जाणून घ्या पपई लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Papai Lagwad Mahiti) – Papai Farming

पपई लागवड । Papai Lagwad । Papai Sheti । पपई पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । पपई पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । पपई पिकास लागवडीयोग्य हवामान । पपई पिकास लागवडीयोग्य जमीन । पपई पिकातील सुधारित जाती । पपई पिकातील अभिवृद्धी । पपई पिकातील लागवड पद्धती । पपई पिकास वळण । पपई पिकास छाटणी । पपई पिकास खत व्यवस्थापन । पपई पिकास पाणी व्यवस्थापन । पपई पिकातील आंतरपिके । पपई पिकातील आंतरमशागत । पपई पिकातील तणनियंत्रण । पपई पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । पपई पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । पपई पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । पपई पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याची पद्धती । पेपेन उद्योग ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

पपई लागवड : Papai Lagwad – Papai Sheti

कमी काळात, कमी पाण्यात आणि कमी खर्चात पपईचे उत्पादन घेता येते. फळ म्हणून आणि पेपेन म्हणून असे पपईचे दुहेरी महत्त्व आहे. सोळाव्या शतकात मलाया या देशातून भारतातून आलेले हे फळ मागील पन्नाससाठ वर्षांत फारच लोकप्रिय झाले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत प्रामुख्याने पपईची लागवड होते. महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, इत्यादी जिल्हे तसेच पुणे आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील बहुतेक भागांत कमीअधिक प्रमाणात पपईची लागवड होते. जवळजवळ वर्षभर पपईचे झाड फळ देते.

पपई पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

पपईचे मूळस्थान अमेरिकेत असले तरी निश्चितपणे ते ठिकाण कोणते हे स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते, पपईंचे उगमस्थान दक्षिण मेक्सिको हे आहे.
पपईच्या पिकापासून कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी निगेत बऱ्यापैकी उत्पादन मिळते आणि ह्याच कारणाने देशात ह्या पिकास कमी अवधीत अधिक लोकप्रियता मिळाली आहे. पपईच्या झाडापासून जवळजवळ वर्षभर फळे मिळतात. तसेच कमी अवधीत पीक येत असल्यामुळे आणि झाडाचे आयुष्यमान कमी असल्यामुळे इतर बागेतही पपई आंतरपीक म्हणून घेता येते. पपईचे फळ अन्नघटकांच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. पोटाच्या बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या विकारांवर पपई गुणकारी असून पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. पपईच्या फळामध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे तसेच इतर अन्नघटकद्रव्ये असतात. 100 ग्रॅम खाण्यायोग्य पिकलेल्या पपईच्या फळात खालीलप्रमाणे अन्नघटक असतात.

अन्नघटकप्रमाण %
पाणी89.50
शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)9.50
प्रथिने (प्रोटीन्स)0.50
स्निग्धांश (फॅट्स)0.10
खनिजद्रव्ये0.42
लोह0.40
स्फुरद0.01
चुना0.01
जीवनसत्त्व ‘अ’20.20 इंटरनॅशनल युनिट
जीवनसत्त्व ‘ब’0.04 मिलिग्रॅम
जीवनसत्त्व ‘क’0.05 मिलिग्रॅम
रायबोफ्लेव्हिन0.25 मिलिग्रॅम
निकोटिनिक आम्ल0.2 मिलिग्रॅम
उष्मांक40 कॅलरी
100 ग्रॅम खाण्यायोग्य पपईत असणारेअन्नघटक

कच्च्या पपईचा भाजीसाठी तसेच कोशिंबिरीत वापर करतात. पिकलेली घट्ट फळे अथवा काप, जॅम तयार करण्यासाठी वापरतात. कच्च्या पपईपासून पेपेन नावाचा कच्चा चिकट द्राव काढतात. या पेपेनचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.
पपईचे फळ फिलिपाईन्समधून मलायामार्गे भारतात आले. सुरुवातीच्या काळात पपई पोर्तुगिजांनी मलायात आणली असा समज आहे. सन 1626 मध्ये पपई भारतातून इटली देशात पोहोचली. जगातील 30 पेक्षा अधिक देशांमध्ये पपईची लागवड केली जाते. ह्यात प्रामुख्याने आफ्रिका, अमेरिका, रशिया, भारत, इंडोनेशिया, चीन, बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. भारतातील अती थंड हवामानाचे प्रदेश सोडल्यास इतर सर्व भागांत पपईची लागवड होते.

पपई पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :

भारत, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ब्राझील, मेक्सिको या 5 देशांचे मिळून पपईंचे उत्पादन एकूण जागतिक उत्पादनाच्या 70 ते 80% आहे. तर मोझांबिक, क्युबा, जमैका, कोलंबिया, पेरू आणि व्हेनेझुएला ह्या राष्ट्रांचा वाटा 20% इतका आहे. पपई उत्पादन करणारे भारत हे एक प्रमुख राष्ट्र असून केरळ, ओरिसा, आसाम, गुजरात, महाराष्ट्र, तामीळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार बेटे, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या राज्यांत पपईची लागवड होते. भारतातील अती थंड प्रदेश सोडल्यास देशात सर्वच भागात पपईची लागवड होते.
भारतातील पपईची लागवड 32,500 हेक्टर क्षेत्रावर असून त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा 2,000 हेक्टर एवढा आहे. भारतात पपई उत्पादकतेच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्ट्राचा क्रमांक बराच वर लागतो. भारतात पपईचे सरासरी उत्पादन हेक्टरी 8.5 टन आहे. तर महाराष्ट्रातील उत्पादन हेक्टरी 14.6 टन आहे. महाराष्ट्रात जळगाव, अहमदनगर, पुणे, धुळे, नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

पपई पिकास लागवडीयोग्य हवामान आणि पपई पिकास लागवडीयोग्य जमीन :

पपई हे उष्ण प्रदेशातील पीक आहे. ह्या पिकाच्या वाढीस उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव व धुके ह्या पिकास हानीकारक ठरतात. पपईची वाढ 38 ते 44 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. उबदार आणि समतोल उष्णतामान या पिकास योग्य समजले जाते. समुद्रसपाटीपासून 1,000 मीटर उंचीपर्यंत उष्ण हवामानात पपईची लागवड यशस्वीपणे करता येते.
पपईच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन चालते. पपईची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे मध्यम खोलीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली सकस जमीन या पिकास चांगली मानवते. चांगली मशागत करून आणि भरपूर सेंद्रिय खते घालून पपईचे पीक हलक्या जमिनीतही घेता येते.
पपईच्या झाडांची मुळे ठिसूळ असल्यामुळे ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनीत मुळे सडतात. पाने पिवळी पडून वाढ थांबते, उत्पादन घटते आणि कधी कधी झाडे मोडून पडतात.
पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या भारी व चोपण जमिनीत तसेच क्षारयुक्त, चुनखडीच्या व पाणी साचणाऱ्या जमिनीत पपईची लागवड करू नये.

पपई पिकातील सुधारित जाती :

पपईच्या वॉशिंग्टन, मधुबिंदू, सिलेक्शन 7 या जाती बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहेत. तामीळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी को 1, को 2 ते को 7 या जाती प्रसारित केल्या आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुसा कृषी संशोधन केंद्रामार्फत पुसा डिलिशियस, पुसा मॅजेस्टी, पुसा जायंट, पुसा ड्वार्फ या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत आणि भारतीय बागवानी अनुसंधान संस्थेच्या चेताली (कर्नाटक) केंद्रावरून कूर्ग हनीड्यू ह्या सुधारित जाती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. अलीकडे तैवान जाती खूपच लोकप्रिय झालेल्या आहेत.
पपईच्या काही प्रमुख जातींची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.

वाशिंग्टन :

या जातीच्या झाडाच्या पानांचे देठ जांभळ्या रंगाचे असून खोडावर जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. झाडे कमी उंचीची असतात. या जातीची फुले मोठी आणि पिवळया रंगाची असतात; तर फळे लंबवर्तुळाकार, सरासरी 1.5 ते 2 किलो वजनाची असतात. फळातील गर केशरी रंगाचा व चवदार असतो. फळात बियांचे प्रमाण कमी असते. ही जात उत्पादनास बरी आणि चिकास सर्वसाधारण असते.

कूर्ग हनीड्यू :

या जातीमध्ये बहुतेक झाडे उभयलिंगी असतात. त्यामुळे लागवड करताना एका ठिकाणी एकच रोप लावावे. या जातीची फळे लांबट, मध्यम ते मोठी व पिवळसर रंगाची असतात. फळांचा गर आकर्षक नारिंगी, मऊ आणि रसदार असतो. फळांचा आतील पोकळ भाग मोठा असतो. चिकाचे प्रमाण कमी असते. फळांची संख्या 100 ते 150 पर्यंत असते. झाडाचा वरचा भाग निमुळता आणि बारीक असल्यामुळे वाऱ्या वादळात झाडे मोडण्याची शक्यता जास्त असते.

को – 1 (कोइमतूर – 1) :

रांची जातीपासून निवडलेल्या ह्या जातीच्या झाडावर फळे कमी उंचीवर लागतात. खोड व शेंड्याकडील भाग सारखा असल्याने झाडे मजबूत असतात आणि वाऱ्यावादळाला सहसा बळी पडत नाहीत. फळे चपटी गोल ते लांबट गोल, टोकावर रेषा, वजनाला 1 ते 7 किलोपर्यंत असतात. फळांचा रंग आकर्षक केशरी आणि चव गोड असते.

को – 2 (कोइमतूर – 2) :

फळे लंबगोल व को-1 या जातीच्या फळांपेक्षा लहान असतात. फळे खाण्यासाठी उत्तम असतात. चिकाचे (पेपेन) प्रमाण जास्त असते. ह्या दोन्ही गुणांमुळे ही जात लागवडीखाली जास्त प्रमाणात आढळून येते.

को – 7 (कोइमतूर – 7) :

फळे मध्यम ते लहान आणि लांबट गोल आकाराची असातात. चीक काढण्यासाठी ही जात जास्त चांगली आहे.

पुसा डिलिशिअस (पुसा 1-15) :

जास्त उत्पादन देणारी ही जात मध्यम उंचीची आहे. या जातीत मादी झाडे आणि उभयलिंगी झाडे येतात म्हणून लागवड करताना एका खड्ड्यात एकच रोप लावावे. या जातीची फळे मधुर व स्वाद वैशिष्ट्यपूर्ण असतो. फळातील गराचा रंग गर्द नारिंगी असतो. फळे लंबगोल असून वजन सरासरी 1.5 किलो (जास्तीत जास्त 2.5 किलो) असते. ही जात सर्वत्र लागवडीस योग्य आहे.

पुसा मॅजेस्टी :

या जातीतसुद्धा मादी आणि उभयलिंगी झाडे येतात. फळे लांबट गोल असून फळांची चव चांगली असते. फळातील गर घट्ट असून गराचा रंग नारिंगी असतो. फळे काढणीनंतर जास्त दिवस टिकतात. फळाचे वजन 1 ते 3.5 किलोपर्यंत असते. ही जात चिकासाठी चांगली आहे. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

पुसा जायंट (पुसा 1-45 व्ही) :

या जातीत नर आणि मादी अशी झाडे येतात. म्हणून लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्डयात 3 रोपे लावावीत. बळकट खोड असल्याने या जातीची झाडे वाऱ्यावादळाला चांगला प्रतिकार करतात. झाडे जोमदार असून फळाची प्रत चांगली असते. फळाचा आकार लंबगोल, टोकाला निमुळता वजन 2 ते 3 किलो, गर नारिंगी रंगाचा असतो. झाडाच्या जमिनीपासून 90 सेंमी. उंचीवर फळे लागतात; तर झाडे 2.53 मीटर उंच वाढतात.

पुसा ड्वार्फ (पुसा 1-45 डी-5) :

या जातीत नर आणि मादी झाडे वेगवेगळी येतात. या जातीची झाडे बुटकी असतात. झाडाची उंची 130 सेंमी. पर्यंत असते. मध्यम आकाराची, गोल, सरासरी 1 ते 1.5 किलो वजनाची फळे लागतात. उत्पादनाला मध्यम अशी ही जात आहे.

सोलो :

हवाईमधील एक उत्कृष्ट जात असून बंगलोर भागात लागवडीखाली आढळते. उभयलिंगी झाडे असलेली ही जात असून फळे लहान आकाराची, लांबट असून फळावरील कोनरेषा स्पष्ट असतात. फळातील गराचा रंग निळसर नारिंगी असतो. फळे काढणीनंतर जास्त काळ टिकून राहतात.

तैवान जाती :

तैवान 786 ही जात रेड लेडी या नावाने ओळखली जाते. ही जात महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.

पपई पिकातील अभिवृद्धी आणि पपई पिकातील लागवड पद्धती :

पपईची लागवड नेहमी बियांपासून रोपे तयार करून करावी लागते.

रोपे तयार करणे :

रोपे गादीवाफ्यावर किंवा पॉलिथीनच्या पिशवीत तयार करतात. जातिवंत निरोगी रोपावर पुढील उत्पादन अवलंबून असते. म्हणूनच खात्रीलायक बियाणे निवडणे आणि निरोगी रोपे तयार करणे महत्त्वाचे ठरते. ह्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
(1) रोपे तयार करण्यासाठी निवडक जातीचे बी वापरावे.
(2) बियांची उगवणशक्ती फळातून काढल्यानंतर सुरुवातीला जास्त असते; मात्र 45 दिवसांनंतर उगवणशक्ती कमी कमी होते. म्हणून बी शक्य तितक्या लवकर वापरावे.
(3) लहान व हलके बी काढून टाकावे.
(4) बी काढल्यानंतर ते स्वच्छ धुऊन त्यावर बाविस्टीन (कार्बेन्डेझिम) अथवा थायरमसारख्या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर बी सावलीत वाळवावे. 1 किलो बियांसाठी 2 ते 3 ग्रॅम बुरशीनाशक वापरावे.
(5) एका हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठी 250 ते 350 ग्रॅम बी पुरेसे होते.
(6) बिया दुसरीकडून आणलेल्या असल्यास त्या पेरणीपूर्वी 8 तास कोमट पाण्यात भिजवाव्यात.

(1) गादीवाफ्यावर रोपे तयार करणे :

रोप तयार करण्यासाठी चांगली निचरा होणारी पोयट्याची भुसभुशीत जमीन निवडावी. जमीन आडवी-उभी नांगरून ढेकळे फोडून सपाट करावी. 2 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 10 ते 15 सेंमी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना 2 टोपल्या चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून नंतर वाफा तयार करावा. जमीन भारी असल्यास सोबत 1-2 टोपल्या वाळू मिसळावी. वाफ्यावर 15 सेंमी. अंतरावर 2 सेंमी. खोल रेषा पाडून ओळींमध्ये 3 सेंमी. अंतरावर बी पेरावे. नंतर बी मातीने झाकून द्यावे. त्यानंतर दरदरोज झारीने पाणी द्यावे. बी उगवण्यास 3 ते 5 आठवड्यांचा कालावधी लागतो. रोपे उगवून आल्यावर वाफ्याला 2 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

(2) पॉलिथीनच्या पिशवीत रोपे तयार करणे :

पॉलिथीन पिशवीत तयार केलेली रोपे लागवडीस वापरल्यास नांगे पडत नाहीत. यासाठी 75 सेंमी. X 12.5 सेंमी. आकाराच्या अरुंद व उंच अशा पिशव्या वापराव्यात. पिशवीच्या तळाकडील भागातून निचरा होण्यासाठी पिशवीच्या तळाला 4 ते 6 भोके पाडावीत. चांगली माती आणि कुजलेले शेणखत समप्रमाणात मिसळून हया मिश्रणाने पिशवी भरावी. त्यानंतर प्रत्येक पिशवीत एक ह्या प्रमाणे बी टाकावे आणि झारीने दिवसाआड पाणी द्यावे.
वरील दोन्ही पद्धतींनी तयार केलेली रोपे 8 ते 10 सेंमी. पर्यंत उंच वाढल्यानंतर त्यांना खत द्यावे. प्रत्येक गादीवाफ्याला 100 ग्रॅम सुफला खत द्यावे. पिशवीतील रोपाला प्रत्येकी अर्धा ग्रॅम सुफला द्यावा. पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा एवढीच मात्रा द्यावी. खत दिल्यानंतर पाणी देणे जरुरीचे असते. त्याचप्रमाणे दर पंधरा दिवसांनी रोगप्रतिबंधक उपाय म्हणून डायथेन एम-45, 2.5 ग्रॅम 1 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारावे. कडक उन्हापासून कोवळ्या रोपांचे संरक्षण होण्यासाठी जरुरीनुसार सुरुवातीला सावली करावी.
निवडलेल्या जमिनीची ढेकळे फोडून घ्यावीत. आवश्यकतेनुसार वखराच्या पाळया देऊन जमीन सपाट करावी. पपईची लागवड 2.25 मीटर x 2.25 मीटर अंतरावर करावी. याप्रमाणे शेताची आखणी करून 45 x 45 x 45 सेंमी. आकाराचे खड्डे खोदावेत. काही दिवस ऊन खाल्ल्यानंतर हे खड्डे दोन भाग चांगली माती आणि एक भाग कुजलेल्या शेणखताच्या मिश्रणाने भरावेत. प्रत्येक खड्ड्याभोवती आळे तयार करून पाटाने पाणी द्यावे. नंतर 3-4 दिवसांनी वाफसा आल्यावर रोपांची लागवड करावी.

लागवड करताना खालील काळजी घ्यावी :

(1) 15 ते 22.5 सेंमी. उंचीची साधारण दीड ते दोन महिन्यांची रोपे लागवडीसाठी निवडावीत. अधिक उंचीच्या अथवा अती लहान रोपांची लागवड करू नये.

(2) वाफ्यास अथवा पिशवीस रोपे काढण्याच्या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोपे काढताना मुळांना इजा होणार नाही.

(3) वाफ्यात रोप जितके खोल असेल त्यापेक्षा किंचित जास्त खोलीवर खड्ड्यात रोप लावावे. पिशवीतील रोपांची पिशवी फाडून मातीसकट लागवड करावी.

(4) नर झाडे आणि मादी झाडे वेगवेगळ्या झाडांवर असलेल्या जातींची रोपे असल्यास प्रत्येक खड्ड्यात 20 सेंमी. अंतरावर त्रिकोणी अथवा चौकोनी पद्धतीने 3 ते 4 रोपे लावावीत. परंतु कूर्ग हनीड्यू, को-3, सोलो, पुसा डिलिशिअस, पुसा मॅजेस्टी यांसारख्या उभयलिंगी जाती असल्यास प्रत्येक खड्ड्यात एकच रोप लावावे.

(5) लागवड ढगाळ हवामानात किंवा पावसाच्या हलक्या सरी येत असताना किंवा दुपारनंतर करावी. लागवडीनंतर पावसाच्या सरी येत नसतील तर लगेच पाणी द्यावे.

(6) रोपे स्थलांतरित केल्यानंतर मुळाभोवती पोकळी राहू नये आणि त्यांचा जमिनीशी घट्ट संबंध यावा म्हणून सभोवतालची माती रोपाभोवती घट्ट दाबावी. रोपे सरळ उभी लावावीत.

(7) उंच वा जास्त पाने असलेली रोपे असल्यास रोपावरील खालची 1-2 मोठी पाने कमी करावीत. पपईची लागवड वर्षातून तीन वेळा म्हणजे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात करता येते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार हंगामाची निवड करावी. जून-जुलैमध्ये अधिक पाऊस आणि भारी जमीन असलेल्या भागात जून-जुलैची लागवड शक्यतो करू नये. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पुढे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये लागवड करावी.
तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्यास बियांची उगवण चांगली होते. 23 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि 44 अंश सेल्सिअसच्या वर तापमान असल्यास बियांच्या उगवणीवर वाईट परिणाम होतो.

पपई पिकास वळण आणि पपई पिकास छाटणी :

पपईचे खोड ठिसूळ असून त्यावर पाने येतात. खोडावरील प्रत्येक पानाच्या बगलेत फुले लागतात. पपईची छाटणी करावी लागत नाही वा वळण द्यावे लागत नाही. नैसर्गिकपणे झाडाची वाढ होऊ द्यावी.

पपई पिकास खत व्यवस्थापन आणि पपई पिकास पाणी व्यवस्थापन :

पपईच्या झाडांची वाढ आणि फुले येण्याची प्रक्रिया एकाच वेळी होत असते. पपई जलद वाढणारे आणि लवकर व जास्त उत्पादन देणारे झाड असल्यामुळे ते जमिनीतून जास्त अन्नद्रव्ये काढून घेते. पपईच्या खोडावरील प्रत्येक पानाच्या बगलेत फूल येते, ज्यापासून पुढे फळ मिळू शकते. यामुळे पपईच्या झाडाला वर्षभर अन्नद्रव्याची आवश्यकता भासते. पपईला लागवडीच्या वेळी भरपूर शेणखत द्यावे. ह्याशिवाय प्रत्येक आळयात 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश अशा खतमात्रा 1, 3, 5 आणि 7 महिन्यांनी प्रत्येक वेळी द्यावी. म्हणजेच एकूण 200 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रत्येक झाडाला द्यावे. जमीन हलकी असलेल्या बागेत हे प्रमाण 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ते500 ग्रॅम पालाश 4 ते 6 वेळा सारख्या प्रमाणात विभागून 2-2 महिन्यांच्या अंतराने द्यावे. खते झाडापासून 12-15 सेंमी. (अर्धा फूट) अंतरावर झाडाभोवती 10 सेंमी. गोलाकार चर खोदून त्यात टाकून मातीने झाकावीत. नंतर लगेच पाणी द्यावे. बागेत अथवा झाडाच्या बुंध्याशी पाणी साचून राहणे पपईच्या पिकाला धोकादायक ठरते. जास्त पाण्यामुळे झाडाचा बुंधा सडून झाडे कोलमडतात, याउलट पाण्याचा ताण पडल्यास फळांचे पोषण व्यवस्थित होत नाही. म्हणूनच पपईला नियमित आणि आटोपशीर पाणी द्यावे. पपईला पाणी देताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत

(1) बागेला वारंवार आणि प्रमाणाबाहेर पाणी देऊ नये.

(2) खताच्या प्रत्येक हप्त्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.

(3) पाण्याचा ताण पडणार नाही इतके अंतर पाण्याच्या दोन पाळ्यांत ठेवावे.

(4) बुंध्याचा पाण्याशी संबंध येऊ नये ह्यासाठी बुंध्याभोवती उंच मातीची भर घालावी. आणि उतार काढावा.

(5) बागेत पावसाचे पाणी साचू नये म्हणून पावसाळयात चर काढून द्यावेत.

(6) पावसाळ्यात जरुरीनुसार, हिवाळयात 8 ते 10 दिवसांनी आणि उन्हाळयात 4 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे.

(7) उन्हाळयात वाफ्यामध्ये वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. यामुळे पाण्याच्या कमी पाळचा लागतील.

पपई पिकातील आंतरपिके । पपई पिकातील आंतरमशागत । पपई पिकातील तणनियंत्रण :

पपईची मुळे उथळ असतात. त्यामुळे आंतरमशागत व खुरपणी फक्त तण काढण्यासाठी वरवर करून बाग स्वच्छ ठेवावी. पपईमध्ये शक्यतो आंतरपीक घेऊ नये. आंतरपीक घ्यायचे असल्यास सुरुवातीच्या 6 ते 8 महिन्यांच्या काळात मूग, उडीद, चवळी, वाटाणा, घेवडा, कांदा, मुळा यांसारखी पिके घ्यावीत. वेलभाज्या, कोबीवर्गीय भाज्या, भेंडी, वांगी ह्यांसारखी भाजीपाला पिके आणि उंच वाढणारी ज्वारी, मका, कापूस ही पिके आंतरपिके म्हणून घेऊ नयेत. वेलवर्गीय भाज्या आणि वांगी ही पिके पपईच्या जवळ लावू नयेत. आंतरपिकांना खताच्या वेगळया मात्रा द्याव्यात.
पपईच्या झाडाची मुळे उथळ वाढतात. त्यामुळे बागेत तण वाढू देऊ नये. वेळोवेळी खुरपणी करून तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. सुरुवातीच्या काळात योग्य आंतरपिके घेतल्यास तणांची वाढ थांबते. पपईच्या बागेत वर्षातून 2 ते 3 वेळा निंदणी किंवा हलकी खुरपणी करावी. मात्र 12 ते 15 सेंमी. पेक्षा जास्त खोल निंदणी किंवा खुरपणी करू नये.

पपई पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

कोळी, मावा आणि पांढरी माशी या पपईवरील प्रमुख किडी आहेत. ह्याव्यतिरिक्त फळमाशी, पाने खाणारी अळी, खवलेकीड, नाकतोडे या किडी क्वचित प्रसंगी आढळतात.

कोळी :

कोळी ही कीड पानाच्या खालच्या बाजूतून रस शोषण करते; त्यामुळे पानांवर पिवळे ठिपके पडून ती वाळतात.

उपाय : कीडग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत. झाडावर डायमेथोएटचा (रोगरचा) 0.06% किंवा डायकोफोल 0.04% तीव्रतेचा फवारा द्यावा. 15 दिवसांनी दुसरा फवारा द्यावा.

मावा :

मावा कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर चट्टे पडतात. माव्यामुळे मोझॅईक या विषाणू (व्हायरस) रोगाचा प्रसार होतो.

उपाय : खबरदारीचा उपाय म्हणून मोनोक्रोटोफॉस 0.4% (36 डब्ल्यू. इ. सी. ) किंवा मिथाईल डिमेटॉन 0.025% (25 इसी) तीव्रतेचे फवारे द्यावेत. व्हायरसग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

पांढरी माशी :

ही कीड पपईच्या पानाच्या खालच्या बाजूतून रस शोषण करते. पाने पिवळसर होतात. पाने खालच्या बाजूने आकुंचन पावून वळतात. पांढऱ्या माशीमुळेही विषाणुजन्य (व्हायरस) रोगाचा प्रसार होतो. कोरड्या हवामानात पांढरी माशी जास्त उपद्रव करते.

उपाय : मावा ह्या किडीचे नियंत्रण करताना पांढऱ्या माशीचेही नियंत्रण होते.

पपई पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

रोपवाटिकेतील रोपांची मर, बुंधा सडणे, पानावरील करपा, भुरी आणि व्हायरस हे पपईवरील प्रमुख रोग आहेत.

रोपवाटिकेतील रोपांची मर :

या रोगाची लागण झाल्यामुळे रोपे रोपवाटिकेमध्येच सडतात.
उपाय : या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोपवाटिकेतील जमीन निर्जंतूक करावी. ह्यासाठी 2.5% तीव्रतेच्या फॉरमॅल्डिहाईडचे द्रावण वाफ्यावर ओतावे आणि वाफे 48 तासपर्यंत कागदाने झाकावेत. बी पेरण्यापूर्वी 15 दिवस अगोदर ही क्रिया करावी. बी पेरण्यापूर्वी 1 किलो बियांना 2.5 ग्रॅम या प्रमाणात सेरेसॉन या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

झाडाचा बुंधा सडणे :

जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीमुळे पपईचे खोड जमिनीजवळ कुजते. पाने पिवळी पडून गळतात आणि कधी कधी झाडही मरते.

उपाय : पाण्याचा निचरा चांगला होत नसलेल्या जमिनीत ह्या रोगाचा पावसाळयात प्रादुर्भाव होतो. म्हणूनच पाण्याचा निचरा चांगला राहील अशी व्यवस्था करावी. बुंध्याजवळ पाणी साचू देऊ नये. पावसाळ्यात विशेषतः रोगाची लक्षणे दिसताच बुंध्याजवळ एका झाडाला 1 लीटर या प्रमाणात कॉपर ऑक्सिक्लोराईडचे द्रावण टाकावे ( 1 लीटर पाण्यात 2 ग्रॅम या प्रमाणात कॉपर ऑक्सिक्लोराईड घालून द्रावण तयार करावे.)
(3) पानांवरील करपा पानाच्या कडा काळसर करड्या रंगाच्या होतात. आणि नंतर संपूर्ण पान वाळून गळून पडते.

भुरी :

पानांवर आणि फळांवर हा रोग प्रामुख्याने पावसाळयात आणि दमट हवामानात दिसतो. पानाच्या दोन्ही बाजूंवर पांढरी बुरशी वाढते. फळावरही ठिपके दिसतात. रोग बळावल्यास पाने गळतात.

उपाय : पानावरील करपा आणि भुरी या दोन्ही रोगांमुळे पाने गळतात. त्यामुळे झाड कमजोर होऊन फुले आणि फळे गळतात. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी पावसाळयात दर पंधरा दिवसांच्या अंतराने डिमेक्रॉन 100 मिली. अधिक कॅराथेन 100 मिली. अधिक 50 ग्रॅम डायथेन झेड 78 दोनशे लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

व्हायरस :

व्हायरस या रोगाची लागण झाल्यास सुरुवातीला पानाच्या शिरा पिवळया पडतात. नंतर पानावर पिवळे ठिपके दिसतात. पानाचा आकार लहान होतो. पाने गळून शेंड्यावर लहानसा पानांचा गुच्छ राहतो. फलधारणा होत नाही, लहान फळे गळतात. मोठ्या फळांना चव नसते. हा पपईवरील सर्वांत जास्त नुकसानकारक रोग असून त्याचा प्रसार मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींमुळे होतो.

उपाय : रोगट झाडे दिसताच ती मुळांसकट काढून जाळून टाकावीत. रोगट झाडे जास्त असलेल्या शेतात पुढे 2-3 वर्षे पपईचे पीक घेऊ नये. सुरुवातीपासूनच किडीचा बंदोबस्त केल्यास ह्या रोगाचा प्रसार होत नाही.

पपई पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

पपईचे रोप लावल्यानंतर 4 ते 6 महिन्यांनी पपईच्या झाडाला फुले येतात आणि फळधारणा झाल्यानंतर 4 ते 5 महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात. म्हणजेच रोपे लावल्यापासून एका वर्षात फळे काढणीस येतात. फळ तयार झाले हे खालील गुणधर्मावरून ओळखावे.

(1) फळावर पिवळट भाग दिसू लागतो.

(2) फळाच्या सालीला नखाने खरडल्यास सालीतून दुधासारखा चीक न निघता पाण्यासारखा चीक निघतो.

(3) फळाच्या देठाजवळच्या भाग पिवळा दिसू लागतो.

हे बदल दिसल्यानंतर फळे टोकाला धरून हळूवारपणे पिळवटून देठासह काढावीत. लांबच्या बाजारपेठेसाठी पूर्ण वाढलेली परंतु फिकट हिरवी व कडक फळे काढावीत. फळांवर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताचा थर द्यावा. टोपलीवर झाकण लावून सुतळीने बांधून नंतर टोपल्या विक्रीसाठी पाठवाव्यात.
पपईचे झाड साधरणतः दोन वर्षांपर्यंत भरपूर फळे देते. त्यानंतर मात्र उत्पादन कमी होते. साधारणपणे पपईच्या एका झाडापासून प्रत्येक वर्षाला 25 ते 30 फळे मिळतात. फळाचे वजन 500 ग्रॅम ते 3 किलोपर्यंत असते. म्हणजे सरासरी दर हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन दर वर्षी मिळू शकते.

पपई पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याची पद्धती :

पपईचे फळ काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाही. फळ काळजीपूर्वक हाताळावे लागते. खरचटल्यामुळे किंवा वजनामुळे फळे लवकर खराब होतात. म्हणूनच बहुतेक वेळा फळे एका थरातच पॅक करून दूरच्या बाजारात पाठवितात. फळांच्या आजूबाजूला कागदाचे तुकडे यांसारख्या वस्तूंचा उपयोग करतात. प्रत्येक फळसुद्धा कागदामध्ये गुंडाळून ठेवावे.
भारतातून पपईची फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होत नाहीत. हवाई देशातून पपईची फळे निर्यात होण्याअगोदर धुरी किंवा व्हेपर हिट देऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. ह्या दोन पद्धतीपैकी धुरी देण्याची पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. धुरी देण्यापूर्वी फळे 50 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात 20 मिनिटे धरावीत. फळांना धुरी देण्यासाठी इथिलीन डायब्रोमाईडचा वापर करतात. फळे 23 अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे पिकतात. 12 अंश सेल्सिअस तापमानात फळे 2 आठवड्यांपर्यंत ठेवता येतात.

पेपेन उद्योग :

पपईमध्ये पेपेन नावाचे एन्झाईम असते, त्यापासून पेपेन तयार करता येते. पपईच्या कच्च्या फळातून जो चीक निघतो, त्यात हा घटक असतो. पेपेनचा उपयोग खाद्यपदार्थात आणि औषधनिर्मितीत केला जातो. पेपेनसाठी को 2 ही पपई जात चांगली समजली जाते. पूर्ण वाढलेल्या हिरव्या रंगाच्या 70-80 दिवसांच्या पपया चीक काढण्यासाठी वापराव्यात. साधारणपणे 1 महिनाभर हे काम चालते. 3/4 दिवसांनी, त्याच फळावर स्टील चाकूने चन्ऱ्या पाडून चीक गोळा करावा. चीक काढण्याचे काम सकाळी करावे. ताज्या चिकात दर 100 किलोसाठी अर्धा किलो सोडियम मेटॅबाय सल्फाईड मिसळावे; म्हणजे चीक खराब होत नाही. एका झाडापासून सुमारे पाऊण किलो चीक मिळतो. एक लेक्टर लागवडीपासून सुमारे 1 टन चिकाचे उत्पादन मिळते. चीक काढलेली फळे पुढे पिकवून खाण्यासाठी वापरता येतात. विक्रीकरता पाठविता येतात. काढलेला चीक सुरक्षितपणे पुढील प्रक्रियेसाठी लगेच पाठवावा.

सारांश :

उष्ण आणि दमट हवामान पपई पिकास चांगले मानवते. जोरदार वारे, कडाक्याची थंडी व धुके या पिकास मानवत नाही. हलक्या ते मध्यम जमिनीवर हे पीक येऊ शकते. फक्त पाण्याचा निचरा चांगला होणे आवश्यक आहे. ओलिताची सोय असलेल्या आणि चांगला निचरा असलेल्या जमिनीवर महाराष्ट्रातील सर्व भागात पपईचे पीक घेता येते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व अहमदनगर हे जिल्हे तसचे पुणे आणि वर्धा जिल्ह्यांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. वेगवेगळया भागांत पपईच्या निरनिराळ्या जाती लावलेल्या आढळतात. मागील काही वर्षात पेपेन आणि फळांची प्रत यांचा विचार करून को-2 ह्या जातीची लागवड जास्त वाढली आहे. त्यासोबत कूर्ग हनीड्यू, वॉशिंग्टन ह्याही जाती चांगल्या उत्पादन देतात. पपईची लागवड रोपांपासून करतात. जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फे ब्रुवारी-मार्चमध्ये रोपे लावतात. जास्त पावसाच्या भागात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लावणी योग्य ठरते. पपईची लावणी 2.25X2.25 मीटर अंतरावर करतात. प्रत्येक खड्डचात नर व मादी झाडे असलेल्या जातीची 3-4 रोपे तर उभयलिंगी जात असल्यास 1 रोप लावावे. पपईच्या झाडाला वळण किंवा छाटणी करावी लागत नाही. लावणीनंतर पपईला 135 आणि 7 महिन्यांनी अशी दोन महिन्यांच्या अंतराने रासायनिक खते द्यावीत. फुले धरल्यानंतर नर व मादी झाडे ओळखता येतात. ह्यावेळी बागेत 10% नर झाडे ठेवून तसेच प्रत्येक खट्टयात एका पेक्षा जास्त झाड नसेल अशी काळजी घेऊन इतर नर झाडे तसेच जास्तीची मादी झाडे काढून टाकावीत. फुले-फळे दाट असल्यास ती लहान असतानाच विरळणी करावी म्हणजे फळे चांगली वाढतात. पपईची मुळे उथळ असल्यामुळे साधारणपणे पपईच्या बागेत आंतरपिके घेऊ नयेत.
पपई पिकाला व्हायरस, करपा व भुरी ह्या रोगाचा जास्त उपद्रव होतो आणि म्हणून पपई पिकाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पपईच्या झाडाला 4 ते 6 महिन्यांनी फुले लागतात. व पुढे 4 ते 5 महिन्यांनी म्हणजे लावणीनंतर 1 वर्षाच्या आत फळे तयार होतात. पपईचे झाड 2 वर्षेपर्यंत फळे देते. प्रत्येक वर्षी एका झाडापासून साधारणपणे 30 फळे मिळतात.

जाणून घ्या लिंबू लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Limbu Lagwad Mahiti) – Limbu Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )