा द्यावी. याशिवाय रोग व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. योग्य अशी आंतरपिके घेतल्यामुळे बागेची चांगली निगा राहून मुख्य पिकांच्या वाढीला पोषक असे वातावरण मिळते. शेंगवर्गीय आंतरपिके घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणीपुरवठा विचारात घेऊन आंतरपिकांची एक किंवा अधिक हंगामांत लागवड करावी. ज्या वेळी बागेत आंतरपिके नसतात त्या वेळी बागेत स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे असते. जानेवारी ते मे या काळात भुईमूग, मिरची, गवार, काकडी, मूग, उडीद, पालक, चवळी आणि जून ते सप्टेंबर या काळात भुईमूग, मिरची, गवार, श्रावण घेवडा, मूग, उडीद, वाटाणा, चवळी इत्यादी आंतरपिके घ्यावीत.

तणनियंत्रण :

डाळिंब हे ओलिताचे पीक असल्यामुळे सुरुवातीच्या दोनतीन वर्षांत निरनिराळया तणांचा प्रादुर्भाव बागेत सतत होत असतो. तणांच्या नियंत्रणासाठी दोन ओळींतील जागेत सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांत मूग, उडीद यांसारखी पिके घ्यावीत आणि फुले येण्यापूर्वी जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. याशिवाय बागेतील मोठी तणे मजुरांकडून काढून घ्यावीत. तणांचे नियंत्रण तणनाशके वापरूनसुद्धा करता येते. ग्रामोक्झोन 1.5 लीटर अधिक फर्नोक्झोन 3 किलो दर हेक्टरी 500 लीटर पाण्यात मिसळून तणांवर फवारल्यास तणांचा नाश होतो. याशिवाय झाडांच्या खोडाजवळ जमिनीवर काळचा पॉलिथीनचे आच्छादन केल्यास तणांचे नियंत्रण होऊन कमी पाण्यात डाळिंबाची बाग वाढविता येते व पाण्याची बचत होते.

डाळिंब पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

डाळिंबाच्या झाडावर मुख्यतः वर्षातून तीन वेळा नवीन फूट येऊन त्यावर फुले येतात. या काळात हवामान दमट व ढगाळ असल्यास नवीन फुटीवर, फुलांवर आणि फळांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन बरेच नुकसान होते. त्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके व बुरशीनाशके वापरून प्रतिबंधक उपाययोजना करावी. रोग व किडी आल्यावर नियंत्रणाचे उपाय केल्यास फारसा उपयोग होत नाही.

फळे पोखरणारी अळी (सुरसा) :

या किडीची मादी (फुलपाखरू) डाळिंबाची फुले आणि कोवळया फळांवर अंडी घालते. अंड्यातून अळी निघून ती फळात प्रवेश करते आणि फळातील बिया व गर खाऊन फळात विष्ठा टाकते. अळीने पोखरलेल्या फळांवर छिद्रे पडून त्यातून अळीची विष्ठा बाहेर दिसते. अशी पोखरलेली फळे सडतात व पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात.

उपाय : फुले येण्याच्या व फळधारणेच्या काळात 0.2% कार्बारिल (सेव्हिन 50% ) फॉस्फोमिडॉन 85% पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बागेवर फवारावे. झाडाखाली पडलेली फुले व फळे गोळा करून नष्ट करावीत.

साल खाणारी अळी :

या किडीची अळी रात्रीच्या वेळी झाडाच्या खोडाची व फांद्यांची साल खाते. अळी खोडांचा व फांद्यांचा आतील भाग पोखरून आत लपून बसते. खोडावर किडीची विष्ठा, जाळी आणि भुसा आढळून आल्यास ही कीड आतमध्ये हमखास आहे असे समजावे. डाळिंबाच्या जुन्या किंवा दुर्लक्षित बागेत ही कीड आढळते.

उपाय : झाडाचा किडलेला भाग खरडून स्वच्छ करावा. खोड व फांदीवरील छिद्र तारेच्या साह्याने मोकळे करावे व त्यात पेट्रोल किंवा रॉकेलचा बोळा टाकून ते ओल्या मातीने बंद करावे. मोनोक्रोटोफॉस पाण्यात मिसळून किडलेल्या भागावर फवारणी करावी.

खोडाला छिद्रे पाडणारी कीड :

आकाराने अतिशय लहान आणि काळचा रंगाचा भुंगा डाळिंबाचे खोड आणि फांद्यांवर बारीक छिद्रे पाडून खोड आतून पोखरून टाकतो. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड अथवा झाडाच्या फांद्या वाळून जातात.

उपाय : किडलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. 50% सेवीन 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून खोड आणि फांद्यांवर फवारावे.

मावा व फुलकिडे :

या किडी कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाच्या कोवळ्या फांद्या सुकल्यासारख्या दिसतात. माव्याचे प्रमाण वाढल्यास पानावर तेलकट पदार्थ पसरल्यासारखा दिसतो.

उपाय : डायमेथोएट 30%, मिथील डिमेटॉन 25%, मोनोक्रोटोफॉस 36% यांपैकी एक कीटकनाशक औषध 10 मिली. 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लाल कोळी :

अतिशय लहान आकाराची ही कीड पाने, फुले आणि फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे पानांची खालील बाजू व फळांची साल प्रथम चंदेरी पांढरी व नंतर तांबूस पडते. फळांवर तांबूस तपकिरी चट्टे दिसतात.

उपाय : पाण्यात विरघळणारे 25 ग्रॅम गंधक 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

पानावरील ठिपके (लीफ स्पॉट) :

या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर फिकट तपकिरी ते जांभळसर, चक्राकार आणि वेडेवाकडे ठिपके दिसून येतात. नंतर त्यांचे एकमेकांत मिसळून गडद काळपट ठिपक्यांत रूपांतर होते. अशी रोगट पाने पिवळी पडून गळतात. फळांवरसुद्धा रोगाची लक्षणे दिसतात. रोग बळावल्यास फळे आतून कुजू लागतात.

उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच डायथेन झेड 78 किंवा डायथेन एम-45 या बुरशीनाशकाच्या 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

फळकूज (फ्रुट रॉट) :

हा रोग प्रामुख्याने पावसाळी हंगामात दिसून येतो. फळाची साल व आतील भाग बुरशीमुळे सडून जातो. अशा फळांना आंबूस वास येतो. हा रोग फळांतील बियांमार्फत पसरतो. या रोगामुळे फुलेसुद्धा गळून पडतात.

उपाय : बागेतील रोगग्रस्त फांद्या, फुले व फळे वारंवार जमा करून नष्ट करावीत. डायथेन एम-45 किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

फळांना तडे पडणे :

डाळिंबाच्या लहान फळांना बोरॉनच्या कमतरतेमुळे तडे पडतात. परंतु अनियमित पाणीपुरवठा हे फळांना तडे पडण्याचे दुसरे कारण आहे. मृग बहाराच्या फळांमध्ये अनियमित पावसामुळे व हवेतील कमीअधिक आर्द्रतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.

डाळिंब पिकावरील फळांची काढणी, उत्पादन आणि विक्रीव्यवस्था :

फळांची काढणी :

डाळिंबाची फळे फुले लागल्यापासून 4/5 महिन्यांत काढणीसाठी तयार होतात. आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्टमध्ये तर मृग बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात काढणीसाठी तयार होतात. फळांची साल पिवळसर करड्या रंगाची दिसू लागल्यानंतर आणि फळ हाताने दाबल्यावर करकर आवाज आल्यास फळे काढणीस तयार झाली असे समजावे.

उत्पादन :

डाळिंबाच्या झाडापासून 3 ते 5 वर्षांपर्यंत कमी फळे मिळतात. झाडे 6 ते 8 वर्षांची झाल्यानंतर प्रत्येक झाडापासून 150 ते 200 फळे मिळतात. डाळिंबाची बाग 15- 20 वर्षांपर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते. आणि त्यानंतर उत्पादनाचे प्रमाण घटत
जाते.

विक्री :

फळे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यापूर्वी त्यांची आकारावरून प्रतवारी करावी. फळे बांबूच्या करंड्यांत भरताना करंड्यांच्या तळाशी आणि तोंडाशी थोडे वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट भरून व्यवस्थित बंद कराव्यात व त्यावर लेबल लावून विक्रीसाठी
बाजारात पाठवाव्यात.

डाळिंब फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :

डाळिंबाच्या फळांची काढणी केल्यानंतर फळे 2 आठवडे चांगली राहू शकतात. फळांची 2 अंश सेल्सिअस तापमानाला 2 महिन्यांपर्यंत साठवण करता येते. फळे झाडावरच पक्व होत असल्यामुळे झाडावरून काढल्यानंतर खास करून पिकविण्याची गरज नसते.

सारांश :

डाळिंबाचे पीक सर्वसाधारणपणे कोरड्या व समशीतोष्ण हवामानात चागंल्या प्रकारे येते. मध्यम प्रकारची व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकासाठी निवडावी. भारतात डाळिंबाच्या लागवडीखाली सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात गणेश या जातीची लागवड सोलापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली उस्मानाबाद या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात करतात. डाळिंबाची अभिवृद्धी गुटी कलमापासून करतात. हलक्या जमिनीत 4 X 4 मीटर आणि मध्यम जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर लागवड करतात. डाळिंबाची 3 ते 4 वर्षांत जोमदार वाढ होण्यासाठी नियमित खते व पाणी तसेच रोग व किडींपासून संरक्षण करणे या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या झाडाला वर्षातून तीन वेळा फुले (बहार) येतात. यापैकी एक योग्य बहार धरण्यासाठी हवामान, पाण्याची उपलब्धता, बाजारभाव, तांत्रिक ज्ञान, इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. बहार धरण्यासाठी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे फुले येण्यापूर्वी एक ते दीड महिना पाणी तोडावे लागते.

जाणून घ्या लिंबू लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Limbu Lagwad Mahiti) – Limbu Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )