जाणून घ्या जरबेरा लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gerbera flower Lagwad Mahiti Gerbera Sheti) – Gerbera Farming

जरबेरा लागवड । Gerbera Lagwad | Gerbera Sheti |जरबेरा लागवड महत्त्व | जरबेरा लागवडी खालील क्षेत्र । जरबेरा पिकाचे उत्पादन | जरबेरा पिकास योग्य हवामान । जरबेरा पिकास योग्य जमीन | जरबेराच्या उन्नत जाती | जरबेरा पिकाची अभिवृद्धी । जरबेरा पिकाची लागवड पद्धती | जरबेरा पिकास योग्य हंगाम । जरबेरा पिकास योग्य लागवडीचे अंतर |जरबेरा पिकास खत व्यवस्थापन । जरबेरा पिकास पाणी व्यवस्थापन |जरबेरा पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | जरबेरा पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | जरबेरा पिकामधील तणांचे नियंत्रण | जरबेरा फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | जरबेरा पिकाची फुले टिकविणे |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

जरबेरा लागवड । Gerbera Lagwad | Gerbera Sheti |

जरबेरा हे फुलझाड अनेक वर्षांपासून कुंडीत, उद्यानातील ताटव्यांमध्ये, इमारती, बंगले, शासकीय कार्यालये, इत्यादींच्या सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यासाठी व रॉक गार्डनमध्ये लावण्यासाठी वापरले जात आहे. जरबेरा हे बहुवर्षायु फुलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात. ही फुले विविध रंगांची, आकर्षक आणि टिकाऊ असतात. यामुळे गुच्छ आणि फुलदाणी सजावटीसाठी ही फुले वापरली जातात. या फुलांच्या अंगी असलेल्या वरील गुणांमुळे जरबेराच्या फुलांना कटफ्लॉवर म्हणून जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र जरबेराची लागवड महाराष्ट्रात फारच कमी क्षेत्रावर अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे केली जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला, औरंगाबाद आणि इतरही जिल्ह्यांतून कटफ्लॉवर्सच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यास खूप मोठा वाव आहे. जरबेराची फुले वर्षभर उपलब्ध होत असल्यामुळे देशांतर्गत विक्रीसाठी तसेच परदेशात फुलांची निर्यात करण्यासाठी जरबेराखालील क्षेत्र वाढविण्यास बराच वाव आहे. म्हणून या फुलझाडाच्या लागवडीच्या आधुनिक तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.

जरबेरा लागवड महत्त्व | Gerbera Cultivation Importance |

जरबेराच्या फुलझाडाला वर्षभर सतत फुले येतात. म्हणून उद्यानातील ताटव्यात लागवड करण्यासाठी हे फुलझाड खूप उपयुक्त आहे. याशिवाय कटफ्लॉवर्स म्हणून या फुलांना चांगली मागणी असते. कटफ्लॉवर्सव्यतिरिक्त बागबगिचांमध्ये, खाजगी बंगले किंवा इमारतींचा परिसर सुशोभित करण्यासाठी या फुलझाडांची ताटव्यात लागवड करतात.
याशिवाय विविध सजावटींसाठी, कुंड्यांमधून आणि रॉक गार्डनमध्ये लागवड करण्यासाठी, फुलदाणीत ठेवण्यासाठी, हिरवळीच्या मध्यावर किंवा कडेला लावण्यासाठी जरबेरा हे फुलझाड अधिक चांगले आहे. या फुलांचा उत्तम दर्जा, काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता, फुलांचे विविध रंग आणि आकार, इत्यादी गुणांमुळे जरबेराच्या फुलांपासून हार आणि उत्कृष्ट प्रतींचे गुच्छ तयार करता येतात. जरबेराची लागवड शहरांच्या जवळच्या परिसरात होत आहे. नाशिक परिसरातील पॉलिहाऊसमध्ये या फुलझाडांची लागवड करून ही फुले परदेशात निर्यात होऊ लागली आहेत. म्हणून पद्धतशीरपणे लागवड करून या पिकापासून चांगला नफा मिळविण्यास खूप वाव आहे.

