।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
प्रवास (Pravas__Bodhkatha)
शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं.
शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. सगळा पसारा बांधलाय. तिथं पोहोचल्यावर फोन करतो. अजिंक्य कुठं आहे? अभ्यास कसा आहे? सुजाता कुठं आहे? तिचा अभ्यास कसा आहे? ऊस कसा आहे? अाण्णा शेताकडे जातात का? त्यांची तब्बेत कशी आहे? आई आता चालतीय का? म्हादू ट्रॅक्टर वर जातोय का?
शंकर मिलिट्रीत भरती होऊन 15 वर्ष झालेली. आता चार पाच वर्षात रिटायरमेंट. नंतर गावाकडं कायमचं जायाचं. वर्षात दोन दोन बदल्या. प्रमोशने. कुठंच स्थिर नाही. म्हणून शंकरने बायका पोरं गावाकडं ठेवलेली. शेताकडे लक्ष राहतयं. पोरांना दूध दुभतं मिळतंय. चांगलं शिक्षण मिळतंय.
अजिंक्य यंदा 12 वीत होता. सुजाता 10 वीत. त्यांची परीक्षा जवळ आलेली. मालन त्यांना काही कमी पडू देत नव्हती. अजिंक्य कधीतरी हट्ट करायचा. मालन तो पूर्ण करायची. शंकर मालनला म्हणायचा, “दोन पोरं हीच आपली प्रॉप्रर्टी. दोन पोरं हीच आपली जायदाद. म्हातारपणाची काठी. रिटायर होऊन मी गावाकडं आलो कि निवांत राहणार. माझा वाघ तोपर्यंत नोकरीला लागल. त्यानं कलेक्टर व्हावं हे आपलं स्वप्न तो पूर करणारच. तो नोकरीला लागला कि आपल्या दोघांना एकच काम. चांगली सून आणि चांगला जावाय बघायचा”.
मालन हसायची. म्हणायची, “तुमाला स्वप्नं बघायची लई सवय. पण असं झालंच नाही तर” ?? शंकर म्हणायचा, “अशुभ बोलू नकोस. आपण आपल्या पोरांसाठी केलेलं कष्ट वाया नाही जाणार. ती आपल्याच रक्तामांसाची आहेत.”
तुला आठवतय? अजिंक्य तिसरीत होता. तुम्ही सगळी सुट्टीला एर्नाकुलमला आला. आठ दिवसांनी तुम्हाला परत पाठवलं. गावी आल्यावर त्याला कावीळ झाली. मी रजा टाकून आलो. डॉ. वडवेकरांच्यात अँडमिट केेलं. डॉक्टर म्हणाले, “कावीळ मेंदूपर्यत गेली तर अवघड आहे. मी प्रयत्न करतोय. परंतू……
मी हबकलोच. पण तरी डॉक्टरना सांगितलं, “कितीही पैसा लागू दे. नोकरीचा सगळा पैसा खर्चीन. माझ्या वाट्याची सगळी जमीन विकीन. पण माझ्या पोराला वाचावा”. मालु.. तुला कधी बोललो नाही. पण त्या आठ दिवसात मी रात्रभर जागा असायचो. पोराच्या काळजीनं राञी उशी ओलि व्हायची… आणि तू म्हणतेस तस घडलंच नाही तर ?
गावी आलं कि शंकर दोन्ही पोरांना घेऊन शेतात जायचा. जाताना अजिंक्यला ट्रॅक्टर चालवायला द्यायचा. कधी पंढरपूर तर कधी म्हाळसोबाला जायचा. कधी पिक्चरला न्यायचा.
रजा संपली कि शंकरला भरून यायचं. बायका पोरं सोडून जायाला नको वाटायचं. अजिंक्यला म्हणायचा, तू शिकून कोण होणार? तो म्हणायचा, कलेक्टर. शंकरची छाती फुगायची. अजिंक्यला जवळ घेवून म्हणायचा, अभ्यास कर. खूप मोठा हो. आमचं नाव काढ. मी आणि तुझ्या मायनं उभा केलेल्या जायदादीचा तूच मालक होणार आहेस. तुझ्या आणि सुजाताच्या शिक्षणासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. कायबी कमी पडू देणार नाही. सुजाताच्या पाठीवर, तोंडावर हात फिरवायचा. अजिंक्यरला मीठीत घेऊन डोकं कुरवाळायचा. काळजावर दगड ठेवून सगळ्यांचा निरोप घ्यायचा..
अजिंक्यची 12 वीची परीक्षा सुरु झाली. शंकर सकाळ संध्याकाळ फोन करायचा. पेपर कसा गेला? सगळा लिहिला का? वाचलेलं सगळं आलतं का? जीवाला एकच घोर, अजिंक्यला चांगले मार्क्स पडायला पाहिजेत.
बुधवारी अजिंक्यचा शेवटचा पेपर होता. दुपारी 2 वाजता पेपर सुटला. 3 वाजले तरी अजिंक्य घरी घरी आला नव्हता. मालन वाट बघत होती…. आणि अचानक त्याच्या मित्राचा फोन आला. तुमच्या अजिंक्यला पोरांनी मारलय. लवकर या. शिवाजी चौकात तो पडलाय. मालनला धस्स झालं. ताबडतोब त्या उठल्या. शिवाजी चौकात गेल्या. अजिंक्य खाली पडलेला. कापडं फाटलेली. सायकल गटारात पडलेली. दफ़्तर विस्कटलेलं. मालननं त्याला उठवलं. बरीच माणसं जमलेली. वह्या, पुस्तकं, सायकल सगळं घेऊन मालनने गर्दीतून वाट काढली.
घरी आल्यावर मालनने शंकरला फोन केला. अजिंक्य सायकलवरनं पडलाय. लवकर या. दुसऱ्या दिवशी शंकर रजा टाकून आला. विचारपूस करायला लागला. एवढ्यात दोन पोलीस आले. अजिंक्यला स्टेशनात घेऊन गेले. पाठोपाठ शंकर आणि मालनही गेले. पोलिस स्टेशनात 10-12 पोरं. त्यांची चौकशी चाललेली. दोन तासांनी पोलिसांनी शंकरला आत बोलावलं. हा मुलींच्या भानगडीतला सारा प्रकार आहे. यावेळी त्याला सोडतोय. तुमचं लक्ष नाही पोरावर. पुन्हा सापडला तर गुन्हा नोंद होईल. करियर बरबाद झाले तर कोण जबाबदार?
शंकर अजिंक्यला घेऊन घरी आला. काळीज फाटलेलं. स्वप्नांचा चुराडा झालेला. ज्याच्या जीवावर म्हातारपण घालवायच ते उंडगाळ निघालं. त्याला उंडगा नाद लागला. वाटलं होतं नाव काढल. 12 वीला जिल्ह्यात पहिलां येईल. पुढं मागं कलेक्टर होईल. लाल दिव्याची गाडी. मागं पुढं शिपाई. भोंग्याच्या गाड्या. गावात घरापुढं गाड्या लागतील. आमची जिंदगी सार्थकी होईल. ऊन म्हणलं न्हाई, तहान म्हणली न्हाई. राबतच राहिलो. मालन शेतावर आणि मी सीमेवर.
अजिंक्य 6 वीत होता. बाटुक काढताना मालनच्या पायात सड घुसला. रक्तबंबाळ पाय घेऊन दिवसभर राबत होती. का तर अजिंक्यच्या शाळेचा खर्च. 12 वी नंतर पुण्याला यू पी एस सी ला पाठवायचा. जरूर तर मुंबईला. पण कलेक्टर करायचा…आणि …. पोरगं पोरींच्या मागं लागलेलं.. शंकरचं मस्तकच उठलं. जीवनात राम उरला नाही. स्वप्नांचा कोळसा झाला. आता राबण्यात काय अर्थं आहे?? झिजायचं तरी कशाला? शंकर काहीच बोलला नाही. बरोबरीला आलेलं पोरगं. मारून तर काय उपयोग? रात्री झोप लागली नाही. दोन मोठे पेग मारले. फॅनकडे बघत तसाच पडून राहीला.
दुसऱ्या दिवशी पोराला घेऊन शंकर शेतात गेला. पोरगं घाबरून गेलेलं. आता मार खावा लागणार. मिलटरीतला बाप. हतोड्यासारखा हात. शाळापण बंद होणार. नुसत्या विचारानं थरथर कापायला लागलं.
नारळी आंब्याखाली दोघेजण बसली. अर्धा तास शंकर काहीच बोलला नाही. नंतर त्याने मुलाला जवळ घेतलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाला, या वयात अशा चूका होतात. पण तू करशील असं वाटलं नव्हतं. तू तर कलेक्टर व्हायचं ठरवलयस. लाईन मारत मारत कोण कलेक्टर झालेलं ऐकीवात नाही, पोरा… या वयातलं प्रेम झूठ असतं. वासनेचा खेळ असतो सारा.. भादव्यात एका कुत्रीमागं 10-12 कुत्री लागतात. कळवंड करतात. त्यात काही मरतात. काय फरक त्यांच्यात आणि आपल्यात? मरायचं तर देशासाठी मर. मार खायचा तर आई बापाच्या नावासाठी खा. अभ्यासासाठी जेवण कमी केलस. खेळ बंद केलास. मित्रांकडे जाणं बंद केलस. पिक्चर बंद केलास. तसा ह्यो नादपन 5-7 वर्ष बंद केलास तर खूप मोठा होशील. तू फक्त ठरवलं पाहिजेस. एकदा ठरवलं कि डोक्यात तोच विषय राहतो.. शेवटी तो नाद हा दोन xxxx मध्ये नसतो तर डोक्यातच असतो.
18 ते 25 वयातल्या वासनेला सिनेमावल्यानी प्रेम म्हणलं. प्रेम ब्रिम खोटं सारं… हे वय सोडून राहिलेल्या आयुष्यात प्रेम असतं कि नसतं? दोन्हीत फरक काय? आंधळ करतं ते प्रेम नसतं. आंधळं करतं ती वासना असते. ज्यांना आई बाप नाहीत, ज्यांना कुणी बघणारं नाही. त्यांनी साथीदार स्वतः शोधणं ठीक आहे. पण तुझ्यासारख्यानं… आम्ही कुठं गेलोय काय? आम्हाला तुझ्या साथीदाराबद्दल कळणार नाही का? करिअर केलस तर पोरी मागं लागतील. नाहीतर तुलाच मागं लागावं लागेल. तू ठरव काय करायचं ते. नंतर शंकर काहीच बोलला नाही. अबोला धरून दोघेही घरी आले.
12 वीचा निकाल लागला. अजिंक्यला 64% मार्क्स पडले. त्याने शंकरला फोन केला. निकाल लागला. पुण्याला जाऊ का ? शंकर कोरडेपणानं म्हणाला “बघ तुझ्या बेतानं…….”
मालनला वाटायचं अजिंक्यने इथच कुठंतरी अँडमिशन घ्यावं. अभ्यास करावा. पण त्याची इच्छा पुण्याला जायची होती. अजिंक्य पुण्याला गेला.
पोराला पुण्याला जाऊन 2 वर्ष झाली. शंकरने स्वेछानिवृती घ्यायचं ठरवलं. नोकरीत मन रमत नव्हतं. घराकडं जायला पण पूर्वीसारखं भरून येत नव्हतं. वाटायचं मालुला घेऊन दूर कुठतरी जावावं.
शंकर कायमचा गावी आला. शेतातील कामे करू लागला. कधीतरी पोराचा फोन यायचा. फी भरायची आहे . पैसे पाठवा. बाकी काही विचारपूस नाही. शंकर जास्तच उदास व्हायचा.
बुधवारी उसाची लागण करायची होती. शंकर शेतात सरी सोडत होता. ट्रँक्टरमागं गडी तन वेचित होता…. आणि लांबून सुजाता येताना दिसली.. धापा टाकत… पळत… शंकरच्या काळजाचं पाणी झालं. मालनला काही झालं का काय? शंकरने ट्रँक्टर बंद केला. खाली उतरला. तोवर सुजी जवळ आलेली. तिला बोलता येत नव्हतं. घामाघुम झालेली. धाप लागलेली.
शंकरने विचारलं, काय झालं? सुजाताने हातातली पिशवी शंकरपुढं टाकली आणि गप्पकन खाली बसली… शंकरने पिशवी बघितली… त्यात पेपर होता… पेपरात पहिल्या पानावर ठळक बातमी होती… यु पी एस सी परीक्षेत अजिंक्य शंकर जाधव महाराष्ट्रात नववा…… शंकरनं पेपरासहित पोरगिला गच्चं मिठीत घेतलं. वादळात मोठं झाड हालावं तसा तो गदगदायला लागला. आनंदाला पारा उरला नाही. शंकरच्या दोन्ही डोळ्यातल्या पाण्यानं पोरगीचं डोकं ओलचिम्ब झाल.
मुलांचे आयुष्य घडवायचे असेल तर अशा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपल्या मुलांना सांगा. कारण आपण शिक्षक आहोत सैराट सारखी उदाहरणे देऊन मुलांची आयुष्य उध्वस्त करू नका….
आयुष्यात काही तरी चांगले नाव कमवा ,आई वडिलांना आनंद द्या.