
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री तुळजाभवानीची अवतार कथा – Avatar story of Shri Tuljabhavani
संपूर्ण भारतात एकूण 51 शक्तिपीठे असून त्यापैकी महत्त्वाची साडेतीन शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रातील या नावाजलेल्या शक्तिपीठांपैकी प्रथम शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माता, दुसरे शक्तिपीठ तुळजापूरची आई भवानी माता, तर तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ माहूर गडावरील रेणुका माता तसेच सप्तशृंगी या नावाने ओळखले जाणारे अर्धपीठ नाशिक जिल्ह्यात आहे.
कृत युगातील ही कथा आहे. एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती. परंतु तिच्या गुरूने तीला सती न जाण्यास विनंति केली. तेंव्हा आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली. अनुभूती ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करून तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तीला त्याची अत्यंत भीती वाटली . ती घाबरून पळत सुटली तेव्हा कुकर राक्षस देखील तिच्या मागे धावत सुटला मात्र तिने त्यावेळी आई भगवती मातेचा मनापासून धावा केला. अनुभूतीने आपले पावित्र्य रक्षण करण्यासाठी भगवती मातेचा मनापासून केलेला धावा पाहून आई भगवती ला अनुभूतीची दया आली. आणि काही क्षणात देवी प्रगट होऊन तिने त्या राक्षसा सोबत युद्ध केले व त्याचा वध केला.
आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली याचा आनंद तेव्हा अनुभुती ला झाला. तिने देवीला इथल्याच पर्वतात कायमचे वास्तव्यास राहण्याची विनंती केली. त्यावर अनुभूतीच्या विनंती ला मान देऊन त्या पर्वतात देवीने आपले वास्तव्य स्वीकार केले. भक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरेने धावून येणारी देवी पुढे त्वरीता तसेच तुरजा म्हणून ओळखली जाऊ लागली. काही दिवसांनी या तूरजा शब्दांचे रूपांतर तुळजा असे झाले. तेव्हापासून भगवती मातेला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते
संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणारी आई भवानी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असते. आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक संकटात ती सदैव धावून येत असते. उदाहरण द्यायचे झाले तर वेगवेगळ्या युगात देवीने आपल्या प्रिय भक्तांसाठी अवतार धारण केलेले आहेत. अनुभूती साठी कृत युगात, श्रीराम प्रभू साठी त्रेता युगात, धर्म राजासाठी द्वापार युगात, तर या कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी देवीचा कृपा आशीर्वाद नेहमीच राहिला. आई तुळजाभवानी भोसले राजघराण्याची कुलदेवता होती. छत्रपती शिवराय हे आई भवानीचे निशिम भक्त होते. शिवाजी महाराजांच्या युद्धात अधिक यश यावे याकरिता त्यांना आई भवानी मातेने एक तलवार भेट दिली होती अशी देखील सर्वत्र अख्याइका सांगितली जाते.
तुळजाभवानी मंदिराचा इतिहास- History of tulja bhavani temple
आई तुळजाभवानी चे मंदिर आताच्या “धाराशिव” जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे. आई तुळजाभवानी चे मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2600 फूट उंचावर आहे. आई भवानीचे मंदिर बालाघाट पर्वत रांगेत असून एका कडे पठारावर वसलेले आहे. याच डोंगराचा उल्लेख पुराणात “यमुना गिरी” पर्वत असा केला जातो. नंतर इथल्या परिसरात चिंचेच्या वृक्षाचे प्रमाण अधिक असल्याने याच गावाला लोक चींचपुर असे देखील म्हणू लागले नंतर आई तुळजा भवानीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीचे नाव “तुळजापूर” असे झाले.
आई भवानीच्या दर्शनासाठी संपूर्ण भारत देशातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. ईथे येण्यासाठी प्रत्येक भागातून बस सुविधा उपलब्ध आहेत. तर काही भागात रेल्वे सुविधा देखील उपलब्ध आहेत. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे सर्व भाविक येताना आई तुळजाभवानीचे दर्शन करूनच गावाकडे जातात. हे ठिकाण सोलापूर येथून अवघ्या 45 कीमी अंतरावर आहे.
भवानी मातेच्या मंदिरास दोन प्रवेशद्वार असून एकास राजमाता जिजाऊ महाद्वार तर दुसऱ्या ला राजे शहाजी महाद्वार अशी नावे देण्यात आलेली आहेत. मंदिराच्या जवळ जाईपर्यंत मंदिराचा कळस आपल्याला दिसत नाही. मंदिराचा परिसर अत्यंत मोठा असून भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची रचना केलेली आहे. या काही पायऱ्या उतरल्यावर सुरुवातीला महाद्वार लागते. भवानी मातेच्या दक्षिणेकडील दरवाजास “परमार” दरवाजा म्हणून ओळखले जाते. भक्त परमार यांचा इतिहास सांगायचा झाला तर ते आई भवानीचे महान भक्त होते. त्यांनी आपले मस्तक सुमारे सात वेळा कापून आई भगवती चरणी अर्पण केले होते. अशा रचनेचा श्लोक सुद्धा त्या दरवाजावर आपल्याला पाहायला मिळतो.
महा दरवाजावरील कोरीव काम अत्यंत नक्षीदार असून हेमाडपंथी स्वरूपाचे आहे. दरवाजा जवळच श्री नारद मुनींचे दर्शन होते. पुढे काही अंतर गेले की “कल्लोळ” नावाचे तीर्थ लागते. जेव्हा आई भवानी तुळजापुरात वास्तव्यास आली. तेव्हा हे तीर्थ उत्पन्न झाले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जल तीर्थ या तीर्थात सहभागी होण्यासाठी धावून आले. यामुळे एकच कल्लोळ उठला म्हणुन या तिर्थास “कल्लोळ तीर्थ” हे नाव दीले.
या तिर्थाच्या समोरचं काही अंतरावर “गोमुख तीर्थ” आहे. यातून नियमित रूपाने पाण्याचा ओघ वाहत असतो. तिथे श्री दत्त गुरूंच्या हस्त प्रशालनाचे ठिकाण आहे. त्याच्या लगतच आपल्याला “अमृत कुंड” पाहायला मिळतो. थोडं अलीकडे गेलं तर सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे. पुढे निंबाळकर नामक दरवाजा लागतो. हा दरवाजा ओलांडल्यावर आई भवानीच्या मंदिराचा कळस आपल्याला दिसतो. हा कळस पंच धातूंनी तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात होमकुंड असून त्यावर आता शिखर देखील बांधण्यात आले आहे. संपूर्ण मंदिराचा सभामंडप अत्यंत भव्य असून तो जवळपास तब्बल 16 खांबा पासून बांधण्यात आला आहे. आई भवानी मातेचा गाभारा पश्चिम दिशेस असून होमाच्या डाव्या बाजूला मंडप उभारलेला आहे.
तुळजाभवानी मातेचे वैशिष्ट्ये -Characteristics of Tulja bhavani
काही इतिहासकारांच्या मते आई तुळजाभवानी चे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून मंदिराची रचना पुरातन आहे. तर काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन काळातील मानले जाते. देवीच्या दर्शनासाठी पाच मजली इमारत उभारली असून “धर्म दर्शन” व “मुखदर्शन” असे दोन भाग करण्यात आले आहेत. गाभाऱ्याच्या एकदम मधोमध चांदीच्या सिंहासनावर भवानी मातेची मूर्ती आरूढ झाली आहे. भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळे पासून बनवलेली असून तिने विविध प्रकारातील शस्त्र व अस्त्र धारण केलेले आहेत. आई भवानीच्या गाभाऱ्याच्या पत्रा संपूर्ण चांदी युक्त आहे. त्या दरवाजाच्या गाभाऱ्यावर अद्भुत असे नक्षीकाम करण्यात आले आहे. आई भवानीची मूर्ती पाषाणाची असून तिची उंची तीन फूट आहे. मूर्तीचा प्रकार स्वयंभू असून मूर्ती अत्यंत प्रसन्न व तेजस्वी भासते. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभ्या अवस्थेत आरूढ असून तिच्या मस्कावरील मुकुटातून केसांच्या काही बटा बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आई भवानीच्या हातामध्ये विविध स्वरूपाची आयुधे धारण केलेली आहेत. त्यामध्ये त्रिशूल, बीचवा, बाण, चक्र, शंक, धनुष्य, पान पात्र, तसेच एका हातात राक्षसाची शेंडी पकडलेली आहे. पाठीवर बाणांचा भाता घेतलेला आहे.
आई भवानी मातेने एका हातामध्ये महिषा सुराची शेंडी धरली असून दुसऱ्या हाताने त्याच्या पोटात त्रिशूल घुसविलेला आहे. देवीच्या उजव्या पायाखाली त्या राक्षसाचे मुंडके असून डाव्या बाजूला सिंह व महान तपस्वी “मार्कंडेय ऋषी” ची मूर्ती अपल्याला पाहायला मिळते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे. देवीच्या मूर्ती ला स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे. आई भवानी मातेची पूर्वी दिवसातून 3 वेळा पूजा केली जायची. परंतु आता मात्र ती 2 वेळा करण्यात येते, पहाटे आणि सायंकाळी नित्यनेमाने देवीची पूजा केली जाते. गाभाऱ्या पासून जवळच उत्तर दिशेला मातेच्या निद्रेसाठी चांदीचा पलंग असून प्रशस्त शयन गृह आहे. आई भवानी साठी स्नान गृहाची व्यवस्था केलेली आहे. आई भवानी वर्षातून तीन वेळा निद्रा अवस्था धारण करते. ते पुढील प्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या. इतर वेळी आई भवानी सदैव जागृत अवस्थेत असते.
तुळजाभवानी मातेचा उत्सव- Festival of Tulja bhavani Mata
तुळजापूर येथे आई भवानी च्या नावाने वर्षातून अनेक उत्सव साजरी केले जातात. आई भवानीची मूर्ती चल स्वरूपाची असल्याने प्रत्यक्ष भवानी मातेला पालखीत विराजमान करुन मिरवणूक काढण्याची पद्धत आहे.
शारदीय नवरात्र उत्सव
नवरात्र उत्सवात तुळजापुर मध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या नवरात्राच्या काळात नऊ दिवस देवीची दररोज महापूजा केली जाते. या काळात अनेक भागातील भक्त आपल्या पालख्या घेऊन तुळजापुरात दाखल होतात. देवीला अनेक अलंकार या काळात घातले जातात. त्यातला एक प्रकार म्हणजेच “छबिना उत्सव” होय.
आई तुळजाभवानी मातेचा छबिना म्हणजे काय?
आई भवानी मातेची उत्सव मूर्ती तिच्या अनंत वाहानापैकी एका वाहनावर आरूढ करण्यात येते. व तिला पालखीमध्ये आसनस्थ करून तिच्या पादुकांची संपूर्ण मंदिराच्या भोवती मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकी ला छबिना असे म्हटले जाते.आई तुळजा भवानी मातेचा हा उत्सव दर मंगळवारी तसेच पौर्णिमेच्या एक दिवस आधी व पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा न करता हाच उत्सव पुढे दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा करण्यात येतो. तसेच फाल्गुन पौर्णिमेला हा उत्सव साजरा न करता चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला हा उत्सव साजरा केला जातो. आई भवानी मातेच्या निद्रा काळात हा छबिना उत्सव साजरा केला जात नाही.
छबिना उत्सवाचे महत्व सांगायचे झाले तर या उत्सवाच्या काळात तुळजापूर परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा छबिना ज्या ठिकाणी उभा केला जातो. तिथूनच सर्व गावांच्या सीमा अधोरेखित आहेत. सर्व भाविकांचे मते देवी इथे उभा राहिल्यावर तिला संपूर्ण विश्व पाहता येते. त्यामुळे आई भवानी सर्व भक्तांना संकटातून बाहेर काढण्यास मदत करते. या पालखी समोर पोत पाजळून आई भवानी मातेच्या नावाचा जयघोष केला जातो. इथे अनेक भक्त आपल्यातील कला मोठ्या आनंदाने सादर करतात आणि गीत गाऊन वाद्य वाजवली जातात. विविध भागातून नामांकित गोंधळी आपली कला सादर करण्यासाठी तुळजापुरात दरवर्षी आपली हजेरी लावतात.
दसरा उत्सव
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आई भवानीची मूर्ती तिथल्या पिंपळाच्या पारावर आदरपूर्वक आणून प्रशस्त अशा पालखीत विराजमान करण्यात येते. पालखीवर हळदी कुंकवाची उधळण करून मोठ्या थाटात संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. या उत्सवात अनेक ठिकाणाहून भाविक भक्त आपली हजेरी लावतात याच काळात ग्रहण कालावधी असल्याने या ग्रहण काळात भवानी मातेस पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सोवळ्यात ठेवण्यात येते. तोपर्यंत कुठलाच साज शृंगार देवीने धारण केलेले नसतो. नंतर ग्रहण कालावधी समाप्त झाल्यावर स्नान गृहामध्ये देवीला स्नान घालून देवीची महापूजा केली जाते. या देवीच्या नियमित पुजेचा मान सुरुवातीपासूनच भोपे कुळातील पुजाऱ्यांना दिला जातो. प्रत्येक विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानीचे दागिने मांडण्यात येतात. या सर्व अलांकरा पैकी एक अलंकार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः च्या हाताने आणून आई भवानिस अर्पण केलेला आहे. तो दागिना आजही आपल्याला पाहायला मिळतो. तुळजापुरात चैत्र महिन्यात सुद्धा मोठा उत्सव भरतो. तसेच दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीला तुळजापुरात “काळभैरव भेंडोळी उत्सव” भरवण्यात येतो. तेव्हा देखील जवळपासच्या परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
आई तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी कसे जायचे ? How to go for darshan of Ai Tulja Bhavani temple?
सोलापूर ते तुळजापुर अंतर – solapur to tuljapur distance
सोलापूर ते तुळजापुर हे अंतर अगदी 45 किमी असून सोलापूर वरून तुळजापुर ईथे येण्यास बस व रेल्वे सुविधा तसेच खाजगी वाहनाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
पंढरपूर ते तुळजापूर अंतर – pandharpur to tuljapur distance (113 Km)
पुणे ते तुळजापुर अंतर – pune to tuljapur distance (293 km)