जरबेरा लागवडी खालील क्षेत्र । जरबेरा पिकाचे उत्पादन | Areas under gerbera cultivation. Production of gerbera crop |

जरबेराचे मूळस्थान दक्षिण आफ्रिका असून जरबेराचे काही प्रकार भारताच्या हिमालय आणि नेपाळच्या उंच पर्वतमय प्रदेशातील आहेत. जगातील विविध हवामानांत या फुलझाडांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. भारतात जरबेराची लागवड छोट्या-मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील लोकांना जरबेरा हे फुलझाड साधारण परिचयाचे होते; परंतु या पिकाच्या लागवडीचा अनुभव मात्र कोणीही घेतलेला नव्हता. 1992-93 या वर्षी शिर्डीजवळील अस्थगावच्या श्री. डुंगरवार या शेतकऱ्याने या पिकाची व्यापारीदृष्ट्या शेती करून किफायतशीर उत्पादन मिळविले. यानंतर इतर शेतकरीही हळूहळू या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले.
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात आणि त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात जरबेराची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. याव्यतिरिक्त नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला, औरंगाबाद व इतर जिल्ह्यांतूनही या फुलझाडाच्या लागवडीस वाव आहे. अलीकडे ऊतिसंवर्धनाने तयार केलेली रोपे वापरून हरितगृहात जरबेराची लागवड यशस्वी झालेली आहे.

जरबेरा पिकास योग्य हवामान । जरबेरा पिकास योग्य जमीन | Suitable climate for gerbera crop. Land suitable for gerbera crop

जगामधील उष्ण व समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात जरबेराचे पीक उघड्या शेतात घेतात. मात्र अती थंड हवामान असलेल्या प्रदेशात धुक्यापासून वाचविण्यासाठी हे पीक काचगृहात घेतात. महाराष्ट्रातील उष्ण व कोरड्या आणि समशीतोष्ण हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते. भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा व सर्वसाधारण 500 ते 615 मिलीमीटर पाऊसमान या पिकाच्या वाढीसाठी योग्य असते. तर अती पाऊस, बराच मोठा काळ अती कडक थंडी व कडक उन्हाळा जरबेराच्या उत्पादनास मानवत नाही. दिवसाचे 12 अंश ते 25 अंश सेल्सिअस तापमान, 50 ते 60 % आर्द्रता आणि रात्रीचे 12 अंश सेल्सिअस तापमान असल्यास या फुलांची प्रत चांगली मिळते.
जरबेराच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी हलकी, मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन अधिक योग्य असते. चोपण मातीच्या, चुनखडीयुक्त आणि पाण्याचा अयोग्य निचरा होणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड किफायतशीर होत नाही. त्याचप्रमाणे भारी काळ्या व अत्यंत सुपीक जमिनीत झाडाची केवळ पालेदार वाढ होते; परंतु फुलांचे समाधानकारक उत्पादन मिळत नाही. म्हणून अशा प्रकारच्या जमिनीत जरबेराची लागवड करू नये. एकूण सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर सामान्यपणे 30 ते 45 सेंमी. मध्यम खोलीची काळी व 5 ते 7.5 दरम्यान सामू असलेली जमीन जरबेराच्या लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. हलक्या जमिनीतही पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खते घालून या पिकाची किफायतशीर लागवड करता येते.

जरबेराच्या उन्नत जाती | Advanced Varieties of Gerbera |

जरबेरा हे नाव टरगॉट जरबर या जर्मन निसर्गप्रेमी संशोधकाच्या नावावरून देण्यात आले आहे. जरबेराच्या कुळात 40 प्रकार असून त्यातील जरबेरा जमसोनी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर शेतात लावला जातो.
जरबेराच्या क्रीम क्लेमेन्टाईन ( नारिंगी रंगाची फुले), मरॉन क्लेमेन्टाईन ( नारिंगी रंगाची फुले), फ्लेमिंगो (फिकट गुलाबी रंगाची फुले), उरनस (पिवळ्या रंगाची फुले), फ्रेडोरेलो (लाल रंगाची फुले) या जातींचे जगभर व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते.
जरबेराच्या फुलांमध्ये प्रामुख्याने देशी जाती व परदेशी सुधारित जाती असे दोन गट पडतात. देशी जातींच्या फुलांमध्ये सिंगल व डबल असे दोन प्रकार असून त्यामध्ये अनेक रंग आढळतात. . या प्रकारातील फुलांचे दांडे आखूड व कमकुवत असतात. परदेशी जातींची सर्व फुले डबल प्रकाराची असून त्यामध्ये स्थानिक जातींप्रमाणेच अनेक रंग आढळतात. या प्रकारातील फुले जाड व लांब दांड्याची असतात. जरबेराच्या पसादेना, पारिजात, पालरेमो, पॅलोरा, पनामा, पामेला, पोलर, झेब्रा, विजय ट्रॉपिकल स्पायडर, सँडा आणि अँजेला, इत्यादी सुधारित जाती आहेत. जरबेराच्या अशा अनेक जाती असल्या तरी महाराष्ट्रात कोणत्या जाती चांगल्या येतात यावर फारच कमी संशोधन झालेले आहे. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात ब्लॅक हार्ट, डबल टॉप फ्लॉवरिंग आणि अलस्मिर हायब्रीड या जाती चांगल्या येत असल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या अनुभवास आले आहे. जरबेराच्या सिंगल जातींपेक्षा डबल जातींना कटफ्लॉवर म्हणून जास्त मागणी असते. म्हणून लागवडीसाठी प्रामुख्याने डबल जातींची निवड करावी.

जरबेरा पिकाची अभिवृद्धी । जरबेरा पिकाची लागवड पद्धती | Growth of gerbera crop. Cultivation method of gerbera crop

जरबेराची अभिवृद्धी बियांपासून आणि शाखीय पद्धतीने करता येते.

बियांपासून अभिवृद्धी :

जरबेराची बियांपासून अभिवृद्धी करणे ही पद्धत सोपी आणि सुटसुटीत आहे. या पद्धतीने अभिवृद्धी केल्यास शाखीय पद्धतीमुळे होणाऱ्या विषाणू अथवा अन्य रोगांचा प्रसार टाळता येतो. बियांपासून अभिवृद्धी करण्याचे वरील फायदे जरी असले तरी काही तोटेही आहेत. बियांपासून अभिवृद्धी केल्यामुळे मातृवृक्षासारखे सर्वच गुण नवीन रोपात येत नाहीत. याशिवाय रोपांची वाढ हळू होऊन फुलांचा पहिला बहर शाखीय अभिवृद्धीच्या तुलनेत उशिरा येतो. जरबेराच्या लागवडीसाठी जेव्हा बी धरायचे असते, तेव्हा थंड हवामान असणे आवश्यक असते. याशिवाय फुले उमलल्यावर दिवसा 10 ते 12 च्या दरम्यान कृत्रिम परागीभवनाचीही आवश्यकता असते. फुलात बी तयार झाल्यावर ते काढून घेऊन सुकवावे आणि 2-3 आठवड्यांत हे बी गादीवाफ्यावर अथवा खतमातीने भरलेल्या टोपल्यात अथवा कुंड्यांमध्ये पेरावे. रोपाला दोन पाने आल्यावर रोपे लागवडीलायक होतात. या अवस्थेत येण्यासाठी रोपांना साधारणपणे 5 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागतो.

शाखीय पद्धतीने अभिवृद्धी :

या पद्धतीमध्ये जुन्या लागवडीतील झाडाच्या खोडातून फुटणाऱ्या बगलफुटी (सकर्स) अलग करून त्यापासून अभिवृद्धी करतात. अभिवृद्धीची ही सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. अभिवृद्धीसाठी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मातृवृक्षापासून सकर्स वेगळे केल्यावर मोठ्या पानांची आणि मुळांची हलकी छाटणी करून घ्यावी. मात्र मधून वाढणारा शेंडा शाबूत ठेवावा आणि लागवड करताना तो मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
ऊतिसंवर्धन पद्धतीनेही जरबेराची अभिवृद्धी करता येते. ही पद्धत खर्चीक आहे. परंतु एकाच वेळी जरबेराची भरपूर रोपे तयार करता येतात. याशिवाय या पद्धतीमुळे फुलांचे भरपूर व लवकर उत्पादन घेता येऊन मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म रोपामध्ये जोपासता येतात. जरबेराच्या लागवडीपूर्वी जमीन नांगरून, कुळवून घेऊन भुसभुशीत करून घ्यावी. त्या वेळी हेक्टरी 20 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत घालून ते मातीत चांगले मिसळून घ्यावे. यानंतर 45 ते 60 सेंमी. अंतरावर सऱ्या काढाव्यात आणि सरीच्या एका बाजूने 30 ते 40 सेंमी. अंतरावर एका ठिकाणी एक फुटवा (सकर्स) लावून लागवड करावी. लागवड करताना रोपाचा मधला वाढणारा शेंडा मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

जरबेरा पिकास योग्य हंगाम । जरबेरा पिकास योग्य लागवडीचे अंतर | Suitable season for gerbera crop. Suitable planting distance for gerbera crop |

जरबेराची व्यापारी तत्त्वावर शेतात लागवड करताना जास्त पावसाचा काळ वगळता वर्षभरात केव्हाही लागवड केली तरी चालते. यासाठी जोराचा पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा जोराचा पाऊस संपल्यावर म्हणजेच जून महिन्यामध्ये बियांची गादीवाफ्यावर पेरणी करावी. रोपे 4-6 पानांवर आल्यानंतर त्यांची शेतात लागवड करावी. जरबेराची रोपे अत्यंत नाजूक असल्यामुळे लागवड करताना त्यांची काळजी घ्यावी किंवा शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करावी.
जरबेराची लागवड करण्यासाठी सुरुवातीला 45 ते 60 सेंमी. अंतरावर सऱ्या काढून त्यांच्या एका बाजूने 30 ते 40 सेंमी. अंतरावर एक याप्रमाणे अंतर ठेवून रोपांची लागवड करावी. हलक्या जमिनीत सपाट वाफे तयार करून त्यांमध्ये 30 सेंमी x 30 सेंमी. किंवा 40 सेंमी. X 40 सेंमी. अंतरावर लागवड करावी. कमी अंतरावर लागवड केल्यास रोपांची संख्या वाढते आणि सुरुवातीला जास्त फुले मिळतात; परंतु पुढे फुलांचे उत्पन्न आणि प्रत घटते; उद्यानात, इमारतींच्या परिसरात अथवा रस्त्याच्या दुतर्फा जेव्हा जरबेराची लागवड करावयाची असते तेव्हा जागेच्या उपलब्धतेनुसार विशिष्ट आकाराचे वाफे तयार करून त्यात खत घालून 30 X 30 अथवा 30 X 20 सेंमी. अंतरावर जरबेराची लागवड करावी. याशिवाय शेणखत आणि पोयटा माती समप्रमाणात भरून मातीच्या कुंड्यांत त्रिकोणी पद्धतीने जरबेराची लागवड करावी.

जरबेरा पिकास खत व्यवस्थापन । जरबेरा पिकास पाणी व्यवस्थापन | Fertilizer management of gerbera crop. Gerbera Crop Water Management |

जरबेरा हे पीक सेंद्रिय खताच्या वापराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. त्यामुळे फुलांची चांगली प्रत व काढणीनंतर चांगला टिकाऊपणा पाहिजे असल्यास पिकाला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते देणे आवश्यक आहे. या पिकाची व्यापारीदृष्ट्या लागवड करावयाची असल्यास लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी 20 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खते द्यावीत. 50 किलो नत्राचा दुसरा आणि तिसरा हप्ता लागवडीनंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात द्यावा. यामुळे झाडाची जोमदार वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. बागेत अथवा इमारतींच्या परिसरात जरबेराची लागवड केली असल्यास दर चौरस मीटर क्षेत्रात 3 ते 5 किलो शेणखत, 15 ग्रॅम स्फुरद आणि 5 ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. कुंडीतील लागवडीससुद्धा थोड्याफार फरकाने याच प्रमाणात खते द्यावीत. बऱ्याच वेळा जरबेराच्या पानांमधील क्लोरोफिलचे प्रमाण कमी होते. अशा वेळी पानांवर 40 पीपीएम मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी.
जरबेरा या पिकाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात परंतु नियमित पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. फुलांच्या बहाराच्या वेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास फुलांची प्रत खराब होण्याची शक्यता असते. यासाठी जमीन व हवामान पाहून गरजेनुसार पावसाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या, हिवाळ्यात 8 ते 9 दिवसांच्या आणि उन्हाळ्यात 4 ते 6 दिवसांच्या अंतराने पिकाला नियमित पाणी द्यावे. या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पिकाची एकसमान वाढ होऊन नियमित उत्पादन मिळते. या पिकाच्या पाणी व्यवस्थापनासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करू नये.

जरबेरा पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | Important pests of gerbera crop and their control

जरबेरा पिकावर किडींचा कमी प्रमाणात उपद्रव होतो. कधीकधी मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व सूत्रकृमींसारख्या किडींचा कमी अधिक प्रमाणात उपद्रव दिसून येतो. या सर्व किंडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मानोक्रोटोफॉस किंवा 16 मिलिलीटर डायमेथोएट (30% प्रवाही) किंवा 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन ( 50% प्रवाही) हे कीटकनाशक मिसळून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांची 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटूनपालटून फवारणी केल्यास या किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. सूत्रकृमी किंवा मुळ्या कुरतडणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हेक्टरी 100 किलो निंबोळी पेंड लागवडीच्या वेळी जमिनीत मिसळावी.

जरबेरा पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | Important diseases of gerbera crop and their control

जरबेरा पिकावर मूळकूज, खोडकूज, करपा, भुरी आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांचे वेळीच नियंत्रण करावे अन्यथा मोठे नुकसान होण्याचा संभव असतो.

मूळकूज व खोडकूज :

जमिनीतील विविध प्रकारच्या बुरशींमुळे हा रोग होतो. पिकामध्ये जास्त काळ पाणी साचून राहिल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढते. जरबेराबरोबरच गुलाबासारख्या पिकांवरसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
उपाय : या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. याशिवाय रोगाची लागण दिसून आल्यास 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड या ताम्रयुक्त बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून झाडाच्या खोडाच्या बुडाशी
ओतावे.

करपा, भुरी व केवडा रोग :

करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 हे बुरशीनाशक आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक यांचे द्रावण तयार करून त्यांची पिकावर फवारणी करावी. केवडा रोग टाळण्यासाठी उपलब्ध रोगप्रतिबंधक जातींची निवड करावी. या रोगांच्या नियंत्रणाबरोबरच रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

जरबेरा पिकामधील तणांचे नियंत्रण | Control of weeds in gerbera crops

जरबेराचे पीक जास्त काळ शेतात राहत असल्यामुळे लागवडीपूर्वी शेतातील हरळी, लव्हाळा, कुंदा यांसारख्या बहुवर्षायु तणांचा नाश करावा आणि त्यानंतर पिकाची लागवड करावी. लागवडीनंतर येणारा कोंबडा, शिंपी, दीपमाला, जर्मन काटा, बिलाईत घोळ, पांढरी फुली यांसारखी तणे उगवतात. वेळोवेळी खुरपण्या करून या तणांचा नायनाट करावा. तणांच्या नियंत्रणाबरोबरच आंतरमशागतीची इतर कामे वेळच्या वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कीड-रोगांचे नियंत्रण करणे, पिकातील जमिनीची चाळणी करणे, झाडांना मातीची भर घालणे, झाडाच्या बुडखावरील रोगट तसेच सुकलेली पाने काढून टाकणे यांसारख्या कामांचा समावेश होतो. याच्या एकूण परिणामामुळे झाडाची चांगली वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या फुलांचे उत्पादन मिळते.

