जाणून घ्या मोसंबी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Mosambi Lagwad) – Mosambi Farming

मोसंबी पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार | Mosambi Sheti । मोसंबीच्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन | मोसंबी पिकासाठी योग्य हवामान | मोसंबी पिकासाठी जमीन | मोसंबीच्या सुधारित जाती | मोसंबीची अभिवृद्धी | मोसंबीची लागवड पद्धती | मोसंबी पिकासाठी हंगाम। मोसंबी पिकासाठी लागवडीचे अंतर । मोसंबी पिकास वळण । मोसंबी पिकाची छाटणीची पद्धत । मोसंबी पिकातील आंतरपिके । मोसंबी पिकाची आंतरमशागत । मोसंबी पिकातील तणनियंत्रण । मोसंबी पिकाचे खत व्यवस्थापन। मोसंबी पिकाचे पाणी व्यवस्थापन । मोसंबी पिकाचा बहार धरणे । मोसंबी पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । मोसंबी पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । मोसंबी पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । मोसंबी फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

मोसंबी पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

मोसंबी या पिकाचे उगमस्थान दक्षिण चीन असून प्रथम दक्षिण भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली.
भारतात बहुतेक फळे ताजी खाण्यासाठी उपयोगात आणतात. परदेशात या फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे टिकाऊ पदार्थ तयार करतात. या फळातील प्रत्येक भागाचा उपयोग करून 95% फळावर प्रक्रिया केली जाते. मोसंबी हे पीक अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

मोसंबीच्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :

महाराष्ट्र राज्यात मोसंबी या पिकाखाली 20,000 एकर क्षेत्र आहे. मोसंबी पिकाखालील क्षेत्र हे प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात आहे. मोसंबीचे वार्षिक उत्पादन पावणेदोन लाख टन इतके आहे.

मोसंबी पिकासाठी योग्य हवामान आणि मोसंबी पिकासाठी जमीन :

हवामान :

मोसंबीची वाढ समशीतोष्ण हवामानाच्या, कमी पावसाच्या, कोरड्या हवामानात चांगली होते. ज्या ठिकाणी 12 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असते, अशा भागात हे पीक चांगले येते.

जमीन :

भारी, खोल, काळ्या मातीच्या, पाण्याचा निचरा चांगला न होणाऱ्या जमिनी या पिकास अयोग्य आहेत. अयोग्य जमिनीची निवड केल्यास झाडे डायबॅक रोगास बळी पडतात. संत्र्याच्या पिकास योग्य असलेली जमीन मोसंबीच्या पिकाससुद्धा योग्य असते. मध्यम हलक्या जमिनीत मोसंबीची झाडे चांगली वाढून उत्पादनही चांगल्या प्रतीचे मिळते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असलेली, मध्यम काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी.

मोसंबीच्या सुधारित जाती :

महाराष्ट्रात सध्या ‘न्युसेलर’ मोसंबीची लागवड केली जाते. जुन्या नगर जातीच्या मोसंबीपेक्षा ही जात उत्पादन आणि प्रतीच्या दृष्टीने सरस आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची, फिकट पिवळया रंगाची, पातळ सालीची, भरपूर गोड आणि रसाळ असतात. फळाची साल घट्ट असून सालीवर उभ्या लहानलहान खोमण्या असतात.

मोसंबीची अभिवृद्धी आणि मोसंबीची लागवड पद्धती :

अभिवृद्धी :

मोसंबीची कलमे जंबेरी किंवा रंगपूर लिंबाच्या एक ते सव्वा वर्षाच्या खुंटावर मौसंबीचे डोळे बांधून करतात. ही कलमे तयार करताना डोळे निरोगी आणि चांगले उत्पादन देणाऱ्या झाडापासून घेतलेले असावेत. कलमे उंच बांधणीची (22 ते 25 सेंमी.) असावीत. कलमांची उंची लागवडीच्या वेळेस 75 ते 90 सेंमी. असावी. कलमे खात्रीलायक आणि नोंदणीकृत केलेल्या रोपवाटिकेमधून विकत घ्यावीत. 18 ते 21 महिने वयाची कलमे मोसंबीच्या लागवडीसाठी वापरतात.

