संत भगवानबाबा – Sant Bhagwan Baba

संत भगवानबाबा यांचे जन्म आणि बालपण – Birth and Childhood of Sant Bhagwan Baba | श्री संत भगवानबाबा चरित्र पद – Shri Sant Bhagwanbaba Biography Pad – Shri Sant Bhagwanbaba Charitra Pad | श्री संत भगवानबाबांची आरती – Aarti of Shri Sant Bhagwan Baba | Aarti of Shri Sant Bhagwan Baba Audio

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

संत भगवानबाबा – Sant Bhagwan Baba

भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.

संत भगवानबाबा यांचे जन्म आणि बालपण – Birth and Childhood of Sant Bhagwan Baba

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी संत भगवान बाबा चा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव ‘आबा’ किंवा ‘आबाजी’ ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.

गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते’ अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरुन गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.

आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव ‘भगवान’ ठेवले.

असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.

श्री संत भगवानबाबा चरित्र पद – Shri Sant Bhagwanbaba Biography Pad – Shri Sant Bhagwanbaba Charitra Pad

भगवानबाबा चरित्र पद-१

आहे मी अज्ञानी करितो स्तवन।करी कृपा हे गजवदन।१।
अल्प माझी मती।येतो काकुळती।दे मज स्मृती लंबोदरा।२।स्तवन करितो शारदा माऊली।वर देई मज सरस्वती माऊली।३।भगवान बाबाचे गावया गुण नाम।देई मज प्रेम कमळजा।४।भगवान बाबांचे गातो चरित्र।प्रभूदास हा संतांचा दासमित्र।५।

भगवानबाबा चरित्र पद-२

जन्माच पद – कौतिका माऊली गरोदर राहिली। इच्छा तिज झाली पुत्राची।१।पुत्र ऐसा व्हावा भाव मनीं।जैसा हनुमान अंजनीशी।२।मागते देवा पूर्ण करी आस।पुत्र रामदास देई मज।३।रामभक्त बळी हनुमंत।तैसा सूत मज देई देवा।४।कृष्ण भक्त उद्धव होऊनि गेला।तैसा भक्त पुत्र देई मला।५।लागलीसे आस करा माझी पूरी।पुत्र वारकरी देई मज।६।कौतुका माऊली करीतसे विनवणी।तंव चक्रपाणी स्वप्नी आले।७।स्वप्नामध्ये दिलासे दृष्टांत।तुज पोटी संत येत आहे।८।पूर्व जन्मीचे सुकृत तुज गाठी। म्हणुनी येईल संत तुज पोटी।९।सप्तजन्मी तप देवकीने केले।म्हणुनी पोटी आले रामकृष्ण।१०।प्रभूदास म्हणे मातेने जे सांगितले।ते मी वदले चरित्रात ११।

भगवानबाबा चरित्र पद-३

कौतुका माऊली असता गरोदर।वाटे हरिकथा कीर्तन ऐकावे।१।कथा कीर्तनाचा लागलासे छंद।आवडी मुकुंद सर्वकाळ।२।हरिनामाची लागली आवड।पुढे बहु गोड बाळ क्रीडा।३।कौतुका मातेस भरता नऊ मास।आला तो दिवस आनंदाचा।४।श्रावण वद्य पंचमी शके अठराशे अठरा।जन्मले बाळ उगवत्या दिनकरा।५।मातेच्या उदरी घेऊनिया जन्म।वृत्ती समाधान पावली परम।६।प्रभूदास म्हणे आहे मी वेडा।कृपा करी बाळावरी हरी।७।

भगवानबाबा चरित्र पद-४

कौतुका मातेसी झाली चार बाळे।परी हे निराळे सर्वांहूनी।१।जन्म घेऊनिया संत आले पोटी।होते पुण्य गाठी माई पदरी।२।पित्याने नांव ठेविले आबाजी।म्हणे पोटी आले वडील माझे।३।वडिलांची खूण दाखविली खरी।परी ते ब्रम्हचारी अवतरले।४।माता पित्याची होती गरिबी।तेथ ही ज्ञान मूर्ती पोटी आली।५। प्रभूदास करितो लिखाण।देई कृपादान पांडुरंगा।६।

भगवानबाबा चरित्र पद-५

अवतार घेऊनिया दाविला खेळ।उद्धरिले कूळ सर्व तेणे।१।खेळ दाऊनिया उद्धरिले जग।तेणे पांडुरंगा वश केले।२।घेऊनिया अवतार दाखविला मार्ग ।लाविले जगजन भक्तिमार्गी।३।भक्ती मार्ग तेणे दाखवूनी सोपा।चौऱ्यांशीच्या फेऱ्या चुकविल्या।४।नाव भगवान
स्वरूपही छान।तोची मनमोहन माते कुशी।५।प्रभूदास म्हणे दाऊनि बाललीला।माते पोटी अवतार घेतला।६।

भगवानबाबा चरित्र पद-६

पोटी आल्याने दारिद्रय संपले।पुढे दैव आले तया कृपे।१।पंच वर्षीय सुंदर दिसे बाळ।दिसे सोज्जवळ मदनमूर्ती।२।चिमुकल्या बाळा घेऊनिया अंकी।पिता शिकवी तया एक दोन।३।उजळणी त्यासी सहज मुखोद्गत।मग शाळेत त्या घातले।४। शाळेत जातांना आला एक ज्योतिषी।पिता तया पुसे वेळ कैसी।५।ज्योतिषी सांगती उत्तम वेळ।घालावी अंघोळ आबाजीला।६।आंघोळ घालुनी पाठवा शाळेत
आज मुहूर्त छान असे।७।पितयाने त्यासी धरोनिया हाती।नेले शाळेप्रति आबाजीला।८।प्रभूदास करितो लेखन।ऐका हो चरित्र भगवान बाबांचे।९।

भगवानबाबा चरित्र पद-७

बाळ हे गोमटे रूप मनोहर।साजिरे सुंदर बैसले गुरुजी समोर।१।गुरुजींनी सांगितला जो धडा।वाचीतसे आबाजी खडखडा।२।शाळेत मुले होती फार।परी नंबर पहिला आबाजीचा।३।गुरुजी जे जे कांही शिकवीत।ते ते करी सर्व मुखोद्गत।४।गुरुजी आबा बुद्धीचे करिती कौतुक।प्रभूदास हा त्यांचा सेवक।५। गुरुजींनी शिकविले सर्वकांही।नाही उरले शिकविण्याचे कांही।६। हा प्रसंग आहे पुरातन। बहुतेक शक अठराशे चोवीस जाण।७।

भगवानबाबा चरित्र पद-८

सुपे सावरगांवीच्या गुरुंजीची विद्या संपली।कारण शके १८२३ची हि गोष्ट भली।१। निजामशाहित शैक्षणिक दुरावस्था आगळी। प्राथमिक शिक्षण व्यवस्था दुरावली।२।गुरुजी म्हणती सरले माझे ज्ञान।आबाजीचाला पाठवा चांगल्या स्थळी।जेथे पुढील शिक्षण व्यवस्था भली।३।आहे बहु हुशार हा आबाजी।तुम्ही यासी पुढे शिकवा तुबाजी।४।शुद्ध आहे याची उच्चार वाणी।काय करील पुढे करणी सांगवेना।५।असे बाळ आबाजीचे सद्गुण। वर्णितो प्रभूदास कळवलोनी।६।

भगवानबाबा चरित्र पद-९

घेऊनिया पिता आले घरासी।सांगे कांतेसी शाळेचे वर्तमान।१।आबाजीच्या अभ्यासाचे करावे ते काय।सुचवा कांही उपाय मज।२।
भार्या ही होती बहु ज्ञानी।सांगतसे विचार पती परमेश्वरासी।३।सोसून त्रास तुम्ही शिकवावे यास।नका करू नाश आयुष्याचा।४।घाला यास नेऊनि आजोळी।आहे लोणी गांवी मोठी शाळा।५।तेथील गुरुजन आहेत थोर।शिकवतील बाळाशी आपल्या ते।६।घेऊनिया पिताश्री गेले आबाजीला। नेऊनि घातले शाळेमध्ये।७।प्रभूदास म्हणे मी तर अज्ञानी।नव्हे शुद्ध माझी देवा वाणी।८।

भगवानबाबा चरित्र पद-१०

लोणीच्या शाळेत आबाजीने काय केले।प्रश्न विचारीले गुरुजींशी।१।गुरुजी होते बहु ज्ञानवान।सांगे गहन प्रश्न आबाजीला।२।आबाजी देतसे चतुर उत्तर।तंव गुरुजींशी नवल अपार।३।गुणी दिसे बाळ मती दिसे प्रांजळ।धन्य त्याचे माता पिता।४।गावाचेही मुले होती शाळेत।आबाजीच्या आधी बहुत दिवस।५।आबाजीचा एक गणपत बडे सोबती।वारणीचा होता प्रिय साथी।६।दोघेही करिती उपवास एकादशी।त्रिदीवसीय व्रत नियमित नेमासी।७।आबाजी हा जन्मजात योगी।कळों आले तेंव्हा गणपतीला।८।दोघांची ही जमली गट्टी।अभ्यासक्रम करिती एकपाठी।९।गणपत बडे हे माझ्या मातेचे पिता।पुढे गोष्टीं करील तत्त्वता।१०।प्रभूदास म्हणे आबाजी जन्मसिद्ध योगी।कळो येईल प्रचिती जो महायोगी।११।

संत भगवानबाबा चरित्र पद ११

लोणी शाळेत गावचे मुळे बहुत।आबाजी मागुन येऊनि सर्वापुढे जात।१।सर्वांननंतर आला अभ्यासही केला।सर्वापुढे गेला आबाजी तो।२। प्रथम क्रमांकाने चवथीत पास झाला। पुढे नाही वर्ग शिकण्याला।३।घेतले बोलावून त्याच्या वडिलाला।घेऊन जा पुढे शिकावयाला।४।परंतु निजामशाहीचा भाग मागासलेला।
जवळपास नाही त्या क्षेत्री शाळा शिक्षणाला।५।आबाजीच्या वडिलांचा नाईलाज झाला।नाही सोय पुढील शिक्षणाला।६।ते घरी घेउनी आले आबाजीला।घरचे शेतीचे कामे करू लागला।७।घरी येता माई लिंबलोण करी। चवथा वर्ग पास झाला माझा पुत्र भारी।८।परी पुढील शिक्षणाची नाही खरी।म्हणून आबाजी दुःखी अंतरी।९।प्रभूदास म्हणे बघा परिस्थिती न्यारी।इच्छा शिकण्याची राहिली अपुरी।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १२

सुपे सावरगांवी करिता कामेशेती – कौतुका माउलीला स्वप्न आठविती।१।प्रगटले परी ओळख नाही कोणासी।आले ते वंशासी एकनाथ।२।सद्गुरू जनार्दनीं आज्ञा केली असे।एकनाथ अवतार कारण पुसे।३।तुम्ही जन्म घ्यावे सानपाच्या वंशी।लावा जनासी भक्तिमार्गी।४।भक्ती मार्ग हा मागासला फार।म्हणुनी अवतार घेणे तुज।५।मागील अवतारी होतास संसारी।आता रहावे बाल ब्रम्हचारी।६।अवतार घेऊनिया जावे गडावरी।आहे ब्रह्मचारी साधू तेथे।७।तयाचा बोध घेऊनिया।करावी झाडणी वासनेची।८।तेथे राहोनिया व्हावे वारकरी।रामकृष्णहरी सदा मनी।९।सुरू करा वारी पंढरीची।प्रभूदास म्हणे अंतरी भक्ती दृढ विठोबाची।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १३

गोकुळीं कान्हा मिळोनिया गोपाळा।करीतसे खेळा वृंदावणी।१।गाई ओळीता गोपाळाच्या मेळी
खेळतसे चेंडूफळी मुलांसंगे।२।आबा तसेच तू करी,घेऊनिया भाकरी।जाई वानंतरी गाईमागे।३।निघाला गाई पाठी घेऊनिया काठी
माता ती गोरटी आनंदली।४।गाई संगे बाळकृष्ण निघे रानात।आनंद बहुत होत यशोदेसी।५।त्या स्मरणे कौतुका मातेस।सुख आनंद अंतरात होतसे।६।आनंदाचे डोही गेली बुडोनी।स्मरण मनी गोविंदाचे।७।बोरोबर गावांतील गाईचे गुराखी।खेळती रानी वनीं दिनभरी।८।ऐसे वळीती गुरे ढोरे।
सावरगांवीच्या गायरानी ती पोरे।९।प्रभूदास म्हणे ही सकळी रखीती खेळीमेळी जित्राबे।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १४

आई म्हणे बाळा लागो तुज चाळा – गोविंद गोपाळा विसरु नको।१।रामकृष्णहरी ऐसा जप करी।मंत्र हा उच्चारी निशीदिनी।२।आई बाप दोघे विठ्ठलभक्त।म्हणोनिया बाळाशी शिकवीत।३।गाई घेऊनिया निघाले रानात।मिळोनिया बहुत गुराखी गोपाळ।४।गाई चरती रानी वनी।बैसले जाउनी पाण्यापासी।५।तेथे त्यांनी सोडल्या भाकरी।गाई गेल्या दुरी चरावया।६।गाई गेल्या दुरी आणारे माघारी।वासना अढळ भारी बोलवा त्यांना।७।आबाजीचे शब्द होते अनुभवी।कळण्याच्या ठाव नाही कोणा।८।मिळोनिया गोपाळ खेळती खेळ।आबाजी चपळ सर्वामध्ये।९।प्रभूदास म्हणे गुरख्यांच्या मेळा।आबाजी लीला दावीतसे।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १५

विटू दांडी चेंडू हुतुतू खेळती।चपळ आबाजीचा हात कुणी ना धरिती।१।रानात झाडात सुर- पारंब्या खेळती। आबाजीसम गती नाही कोणा।२।चालली म्हणत असे कोणी धरा मज।नाही तरी राज तुम्हावरी।३।मती बहु चंचल खेळीमेळी।जैसा बाळ कृष्ण गोकुळीं।४।कृष्ण मांडी खेळ यमुनातीरी।तैसाच खेळ त्यांचा डोंगरावरी।५।तेथील नदीच्या डोहात जाती।कपडे काढोनिया पोहू लागती।६।पाण्यात मुले घेतात बुड्या।म्हणती गड्या शिवा मज।७।सर्वजन म्हणती आबाजीला शिवा डाव तो आणावा तयावरी।८।पोहण्यात आबाजी बहु तरबेज।कुणाच्याही पकडीत येत नाही।९।कंटाळली मुले निघाली बाहेरी।प्रभूदास सांगे आबाजीची थोरी।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १६

नेहमीप्रमाणे आबाजी निघाले गाईकडे।आले डोंगराच्या कडे कपारी जवळी।१।अष्ट वर्षीय बाळ आबाजी। रानी चारिता गाई मनमौजी।२।चरोनी गाई सावली विसावल्या।आबाजीही लिंबाच्या सावली पहुडला।३। दुपारी बाराच्या प्रखर उन्हात।आराम करिता स्वप्न दृष्टांत।४।तुकाराम महाराज स्वप्नी उपदेशीत।माझ्या अभंगाची जनमाणसात।५।किर्तनी गाऊन करी जागृत। अज्ञानीही सर्व मानव जात।६।दहा मिनिटे असेच गेले।जागे होता आबाजी दचकले।७।असेच स्वप्न उपदेश कलियुगी।केले तुकोबांनी बहिणाबाई निळोबासी।८।तीच प्रचिती आबाजीसी। आली शके अठराशे सव्वीसी।९। प्रभूदास म्हणे तुकोबांचा प्रसाद। पावोनी आनंद आबाजीसी।१०।

संत भगवानबाबा चरित्र पद १७

जेष्ठ बंधू – पांडुरंग।१।माता म्हणे बाळा सांभाळावे।रामे सांभाळीला लक्ष्मण जैसा।२।गाई घेऊनिया गेले ते डोंगरी।बैसले भाकरी खावयासी।३।त्या कळपात गाय एक गुणी।देतसे दूध काढुनी रानी वनी।४।आबाजीला पाहोनी गाय हंबरली।पान्हा पान्हावली ती गाय माऊली।५।दूध काढावया झाडा आड गेला।पांडुरंग बंधू त्याकडे आला।६।झाडाआड राहिल्या तंव भाकरी।गाय दुसरी आली तेथे।७।दूध घेऊनिया येता माघारी।गाईने भाकरी खाल्या सर्वही।८।लहान पांडुरंग म्हणे भूक भारी।दे मज भाकरी खावावया।९।चिमुकला बंधू रडू लागला।घाली आईकडे नवोनिया।१०।प्रभूदास म्हणे हा प्रसंग।सांगितला पांडुरंग बंधूने मला।११।

संत भगवानबाबा चरित्र पद १८

पांडुरंग बहु रडु लागला।म्हणे दादा मला भाकरी दे खायला।१।
आबाजी म्हणे देईन तुज भाकरी परि सांगू नको घरी कोणासी।२।
भाकरीचा मंत्र येतसे मज।भाकरी तुज देतसे खावावया।३।बैसले जाऊनिया एका खिळ्यावरी।काढली भाकरी त्यातूनी।४।पांडुरंग बहु अज्ञानी समजले नाही
आबाजीने लवलाही सिद्धीने काढले सर्वही।५। यावरून कळले बा पाही।आबाजी हा जन्मसिद्ध योगी बारमाही।६।गाई घेऊनिया घराकडे आले।पांडुरंग माईला सर्व सांगे।७।आबाजीला भाकरी मंत्र येतो माई।मला दुपारी भाकरी खावयासी देई।८।पांडुरंगाचे बोल तिला लबाड वाटले।तरी कळों आले तिज कांही काळे।९।असे बहु चमत्कार करतील पुढे।तारावया जन भोळे भाबडे।१०।
प्रभूदास म्हणे हे सिद्धीचे कोडे।समजण्या बहु कठीण गडे।११।

संत भगवानबाबा चरित्र पद १९

गाई सांभाळन्या जातसे डोंगरी कपारी।नित्य नेमाने बरोबरी खेळती गुराखी।१।डोंगरी जाऊनिया करितो काई। अतीत भविष्या जाणे कांही।२।कच्च्या उंबराच्या करोनीया माळा।घालीतसे गळा आबाजी तो।३।लावुनिया राख आपुलिया अंगी।गोसाव्या वेशा संगी बागडे।४।अलख निरंजन म्हणुनी फिरे डोंगरी।पुढील जाणे भविष्य दिग्नतरी।५।सवंगडी म्हणती असे का करी।म्हणे मज या पंथाची आवड भारी।६।असेच करावे वाटे अंतरी।नको नको बंधन भव सागरी।७।संसार करोनिया बहु थकले।परी तिळमात्र सुख न लाभले।८।संत महंत योगी संसारा भ्याले।म्हणोनिया गेले मोक्षाप्रति।९।प्रभूदास म्हणे हा योगी महंत।वारकरी संत होईल पुढे१०।

संत भगवानबाबा चरित्र पद २०

असेच करावे बहु इच्छा मनी।कधी जनार्धन जनी कृपा करी।१।सोबत्याना असा बोध करी ।जाऊ आपण सारे पंढपुरी।२।सावरगावी रानात आहेत कानिफनाथ।जावोनिया तेथ भजन करित।३।दगडाचे टाळ घेवोनिया करी।मुखाने म्हणे रामकृष्णहरी।४।राखोनिया गाई दिवसभरी।सायंकाळी येतो घरी लगभरी।५।गावांत होती रामायण पोथी।ऐकावयास रात्री तेथ जाती।६।पोथीला जाई तेथ तटस्थ उभा राही।खाली बैसरे म्हणतसे आई।७।चालू रामकथेत उभा असे मारोती।सांगे मातेप्रति आबाजी तो।८।त्याच्या या बोला विचार असे सखोल।करिती नवल सर्वजन।९।प्रभूदास म्हणे बालपणीच गोडी। आवडी कथा कीर्तनाची आबाजीसी।१०।

श्री संत भगवानबाबांची आरती – Aarti of Shri Sant Bhagwan Baba

आरती भगवानबाबा | चिदानंदाचा गाभा | |
वैराग्य मूर्तीमंत | दिसे शांतीची शोभा | | १ | |

तुळशी उगवल्या | रक्त सांडिले जेथे |
धावोनिया आले देव | दिले अभय तेथे | | २ | |

बैसोनी पाण्यावरी | वाचली ज्ञानेश्वरी |
नारायणाचे कैवारी | झाली किर्ती चराचरी | | ३ | |

श्री संत भगवानबाबांची आरती – Aarti of Shri Sant Bhagwan Baba Audio

Related Post

संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj)

संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज देहू (Sant Tukaram Maharaj Dehu)

पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीत थोर संत गोरा कुंभार यांनी आपले जीवन समर्पित केले – A Noble Sant Gora Kumbhar Dedicated his life in Vitthal bhakti of Pandharpur

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )