पेरू पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । Peru Sheti । पेरू पिकास हवामान । पेरू पिकास जमीन । पेरू पिकाच्या सुधारित जाती । पेरू पीक अभिवृद्धी । पेरू पीक लागवड पद्धती । पेरू पीक लागवडीस हंगाम । पेरू पीक लागवडीचे अंतर । पेरू पिकास वळण । पेरू पिकास छाटणी । पेरू पिकास खत व्यवस्थापन । पेरू पिकास पाणी व्यवस्थापन । पेरू पिकातील आंतरपिके । पेरू पिकातील आंतरमशागत । पेरू पिकातील तणनियंत्रण । पेरू पिकाचा बहार धरणे । पेरू पिकास पाण्याचा ताण देणे । पेरू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । पेरू पिकास उत्पादन- गुणवत्तावाढीच्या खास बाबी । पेरू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । पेरू पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन । पेरू फळांची साठवण फळे पिकविण्याच्या पद्धती व विक्रीव्यवस्था ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पेरू पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
उगमस्थान :
पेरू या फळझाडाचे उगमस्थान मेक्सिको आणि पेरू या देशांच्या दरम्यानच्या भागातील आहे.
महत्त्व :
पेरूची लागवड वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे या पिकाचा कणखरपणा होय. कमी पाण्यावर येणारे फायदेशीर पीक म्हणून पेरूची लागवड केली जाते. जमिनीच्या बाबतीतही हे पीक चोखंदळ नाही. फळे रुचकर आणि इतर फळांच्या मानाने स्वस्त असल्यामुळे पेरूचे फळ समाजातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये प्रिय झाले आहे. आणि म्हणूनच पेरूची लागवड झपाट्याने वाढत आहे.
पेरूच्या फळात ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तसेच इतर खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 76.10 |
शर्करा (कार्बोहायड्रेट) | 14.50 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 1.50 |
स्निग्धांश (फॅट्स) | 0.20 |
तंतुमय पदार्थ | 6.90 |
खनिजद्रव्ये | 0.80 |
लोह | 1.00 |
स्फुरद | 0.04 |
चुना | 0.01 |
जीवनसत्त्व ‘ब’ | 0.03 |
जीवनसत्त्व ‘क’ | 0.30 |
उष्मांक | 66 (कॅलरी) |
पेरूच्या फळापासून जेली, पुडिंग, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात.
पेरूचे झाड टणक असल्यामुळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठीही पेरूच्या लाकडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पीक कमी खर्चाचे, हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
भारतात 17व्या शतकात पेरूची झाडे आढळून आली. काही तज्ज्ञांच्या मते, पेरू हे मूळचे भारतातील पीक आहे. भारत, मलाया, बांगलादेश, म्यानमार, अमेरिका आणि दक्षिण चीन ह्या देशांत पेरूची लागवड आढळून येते.
भारतातील फळपिकाखालील एकूण क्षेत्रफळाच्या 6 ते 7 % क्षेत्रफळ पेरूच्या लागवडीखाली आहे. अती थंड प्रदेश सोडल्यास भारतातील सर्व राज्यांत पेरूची लागवड होते. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब, तामीळनाडू, आसाम ही प्रमुख पेरू उत्पादक राज्ये आहेत. सरासरी उत्पादनाच्या बाबतीत गुजरात आणि मध्यप्रदेश (हेक्टरी 20 टन) ही राज्ये आघाडीवर असून त्यानंतर आंध्र प्रदेश व तामीळनाडू, आसाम, बिहार, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्र असून पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा, जळगाव या जिल्ह्यांत आहे.
पेरू पिकास हवामान आणि पेरू पिकास जमीन :
उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात पेरूची लागवड करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानातसुद्धा हे फळझाड वाढू शकते. कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशात जेथे हिवाळ्यात थंडी अधिक असते अशा भागात पेरूचे उत्पादन चांगले येते आणि फळांची गुणवत्ताही अधिक चांगली असते.
पावसाचे प्रमाण 300 ते 500 मिलिमीटरच्या दरम्यान असलेल्या भागात तसेच जून ते ऑक्टोबरपर्यंत 1,000 मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या भागात पेरूचे पीक चांगल्या प्रकारे येते. जास्त व सतत पाऊस असलेल्या दमट भागात झाडाची नुसती वाढ होते. परंतु फळे कमी लागतात. शिवाय फळांची प्रतही खराब असते आणि त्यावर देवी रोगाचा प्रादुर्भाव होतो. कोकणातील अती पावसाचा दमट भाग सोडल्यास महाराष्ट्रातील बहुतेक भागात पेरूची लागवड चांगल्या प्रकारे होते. पेरूच्या झाडाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याने दुष्काळी भागातही पेरूची लागवड यशस्वी होऊ शकते.
पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असलेल्या हलक्या ते मध्यम जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होते. जमिनीच्या बाबतीत पेरू हे पीक चोखंदळ नसले तरी अतिभारी, चोपण, पाणथळ, चुनखडीयुक्त, पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनी ह्या पिकास अयोग्य ठरतात आणि म्हणूनच अशा जमिनी पेरू लागवडीसाठी निवडू नयेत. सुमारे 45 सेंमी. खोल पोयट्याच्या मुरमाचा थर असलेल्या जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होते. 6.5 8.5 आम्ल – विम्ल निर्देशांकापर्यंत जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होऊ शकते.
पेरू पिकाच्या सुधारित जाती :
फळातील गराचा रंग, फळाचा आकार, फळातील साल, पृष्ठभाग तसेच गाव किंवा प्रदेशावरूनही पेरूच्या जातींचे वर्गीकरण केले जाते. पांढऱ्या गराचे पेरू जास्त गोड असतात. पेरूच्या जवळपास 92 जाती आहेत. त्यांपैकी आपल्या देशात फक्त 5 ते 6 जातींची लागवड केली जाते.
देशातील विविध ठिकाणी घेतलेल्या चाचण्यांवरून असे दिसते, की ह्या सर्वांमध्ये सरदार (लखनौ -49) आणि अलाहाबाद सफेदा ह्या जाती अधिक उत्पादन देणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या आहेत. महाराष्ट्रात ‘सरदार’ ह्या जातीची शिफारस फार पूर्वीपासून केलेली आहे आणि ही जात मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली येत आहे.
सरदार पेरू :
‘लखनौ 49’ या नावाने प्रचलित असलेली ही जात डॉ. जी. एस. चिमा ह्यांनी 1927 मध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे अलाहाबाद सफेदा या जातीच्या रोपांमधून निवड पद्धतीने शोधून काढली. ह्या जातीची झाडे फार उंच न वाढता आडवी वाढतात. पाने अंडाकृती आणि दोन्ही टोकांकडे निमुळती असतात. फळे आकाराने मोठी व गोल असतात. फळांचा रंग सफेद असून गर चवीस गोड असतो. फळामध्ये बियांचे प्रमाण कमी असते. ही जात उत्पादनास चांगली आहे. डॉ. चिमांच्या फळसंशोधन कार्याचा गौरव करण्याकरिता 1969 मध्ये या जातीचे ‘सरदार’ असे नामकरण करण्यात आले. अखिल भारतीय पातळीवर व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीसाठी ह्या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
पेरू पीक अभिवृद्धी आणि पेरू पीक लागवड पद्धती :
अभिवृद्धी :
पेरूची अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने करता येते. बियांपासून तयार केलेल्या झाडापासून उत्पादन उशिरा मिळते आणि फळांची प्रत आणि उत्पादन यांविषयी खात्री नसते. शिवाय झाडेही फार मोठी आणि सरळ उंच वाढतात. इच्छित जातीची लागवड करण्यासाठी त्याच जातीची कलमे (दाब कलम, भेट कलम अथवा गुटी कलम) लावावीत. दाब कलम, भेट कलम आणि गुटी कलम पद्धतीने पेरूची कलमे करता येत असली तरी कलम करण्यास लागणारा काळ, खर्च मेहनत आणि यश यांचा विचार करता दाब कलम पद्धतीने पेरूची अभिवृद्धी करणे योग्य ठरते.
मोठ्या प्रमाणावर कलमे तयार करण्यासाठी 1.0 मीटर x 1.0 मीटर किंवा 1.5 मीटर X 1.5 मीटर अंतरावर योग्य जातीची निवडक कलमे लावतात. एक वर्षानंतर जमिनीलगत मुख्य खोड छाटतात. त्यामुळे तेथून बरेच नवे फुटवे निघतात.
फेब्रुवारी महिन्यात बुडापासून छाटणी केली असता जुलैपर्यंत कलम करण्यायोग्य फुटवे मिळतात. कलम करण्यायोग्य जाडीच्या आणि पक्वतेच्या फुटव्यांचाच कलमे करण्यासाठी उपयोग करावा. एका झाडावरील सर्वच फुटव्यांवर एकाच वेळी कलमे करू नयेत. कलम करण्यासाठी निवडलेल्या फुटव्यांच्या जमिनीलगतच्या डोळ्यांखालील भागावरून आतील भागास इजा होऊ न देता जिभली पद्धतीने 2-3 सेंमी. भागावर काप द्यावा. काप घेतलेल्या डोळ्यांच्या किचित खाली इंडॉल ब्युटिरिक अॅसिड (IBA) ह्या संजीवकाचे 3,000 पीपीएम तीव्रतेचे मलम लावावे. या संजीवकामुळे कलमांना लवकर आणि भरपूर मुळे येतात. तीन ग्रॅम संजीवक एक किलो लॅनोलिन पेस्टमध्ये मिसळून 3,000 पीपीएम तीव्रतेची पेस्ट तयार होते. अशा रितीने कलमासाठी तयार केलेल्या फुटव्यांवर जेथे रिंग काढली त्यापेक्षा वरपर्यंत मातीचा ढीग ओढावा; जेणेकरून कलम केलेला भाग जमिनीत राहील. जमीन नेहमी ओलसर ठेवावी. साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांत म्हणजे सप्टेंबर महिन्यात मुळ्या आलेली कलमे तयार होतात. पुन्हा याच झाडावर असलेल्या फुटव्यांवर सप्टेंबरमध्ये कलमे बांधता येतात. एका वर्षात प्रत्येक झाडापासून 80-100 कलमे मिळू शकतात. बरीच वर्षेपर्यंत अशा रोपवाटिकेतून कलमे मिळवता येतात. सततच्या अभिवृद्धीमुळे अशा झाडांचा जोम टिकविण्यासाठी भरपूर शेणखत तसेच वरखते द्यावी लागतात. सद्य:स्थितीत दाब कलमाने पेरूची अभिवृद्धी केली जाते.
लागवड पद्धती :
पूर्वमशागत :
पेरूच्या लागवडीसाठी निवड केलेल्या जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट आणि कुळवाच्या दोनतीन पाळ्या देऊन खोल मशागत करावी. मे महिन्यात बागेची 7 x 7 मीटर अंतरावर खड्डे खोदण्यासाठी आखणी करावी.
खड्डे खोदणे :
प्रत्येक झाडाच्या ठिकाणी 60 X 60 X 60 सेंटिमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यातच खोदून घ्यावेत. खड्डे 20-25 दिवस चांगले तापू द्यावेत. खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा आणि 1 किलो सुपर फॉस्फेट घालून नंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट व पोयट्याची माती ह्यांच्या 1:1 प्रमाणातील मिश्रणाने ते भरावेत. मिश्रणात 10 ग्रॅम 10 % रामेक्झीन पावडर सुरुवातीलाच मिसळावी.
कलमाची निवड :
कलमांची निवड करताना ती कृषी विद्यापीठ किंवा शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून करणे आवश्यक असते. कलमे जातिवंत, जोमदार वाढणारी आणि निरोगी असावीत. कलम झाडावरून काढल्याबरोबर शेतात लावू नये. काही दिवस ती रोपवाटिकेत जोपासल्यानंतर ती पुढे शेतात लावावीत.
पेरू पीक लागवडीस हंगाम आणि पेरू पीक लागवडीचे अंतर :
कमी पावसाच्या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर किंवा जास्त पावसाच्या भागात जोराचा पाऊस संपल्यावर कलमे शेतात लावावीत. कलम खड्याच्या मधोमध लावून त्याला मातीचा भक्कम आधार द्यावा. लागवड 7 मीटर x 7 मीटर अंतरावर करावी. लागवड फार जवळ जवळ केल्यास झाडे निमुळती आणि उंच वाढतात आणि उत्पादन कमी मिळते. लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी कलमाच्या भोवतीची माती दाबून घ्यावी म्हणजे मुळांचा मातीशी संबंध राहील अन्यथा बऱ्याच वेळा कलमाची मुळे सैल होऊन कलम दगावते. नवीन झाडाला काठीचा आधार द्यावा. कलमांना नियमित अंतराने पाणी द्यावे.
पेरू पिकास वळण आणि पेरू पिकास छाटणी :
पेरूच्या झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र झाडाला योग्य वळण देण्यासाठी विशेषतः झाडे लहान असताना आवश्यकतेनुसार छाटणी करावी. तथापि, जास्त वयाच्या मोठ्या झाडांची छाटणी करून नवीन जोमदार फुटवे वाढवून घेणे फायदेशीर ठरते. झाडांची वाढ एकाच खोडावर होण्यासाठी अर्धा ते पाऊण मीटर उंचीपर्यंत येणारी खोडावरील फूट वेळोवेळी काढून टाकावी. झाडाचा समतोल राखण्यासाठी 3-4 फांद्या ठरावीक अंतरावर राखाव्यात, जेणेकरून झाड सर्व बाजूंना वाढेल. पेरूची झाडे लावल्यानंतर 1-2 वर्षांनी फांद्यांवरील फुटीवर फुले येतात. ह्यामुळे झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून 4 वर्षेपर्यंत फांद्यांवर येणारी फुले वेळोवेळी काढून टाकावीत. झाडांच्या फांद्या सरळ उभ्या वाढल्यास त्यांना फळे कमी लागतात. म्हणून सुरुवातीपासूनच पेरूच्या फांद्या पसरतील अशा पद्धतीने छाटणी करावी. सरदार जातीची झाडे पसरटच वाढतात आणि म्हणून अधिक उत्पादन देतात.
पेरू पिकास खत व्यवस्थापन आणि पेरू पिकास पाणी व्यवस्थापन :
खते-झाडाची वाढ जलद व्हावी यासाठी सुरुवातीपासून पहिली 4 वर्षे म्हणजेच फळे घेण्यास सुरुवात करेपर्यंत खताच्या योग्य मात्रा देणे आवश्यक असते. या काळात रासायनिक खताच्या मात्रा वर्षातून तीन वेळा विभागून द्याव्यात. शेणखत मात्र जूनच्या सुरुवातीलाच पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक झाडाच्या भोवती वाफ्यात मिसळून द्यावे. पेरूच्या प्रत्येक झाडाला खालीलप्रमाणे खते द्यावीत.
झाडाचे वय | शेणखत (किलो) | नत्र (ग्रॅम) | युरिया (ग्रॅम) |
1 वर्ष | 5 | 100 | 200 |
2 वर्ष | 10 | 200 | 400 |
3 वर्ष | 15 | 300 | 650 |
4 वर्ष | 20 | 400 | 850 |
5 वर्ष | 25 | 500 | 1050 |
नत्राच्या एकूण मात्रांपैकी 30% नत्र जून – जुलै महिन्यात 30% नत्र सप्टेंबर महिन्यात आणि उरलेला भाग फेब्रुवारीमध्ये द्यावा. हलक्या जमिनीत अथवा स्फुरद आणि पालाशची कमतरता असलेल्या जमिनीत प्रत्येक वर्षाला 50 ग्रॅम स्फुरद अधिक 50 ग्रॅम पालाश ह्या प्रमाणात वाढवून खते नत्रासोबत विभागून द्यावी.
फळे घेणे सुरू झाल्यानंतर म्हणजे 4 वर्षांच्या पुढे प्रत्येक झाडात 25 ते 30 किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी आणि 375 ग्रॅम नत्र, 375 ग्रॅम स्फुरद व आवश्यकतेनुसार 250 ते 375 ग्रॅम पालाश बहार येण्यापूर्वी द्यावे आणि त्यानंतर 375 ग्रॅम नत्र फळे धरल्यानंतर द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
पेरूचे झाड बराच काळ पाण्याचा ताण सहन करू शकते. तरीपण खते दिल्यानंतर पाऊस नसेल तर पाणी देणे आवश्यक असते. नियमित पाणी दिल्याने झाडाची वाढ चांगली होते. बुंध्याभोवती दुहेरी आळे करून बाहेरील आळ्यात पाणी द्यावे. उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने व हिवाळ्यात 20 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडाच्या वाढीनुसार आळ्याचे आकारमान वाढवावे.
फळे घेणे सुरू केल्यानंतर बहारानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मृग बहार घेतलेला असल्यास एप्रिल-मे महिन्यापासून जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचा ताण देणे सुरू करावे. फळधारणा होताना व फळाच्या वाढीच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडू नये म्हणून कमी अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फळकाढणी झाल्यानंतर झाडांना जास्त अंतराने आणि मर्यादित पाणी द्यावे.
पेरू पिकातील आंतरपिके । पेरू पिकातील आंतरमशागत । पेरू पिकातील तणनियंत्रण :
पेरूच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या 4 वर्षेपर्यंत पेरूपासून फारसे उत्पादन मिळत नाही आणि दोन झाडांमधील बरीच जागा उपलब्ध असल्यामुळे काही आंतरपिके घेऊन उत्पादन मिळविता येते. द्विदल धान्याची पिके अथवा भाजीपाल्याची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. फार उंच वाढणारी आणि दाट अशी ज्वारी, मका, केळीसारखी पिके घेऊ नयेत. मात्र पपईचे पीक आंतरपीक म्हणून घेता येईल.
पेरू पिकाचा बहार धरणे :
महाराष्ट्रातील हवामानात पेरूच्या झाडाला जून (मृग बहार), ऑक्टोबर (हस्त बहार) व जानेवारी असे तीन बहार येतात. ह्या बहारांपैकी महाराष्ट्रातील हवामानात मृग बहार घेणे फायदेशीर ठरते. ह्या बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात विक्रीसाठी तयार होतात. त्यामुळे त्यांची प्रत चांगली असते. तसेच फळे पावसाळ्यात अपक्व अवस्थेत असल्याने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असतात. मृग बहार घेण्यासाठी उन्हाळ्यात झाडांना पाण्याचा ताण द्यावा लागतो. ह्या काळात बहुतेक भागांत पाणीटंचाई असते. त्यामुळे झाडांना ताण देणे सुलभ होते. ह्या उलट परिस्थिती इतर बहारांची असते. आंबे बहारापासूनची फळे जून महिन्यापासून पुढे मिळतात. फळाच्या वाढीचा काळ उन्हाळ्यात येतो. त्यामुळे ती लहान राहतात तसेच संपूर्ण उन्हाळाभर झाडांना पाणी द्यावे लागते. फळमाशीचा उपद्रव पावसाळ्यात जास्त असतो आणि त्यामुळे पळांचे नुकसान होते. हस्त बहार धरण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून झाडांना ताण द्यावा लागतो. पावसाळा उशिरापर्यंत चालल्यास झाडांना ताण देता येत नाही. त्यामुळे फळे कमी लागतात. फळांच्या वाढीच्या काळात थंडी अधिक असते, त्यामुळे फळे लहान राहू शकतात.
पाणीपुरवठा आणि जवळच मोठी शहरे असलेली बाजारपेठ व स्थानिक परिस्थितीत तसेच वरील विवेचन, इत्यादी बाबी लक्षात घेऊनच इतर बहार घेण्याचा विचार करावा. मात्र एकापेक्षा अधिक बहारांची फळे घेऊ नयेत. पेरूचा विशिष्ट बहार घेण्यासाठी काही खास उपचार करावे लागतात. झाडांना त्यानुसार ताण देणे, खते देणे आणि पाण्याच्या पाळ्यांमध्ये बदल करावा लागतो.
वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, आपणाकडील हवामानाचा विचार करता मृग बहार घेणे अधिक फायदेशीर ठरते. मृग बहार घेण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.
पेरू पिकास पाण्याचा ताण देणे :
झाडांना विश्रांती देण्यासाठी झाडांची वाढ थांबवावी लागते. ह्यासाठी झाडांना जमिनीच्या मगदुरानुसार लवकर अथवा उशिरा पाणी देणे बंद करावे. भारी जमिनीतील बागेला 40 ते 60 दिवस पाण्याचा ताण द्यावा. हलक्या जमिनीत 30 ते 40 दिवसांचा ताण पुरेसा होतो. म्हणजेच भारी जमिनीस मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर हलक्या जमिनीस एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून स्थानिक परिस्थितीचा विचार करून पाणी देणे बंद करावे. जास्त ताण दिल्यास झाडाची पूर्ण पानगळ होऊन झाडाच्या फांद्या वाळतात आणि त्यामुळे उत्पादन कमी होते आणि झाडे दुबळी होतात. म्हणून पेरूच्या बागेला पाण्याचा ताण काळजीपूर्वक द्यावा.
पेरू पिकातील मशागत :
पेरूच्या झाडाला पाण्याचा ताण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी पाने पिवळी पडून पानगळ सुरू होते. भारी जमिनीत पानगळ लवकर होत नसल्यास तेथे नांगरट करून शेत भुसभुशीत करावे. उन्हाळ्यात शेवटी म्हणजे मे महिन्याच्या चवथ्या आठवड्यात कुजलेले शेणखत देऊन मातीत मिसळावे.
जूनमध्ये पावसाळा उशिरा सुरू झाल्यास अथवा बागेला ताण जास्त झाल्याचे आढळून आल्यास बागेत उभे आडवे दांड पाडून पाण्याच्या हलक्या पाळ्या द्याव्यात. पाण्याच्या पहिल्या पाळीच्या अगोदर नत्राची अर्धी मात्रा तसेच पूर्ण स्फुरद व पालाश ही खते द्यावीत आणि जरुरीच्या पाण्याच्या हलक्या पाळ्या द्याव्यात.
उन्हाळ्यात दिलेल्या ताणामुळे झाडांना विश्रांतीनंतर रासायनिक खते व पाणी मिळताच त्यावर नवीन फूट आणि फुलोरा येण्यास सुरुवात होते. जुलैमध्ये फुलोरा येऊन त्यापासून फळधारणा होते. फळधारणा टिकविण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नत्राची उरलेली अर्धी मात्रा द्यावी.
तणनियंत्रण :
बाग तणविरहित असल्यास झाडाची वाढ चांगली होते. तसेच किडीचा विशेषत: फळमाशीचा उपद्रवही कमी होतो. झाडाभोवती निंदणी करून बाग स्वच्छ ठेवावी. उन्हाळ्याच्या शेवटी हलकी मशागत केल्यास बाग स्वच्छ होण्यास मदत होते. तणनाशकांचा तसेच आच्छादनांचा वापर करूनही तणनियंत्रण सुकर करता येते.
पेरू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
फळमाशी, पिठ्या ढेकूण आणि साल पोखरणारी अळी ह्या प्रमुख किडी पेरूच्या झाडावर आढळतात.
फळमाशी : (फ्रुट फ्लाय)
मादी फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात प्रवेश करून आतील गर खातात, त्यामुळे फळे कुजणे व गळण्याचे प्रमाण वाढते.
उपाय: किडीचा उपद्रव सुरू झाल्यावर या फळमाशीचा बंदोबस्त करणे कठीण जातेः कारण फळमाशीच्या अळ्या फळात वाढत असतात. म्हणून या किडीचा उपद्रव कमी करण्यासाठी सुरुवातीपासूनच खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
(1) झाडाखाली गळालेली फुले, फळे वेचून नष्ट करावीत. बाग स्वच्छ ठेवावी.
(2) फुले येण्यासाठी आणि फळधारणेच्या वेळी हेक्टरी 2 किलो कार्बारिल (0.2%) किंवा 150 मिलिलीटर फॉस्फोमिडॉन (0.03%) 500 लीटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
(3) आंबे बहाराची फळे झाडावर असल्यास अशी फळे ह्या किडीस जास्त पोषक ठरतात. म्हणून ह्या बहाराची फळे काढून टाकावीत.
साल पोखरणारी अळी :
दुर्लक्ष केलेल्या बागेत ही कीड जास्त प्रमाणात आढळते. या किडीची अळी रात्रीच्या वेळी झाडाच्या सालीच्या आतील भागात शिरून आतील भाग पोखरून उपजीविका करते. या किडीचा उपद्रव झालेल्या खोडावर छिद्रे आढळून येतात. साल पोखरलेल्या ठिकाणी अळीची जाळीसारखी दाणेदार विष्ठा आढळते. उपद्रव जास्त असल्यास फांद्या अथवा झाडे वाळून जातात.
उपाय : किडीने केलेली झाडावरील छिद्रे शोधून त्यात कार्बन डायसल्फाईड आणि इडीसीटी मिश्रण किंवा बोअरर सोल्यूशन घालावे. ड्रापरने अथवा कापसाच्या बोळ्याने ही औषधे घालून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. वरील औषधे न मिळाल्यास पेट्रोलमध्ये कोणत्याही कीडनाशकाचे 2-3 थेंब टाकून ते छिद्रांमध्ये घालावे. सालीचा भुसा किंवा किडीची विष्ठा झाडाच्या खोडावर आढळल्यास अळी आत आहे असे समजावे.
पिठ्या ढेकूण :
ही कीड मोठ्या प्रमाणावर पेरूच्या पिकावर आढळते. हे ढेकूण कोवळ्या फुटीतील आणि फळातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून निघणाऱ्या मधासारख्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळे पेरूच्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.
उपाय : किडीचा प्रादुर्भाव दिसताच फास्फोमिडॉन 150 मिली. 500 लीटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
पेरू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
पेरूच्या फळावर देवी रोग, फळे कुजणे हे रोग दिसतात. ह्या रोगांपैकी देवी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतो.
देवी रोग :
हा बुरशीजन्य रोग असून कोवळ्या हिरव्या फळावर आढळतो. या रोगाची बुरशी फळाच्या सालीवर वाढते. सुरुवातीला फळावर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. लालसर तपकिरी ठिपके पुढे वाढत जाऊन फळाची साल फाटते आणि फळे तडकतात. रोगट फळे चवीस पाणचट लागतात. सतत पाऊस आणि दमट हवामानात ह्या रोगाची वाढ झपाट्याने होते.
उपाय :
(1) पेरूच्या बागेतील रोगट फळे काढून नष्ट करावीत.
(2) पावसाळ्यात झाडावर नवीन फूट येण्यापूर्वी आणि अर्धवट पोसलेल्या कोवळ्या पानांवर आणि फळांवर 0.25% तीव्रतेचा कॉपर ऑक्सिक्लोराईडचा (100 लीटर पाण्यात 250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड) फवारा द्यावा. 2 ते 3 फवारण्या केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
फळे सडणे :
फळावर देठाजवळ लाल रंगाचे गोल ठिपके दिसतात. पावसाळ्यात हे प्रमाण जास्त असते. आपल्या भागातील पेरूच्या बागांत ह्या रोगाचे प्रमाण कमी आहे.
उपाय : बागेतील रोगट, सडलेली, कुजलेली फळे वेचून नष्ट करावीत. बागेवर 0.2% डायथेन झेड-78 या बुरशीनाशकाच्या जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या काळात 3-4 फवारण्या कराव्यात.
लाल पाने :
भारी जमिनीत तसेच पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या बागेत पेरूची पाने लालसर पडतात. जमिनीत क्षार अथवा चुनखडी असेल तर लाल पानांचे प्रमाण वाढते. या विकृतीमुळे फळे लहान राहून तांबूस रंगाची बनतात.
उपाय : पाण्याचा निचरा वाढविणे, सेंद्रिय खताचे प्रमाण वाढविणे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या 2-3 फवारण्या करणे, या उपाययोजना कराव्यात.
पीक संजीवके :
पेरूची कलमे करताना आयबीए या संजीवकाचा 2,000/ ते 5,000 पीपीएम तीव्रतेने कलमातून वापर केल्यास दाब कलमांना पुढे लवकर आणि भरपूर लागतात. पेरूची शेंडा वाढ कमी करण्यास सीसीसी या वाढ विरोधक संजीवकाची 2,000 ते 2,500 पीपीएम तीव्रतेची फवारणी करावी. फळांची काढणी करण्यापूर्वी 15 दिवस अगोदर एनएए हे संजीवक 200 ते 500 पीपीएम तीव्रतेने फवारल्यास फळांचा तजेलदारपणा वाढतो.
फांद्या वाकविणे :
उभट वाढणाऱ्या फांद्या वाकवून आडव्या केल्यास फळांचा आकार वाढतो. त्यांची गुणवत्ता सुधारते आणि फळांची काढणी करणे सुलभ होते.
बहार धरणे :
योग्य बहाराची निवड करणे, बहारपूर्व काळात आणि बहार काळ संपतानाची विश्रांती मोडून झाडावर भरपूर फुले / फळे आणणे, इत्यादी हेतू साध्य करता येतात.
पेरू पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन :
मृग बहाराची फळे नोव्हेंबर महिन्यापासून तयार होऊ लागतात. सर्वच फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत फळे काढणीचा हंगाम असतो. फळांचा हिरवा रंग जाऊन तो पिवळट होतो. तसेच फळ हाताला नरम लागते. अशी पक्व फळे 2-3 दिवसांच्या अंतराने काढावीत. दूरवरच्या बाजारात फळे पाठवायची असल्यास ती पूर्ण पिकण्याच्या अगोदर काढावीत. फळे काढताना वा नंतर भरताना ती घासणार नाहीत किंवा दबणार नाहीत अशा रितीने काळजीपूर्वक हाताळावीत. फळे सकाळच्या वेळी तोडावीत. तोडल्यानंतर सावलीत गवतावर पसरवून आकारानुसार वर्गवारी करून ती करंड्यांत भरावीत.
उत्पादन :
लागवड केल्यानंतर 4 वर्षांपासून पुढे पेरूचे उत्पादन सुरू होते. सुरुवातीलाच 3-4 वर्षे उत्पादन कमी मिळते. व्या वर्षानंतर उत्पादन वाढत जाऊन 10व्या वर्षी प्रत्येक झाडापासून 1,000 ते 1,500 फळे मिळू लागतात. पेरूच्या बागेपासून
नियमित उत्पादन मिळते.
पेरू फळांची साठवण फळे पिकविण्याच्या पद्धती व विक्रीव्यवस्था :
फळे काढल्यावर 3-4 दिवसांपर्यंत चांगली राहू शकतात. पॉलिथीनच्या पिशवीला छिद्रे पाडून त्यात पेरू साठविल्यास 6 दिवसांपर्यंत फळे चांगली टिकविता येतात. 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमानात फळे साठविल्यास फळे 30 दिवसांपर्यंत टिकविता येतात. 6% मेणाचा थर फळावर देऊन आणि रूमटेंपरेचरपेक्षा कमी तापमानात साठवून फळे चांगल्या स्थितीत बरेच दिवस टिकविता येतात.
विक्री :
पेरूची फळे जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणून फळांची विक्री 2-4 दिवसांत करावी. त्यानंतर फळांची चकाकी जाऊन त्यांवर सुरकुत्या पडतात आणि अशा फळांना चांगला भाव मिळत नाही. झाडावर तयार होत आलेली फळे काढल्यास ती 2-4 दिवसांत पिकतात
सारांश :
अधिक पाऊस आणि दमट हवामानाचे पट्टे सोडल्यास महाराष्ट्रातील सर्वच भागांत पेरूचे पीक चांगल्या प्रकारे येते. पेरूचे झाड अतिशय काटक, कणखर असते आणि हलक्या ते भारी जमिनीत येऊ शकते. महाराष्ट्रात सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड असून ती प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा, जळगाव या जिल्ह्यांत आहे. हलक्या ते मध्यम जमिनीवर आणि उष्ण कोरड्या हवामानात पेरूची प्रत चांगली असते. पेरूची अभिवृद्धी गुटी कलम किंवा दाब कलम किंवा भेट कलमाद्वारे करणे योग्य ठरते. बियांपासून अभिवृद्धी करू नये. राज्यात निरनिराळ्या भागातील पेरूच्या फळांत विविधता आढळते; कारण बरीचशी लागवड रोपांपासून झालेली आहे. तसेच इतरही जाती आलेल्या आहेत. गणेशखिंड बागेतून विकसित केलेली ‘सरदार’ ही जात प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच सध्या ह्याच जातीला चांगली मागणी आहे. पेरूची लागवड 7 मी. X 7 मी. अंतरावर चौरस पद्धतीने करावी. सुरुवातीच्या काळात झाडाला योग्य वळण द्यावे. क्यानुसार वर्षातून तीन वेळा खताच्या मात्रा विभागून द्याव्यात. 4थ्या वर्षापासून बहार घेण्यासाठी झाडांना पाण्याचा ताण द्यावा. अशा झाडांना अर्धी खतमात्रा ताण तोडताना आणि अर्धी खतमात्रा फळे धरल्यानंतर द्यावी. बहुतेक भागात पेरूला वर्षातून तीनदा फुले आणि फळे येतात. मृग बहाराची फळे चांगली असतात व ती नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान मिळतात.