झिनिया लागवड । Ziniya Lagwad | Ziniya Sheti | झिनिया लागवडीचे महत्त्व । झिनिया लागवडी खालील क्षेत्र । झिनिया पिकाचे उत्पादन । झिनिया पिकास योग्य हवामान । झिनिया पिकास योग्य जमीन । झिनिया पिकाच्या उन्नत जाती । झिनिया पिकाची अभिवृद्धी । झिनिया पिकाची लागवड पद्धती । झिनिया पिकास योग्य हंगाम । झिनिया पिकास योग्य लागवडीचे अंतर ।झिनिया पिकास वळण । झिनिया पिकास छाटणीच्या पद्धती ।झिनिया पिकास खत व्यवस्थापन । झिनिया पिकास पाणी व्यवस्थापन ।झिनिया पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । झिनिया पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।झिनिया फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । झिनिया फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
झिनिया लागवड । zinnia Lagwad | Ziniya Sheti |
झिनिया हे कमी दिवसांत येणारे हंगामी फुलझाड आहे. हे फुलझाड 1 ते 3 फूट उंचीपर्यंत वाढते. झिनियाची फुले टपोरी, आकर्षक, विविध आकारांची आणि रंगछटांची असतात. श्रावण महिन्यात तसेच दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झिनियाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खरीप हंगामात या फुलझाडाची लागवड कमी खर्चात, कमी वेळात, फारशी काळजी न घेता यशस्वीरित्या करता येते.
झिनिया लागवडीचे महत्त्व । Importance of Ziniya cultivation.
झिनिया हे विविधरंगी हंगामी फुलपीक आहे. झिनिया फुलझाडांची लागवड प्रामुख्याने बंगला, बगिचांमध्ये फुलांचे ताटवे, फुलांचे वाफे तसेच हिरवळीच्या मध्यभागी अथवा बागेभोवती करतात. व्यापारी तत्त्वावर या फुलपिकांची लागवड फारच थोड्या प्रमाणात केली जाते. झिनियाचे फूल अत्यंत आकर्षक, विविध रंगांचे आणि टपोरे असते. थोडीशी निगा व पाणी उपलब्ध असले तर या फुलझाडांची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. सहज करता येणारे फारसा खर्च आणि लक्ष द्यावे न लागणारे हे पीक खरीप हंगामात घेतल्यास फायदेशीर ठरते. कारण श्रावण महिन्यात देवपूजेसाठी या फुलांना भरपूर मागणी असते. मोठ्या शहरा या फुलांना भरपूर मागणी असल्याने या पिकाच्या लागवडीस बराच वाव आहे.
झिनिया फुलझाडांची लागवड फार पूर्वीपासून भारतामध्ये सुरू झालेली आहे. मेक्सिको हे या फुलझाडाचे उगमस्थान असून तेथून अमेरिका आणि इतर देशांत या फुलझाडाचा प्रसार झालेला आहे.
झिनिया लागवडी खालील क्षेत्र । झिनिया पिकाचे उत्पादन । Ziniya planting area below. Production of Ziniya crop.
महाराष्ट्रात झिनिया या फुलझाडाच्या लागवडीखालील क्षेत्राची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी अंदाजे 50 हेक्टर क्षेत्रावर झिनिया फुलपिकाची लागवड असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्यात 250 ते 300 टन झिनियाच्या फुलांचे उत्पादन होते.
झिनिया पिकास योग्य हवामान । झिनिया पिकास योग्य जमीन । Suitable climate for Ziniya crop. Land suitable for Ziniya crop.
झिनियाचे पीक उष्ण आणि कोरड्या तसेच दमट हवामानात वाढते. मात्र कडक थंडी झिनियाच्या पिकाला मानवत नाही. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. मध्यम काळी ते भारी काळया जमिनीतदेखील झिनियाची वाढ चांगली होते. हलक्या मुरमाड जमिनीत शेणखताचा भरपूर पुरवठा केल्यास झिनियाचे उत्पादन चांगले मिळते.
झिनिया पिकाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Ziniya plant.
झिनियाच्या जातींचे झिनिया लिनिऑरिस (बटन झिनिया), झिनिया इलेगन्स (गेंदा झिनिया) आणि झिनिया हॅजेना (बुटका झिनिया) असे तीन मुख्य प्रकार आहेत.
झिनिया लिनिऑरिस (बटन झिनिया) :
झिनियाच्या या प्रकारातील झाडे 20 ते 25 सेंटिमीटरपर्यंत उंच वाढतात. या प्रकारातील झाडांची पाने व फुले लहान आकाराची असतात. या प्रकारातील जातींना लहान आकाराची, पांढऱ्या किंवा पिवळया रंगाची असंख्य फुले लागतात. या प्रकारातील जाती बहुवर्षायु असून त्यांचा उपयोग बंगला, बगिचांमध्ये फुलांचे ताटवे तयार करण्यासाठी तसेच रॉकरीमध्ये आकर्षकपणा वाढविण्यासाठी करतात.
झिनिया इलेगन्स (गेंदा झिनिया) :
झिनियाच्या या प्रकारातील झाडे 25 ते 120 सेंटिमीटरपर्यंत उंच वाढतात. या प्रकारातील फुले मोठ्या आकाराची, दुहेरी पाकळयांची आणि गेदेदार असून फुलांना पांढरी, हिरवी, लाल, गुलाबी, पिवळी, केशरी, जांभळी अशा विविध रंगछटा असतात. या प्रकारातील फुलांचा उपयोग कटफ्लॉवर्स म्हणून, फुलदाणी सजावटीसाठी, हारांसाठी, गुच्छ तयार करण्यासाठी करतात.
या प्रकारातील जाती पुढीलप्रमाणे आहेत :
(1) जायंट ऑफ कॅलिफोर्निया: उंच वाढणारी,
(2) डेलिया फ्लॉवर्ड : हिरवट फुले,
(3) क्रिसँथेमम फ्लॉवर्ड : नाजूक, आकर्षक पाकळ्यांची फुले,
(4) पेपरमिंट स्टिक: विविधरंगी फुले,
(5) कॅक्टस फ्लॉवर्ड : वेड्यावाकड्या पाकळ्यांची, कमी आकर्षक फुले,
( 6 ) पमिला आणि नाना : मध्यम आकाराची फुले.
झिनिया हॅजेना (बुटका झिनिया) :
या प्रकारातील झाडे 30-45 सेंटिमीटर उंच वाढतात. या प्रकारातील झाडे बुटकी असली तरी फुले मोठ्या आकाराची, एकेरी अथवा दुहेरी पाकळ्यांची आणि केशरी, लाल, सोनेरी रंगांची असतात.
झिनिया पिकाची अभिवृद्धी । झिनिया पिकाची लागवड पद्धती । Growth of Ziniya crop. Cultivation method of Ziniya crop.
झिनियाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून करतात. मे किंवा जून महिन्यांत गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करतात. थोड्या प्रमाणात रोपे पाहिजे असल्यास बांबूच्या टोपलीत खतमाती भरून त्यामध्ये बी पेरून व नियमित पाणी देऊन रोपे तयार करता येतात. झिनियाची एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी अडीच किलो बियाणे लागते. गादीवाफ्यावर रोपांना 5-6 पाने आल्यावर म्हणजेच रोपांची उंची 10 ते 15 सेंटिमीटर झाल्यावर कायमच्या जागी रोपांचे स्थलांतर करावे. ज्या ठिकाणी कायमची लागवड करायची आहे, अशी जमीन प्रथम नांगरून कुळवून आणि सपाट करून, सपाट वाफे किंवा सऱ्या वरंबे तयार करून नंतर रोपांची लागवड करावी.
झिनिया पिकास योग्य हंगाम । झिनिया पिकास योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for Ziniya crop. Proper Planting Spacing for Ziniya Crops
झिनियाची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करतात. दोन झाडांमधील व दोन ओळींमधील अंतर 45 x 45 सेंटिमीटर किंवा 30 x 30 सेंटिमीटर ठेवून लागवड करावी. एका जागी एकच रोप लावावे. गादीवाफ्यावरील रोपांची वाढ 15 सेंटिमीटर किंवा जास्त झाली असली तर लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडून रोपे लावावीत.
झिनिया पिकास वळण । झिनिया पिकास छाटणीच्या पद्धती । Ziniya crop rotation. Methods of pruning Ziniyas.
झिनियाची लागवड केल्यानंतर 6 ते 7 आठवड्यांनी झाडाला प्रथम कळी धरण्यास सुरुवात होऊ लागते. अशा वेळी शेंड्याकडील कळी खुडून टाकावी. त्यामुळे प्रत्येक पानाच्या बगलेतून नवीन फूट बाहेर पडून झाडावर फांद्यांची संख्या वाढते व त्यामुळे फुलांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच झाडे एकदम उंच वाढली असल्यास त्यांना काठ्यांचा आधार द्यावा.
झिनिया पिकास खत व्यवस्थापन । झिनिया पिकास पाणी व्यवस्थापन । Fertilizer management of Ziniya crops. Water management for Ziniya crop.
झिनियाच्या फुलपिकाला हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत, 150 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे. नत्रखताची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. 75 किलो नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेले 75 किलो नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश
लागवडीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. खताची मात्रा दिल्यानंतर पिकाला लगेच पाणी द्यावे. पावसाळ्यात उपलब्धतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
झिनिया पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Ziniya crop and their control.
पावसाळी हंगामात झिनियाच्या पिकावर मावा, पाने कुरतडणाऱ्या किडी आणि फुलकिडे यांचा उपद्रव होतो. किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर रोगार (30% प्रवाही) किंवा 15 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस (36% प्रवाही) या प्रमाणात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने पिकावर 2-3 वेळा फवारावे.
झिनिया पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Ziniya crop and their control.
पावसाळी हंगामात झिनियाच्या फुलझाडांवर भुरी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 2 मिलिलीटर कॅराथेन (48% प्रवाही) अथवा 25 ग्रॅम वेटासूल ( 80% पाण्यात मिसळणारे गंधक) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 ग्रॅम डायथेन एम-45 या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
झिनिया फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Ziniya flowers.
रोप लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी झिनियाच्या झाडांना फुले लागण्यास सुरुवात होते. फुलांचा बहर सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवस चांगला राहतो. फुले नेहमी सकाळच्या वेळी तोडावीत. बोटाच्या नखाच्या साहाय्याने अथवा धारदार चाकूने फुलांचे देठ तोडावेत. झिनियाच्या पिकापासून हेक्टरी 5 ते 6 टन फुलांचे उत्पादन मिळते.
झिनिया फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Ziniya flowers.
झिनियाची तोडलेली फुले बांबूच्या हान्यामध्ये अथवा लाकडी पेट्यांमध्ये भरून विक्रीकरिता बाजारात पाठवावीत. काही वेळेस ही फुले 15 ते 20 सेंटिमीटर लांब देठासहित तोडून त्यांच्या जुड्या बांधून दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. अशी फुले बाजारात विक्री होईपर्यंत तजेलदार राहत असल्याने त्यांना भाव (दर) चांगला मिळतो.
सारांश ।
झिनियाच्या विविधरंगी, टपोऱ्या, आकर्षक फुलांमुळे या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. झिनियाच्या फुलांचा उपयोग कटफ्लॉवर्स म्हणून केला जातो. तसेच बटन झिनिया प्रकारातील झाडांचा उपयोग रॉकरीमध्ये आकर्षकता वाढविण्यासाठी केला जातो.
झिनियाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून केली जाते. मे-जून महिन्यांत रोपे तयार करून जुलै-ऑगस्ट महिन्यांत रोपांची लागवड केली जाते. लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी रोपांना फुले येण्यास सुरुवात होते. फुलांची काढणी धारदार चाकूच्या साहाय्याने देठ तोडून करावी. झिनियाच्या पिकापासून हेक्टरी 5 ते 6 टन फुले मिळतात.