लागवड पद्धती :

मोसंबीची लागवड चौरस पद्धतीने करतात. उन्हाळयात शेताची मशागत करून शेत समपातळीत आणावे लागते. शेतात पाणी साचू नये म्हणून बाहेर पाणी जाण्यासाठी चर (नाल्या) काढावेत. नंतर ठरलेल्या लागवडीच्या अंतराप्रमाणे औरस-चौरस आखणी करून घ्यावी. लागवडीच्या जागी उन्हाळयात 0.75 X 0.75 X 0.75 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे भरण्यापूर्वी त्यांच्या तळाशी 2 ते 2.5 किलो सुपर फॉस्फेट टाकावे. खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि वरची माती यांच्या मिश्रणाने 14 या प्रमाणात मिसळून पावसाळ्यापूर्वी भरून ठेवावेत. मोसंबीची लागवड चांगला पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
मध्यम जमिनीत लागवड करावयाची असल्यास मोसंबीची जंबेरीच्या खुंटावर बांधलेली कलमे वापरावीत. मध्यम व भारी जमिनीसाठी रंगपूर लाईम या खुंटावर बांधलेली कमले वापरावीत.

मोसंबी पिकासाठी हंगाम आणि मोसंबी पिकासाठी लागवडीचे अंतर :

मोसंबीची लागवड चौरस पद्धतीने मध्यम काळ्या जमिनीत 6.5 X 6.5 मीटर अंतरावर करावी. हलक्या ते मध्यम जमिनीत 6 x 6 मीटर अंतर ठेवण्यास हरकत नाही.

मोसंबी पिकास वळण आणि मोसंबी पिकाची छाटणीची पद्धत :

वळण देणे :

मोसंबीच्या लागवडीनंतर झाडाची वाढ सुरू झाल्यावर 1 मीटर उंचीपर्यंत मूळ बांध्यावर फांद्या वाढू देऊ नयेत. मुख्य खोड मीटरभर उंचीपर्यंत सरळ वाढू द्यावे आणि त्यानंतर 5 ते 6 जोमदार फांद्या सर्व दिशांना पसरतील अशा तऱ्हेने वाढू द्याव्यात, म्हणजे झाडांना डेरेदार आकार येतो. त्यामुळे आंतरमशागतीची कामे अडथळा न येता पूर्ण करता येतात.

छाटणी :

मोसंबी फळझाडांना फळधारणेसाठी छाटणीची आवश्यकता नसते. मात्र वाढ, अनावश्यक पानसोट, झाडाच्या मध्यभागी आडव्या तिडव्या वाढणाऱ्या फांद्या छाटणे आवश्यक आहे. त्यामुळे झाडाच्या मध्यभागात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. यामुळे फळाची वाढ चांगली होऊन किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचप्रमाणे रोगट, वाळलेल्या फांद्या वेळीच काढून टाकणे महत्त्वाचे असते. फळे देणाऱ्या बागांमध्ये फळे काढल्यानंतर सल (वाळलेल्या फांद्या) निर्माण होते. ही सल झाडाच्या विश्रांतीच्या काळात काढून टाकावी. यामुळे झाडावरील निरोगी फांद्या, पाने यांची जोमदार वाढ होऊन उत्पादन चांगले येते व रोग व किडींचा उपद्रव कमी होतो.
मोसंबी झाडावरील फक्त अनावश्यक फांद्याच काढाव्यात. इतर फांद्यांची छाटणी करण्याची गरज नसते. चांगल्या फांद्यांची छाटणी केल्यास झाडावर फुले कमी येऊन उत्पादनात घट येते. म्हणून फक्त रोगट, वाळलेल्या फांद्या, पानसोट, मुख्य खोडावरील फूट आणि दाटलेल्या फांद्या काढण्यासाठीच छाटणी करावी.

मोसंबी पिकाचे खत व्यवस्थापन आणि मोसंबी पिकाचे पाणी व्यवस्थापन :

मोसंबी बागांना वाढीच्या दोन कालखंडात खते देतात. पहिला सुरुवातीचा 1 ते 5 वर्षांचा पालेदार वाढीचा कालावधी असतो व दुसरा काळ फळे लागण्याचा असतो. मोसंबीच्या झाडांवर वर्षातून तीनदा नवीन पालवी येऊन झाडाची वाढ होत असते. झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी आणि प्रत्येक झाडाला दिलेले क्षेत्र सुरुवातीच्या पाच ते सहा वर्षांत झाडाच्या विस्ताराने व्यापण्यासाठी अशा प्रत्येक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे खत देणे आवश्यक आहे. रासायनिक खतांची मात्रा जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत समान हप्त्यांत विभागून द्यावी. शेणखत मात्र पावसाळयाच्या सुरवातीलाच द्यावे.

झाडाचे वयशेणखत / कंपोस्ट
(किलो)
नत्र (ग्रॅम)युरिया (ग्रॅम)स्फुरद (ग्रॅम)सुपर फॉस्फेट (ग्रॅम)
1 वर्षे512025060375
2 वर्षे5240500120750
3 वर्षे103607501801125
4 वर्षे1548010002401500
5 वर्षे2060012503001875
6-9 वर्षे3072015003602250
10 वर्षांवरील50100020005003125
मोसंबी फळझाडांसाठी खतांच्या मात्रा

6 वर्षांपुढील झाडास नत्र समान हप्त्यांत विभागून द्यावा. त्यापैकी नत्राचा अर्धा हप्ता ताण संपल्यावर पूर्ण स्फुरदच्या मात्रेसोबत द्यावा आणि नत्राचा उर्वरित अर्धा हप्ता फळधारणेनंतर फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. बागेला शेणखत पावसाळ्यापूर्वी द्यावे. नत्रखतांची अर्धी मात्रा अधिक स्फुरद खताची पूर्ण मात्रा फुलोरा येण्यापूर्वी आणि नत्राची उरलेली अर्धी मात्रा फळे वाटाण्याएवढ्या आकाराची झाल्यावर द्यावी. रासायनिक खतांचा वापर करताना जमिनीचा प्रकार व झाडाचे वय लक्षात घ्यावे. शेणखताची कमतरता असल्यास हिरवळीच्या खताचा वापर करावा. यासाठी पावसाळयात ताग, मूग, इत्यादी पिके फुले येण्यापूर्वी जमिनीत गाडावीत. रासायनिक खते झाडाच्या बुंध्यापासून दूर फांद्यांच्या बाहेरील घेराच्या विस्ताराखाली आळे पद्धतीने 7 ते 10 सेंमी. खोलीवर द्यावीत.
झाडे फळधारणेला आल्यानंतर काही सूक्ष्म द्रव्यांची गरज पुरविण्यासाठी झिंक सल्फेट 0.2 ते 0.5%, मोरचूद 0.2%, मँगनीज सल्फेट 0.2 ते 0.4 %, फेरस सल्फेट 0.2 ते 0.4% आणि बोरिक अॅसिड 0.1 ते 0.2% नवीन पालवी फुटल्यावर 2 महिन्यांनी वरील रसायनांच्या एकत्रित मिश्रणाची फवारणी करावी. मिश्रण आम्लयुक्त असल्यास फवारणीपूर्वी त्यात कळीचा चुना मिसळावा.

पाणी व्यवस्थापन :

बागेला पाणी देण्याच्या पाळ्यांचे प्रमाण बागेचे वय, जमिनीचा मगदूर व हवामान यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे मध्यम प्रकारच्या जमिनीत उन्हाळयातील पाण्याची पाळी 5 ते 7 दिवसांनी व हिवाळयात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने द्यावी. सुरुवातीच्या 5- 6 वर्षांपर्यंत झाडाची वाढ पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे. पाणी देताना झाडाच्या बाहेरील फांद्यांच्या विस्ताराखालील भागातच जेथे तंतुमय मुळे आहेत तेथे गोलाकार आळे करून पाणी द्यावे. जसजसे झाड वाढत जाईल तसतसा आळयाच्या आकारही वाढावयास हवा. झाडाच्या फांद्यांचा जेवढा विस्तार असेल त्यापेक्षा थोडे मोठे आळे करून पाणी द्यावे. झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचू नये म्हणून झाडाभोवती खोडाला माती लावावी. या आळयामुळे झाडाचा बुंधा कोरडा राहतो. अन्यथा मूळकूज, खोडकूज, इत्यादी रोग वाढतात. म्हणून आळयाच्या बाहेरील भागात पाणी द्यावे. याला बांगडी (डबल रिंग) पद्धतीने पाणी देणे असे म्हणतात.

मोसंबी पिकाचा बहार धरणे :

मोसंबीच्या झाडांना फुले येऊन फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी झाडांच्या फांद्यांमध्ये अन्नद्रव्याचा साठा असणे आवश्यक आहे. अन्नद्रव्याचा आवश्यक असा साठा होण्यासाठी झाडाची होणारी नवीन वाढ थांबविणे आवश्यक आहे. ही वाढ थांबविण्यासाठी काही दिवस झाडाला पाणी देणे बंद करतात. यालाच ताण देणे असे म्हणतात. बहार येण्यापूर्वी हा ताण देतात. झाडाला फुले येण्याच्या कालावधीनुसार बहाराला नावे देण्यात आली आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत येणाऱ्या बहाराला आंबे बहार, जून-जुलै महिन्यांत येणाऱ्या बहाराला मृग बहार असे म्हणतात. आंबिया बहारासाठी डिसेंबर महिन्यात झाडांना पाणी देणे बंद करावे. नंतर 20 जानेवारीच्या सुमारास जमीन वखरून पाणी व खते देण्यासाठी आळे तयार करावे. मृग बहारासाठी मे महिन्यात पाणी बंद करून झाडांना विश्रांती द्यावी. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर खताची मात्रा द्यावी.

मोसंबी पिकातील आंतरपिके, मोसंबी पिकाची आंतरमशागत आणि मोसंबी पिकातील तणनियंत्रण :

मोसंबीची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या 4-5 वर्षांपर्यंत दोन झाडांमध्ये बरेच अंतर असल्यामुळे मधल्या जागेत योग्य प्रकारची आंतरपिके घेणे सर्व दृष्टीने फायद्याचे असते. या आंतरपिकांमुळे बागेची चांगली मशागत करता येते. शिवाय बागेत तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना आंतरपिकापासून आर्थिक फायदा होतो. आंतरपिके घेताना बागेतील जमिनीची सुपीकता कायम ठेवणे आणि त्याचबरोबर मोसंबी झाडावर अनिष्ट परिणाम होणार नाही हे पाहावे लागते. त्या दृष्टीने लवकर येणारी, उथळ मुळे असणारी व भाजीपाल्यासारखी ठेंगणी पिके घेणे सोयीस्कर ठरते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उडीद, मूग, भुईमूग, चवळी, चणा, वाटाणा, इत्यादी शेंगवर्गीय पिके घेणे फायदेशीर आहे. मिरची, टोमॅटो, कोबी, बटाटे, पपई ही पिकेदेखील आंतरपिके म्हणून घेता येतात. आंतरपिके घेत असताना त्यांच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी लागणारे खत व पाणी यांची अतिरिक्त अशी सोय करावी. आंतरपिके घेताना मूळ झाडाच्या बाहेरच्या घेरापासून 30 सेंमी. अंतर सोडून मधील क्षेत्र कमी करावे. चार ते पाच वर्षांपर्यंत ही पिके मुख्य पिकांच्या वाढीनुसार घ्यावीत.

आंतरमशागत :

मोसंबीच्या झाडांना नियमित पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे तणांचा उपद्रव वाढतो. तणे जमिनीतील अन्नद्रव्य खातात. काही बारमाही तणे उदाहरणार्थ, हरळी, नागरमोथा, इत्यादी नष्ट करणे त्रासदायक असते. यासाठी जमिनीची मशागत करणे फार आवश्यक असते. मशागत न केल्यास जमीन कडक होऊन मुळांची वाढ खुंटते. म्हणून बागेतील जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पाण्याची बचत होते. त्याचप्रमाणे जमिनीतील उपकारक सूक्ष्म जंतूंची क्रिया जलद होण्यास मदत होते. जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी बागेत 5 ते 6 वेळा वखरणी करावी. फळे तोडल्यानंतर वर्षातून एक वेळा 10 ते 15 सेंमी. खोल मशागत करावी. यासाठी शक्य झाल्यास पॉवर टिलरचा वापर करावा.

तणनियंत्रण :

लावणीनंतर बागेत हरळी, नागरमोथा, कुंदा या तणांचा प्रादुर्भाव बाराही महिने होत असतो. या प्रकारची तणे मुख्य पिकाशी जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्ये घेऊन स्पर्धा करतात. याशिवाय इतर विविध प्रकारची तणे बागेत वाढतात आणि रोग व किडींचे आश्रयस्थान बनतात. म्हणून वेळीच या तणांचा नायनाट करावा.

उपाय : बागेतील तणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वर्षातून 5-6 वेळा वखरणी करावी. पाऊस सुरू होण्यापूर्वी बागेतील सर्व प्रकारची तणे काढून घेऊन बाग स्वच्छ ठेवावी. फळे काढणीनंतर वर्षातून एकदा हलकी नांगरणी करावी.
रासायनिक तणनाशकांचा उपयोग करून तणांचे नियंत्रण करता येते. डॅलॉपान, ग्रामोक्झोन, फर्नोक्झोन ही तणनाशके अधिक उपयुक्त आणि कमी खर्चाची आहेत. पावसाळ्यापूर्वी बागेत 3 किलो डॅलॉपान 250 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. नंतर 20 दिवसांनी 1 लीटर ग्रामोक्झोन 250 लीटर पाण्यात मिसळून फवारल्यास वर्षायु तणांचा बंदोबस्त होतो.

मोसंबी पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

पाने कुरतडणाऱ्या अळया (लेमन कॅटरपिलर) :

ही अळी विशेष करून एप्रिल, जून आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पन्हेरीतील रोपांवर व मोठ्या झाडांवर आढळून येते. अळी कोवळी पाने मध्यरेषेपर्यंत कुरतडून खाते आणि पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात.

उपाय : पाने कुरतडणाऱ्या अळया ह्या बावची नावाच्या तणावर आपली उपजीविका करतात. म्हणून बागेभोवतालच्या बावची या तणाचा नाश करावा. अळयांचा उपद्रव दिसून येताच 50% प्रवाही मिथील पॅराथिऑन 10 मिली. किंवा 50% कार्बारिल भुकटी 40 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) :

ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या झाडापेक्षा पन्हेरीत जुलै ते सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ही कीड पानांतील हरितद्रव्य खात पुढे जाते आणि पानांवर पारदर्शक नागमोडी पोखरलेले चंदेरी पांढरे पट्टे दिसतात. यावरूनच ही कीड चटकन ओळखता येते. या किडीला शेंबडी कीड असेही म्हणतात.

उपाय : या किडीच्या बंदोबस्तासाठी फॉस्फॉमिडॉन 80% प्रवाही 3 मिली. 10 लीटर पाण्यात किंवा मिथील डेमेटॉन 25% प्रवाही 10 मिली. 10 लीटर पाण्यात किंवा मोनोक्रोटोफॉस 40% प्रवाही 7 मिली. 10 लीटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे. ही फवारणी दर 15 दिवसांच्या अंतराने जुलै ते सप्टेंबर आणि पुन्हा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) :

पांढरी माशी व तिची पिल्ले पानांतील रस शोषण करतात. त्यामुळे पाने निस्तेज दिसतात. झाडाचा जोम कमी होतो. याशिवाय किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट गोड पदार्थावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. यालाच कोळशी रोग असे म्हणतात. याचा झाडाच्या वाढीवर आणि फलधारणेवर विपरीत परिणाम होतो.
उपाय : या किडीच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस. सी. 20 मिली. किंवा डायमेथोएट 30 इसी 30 मिली. 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळातील रसाचे शोषण करणारा पतंग :

आंबिया बहाराच्या फळांची वाढ झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांत ह्या पतंगाचा उपद्रव होतो. हे पतंग फळांतील रसाचे शोषण करतात व फळे 34 दिवसांनी जमिनीवर गळून पडलेली दिसतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी बागेत झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे 0.05% मॅलेथिऑन हे कीटकनाशक फळांच्या रसात मिसळून आमीष तयार करून झाडाखाली टाकावे.

पिठ्या ढेकूण (मिलिबग्ज्) :

ही पांढऱ्या रंगाची कीड कोवळया फुटीतील व फळातील रस शोषून घेते व किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट-गोड पदार्थावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाची वाढ न होता उत्पादनात घट येते.

उपाय : मोनोक्रोटोफॉस 0.1% अगर कार्बारिल 0.2% फवारल्यामुळे किडीचा बंदोबस्त होतो.

मावा (अफिड्स) :

ही कीड कोवळी पाने आणि वाढणाऱ्या शेंड्यापासून रस शोषून घेते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात ही कीड जास्त आढळते. याचा झाडाच्या वाढीवर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम होतो.

उपाय : मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 20 मिली. अगर फॉस्फामिडॉन 100% प्रवाही 5 मिली. 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

झाडाची साल खाणारी अळी (इंडरबेला) :

ही अळी झाडाची साल खाते. त्यामुळे सालीतील रसवाहिन्या तुटतात. झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते. इंडरबेला या किडीचा प्रादुर्भाव झाडाच्या सालीच्या वरून जाळीप्रमाणे पसरलेल्या विष्ठेवरून ओळखता येतो. जून-जुलै महिन्यामध्ये ही कीड क्रियाशील असते.

उपाय : प्रथम जाळी करून अळीने केलेले छिद्र मोकळे करावे. या छिद्रात पेट्रोलमध्ये बुडवलेला बोळा घालून वरून मातीने लिंपावे. पेट्रोलऐवजी इ. डी. सी. टी. द्रावण वापरता येते.

खवलेकीड (स्केल इन्सेक्ट) :

ही कीड कोवळ्या शेंड्याकडील फांद्यांमधून रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकल्यासारख्या दिसतात आणि वाळून जातात. ही कीड मधासारखा चिकट-गोड द्राव बाहेर टाकते. या द्रावावर काळी बुरशी वाढून झाड काळे पडते.
उपाय : 0.1% मोनोक्रोटोफॉस किंवा 0.2% कार्बारिल पावसाळयापूर्वी आणि पावसाळयानंतर झाडांवर फवारावे.

मोसंबी पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

मूळकुजव्या रोग (रूट रॉट) :

या रोगामुळे झाडाची मुळे कुजतात. पाने निस्तेज होऊन पानांच्या शिरा पिवळचा पडतात. फांद्या आणि खोडाचा भाग काळसर दिसू लागतो. मोठ्या मुळया कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते. अशा वेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.

उपाय : उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. सेंद्रिय खते योग्य प्रमाणात देऊन नत्रयुक्त खताची मात्रा सोबत द्यावी. रोगग्रस्त झाडांच्या बुंध्याच्या भोवतालची माती काढून मोकळी करावी. सडलेल्या मुळचा काढून टाकाव्यात. मुळांच्या परिसरात 3:3:50 तीव्रतेचे बोर्डों मिश्रण किंवा 0.3% कॉपर ऑक्सिक्लोराईडचे द्रावण ओतावे.

देवी किंवा खऱ्या रोग (सिट्स कैंकर) :

या रोगाचा प्रसार दमट ओलसर पावसाळी हवामानात जास्त प्रमाणात होतो. हा रोग झॅन्थोमोनॉस नावाच्या जिवाणूंमुळे होतो. या रोगामुळे पाने, फांद्या कमजोर होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

उपाय : झाडावरील सर्व वाळलेल्या आणि रोगट फांद्या काढून नष्ट कराव्यात. 0.3% कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास रोगास प्रतिबंध करता येतो.

मर (सिट्स डायबॅक) :

या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे झाड शेंड्यापासून खालपर्यंत वाळत जाते. झाडावरील सर्व पाने गळून झाड वाळते. हा रोग होण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे जमिनीतून पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा न होणे, झाडांना पाण्याचा वाजवीपेक्षा जास्त ताण देणे, अन्नद्रव्याचा पुरवठा न होणे, ट्रीस्टिझा व्हायरस, बुरशी, सूत्रकृमी, वगैरे रोग व किडींपासून झाडांचे संरक्षण न झाल्यामुळे या रोगास झाडे बळी पडतात.

उपाय : हा रोग ज्या कारणांमुळे होण्याची शक्यता असते त्या कारणांची शहानिशा करून त्याप्रमाणे उपाययोजना करावी. रंगपूर लाईम खुंटावर डोळे भरलेल्या न्यूसेलर मोसंबीची कलमे लावावीत.

डिंक्या रोग (सिट्स गॅमॉसीस) :

हा बुरशीजन्य रोग असून झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसून येतो. साल हळूहळू लालसर रंगाची होत जाते.

उपाय : रोगट सालीचा भाग सभोवतालच्या काही निरोगी भागांसोबत चाकूने कापून टाकावा आणि कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. रोगप्रतिकारक खुंटाचा वापर करावा. 22 ते 25 सेंमी. उंचीवर डोळे बांधलेली कलमे लागवडीसाठी निवडावीत. लागवडीसाठी निचऱ्याची जमीन निवडावी. खोडाला मातीचा ढीग लावू नये. झाडांना बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. पावसाळयात झाडावर बोर्डो मिश्रण किंवा 0.1% बाविस्टीन फवारावे.

शेंड्याचा मर रोग :

या रोगामुळे झाडावरील बारीक फांद्या व शेंडे वाळून पांढरे पडतात. फांद्यांची वरील साल निघून जाते. हा रोग ‘कोलेटोट्रिकम’ नावाच्या बुरशीमुळे होतो.

उपाय : झाडांना पाण्याचा जास्त ताण दिल्यामुळे भरपूर बहार येतो. यामुळेसुद्धा झाडाचे शेंडे वाळलेले दिसतात. फळांची काढणी झाल्यानंतर झाडावरील सर्व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. प्रतिबंधात्मक स्वरूपात कॉपर ऑक्सिक्लोराईड, डायथेन एम-45 या बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात.

मोसंबी पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :

मोसंबीची लागवड डोळे बांधलेल्या कलमांपासून करतात. कलमांमधील आनुवंशिक दोष सुरुवातीला लक्षात न आल्यामुळे 5 ते 6 वर्षांनंतर बागाईतदारांना आपले नुकसान झाल्याचे दिसून येते. मोसंबीच्या फळबागांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारे दोष म्हणजे झाडांना चांगला बहार न येणे, झाडे रोगट होऊन मरणे, बारीक पानांची (किंकर पानी) झाडे निपजणे, वेलिया प्रकारची झाडेसुद्धा बऱ्याच प्रमाणात आढळतात. सर्वसाधारणपणे 15% झाडे निकृष्ट प्रकारची आढळतात. यावर उपाय म्हणून कलमांची निर्मिती शास्त्रोक्त पद्धतीने करणे आणि बागाईतदारांनी लागवडीसाठी चांगल्या खात्रीलायक ठिकाणावरून कलमांची निवड करणे आवश्यक आहे.

मोसंबी फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

फळांचा रंग फिकट हिरवा झाल्यावर फळे काढणीस तयार होतात. फळे सोयीस्कररित्या देठापासून काढावीत. फळे काढल्यानंतर प्रतवारी करून करंड्यात व्यवस्थितपणे भरावीत. चांगल्या झाडापासून 500 ते 600 फळे मिळू शकतात. फळे जास्त दिवस साठवून ठेवावयाची असल्यास 0.1% बेनलेट या बुरशीनाशकाच्या द्रावणात 3 ते 5 मिनिटे बुडवून घ्यावीत व फळांवर मेणाचे आवरण घातल्यास फळे दोन महिन्यांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात.

फळांची साठवण आणि फळे पिकविण्याच्या पद्धती :

मोसंबीची पक्क झालेली फळे तोडणीनंतर एक आठवडा चांगली राहू शकतात. मोसंबीची फळे 100 गेज सच्छिद्र पॉलिथीन पिशवीत ठेवल्यास 3-4 आठवडे चांगली राहू शकतात. दोन महिन्यांपर्यंत फळे साठवून ठेवण्यासाठी 0.1% बेनलेट अगर डॉयफॉलेटॉन या बुरशीनाशकांच्या द्रावणात फळे 3 ते 4 मिनिटे बुडविल्यास व त्यावर 6% मेणाचे आवरण लावल्यास बुरशीमुळे होणारे नुकसान थांबून फळे दोन महिन्यांपर्यंत चांगली राहू शकतात. मोसंबीची पक्व झालेली हिरवी फळे 11 ते 13 अंश सेल्सिअस तापमानात साठविल्यास फळांना हिरवट पिवळा रंग येतो.

सारांश :

मोसंबी हे फळझाड समशीतोष्ण हवामानाच्या आणि कमी पावसाच्या कोरड्या हवामानात चांगले उत्पादन देते. मध्यम प्रकारची, एक मीटर खोल असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांत तसेच औरंगाबाद व जालना या भागात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मोसंबीची जम्बेरी किंवा रंगपूर लाईम खुंटावरील डोळा बांधून कलमे लागवडीसाठी वापरतात. मोसंबीची लागवड 6 मीटर x 6 मीटर अंतरावर लावतात. मोसंबी पिकांसाठी मृग बहार आणि आंबे बहार घेतात. आंबे बहाराची फळे नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये तर मृग बहाराची फळे मार्च – एप्रिल महिन्यांत काढणीस येतात. मोसंबी झाडावरील फळांची काढणी केल्यानंतर झाडावरील वाळलेल्या रोगट फांद्या काढून झाडावर बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. वर्षातून तीन वेळा झाडावर नवीन फूट येण्याच्या वेळी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. बहार धरतेवेळी व फळे वाटाण्याएवढी असताना खताच्या मात्रा देणे आवश्यक आहे.

जाणून घ्या केळी लागवडी बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Keli Lagwad) – Banana Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )