अँथुरियम लागवड । Anthurium Lagwad | Anthurium Sheti | अँथुरियम लागवड महत्त्व | अँथुरियम लागवडी खालील क्षेत्र । अँथुरियम पिक उत्पादन । अँथुरियम लागवडीस योग्य हवामान । अँथुरियम लागवडीस योग्य जमीन ।अँथुरियमच्या उन्नत जाती । अँथुरियम पिकाची अभिवृद्धी । अँथुरियम पिकाची लागवड पद्धती ।अँथुरियम पिकाचे खत व्यवस्थापन । अँथुरियम पिकाचे पाणी व्यवस्थापन । अँथुरियम पिकातील आंतरमशागत । अँथुरियम पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । अँथुरियम पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । अँथुरियमच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।अँथुरियमच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। .
अँथुरियम लागवड । Anthurium Lagwad | Anthurium Sheti |
अँथुरियम या फुलझाडाचे उगमस्थान दक्षिण अमेरिका खंडात आहे. अँथुरियमला फ्लेमिंग फ्लॅट किंवा पेंटर्स पॅलेट असेही म्हणतात. आपल्याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे फुलझाड फारसे परिचित नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या फुलझाडाला चांगली मागणी आहे. या फुलझाडाचे अँथुरियम हे नाव ग्रीक भाषेतील आहे. ग्रीक भाषेत अॅन्थोस म्हणजे फूल आणि ऑरा म्हणजे शेपूट असा अर्थ होतो. अँथुरियम या फुलझाडाची लांब दांड्यावरील फुले शेपटीच्या गोंड्याप्रमाणे दिसतात. ही फुले आकर्षक, सुंदर आणि टिकाऊ असतात. याशिवाय या फुलझाडाची पाने चकाकणारी, हृदयाकृती आणि सुंदर दिसतात. यामुळे आगळेवेगळे कटफ्लॉवर म्हणून या फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील अनेक राज्यांतील किनारपट्टीच्या प्रदेशात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण भागात या फुलझाडाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
अँथुरियम लागवड महत्त्व | Anthurium Cultivation Importance |
अँथुरियम हे उष्ण कटिबंधातील फुलझाड असून वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली फुले आणि आकर्षक पानांसाठी या फुलझाडाची लागवड करतात. अँथुरियमची फुले टिकाऊ असल्यामुळे प्रामुख्याने कटफ्लॉवरसाठी, फुलदाणी सजावटीसाठी, पुष्परचनेसाठी या फुलांचा वापर केला जातो. याशिवाय विविध रंगांच्या फुलांमध्ये अँथुरियमची फुले मिसळून आकर्षक पुष्परचना तयार करता येते. युरोपीय फुलांच्या बाजारपेठेमध्ये या फुलांना चांगली मागणी असून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हवाईसारख्या देशातून परदेशी होणाऱ्या फुलांच्या निर्यातीमध्ये सुमारे 50% फुले अँथुरियमची असतात. यामुळे या फुलझाडाची लागवड करून निर्यात केल्यास चांगले उत्पादन मिळते.
अँथुरियमचे झाड हे बहुवर्षायु आहे. त्यात जमिनीवर पसरणारे, वेलीप्रमाणे वर चढणारे किंवा झुडपी उभट खोडाचे असे अनेक प्रकार आहेत. या फुलझाडाची पाने विविध आकारांची सदाहरित व जाळीदार शिरांची असतात. पानाची मध्यशीर व बाजूच्या शिरा तसेच पानाच्या देठा जवळच्या शिरा स्पष्ट दिसतात. अँथुरियमच्या फुलाचे देठ, स्पिथ आणि स्पॅडिक्स हे तीन मुख्य भाग आहेत. फुलाच्या देठावर हृदयाच्या आकारासारखा पसरट भाग असतो. या भागाला स्पिथ असे म्हणतात. स्पिथ हे पसरट असते किंवा काही वेळा त्याच्या कडा आतल्या बाजूला वळल्यामुळे ते खोलगट दिसते. स्पिथमधून कणसासारखा भाग वर येतो. त्याला स्पॅडिक्स असे म्हणतात. या स्पॅडिक्सवर अतिशय लहान आकाराची उभयलिंगी फुले दाटीने असतात. अॅन्थुरियमच्या फुलांचे देठ हिरव्या रंगाचे असतात तर स्पिथ आणि स्पॅडिक्स लाल, नारिंगी, गुलाबी, पांढरे असे विविधरंगी असतात.
अँथुरियम लागवडी खालील क्षेत्र । अँथुरियम पिक उत्पादन । Areas below Anthurium Cultivation. Anthurium crop production.
युरोपीयन देशात अँथुरियमचे फुलझाड अतिशय लोकप्रिय आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अँथुरियमच्या फुलाला मागणी वाढू लागली आहे. दक्षिण आशिया खंडातील श्रीलंका, हवाई बेटे, फिलिपाईन्स, थायलंड, बँकॉक व सिंगापूर, इत्यादी देशांतून या फुलांची निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. अँथुरियमच्या फुलांच्या निर्यातीत इंडोनेशिया, मॉरिशस व थायलंड या देशांचा सिंहाचा वाटा आहे. युरोपातील हॉलंड या देशामधील शेतकरी सुमारे 20 वर्षांपासून या फुलझाडाची लागवड करत आहेत. आपल्या देशातील किनारपट्टीच्या भागात या फुलझाडाची लागवड करण्यास बराच वाव आहे. केरळ राज्यात अँथुरियमच्या फुलांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेणारे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
अँथुरियम लागवडीस योग्य हवामान । अँथुरियम लागवडीस योग्य जमीन । Suitable climate for Anthurium cultivation. Land suitable for Anthurium cultivation.
अँथुरियम हे फुलझाड मूळ उष्ण कटिबंधाच्या हवामानातील आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. अँथुरियमच्या फुलझाडाच्या वाढीसाठी भरपूर पाऊस, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि 50 ते 75 % सावली अनुकूल असते. इंग्लंड व युरोपातील देशांत हरितगृहात या फुलझाडाची लागवड करतात.
अँथुरियमची झाडे उबदार हरितगृहात आणि दमट वातावरणात चांगली वाढतात. झाडांच्या वाढीसाठी योग्यतम तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असावे. दिवसाचे तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस असल्यास अँथुरियमच्या झाडांची वाढ चांगली होते. अँथुरियमच्या वाढीसाठी हवेत 80 % आर्द्रता असणे आवश्यक आहे. अँथुरियमच्या फुलझाडाला फुलधारणेसाठी प्रखर आणि गाळीव सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
अँथुरियमच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम खोलीची परंतु भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते असणारी जमीन योग्य असते. या फुलझाडांची वाफ्यांत आणि कुंड्यांत लागवड करण्यासाठी मातीव्यतिरिक्त इतर माध्यमाचा (मेडिया) उपयोग करतात. अशा प्रकारच्या लागवडीसाठी माध्यम हलके, उत्तम निचऱ्याचे आणि सेंद्रिय पदार्थांचे भरपूर प्रमाण असलेले असावे. बारीक तुकडे व माती यांचे 11 प्रमाणातील मिश्रण किंवा लाकडाचे तुकडे व शेणखत यांचे 51 प्रमाणातील मिश्रण अँथुरियमच्या लागवडीसाठी योग्य आहे. वरील मिश्रणात फर्न झाडाचे तंतू मिसळून तयार केलेल्या अँथुरियमच्या माध्यमात फुलझाडाची वाढ चांगली होते. अलीकडे माध्यम तयार करण्यासाठी पीट किंवा झाडांच्या सालीचे कंपोस्ट वापरतात. कुंड्यांत भरण्याच्या मिश्रणात पीट असल्यास उत्तम प्रतीच्या फुलांचे अधिक उत्पादन मिळते. त्यासाठी पीट, पाईन झाडाची साल आणि परलाईट यांचे 2 : 2 : 1 या प्रमाणातील मिश्रण वापरतात.
अँथुरियमच्या उन्नत जाती । Advanced varieties of Anthurium.
अँथुरियमच्या 500 ते 600 प्रजाती आहेत. त्यांपैकी साधारणपणे 50 प्रजातींची लागवड करतात; परंतु व्यापारी उत्पादनाच्या दृष्टीने 10 ते 15 प्रजाती महत्त्वाच्या आहेत. अँथुरियमच्या फुलांच्या प्रजातींचा गट आणि पानांच्या प्रजातींचा गट असे दोन गट पडतात. उद्यानाच्या दृष्टिकोनातून अँथुरियमचे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत :
(1) पानांचा प्रकार, आणि (2) फुलांचा प्रकार. सर्वच अँथुरियमच्या झाडांना फुले लागतात. फुलांकरिता लागवड करण्याच्या गटातील झाडांना आकर्षक, सुंदर रंगाची व मोठी फुले लागतात; परंतु या फुलझाडांची पाने फारशी आकर्षक नसतात. अलीकडे दुहेरी फुलांच्या जाती उपलब्ध आहेत. पानांच्या प्रकारच्या अँथुरियमच्या झाडांची पाने सुंदर मखमली असतात; परंतु फुले मात्र आकर्षक नसतात. या दोन्ही प्रकारच्या अँथुरियम मधून आपल्या आवडीच जात निवडावी.
अँथुरियमच्या एकूण प्रजातींपैकी अँथुरियम अँड्रिॲनम व अँथुरियम शेरेझेरियानम या दोन प्रजातींची फुलांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर जगभर लागवड केली जाते.
अँथुरियम अँड्रिॲनम :
या प्रजातीचे फुलझाड ताठ उभे वाढते. पाने हृदयाच्या आकाराची, 20 ते 35 सेंटिमीटर लांब व 15 ते 20 सेंटिमीटर रुंद असतात. फुलाचा स्पिथ हृदयाच्या आकाराचा, लालसर नारिंगी किंवा शेंदरी रंगाचा असतो. लोंबते स्पेंडिक्स 10 ते 15 सेंटिमीटर लांब असून पिवळे व पांढऱ्या रंगाचे असते. या प्रजातीतील झाडांची लागवड सुंदर पानांसाठी आणि रंगीत फुलोऱ्यासाठी हरितगृहात मोठ्या प्रमाणावर करतात. उदाहरणार्थ, ऑईल क्लॉथ फ्लॉवर, टेल फ्लॉवर, पेंटर्स पॅलेट.
अँथुरियम शेरझेरियानम :
या प्रजातीचे भरगच्च व आटोपशीर झाड अधिक प्रसिद्ध आहे. या प्रजातीतील झाडांची पाने अरुंद असतात. पानांची लांबी 15 ते 20 सेंटिमीटर असून रूंदी 4.6 ते 6.6 सेंटिमीटर इतकी असते. फुलाचा स्पिथ तेजस्वी स्कार्लेट रंगाचा असतो तर स्पॅडिक्स गोलाकार मुरडलेला आणि सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो. या प्रजातीला फुलधारणा मुख्यतः फेब्रुवारी ते जुलै महिन्यात होते. त्यासाठी दमट हवामान आवश्यक असते. घरातील लोकप्रिय शोभिवंत फुलझाडांमध्ये या प्रजातींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंगो फ्लॉवर, फ्लेम प्लॅट. सध्या प्रचलित असलेल्या अँथुरियमच्या जाती प्रामुख्याने वरील दोन प्रजातींच्या संकरातून निर्माण झाल्या आहेत.
अँथुरियम पिकाची अभिवृद्धी । अँथुरियम पिकाची लागवड पद्धती । Growth of anthurium crop. Cultivation method of Anthurium crop.
बियांपासून अभिवृद्धी ।
अँथुरियमची अभिवृद्धी बियांपासून करता येते. अँथुरियमच्या बियांची चांगली उगवण होण्यासाठी योग्य अवस्थेतील पिकलेल्या फळांतील बी काढतात. त्यासाठी नारिंगी- लाल अवस्थेतील फळे 22 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ठेवून 4 दिवस कुजवितात. त्यामुळे फळातील गरापासून अँथुरियमचे बी सहज वेगळे करता येते. अशा प्रकारे बी काढल्यानंतर हे बी साठवून ठेवावे लागते. कारण झाडावरील फळे एकाच वेळी पिकत नाहीत. वरीलप्रमाणे प्रक्रिया करून मिळालेले बी जास्तीत जास्त 5 दिवस साठविता येते. बी साठविल्यामुळे बियांची उगवण 99 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत कमी होते. दहा दिवस साठविलेल्या बियांची उगवणक्षमता 53 टक्क्यांपर्यंत कमी होते. यासाठी बी योग्य तापमानात म्हणजेच 10 अंश सेल्सिअस तापमानाला साठवितात. या तापमानात साठविलेल्या बियांची उगवणक्षमता 6 आठवड्यांनंतरसुद्धा 60% इतकी असते. फळातून बी काढल्यानंतर त्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया साठवणीपूर्वी केल्यास 12 आठवड्यांनंतरही बियांची उगवणक्षमता 95% इतकी असते. अॅन्थुरियमच्या बियांची उगवण 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. पीट या माध्यमात (सामू 4 ते 5) पेरलेले बी चांगले उगवते.
फुटव्यापासून अभिवृद्धी :
अँथुरियमच्या मुख्य खोडापासून फुटवे निघतात. या फुटव्याला हवेतील मुळ्या (एरियल रूट्स्) असतात. अशा मुळ्या असलेल्या फुटव्यापासून अँथुरियमची अभिवृद्धी करता येते. या पद्धतीने अभिवृद्धी केलेल्या अँथुरियमच्या झाडांना इतर पद्धतीने अभिवृद्धी केलेल्या झाडांच्या तुलनेत लवकर फुले लागतात. एका झाडापासून एका वर्षात साधारणपणे 14 ते 17 फुटवे मिळतात.
छाटापासून अभिवृद्धी :
अँथुरियमच्या झाडाच्या शेंड्याचे छाट योग्य माध्यमात लावल्यास त्यांना मुळ्या फुटतात. मात्र त्यासाठी लागोपाठ मिस्टची आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी छाटावर दररोज 30 मिनिटे पाण्याची फवारणी करावी लागते.
अँथुरियमच्या छाटांना पुरेशा प्रमाणात मुळ्या फुटल्या किंवा मुळ्या फुटलेल्या फुटव्यांची योग्य वाढ झाली की रोपांची लागवड जमिनीत किंवा कुंड्यांत करावी. व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यासाठी रोपांमध्ये 30 सेंमी. x 30 सेंमी. किंवा 45 सेंमी. x 45 सेंमी. किंवा 45 सेंमी. x 60 सेंमी. अंतर ठेवावे. अँथुरियमची कुंडीत लागवड करावयाची असल्यास सुरुवातीलाच योग्य आकाराच्या कुंड्यांची निवड करावी. कुंड्या भरण्यासाठी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे माध्यमाची निवड करून कुंड्या भरून घ्याव्यात. यानंतर कुंडीतील कंपोस्टमिश्रित पोयटा माती बोटांनी दाबून घ्यावी. याशिवाय कुंड्या भरण्यासाठी पीट मिसळलेले माध्यम वापरले असेल तर ते ओलसर असावे व हलकेसे दाबावे. हे माध्यम केव्हाही कोरडे पडणार नाही याची काळजी घ्यावी.जुन्या कुंडीतील झाडे नवीन कुंड्यांत बदलण्याची आवश्यकता केव्हा असते हे झाडांची काळजीपूर्वक तपासणी करून ठरवावे. नवीन कुंड्या पूर्वीच्या कुंड्यांपेक्षा फार मोठ्या नसाव्यात. लहान झाडे दरवर्षी नवीन कुंड्यांत बदलावीत. परंतु मोठी झाडे 2-3 वर्षांनी नवीन कुंड्यांत बदलावीत.
अँथुरियम पिकाचे खत व्यवस्थापन । अँथुरियम पिकाचे पाणी व्यवस्थापन । Fertilizer management of Anthurium crop. Water management of Anthurium crop.
अँथुरियमच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी व चांगली फुलधारणा होण्यासाठी पुरेशा प्रमाणात खते देण्याची आवश्यकता असते. अँथुरियमच्या झाडांना योग्य प्रमाणात नत्र, पालाश व चुना दिल्यामुळे फुलांची प्रत आणि उत्पादन यांमध्ये सुधारणा होते. अन्यथा खोडाची लांबी कमी होणे, उत्पादनात घट येणे, फुलांचा आकार लहान राहणे यांसारखे अनिष्ट परिणाम दिसून येतात. अँथुरियमला दरवर्षी दर हेक्टरी 56 किलो स्फुरद आणि 56 किलो पालाश ही खते 15 : 15 : 15 या मिश्रखतातून द्यावीत. याशिवाय दर हेक्टरी 300 ते 500 किलो कोंबडीखत वर्षभरात 4 ते 5 वेळा विभागून द्यावे. या फुलझाडाच्या अँथुरियम अँड्रिॲनम या जातीच्या झाडाकरिता 12.5 लीटर आकाराच्या प्रत्येक कुंडीत दर आठवड्याला 126 ‘मिलिग्रॅम नत्र व 190 ते 225 मिलिग्रॅम पालाश ही खते द्यावीत. त्यामुळे फुलांचे उत्पादन व प्रत सुधारते. अँथुरियम शेरझेरियानम या जातीच्या झाडाच्या प्रत्येक कुंडीत दर आठवड्याला 22 मिलिग्रॅम नत्र व 22 मिलिग्रॅम पालाश ही खते द्यावीत. अँथुरियमच्या फुलांच्या टिकाऊ रंगासाठी आणि योग्य उत्पादन मिळण्यासाठी पुरेशा प्रमाणात चुनायुक्त (कॅल्शियम) खते देण्याची आवश्यकता असते. यासाठी कुंडीतील प्रत्येक झाडाला 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट (चुना) आणि 2 मिलिग्रॅम बोरॉन ही खते द्यावीत.
अँथुरियमच्या झाडाला भरपूर परंतु नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. तथापि, किती पाणी द्यावे आणि किती दिवसांच्या अंतराने द्यावे हे अनेक बाबींवर अवलंबून असते. उघड्या क्षेत्रावरील किंवा हरितगृहातील अँथुरियमच्या झाडांना हवामान, हंगाम, झाडांचा आकार, वाढीची अवस्था, कुंडीचा आकार व प्रकार आणि कुंडीतील मिश्रण या बाबींचा विचार करून पाणी द्यावे. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात पिकाला भरपूर पाणी द्यावे. झाडाच्या विश्रांतीच्या काळात या फुलझाडाला पाणी देताना कुंडीतील मातीचा पृष्ठभाग कोरडा झाल्यानंतर पाणी द्यावे. अँथुरियमच्या फुलझाडाला पाणी देताना पाण्याची प्रत हा घटकसुद्धा महत्त्वाचा असतो. पाण्यातील क्षार विशेषतः सोडियम क्लोराईड (मीठ) हा क्षार अँथुरियमच्या झाडाला अपायकारक असतो. सिंचनाच्या पाण्यात सोडियम क्लोराईड, सोडियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड या क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास ॲन्थुरियमच्या फुलांचे उत्पादन 40 ते 46% कमी होते.
अँथुरियम पिकातील आंतरमशागत । Intercropping in Anthurium Crops.
अँथुरियमच्या झाडावर, पानांवर अथवा फुलांवर उन्हाची थेट तिरीप पडणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून उन्हापासून या पिकाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम सावली तयार करावी. झाडाभोवती हवा खेळती राहण्यासाठी झाडाची जमिनीलगतची खराब किंवा पिवळी झालेली पाने काढून टाकावीत. कुंडीतील पिकाची वर्षातून एकदा तरी वरच्या थरातील माती बदलावी. बागेतील किंवा कुंडीतील पिकातील तण काढणे, नियमित पाणी देणे आणि किडी व रोगांचा वेळीच बंदोबस्त करणे ही कामे वेळेवर पूर्ण करावी. याशिवाय कुंडीची जागा आलटूनपालटून बदलावी.
अँथुरियम पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Anthurium crop and their control.
अँथुरियमच्या फुलझाडावर मावा, खवले कीड, कोळी, तुडतुडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या किडींचा कमी-अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होतो. अँथुरियमच्या फुलझाडावरील महत्त्वाच्या किडी खालीलप्रमाणे आहेत :
मावा :
ही कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात, झाडांची वाढ खुरटी होते. याशिवाय ही कीड साखरेच्या पाकासारखा चिकट पदार्थ स्रवते. हा चिकट पदार्थ पानावर पसरून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाची शोभा कमी होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50 % प्रवाही) किंवा 15 मिलिलीटर डायमेथोएट (30 % प्रवाही) हे कीटकनाशक मिसळून झाडावर फवारणी करावी.
खवले कीड :
या किडीचा उपद्रव खोड व पानांवर आढळून येतो. ही कीड पानातील तसेच खोडातील रस शोषून घेते. त्यामुळे झाडे कमकुवत होतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी कापसाचा बोळा मेथीलेटेड स्पिरिटमध्ये भिजवून
तो खवले किडीवरून फिरवावा किंवा 10 लीटर पाण्यात 40 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) हे कीटकनाशक मिसळून झाडाच्या खोडावर व पानांवर फवारणी करावी.
कोळी :
ही कीड अत्यंत बारीक असून ती पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर पिवळसर चट्टे पडतात. हे चट्टे पुढे तपकिरी होऊन आकसतात. याशिवाय पानांच्या खालच्या बाजूवर तलम पांढरी जाळी दिसते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 40 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) किंवा 10 लीटर पाण्यात 8 मिलिलीटर केल्थेन मिसळून झाडावर फवारणी करावी.
तुडतुडे :
ही कीड पानांतील कोवळ्या शेंड्यातील आणि फुलातील रस शोषण करते. त्यामुळे पानांचा आकार वेडावाकडा होतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन किंवा 15 मिलिलीटर डायमेथोएट मिसळून फुलझाडावर फवारावे.
अँथुरियम पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Anthurium crop and their control.
अँथुरियमचे उत्पादन घेताना झाडांची कमी अंतरावर लागवड केल्यास अथवा जास्त पावसाच्या प्रदेशात लागवड केल्यास झाडाभोवती जास्त प्रमाणात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे झाडावर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो :
अँथ्रेक्नोज अँथुरियम ।
या फुलझाडाचे नुकसान करणारा हा सर्वांत महत्त्वाचा रोग आहे. या रोगाला स्पॅडिक्स रॉट किंवा ब्लॅक नोज असे म्हणतात. जास्त पावसाच्या प्रदेशात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या रोगामुळे स्पॅडिक्सची कूज होते व फुले विक्रीसाठी अयोग्य होतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 23 ग्रॅम डायथेन झेड 78 (78%) हे बुरशीनाशक मिसळून तयार केलेल्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी.
मूळकूज :
या रोगामुळे विशेषतः पावसाळ्यात अँथुरियमच्या झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा रोग पिथीयम स्प्लेन्डन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मुळांची कूज होते.
उपाय : या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय 10 लीटर पाण्यात 2.5 ग्रॅम पीसीएनबी (क्विंटोझीन) मिसळून ते द्रावण जमिनीत मिसळावे.
पानांवरील ठिपके :
या रोगामुळे अँथुरियमच्या पानांवर ठिपके पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 30 ग्रॅम झायनेब ( 78% ) मिसळून तयार केलेल्या द्रावणाची पानांवर फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 2-3 आठवड्यांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
करपा :
हा रोग झांथोमोनास कँपेस्ट्रीस नावाच्या जिवाणूंमुळे होतो. या जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे अँथुरियमच्या पानांवर चौकोनी आकाराचे काळसर ठिपके पडतात. काही काळाने ठिपके संपूर्ण पानभर तसेच काही वेळा खोडावर पसरतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात स्वच्छता ठेवावी. पाण्याचा चांगला निचरा ठेवावा व रोगग्रस्त झाडाची पाने वेळीच काढून टाकावीत आणि त्यावर स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट किंवा ऑक्सिटेट्रा सायक्लीनची फवारणी करावी.
विषाणुजन्य रोग :
अँथुरियमच्या झाडावर मोझाईक हा विषाणुजन्य रोग होतो. त्यामुळे झाडांची पाने व स्पिथ विकृत आकाराची होतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी विषाणूंचा प्रसार करणाऱ्या मावा आणि पांढरी माशी या किडींचा बंदोबस्त करावा.
अँथुरियमच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Anthurium flowers.
अँथुरियमच्या झाडास 5 ते 7 पाने आल्यानंतर फुलांचे दांडे येऊ लागतात. फुलांचे दांडे बाहेर पडल्यापासून 3 ते 4 आठवड्यांच्या काळात फुले उमलू लागतात. अँथुरियमच्या स्पॅडिक्सवरील फुले पूर्ण उमलल्यानंतर देठासह फुलांची काढणी करावी. अँथुरियमच्या फुलांची लवकर तोडणी केल्यास फुले लवकर सुकतात. साधारणपणे प्रत्येक आठवड्यात एकदा फुलांची तोडणी करावी. हवाई या देशातील शेतकरी स्पॅडिक्सवरील एकतृतीयांश खऱ्या फुलांचा विकास झाल्यानंतर फुलांची काढणी करतात.
फुलांची दांड्यासह काढणी केल्यानंतर फुलांचे दांडे त्वरित कोमट पाण्यात (38 अंश सेल्सिअस) 12 तास ठेवतात. यानंतर फुलांचा रंग, आकार आणि दांड्याची लांबी याप्रमाणे प्रतवारी करून फुलांचे पॅकिंग करतात. अँथुरियमच्या झाडापासून दरवर्षी सरासरी सुमारे 5 फुले मिळतात. अँथुरियमचे हेक्टरी 3,12,500 फुलदांडे मिळतात. सोईनुसार फुलदांड्यांच्या एक किंवा दोन डझनाच्या जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवितात.
अँथुरियमच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Anthurium flowers.
अँथुरियमच्या फुलांचे पॅकिंग करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. पूर्वीच्या पद्धतीत रबरी फुग्यात पाणी भरून त्यामध्ये फुलांचे दांडे ठेवून नंतर फुग्याचे तोंड बांधीत असत. दुसऱ्या पद्धतीत फुलदांड्याच्या टोकाला पाण्यात भिजवलेला कापसाचा बोळा ठेवून त्यावर मेणाचा कागद बांधतात. वरील दोन्हीही पद्धतींत फुलांचे दांडे चांगले बांधून पुठ्याच्या खोक्यात (कोरुगेटेड कार्टून) व्यवस्थित रचून पॅकिंग करतात. अलीकडे हवाई व काही उत्तर अमेरिकन राज्यांत फुलांचे स्पॅडिक्स वितळलेल्या मेणामध्ये बुडवून पॉलिथीनच्या पिशव्यांत पॅकिंग करतात. त्यानंतर ही फुले 21.6 x 50.8 x 91.4 घन सेंटिमीटर किंवा 27.9 x 43.2 x 101.6 घन सेंटिमीटर अशा आकाराच्या पुठ्याच्या खोक्यात भरतात. या खोक्यात अँथुरियमची कमीत कमी 10 डझन फुले मावतात. खोक्यामध्ये आवश्यक दमटपणा राखण्यासाठी व फुलांना इजा होऊ नये यासाठी खोक्याला आतून ओलसर कागदाचे आणि पॉलिथीन कागदाचे अस्तर लावतात.
अँथुरियमची फुले 13 अंश सेल्सिअस तापमानात 2 ते 3 आठवडे साठवून ठेवता येतात. पुष्परचनेतील अँथुरियमची फुले 2 ते 4 आठवडे चांगली राहतात. 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात फुले उघडी असल्यास लाल फुले निळ्या रंगाची होतात, तर गर्द लाल फुलांचा रंग जास्त बदलतो. जेथे रेफ्रिजरेशनची सोय नाही, तेथे 2 ते 10 % प्राणवायूच्या वातावरणात खोलीच्या तापमानात फुले साठविता येतात.
अँथुरियमची फुलदाणीसाठी फुले ।
अँथुरियमच्या फुलांची योग्य वेळी काढणी केल्यास फुलांचा टिकाऊपणा वाढतो. स्पॅडिक्सच्या तीनचतुर्थांश लांबीवरील फुलांचा रंग बदललेला असताना फुलांची काढणी केल्यास फुले जास्त काळ टिकतात. मोठ्या व मध्यम आकाराची फुले लहान व अतिलहान फुलापेक्षा अधिक टिकतात. 13 अंश सेल्सिअस तापमानात फुलदाणीतील फुले चांगल्या स्थितीत राहतात. स्पॅडिक्स पूर्णपणे पांढरे झाल्यानंतर काढणी केल्यास फुलदाणीतील फुले दीर्घकाळ टिकतात. याप्रमाणे काढलेली फुले हिवाळ्यात 22 दिवस आणि उन्हाळ्यात 25 दिवस चांगली टिकतात. काढणीनंतरचे फुलांचे आयुष्य हे प्रामुख्याने जातीवर अवलंबून असते. फुले बाजारात पाठविण्यापूर्वी त्यांचे देठ 7-अप या पेयाच्या 2.25 % तीव्रतेच्या द्रावणात किंवा 500 पीपीएम बेंझाईक अॅसिड किंवा 7.3 पीपीएम सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणात बुडवून फुलदाणीत ठेवल्यास फुलांचे आयुष्य वाढते.
सारांश ।
अँथुरियमच्या फुलांच्या विशिष्ट आकारामुळे आणि विविध रंगांमुळे ही फुले अत्यंत आकर्षक दिसतात. अँथुरियमची फुले झाडांवर किंवा फुलदाणीत दीर्घ काळपर्यंत टिकतात. अँथुरियमच्या फुलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे या फुलांच्या परदेशी निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. अँथुरियमचे शोभिवंत पानांचे आणि शोभिवंत फुलांचे असे दोन प्रकार पडतात. अँथुरियमच्या सर्वच प्रकारच्या झाडांना फुले लागतात. मात्र फुलांच्या प्रकारातील झाडांना मोठी व अतिशय आकर्षक फुले लागतात; परंतु पाने मात्र फारशी आकर्षक नसतात. या फुलझाडांचा फुलोरा (स्पिथ) लाल, गुलाबी, पिवळसर किंवा पांढऱ्या रंगांचा असतो. अँथुरियमच्या फुलांच्या व पानांच्या विविध सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेक संकरित जातीदेखील उपलब्ध आहेत. अलीकडे दुहेरी फुलोऱ्याच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
अँथुरियमची झाडे उत्तम निचऱ्याच्या सुपीक जमिनीत चांगली वाढतात. झाडाच्या वाढीसाठी उबदार, दमट व सावलीची परिस्थिती पोषक असते. अँथुरियमच्या वाढीसाठी हवेत 80% आर्द्रता असणे आवश्यक आहे. अँथुरियमच्या लागवडीसाठी माती, , लाकडाचे बारीक तुकडे, शेणखत, फर्न झाडाचे तंतू, पीट, परलाईट, इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग केला जातो.
अँथुरियमची अभिवृद्धी साधारणपणे बियांपासून करतात; परंतु बियांपासून अभिवृद्धी करून तयार होणारी झाडे ही मातृझाडासारखी नसतात. अभिवृद्धीच्या इतर पद्धतींत पेरगाठीच्या छाटापासून (नोड कटिंग) किंवा कंदाच्या तुकड्यांपासून किंवा मुळ्या फुटलेल्या फुटव्यापासून (डिव्हिजन) अभिवृद्धी करतात. अँथुरियमची कुंड्यांत लागवड करण्यासाठी कुंडीतील मिश्रण हे भुसभुशीत असावे. त्यासाठी या मिश्रणात प्रत्येकी 1 भाग चांगली सुपीक माती, पानांचे खत, शेणखत किंवा घोड्याच्या लिदीचे खत मिसळावे. लाल माती असल्यास 1 भाग वाळू, 1 भाग कंपोस्ट व एकचतुर्थांश भाग कोळशाचे तुकडे मिसळावे.
अँथुरियमला दरवर्षी हेक्टरी 56 किलो नत्र, 56 किलो स्फुरद आणि 56 किलो पालाश ही खते द्यावीत. याशिवाय दर हेक्टरी 300 ते 500 किलो कोंबडीखत वर्षभरात 4 ते 5 वेळा विभागून द्यावे. कुंडीतील झाडांना त्यांच्या शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. अँथुरियमच्या फुलझाडाला क्षारयुक्त पाणी देऊ नये. पाणी देताना हवामान, हंगाम, झाडाचा आकार, वाढीची अवस्था, कुंडीचा प्रकार व कुंडीतील मिश्रण यांचा विचार करून पाणी द्यावे. या फुलझाडातील आंतरमशागतीची कामे आणि कीड व रोगांचे नियंत्रण करणे ही कामे वेळेवर करावीत. अँथुरियमच्या फुलोऱ्यातील (स्पॅडिक्स) फुलांचा पूर्णपणे विकास झाल्यावर फुलांच्या दांड्यासह काढणी करावी. त्यानंतर फुलांचा रंग, आकार व दांड्याची लांबी यांनुसार फुलांची प्रतवारी करावी. प्रतवारी केलेल्या फुलांचे व्यवस्थित पॅकिंग करून फुले विक्रीसाठी बाजारात पाठवावीत. अँथुरियमच्या एका झाडापासून दरवर्षी सरासरी 5 फुले मिळतात.