जरबेरा फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | Harvesting, production and sale of gerbera flowers |

जरबेराची लागवड केल्यापासून दीड ते दोन महिन्यांत फुले येण्यास सुरुवात होते. यापुढे तापमान आणि पाऊसमानानुसार फुलांचे बहार कमीजास्त प्रमाणात येतात. कडक थंडी, खूप पाऊस असलेल्या काळात या फुलझाडापासून थोडे कमी प्रमाणात उत्पादन मिळते. जरबेराच्या फुलांची काढणी करताना फुलाच्या बाह्य बाजूस असलेल्या पूर्ण फुलातील परागकण परिपक्व झालेले दिसल्यास, अशी फुले जमिनीलगत छाटून घ्यावीत. फुले जमिनीपासून काढताना छाटण्याऐवजी किंवा कापण्याऐवजी फुलांच्या दांड्यांच्या तळाशी धरून आजूबाजूला वाकविल्यास बुडातून दांडे सहज तुटून येतात. फुले काढण्याची हीच पद्धत सर्वांत योग्य आहे. अशा प्रकारे फुलांची काढणी केल्यानंतर त्वरित फुलांचे दांडे 2 ते 3 तास पाण्यात बुडवून ठेवावेत. यानंतर फुलांचा रंग, दांड्यांची लांबी किंवा आकार याप्रमाणे प्रतवारी करून घेतल्यानंतर एक ते दोन डझन फुलांच्या जुड्या रबर बँडने बांधाव्यात. या जुड्यांना जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळावे. अशा प्रकारे बांधणी केलेल्या फुलांच्या जुड्या ह्या लाकडी खोक्यांत अथवा कागदी खोक्यांत अथवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये भराव्यात. वरील भाग छिद्र पाडलेल्या कागदांनी बंद करून घेतल्यानंतर त्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेमध्ये पाठवाव्यात.
जरबेराच्या फुलांचे देठ जितके जाड असतात तितकी ही फुले जास्त दिवस टिकतात. फुलांची काढणी केल्यानंतर फुलांच्या देठाखाली 10 सेंटिमीटर अंतरावर फुले अलगदपणे चिमटीत धरून दाबावीत. यामुळे देठातील पोकळीमधील हवा निघून जाते. अशी फुले फुलदाणीत ठेवल्यावर पाणी शोषून घेण्याचे काम लवकर सुरू करतात. यामुळे फुले टवटवीत राहतात.
जरबेराची एकदा लागवड केल्यावर 2 ते 3 वर्षे या फुलझाडांपासून उत्पादन घेता येते. या पिकाच्या हेक्टरी लागवडीपासून दरवर्षी साधारणतः 5 ते 7 लाख फुलांचे उत्पादन मिळते. या पिकाच्या सुधारित जातींपासून लागवड केल्यास एका झाडापासून प्रतिवर्षी 20 ते 30 फुले मिळतात. पुढील वर्षी दीड ते दोन पटीने उत्पादन वाढते.
या फुलांची निर्यातक्षम प्रत पहिल्या दोन वर्षांतच मिळते. आपल्याला जर या फुलांची परदेशी निर्यात करावयाची असेल तर पॅकिंग करताना पुढील पद्धतींचा उपयोग करावा.

(1) प्रत्येक फुलासाठी स्वतंत्र प्लास्टिक पॅकिंग या पद्धतीमध्ये प्रत्येक फुलासाठी वेगळ्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकिंग करावे. यानंतर सर्व फुले प्लास्टिक पिशवीत बसतील अशा पद्धतीने पॅकिंग करतात.

(2) पुट्ट्यावर फुलांचे पॅकिंग : या पद्धतीमध्ये प्रत्येक फूल हे राखीप्रमाणे पुट्ट्यावर लटकवतात आणि सर्व फुलांचे दांडे रबर बँडने पुट्ट्याच्या मागील बाजूस बांधून क्रेटमध्ये भरतात. यामुळे फुलांची प्रत खराब होत नाही. अशा फुलांना परदेशात चांगला भाव मिळतो.

जरबेरा पिकाची फुले टिकविणे | Keeping Gerbera Plant Flowers |

लांब देठासह फुले काढून लगेच पाण्यात ठेवल्यास ही फुले 5-6 दिवस टवटवीत राहतात. फुले काढल्यानंतर ती जास्त काळ टिकण्यासाठी फुलांचे दांडे सिल्व्हर नायट्रेट अथवा साखरेचे द्रावण आणि 8 एच.क्यू.सी. यांच्या द्रावणात 24 तास बुडवून ठेवल्यास ती जास्त काळ टिकतात.

सारांश |

जरबेरा हे विविध रंगांची फुले येणारे फुलझाड आहे. उद्याने, रॉकगार्डन व इमारतीच्या सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यासाठी या फुलझाडाची ताटव्यात किंवा कुंडीत लागवड करतात. जरबेराची फुले उत्कृष्ट प्रतीची व टिकाऊ असतात. त्यामुळे या फुलाला कटफ्लॉवर्स म्हणून मोठ्या शहरांतून भरपूर मागणी आहे. जरबेराच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, हलकी, मध्यम खोलीची काळी जमीन अधिक उपयुक्त असते. आपल्या राज्यातील उष्ण व कोरड्या आणि समशीतोष्ण हवामानात या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. फुलांची मागणी व खप यांचा विचार करता सिंगल जातीपेक्षा डबल जातीच्या फुलांना कटफ्लॉवर्स म्हणून भरपूर मागणी आहे. म्हणून लागवडीसाठी प्रामुख्याने परदेशी जाती अथवा सुधारित जातींची निवड करावी. जरबेराची बियांपासून, सकर्सपासून अथवा ऊतिसंवर्धन पद्धतीने अभिवृद्धी करता येते. जरबेराची ऊतिसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे खात्रीच्या ठिकाणावरून खरेदी करावी किंवा सकर्सपासून लागवड करावी. वरील दोन्ही पद्धतींची लागवड अशक्य असल्यास बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी.
जरबेराची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना जास्त पावसाचा काळ वगळता केव्हाही लागवड केली तरी चालू शकते. मध्यम खोलीच्या काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत सरी-वरंबा पद्धतीने दोन ओळींत 40 ते 60 सेंमी. अंतर आणि दोन रोपांत 30 ते 40 सेंमी. अंतरावर लागवड करावी. हलक्या जमिनीत सपाट वाफे तयार करून त्यामध्ये 30 सेंमी. X 30 सेंमी. अथवा 40 सेंमी. X 40 सेंमी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी पिकाला हेक्टरी 20 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे. यानंतर लागवडीच्या वेळी व त्यानंतर शिफारशीप्रमाणे 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खते विभागून द्यावीत. या पिकाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात परंतु नियमित पाणीपुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रोग-किडींचे नियंत्रण, तणनियंत्रण व आंतरमशागतीची कामेही वेळच्या वेळी करावीत.
लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांत या फुलझाडाला फुले येण्यास सुरुवात होते. फुले पूर्ण उमलल्यानंतर व पूर्ण फुलातील बाहेरचे परागकण परिपक्व झाल्यावर फुलांचे दांडे जमिनीपासून काढून घ्यावेत. यानंतर फुलांच्या जुड्या बांधून त्यांना योग्य पॅकिंग करून, खोक्यात भरून बाजारपेठेमध्ये पाठवाव्यात. लागवडीपासून पहिल्या वर्षी प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 20 ते 30 फुले मिळतात. दुसऱ्या वर्षी उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होते. त्यानंतर मात्र या फुलझाडाची लागवड किफायतशीर होत नाही.

जाणून घ्या कर्दळी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kardali flower Lagwad Mahiti Kardali Sheti) – Kardali Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )